कापरेरेट जगात आपण वावरायला लागलो की हळूहळू तिथली भाषा समजायला लागते. कोणत्याही संभाषणात ‘अ‍ॅज पर कंपनी पॉलिसी’ अशी सुरूवात आणि शेवट करणारा माणूस एचआरचाच असू शकतो..

कॉलेजचे सोनेरी दिवस सरत असतानाच आम्हाला भविष्याचे वेध लागले होते. आता आपण कार्पोरेट विश्वात पदार्पण करणार ही जाणीव आम्हाला सुखावून जायची. बघता बघता कॉलेज संपलं, पण कॉलेजमधून बाहेर पडताच मनात आलेला पहिला विचार म्हणजे- ‘आता डोक्यावर कॉलेजचं छप्पर नाही’ असा होता. त्या छपराखाली आम्ही किती सुरक्षित होतो हे कॉर्पोरेट विश्वाचे चटके बसल्यावर कळलं.
मग तो सोनियाचा दिन आला आणि आम्ही कंपनीत रुजू झालो. ‘इंडक्शन प्रोग्रॅम’, ‘ट्रेनिंग सेशन’ असे करत करत भरभर दिवस पुढे जात होते. त्या काळात कंपनीच्या भव्य इमारतीपासून ते मशीनमधल्या बेचव कॉफीपर्यंत सगळ्या गोष्टींचं कौतुक वाटतं. पण नव्याच्या नवलाईचे नऊ दिवस संपले की त्याच गोष्टींचा कंटाळा यायला लागतो. कारण त्या भव्य इमारतीच्या आतमध्ये सगळं यंत्रवत सुरू असतं. आणि तिथे कॉफी मशीनलाच काय तर खुद्द माणसालासुद्धा ‘रिसोर्स’ म्हणून संबोधण्यात येते.
हळूहळू कामाला सुरुवात होते. ‘बॉस’ नावाच्या एका व्यक्तिमत्त्वाशी आपली ओळख करून देण्यात येते. मग हळूहळू ते व्यक्तिमत्त्व उलगडायला लागतं. किंबहुना हे व्यक्तिमत्त्व आपल्याला कधीच उलगडणार नाही हे आधी कळतं. कारण बॉस हे एक नसून अनेक व्यक्तिमत्त्वे असतात. पुढे आपल्या करिअरमध्ये कितीतरी बॉस भेटतात. कोणी मित्रासारखं वागवतं, कोणी अक्षरश: मुलासारखं वागवतं, कोणी फक्त कामाशी काम ठेवून म्हणजे ज्याला कॉर्पोरेट भाषेत ‘प्रोफेशनल’ असं म्हणतात तसं वागवतं, तर कोणी अगदी जन्मोजन्मीचा शत्रू असल्यासारखं वागवतं. कधी कधी तर असा प्रश्न पडतो की जेव्हा आपल्यावर बॉस होण्याची वेळ येईल तेव्हा आपण कसे असू? त्यात आपला स्वभाव जर सगळ्यांशी मिळून मिसळून राहण्याचा असेल तर हे उसनं प्रोफेशनलिझम आणायचं तरी कुठून? त्यात प्रोफेशनलिझमचा खरा अर्थ आणि कॉर्पोरेट विश्वातला अर्थ यात खूप फरक आहे.
आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असणं आणि त्यासाठी झोकून काम करणं म्हणजे प्रोफेशनलिझम!! पण कॉर्पोरेट विश्वात माझ्या व्यवसायाशी फक्त मीच प्रामाणिक आहे असं दाखवण्यासाठी झोकून काम करणं म्हणजे प्रोफेशनलिझम!!
कॉर्पोरेट विश्वात काही परवलीचे शब्द असतात.
परफॉर्मनन्स: जो दाखवत नाही तेव्हाच आपण सगळ्यांच्या नजरेत येतो.
प्रॉडक्टीव्हीटी: जी नेमकी किती आहे हे कोणीच सांगू शकत नाही.
प्रोजेक्ट : ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशा प्रकारामुळे जो नेहमीच पेटलेला असतो.
प्रोसेस : जी ठरवेपर्यंत प्रोजेक्टची वेळ संपते.
इन्क्रीमेंट : मालकाने अगदी ५१ टक्के शेअर्स जरी आपल्या नावे केले तरी जी आपल्याला कमीच वाटते.
टीम : ज्यांत सगळेच कप्तान असतात.
तशा कॉर्पोरेट विश्वात गमतीजमती भरपूर असतात. व्यक्तिनिरीक्षणाचा छंद असणाऱ्यांसाठी तर ते ‘विरंगुळा केंद्र’ ठरू शकतं. उदाहरणार्थ, समोरची व्यक्ती कोणत्या विभागातली आहे हे त्याच्या बोलण्यावरून ओळखता येतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर ‘दुपारी चारनंतर या’ असं मिळालं तर आपण ‘अकाऊंट डिपार्टमेंट’ला आहोत हे ओळखावं. आणि त्यानंतरही तुम्ही प्रश्न विचारण्याचा मूर्खपणा केलाच तर, ‘तुम्हाला कळत नाहीये का मी काय बोलतोय?’ असं उत्तर मिळेल. आपण समजदार असलो तर दुपारी चारनंतरसुद्धा तिथे जाणार नाही.
किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर, ‘अ‍ॅज पर कंपनी पॉलिसी’ असं मिळालं तर समोरची व्यक्ती ही एचआरच असू शकते. एचआर लोकांसाठी ‘कंपनी पॉलिसी’ हे पुस्तकं बायबलपेक्षा महत्त्वाचं असतं. गंमत म्हणजे त्यांनी कधी बायबलही वाचलेलं नसतं आणि कंपनी पॉलिसीपण वाचलेली नसते. पण कोणत्याही गोष्टीला अडवणं हीच आपल्या कंपनीची पॉलिसी आहे अशी त्यांची ठाम समजूत असते.
आपलं एखादं महत्त्वाचं काम घेऊन आपण कोणाकडे गेलो आणि ते काम झालं असं तर कधीच होत नाही. अशा वेळी, ‘मी आत्ता खूप बिझी आहे. मी आत्ता काहीच करू शकत नाही’ असं उत्तर मिळाल्यास आपण ‘डिझाईन डिपार्टमेंट (टेक्निकल सेल) ला आहोत हे ओळखावं. पण थोडं लक्ष देऊन तो बिझी असणारा माणूस नेमकं काय करतोय हे बघितल्यास कळेल की काल केलेलं चुकीचं काम तो आत्ता परत करतोय. कारण त्यासाठी आत्ताच त्याच्या बॉसनं त्याला झाप झाप झापलाय!!
मग आपलं अपूर्ण राहिलेलं काम घेऊन आपण दुसऱ्या कोणाजवळ गेलो की, ‘तू मला काय विचारतोय? माझा काय संबंध?’ असं उत्तर मिळेल. हे उत्तर देणारा माणूस हा कंपनीतला सगळ्यात दु:खी माणूस असतो. कारण त्याचा नेमक्या कोणत्या कामाशी संबंध आहे हे त्यालाही माहिती नसते.
आपल्या एखाद्या समस्येचं उत्तर जर , ‘मी हे आधीच सांगितलं होतं. त्या वेळी माझं कोणी ऐकलं नाही’ असं मिळालं तर आपण ‘क्वालिटी कंट्रोल’ मध्ये आहोत. या लोकांना सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना असते. पण यांची भूमिका ही नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणासारखी तटस्थ असते.
मग हळूहळू सगळे विभाग फिरून आपण प्रोजेक्ट मॅनेजरकडे येतो. आपली समस्या ऐकून तो कुत्सितपणे हसतो. आणि, ‘अरे १८५७ च्या उठावात आम्ही..’ अशा सुरात सुरुवात करून सगळा इतिहास-भूगोल आपल्यासमोर मांडतो, पण नेमका आपला प्रश्न अनुत्तरितच राहतो. या व्यक्तीला भूतकाळ आणि भविष्यकाळातच राहायला आवडतं. वर्तमानकाळ त्याच्या गावीच नसतो.
बिचारे आपण!! समस्या अजूनही सुटलेली नसल्यामुळे शेवटी आपल्या बॉससमोर सगळी कैफियत मांडतो. मग बॉस आपण काय करायला हवं होतं हे सांगतो. अचानक आपल्याला श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन घडतंय असं जाणवायला लागतं. आणि त्या विश्वरूपापुढे आपलं अस्तित्व, आपलं ज्ञान किती नगण्य आहे याची जाणीव होऊन निराश मन:स्थितीत आपण घरी जातो.
अशा कितीतरी वल्ली इथे रोज भेटतात. स्वत:विषयी कितीतरी गैरसमज घेऊन लोक इथे वावरतात. काही लोकांना कंपनीची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे असं वाटतं. जणू काही यांनी काम करणं बंद केल्यावर दुसऱ्याच दिवशी कंपनीला टाळं लागणार आहे. काही लोक तर सतत, ‘सध्या मार्केटमध्ये मंदी आहे म्हणून नाहीतर केव्हाच लाथ मारली असती या कंपनीला!!’ अशा आविर्भावात असतात. जणू काही मार्केट तेजीत आल्यावर मुकेश अंबानी स्वत: यांच्यासाठी पायघडय़ा घालणार आहे. आणि अझीम प्रेमजी यांच्यासाठी देवाला साकडं घालणार आहे!!! काही लोक सतत आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची कैफियत मांडत असतात. कंपनीची प्रत्येक गोष्ट ही आपल्याला त्रास देण्यासाठीच आहे अशी त्यांची समजूत असते. म्हणजे अगदी यांच्या डोक्यावरचे पंखे जरी बंद झाले तरी आपल्याला गर्मी व्हावी म्हणून मुद्दाम असं केलंय असं त्यांना वाटतं. तर काही लोकांना कंपनीतल्या आतल्या बातम्या आपल्यालाच कशा माहिती असतात हे सांगण्यात अभिमान वाटतो. जणू काही कंपनीचा मालक आणि हे रोज एकाच कपातून चहा पितात!!
या सगळ्यात आणखी एक जमात असतेत, ती म्हणजे प्रामाणिकपणे आपलं काम करणाऱ्यांची. पण या बिचाऱ्यांची परिस्थिती नेहमीच इकडे आड अन् तिकडे विहीर अशी असते. कारण कधीतरी पाणी लागेल या आशेने ते विहीर खोदत राहतात. आणि पाणी लागल्यावर इतर लोक त्यात हात धुवून घेतात. पण या बिचाऱ्यांच्या हाताला कोणी पाणीही लागू देत नाही आणि त्या खोल विहिरीतून बाहेर पडायला त्यांना कोणी हातसुद्धा देत नाही. शिवाय विहिरीतून बाहेर पडलेच तर पुढे काय हा प्रश्न तर कायम असतोच!!
तसं पाहता खरं विश्व आणि कॉर्पोरेट विश्व सारखंच असतं. फरक असला तर तो एवढाच की खऱ्या विश्वातली एंट्री आणि एक्झिट आपल्या हातात नसते. आणि कॉर्पोरेट विश्वातली एंट्री आणि एक्झिट बऱ्याच अंशी आपल्या हातात असली तरी त्याचा काही उपयोग नसतो. हे वाक्य लिहिताना कुठेतरी वाचलेल्या दोन ओळी मला आठवताहेत.
‘‘जहर दे के वो
फरमाते हैं के पीना होगा,
जहर पीता हूं तो
कहते हैं कि जीना होगा!!’’