श्रावण सगळ्या सृष्टीचं सौंदर्य ओंजळीत घेऊन येतो. अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावं, हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि व्रतवैकल्ये साजरी केली जातात.
श्रावण अधिकच जवळचा वाटतो तो माहेरवाशिणीला. माहेरवाशिणीसाठी आनंदाची पर्वणी असते. स्त्रिया उपवास, व्रते, उपासना, नामस्मरण करतात. धार्मिक पथ्ये पाळतात. व्रतवैकल्य, मंगलमय वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी १०८ बेलाची पाने शिवपिंडीवर वाहिली जातात. १०८ पाने न मिळाल्यास ७,९,११ अशी बेलाची पाने वाहतात. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिले जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्या मूग, चौथ्या जवस, पाचवा आला, तर सातू असे वाहिले जाते. श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून सोळा सोमवार व्रत केले जाते.
श्रावणातील मधुमंगल सोहळा म्हणजे मंगळागौरीचे व्रत. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती. नववधू पहिली पाच वर्षे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा करते. हे व्रत सौभाग्यवर्धक असून त्यांच्या व्रताने पतीचे आयुष्य वाढते. पूर्वी मंगळागौरीचा थाट असायचा. आता मंगळागौर तितकीशी साजरी होत नाही, तरी मानवी भावनांना फुलविणारा श्रावण मास आहे.
बुधवारी बुध पूजन, तर गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. याला बुध-बृहस्पतीचा कु ळधर्म म्हणतात. शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. जरा-जिवती-जिवंतिका अशी नावे आहेत. जिवंतिका पूजनाचे व्रत स्त्रियासुद्धा करतात. सात देवतांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते असे म्हटले जाते. शनिवारी मारुतीला तेल, काळे उडीद एकत्र करून वाहिले जाते. रविवारी आदित्य पूजन केले जाते. आदित्य पूजनाला खास महत्त्व आहे. श्रावणात आयतवार पूजन ही परंपरागत चालत आलेली एक प्रथा आहे.
श्रावणातील सात वारांना जसे महत्त्व आहे, तसे सणांनासुद्धा आहे. श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी येते. नागपंचमीला मातीच्या नागाची किंवा नागाच्या चित्राची पूजा केली जाते. या दिवशी भूतदया मंत्र जपण्याचा आणि प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यात येतो. पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. कोळीबांधवांमध्ये नारळी पौर्णिमेला फार महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी कोळीबांधव श्रीफळ वाजतगाजत नेऊन सागराला अर्पण करतात आणि सागराला प्रसन्न करून कृपादृष्टीसाठी विनवणी करतात. श्रावणी पौर्णिमेला जसे नारळी पौर्णिमा म्हणतात, तसे राखी पौर्णिमासुद्धा म्हणतात. प्राचीन काळी प्रजानन या दिवशी राजाच्या घरी जाऊन स्त्रिया त्याच्या हाताला राखी बांधत असत. राखी म्हणजे आमचे रक्षण कर असा यातील भावार्थ आहे. पुढे आपले रक्षण भावाने करावे, याकरिता बहीण या दिवशी त्याच्या हाताला राखी बांधू लागली. जैन बांधव हा दिवस रक्षा पर्व म्हणून पाळतात.
श्रावण वद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी. या अष्टमीला गोकुळाष्टमी, जन्माष्टमी, कृष्णाष्टमी अशी अनेक नावे आहेत. संपूर्ण भारतात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मथुरा, द्वारका आदी ठिकाणी या उत्सवाचा थाट असतो. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर हा सण साजरा होतो. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहिकाला साजरा केला जातो. श्रावणी अमावास्या म्हणजे बैलपोळा. बारा मास ज्याच्या जिवावर शेतकरी शेतीतून पीक काढतो, तो शेतकऱ्यांचा सोबती बैल. या दिवशी बैलाला सजवून, त्याची पूजा करून मिरवणुकीने मारुतीच्या देवळात नेतात. पोळा हा सण पूर्णपणे ग्रामीण भागातला आहे. याच अमावास्येला पिठोरी अमावास्या असेही म्हणतात. आगरी लोकांमध्ये ‘पिठोरी गौरी’ पूजा केली जाते. हे व्रत संतती देणारे असल्यामुळे बहुतांश सुवासिनीच करतात. हा दिवस ‘मातृदिन’ म्हणून पाळला जातो.
मेंदी आणि श्रावणातील अनेक सण यांचा घनिष्ठ संबंध आहे. श्रावणात धुंद निसर्गाच्या जोडीला मेंदीचा सुवास दरवळायला लागतो. मेंदी काढण्याला प्रत्येक संस्कृतीमध्ये एक वेगळा अर्थ आहे. अलीकडच्या काळात अरेबिक मेंदीच्या कलेला महिला वर्गाची पसंती जास्त आहे. मेंदीचे आकर्षण अनेक वर्षांपासून कायम आहे. कारण मेंदी सौंदर्य खुलविते.
असा हा श्रावणमास. निसर्ग आणि मानवी मनावर अधिराज्य करणारा महान मास आहे.
 सुनील कुवरे

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी