01sulakshanवर्ल्ड कप सुरू झाला आणि अनेक तर्क-वितर्काना वाचा फुटली. कोणता संघ उपांत्य फेरीत जाणार, कोण उत्तम खेळणार, कोणता संघ परत घरी जाणार; असे अंदाज बांधले जाऊ लागले. पण, हे अंदाज नेहमी खरे ठरतीलच असं नाही.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता खूप रंगात आली आहे. वेस्ट इंडिज व बांगलादेश यांचा अपवाद वगळता कसोटी दर्जा लाभलेल्या संघांनी या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली आहे. त्यांच्याबाबतचे निकाल अपेक्षेनुसार लागत असले तरीही या स्पर्धेतही अनेक अनपेक्षित व धक्कादायक निकाल पाहावयास मिळाले आहेत.
या स्पर्धेच्या विजेतेपदाचे दावेदार मानल्या गेलेल्या संघांपैकी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत यांनी अपेक्षेनुसार विजय मिळवीत बाद फेरीत स्थान मिळविले आहे. कसोटी दर्जा लाभलेल्या संघांपैकी पाकिस्तान, श्रीलंका यांनीही बाद फेरीच्या दिशेने कूच केली आहे. मात्र विजेतेपदाचे भक्कम दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा आपण ‘चोकर’ असल्याचे सिद्ध केले आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत खूपच अनपेक्षित कामगिरी पाहावयास मिळत आहे. क्रिकेटचे माहेरघर मानल्या गेलेल्या इंग्लंड संघावर पुन्हा एकदा अन्य संघांकडून शिकण्याची वेळ आली आहे. या संघांच्या तुलनेत आर्यलड संघाची कामगिरी सुखद धक्का देणारी आहे. सहयोगी संघ असूनही आपण कसोटी दर्जाचेच आहोत असाच प्रत्यय ते देत आहेत.
या स्पर्धेच्या स्वरूपाविषयी खूप काही बोलाबाला होत आहे. केवळ दोन सामने जिंकणारा संघही बाद फेरीत स्थान मिळवू शकेल अशीच व्यवस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली असावी. मात्र त्या प्रयत्नात स्पर्धेतील बाद फेरीविषयी चुरस राहत नाही व चाहत्यांनाही त्याचा निखळ आनंद घेता येत नाही. साखळी सामन्यांमध्ये शेवटपर्यंत उत्कंठा राहावी या दृष्टीने स्पर्धेच्या स्वरूपात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे.
आफ्रिकेचे खेळाडू यंदा आपल्यावर असलेला ‘चोकर’चा शिक्का पुसून काढतील अशी अपेक्षा होती. मात्र भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारताना पुन्हा त्यांनी आपला तोच गुण सिद्ध केला आहे. आफ्रिकेचा संघ कागदावरच बलाढय़ आहे हे यंदा प्रकर्षांने दिसून येत आहे. एकखांबी तंबू अशीच त्यांची अवस्था होत आहे. अब्राहम डिव्हिलियर्स याचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य खेळाडूंविषयी खात्री देता येत नाही. सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी सर्व खेळाडूंची एकत्रित कामगिरी आवश्यक आहे. तसे झाले नाही तर त्यांना बाद फेरीत खूपच जड जाणार आहे.
भारतास विंडीजविरुद्ध विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले हे एका दृष्टीने बरेच झाले. ठेच लागल्यानंतर पुढचे पाऊल टाकताना माणूस चार वेळा विचार करतो. विंडीजचे सात फलंदाज शंभर धावा होण्यापूर्वीच बाद झाल्यानंतर आपल्या गोलंदाजांनी खेळावरील नियंत्रण गमावले. त्यानंतर त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. विंडीजच्या शेवटच्या तीन फलंदाजांनी जवळजवळ शंभर धावांची भर घातली. त्यांनी आणखी २०-२५ धावा केल्या असत्या तर कदाचित आपण हा सामना गमावला असता. फलंदाजी व क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्यास अजून भरपूर वाव आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत काही बदल करण्याची आवश्यकता आहे. रोहित शर्मा हा lp41परदेशातील खेळपट्टीवर सलामीस अपयशी ठरत आहे. त्याच्याऐवजी सलामीस अजिंक्य रहाणे याला पाठविणे योग्य होईल व रोहित चौथ्या क्रमांकावर योग्य आहे. स्विंग गोलंदाजीपुढे रोहितचे पाय हलत नाहीत. एकेरी व दुहेरी धावा काढण्यातही तो कमकुवत आहे. बाद फेरीसाठी हा कमकुवतपणा धोकादायक ठरू शकतो. शेवटच्या फळीत भरवशाचा फलंदाज नाही. रवींद्र जडेजाऐवजी स्टुअर्ट बिन्नी याला संधी देणे उचित ठरेल. स्टुअर्ट हा उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे हे त्याने अनेक वेळा सिद्ध केले आहे. न्यूझीलंडमध्ये स्विंग गोलंदाजीस पोषक वातावरण व खेळपट्टी असते. अशा खेळपट्टीवर तो उपयुक्त होईल. फलंदाजीबाबत जडेजापेक्षा तो जास्त भरवशाचा फलंदाज आहे. संघात जडेजा नसला तरी सुरेश रैना, रोहित शर्मा, विराट कोहली हे बदली व पर्यायी गोलंदाज म्हणून वापरता येतील. फलंदाजीत रविचंद्रन अश्विन याला बढती दिली तर अधिक योग्य होईल. विंडीजविरुद्ध केलेल्या खराब क्षेत्ररक्षणापासून भारतीय खेळांडूंनी बोध घेतला पाहिजे. बाद फेरीत अशा चुका खूप महागात ठरण्याची शक्यता आहे. एखादे जीवदानदेखील सामन्याचा निकाल आपल्याविरुद्ध जाण्यासाठी महागडे होऊ शकते.
पाकिस्तान व वेस्ट इंडिज हे अत्यंत बेभवरशी संघ आहेत. दोन्ही संघांमधील खेळाडू अजूनही झगडत आहेत. मिसबाह उल हक याचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांमध्ये सातत्य नाही. युनूस खान याला मधल्या फळीतच खेळविणे योग्य आहे. एकाच वेळी तीन डावखुरे द्रुतगती गोलंदाज असणे हे पाकिस्तानच्या संघाचे वैशिष्टय़ आहे. उमर अकमल या तात्पुरत्या यष्टीरक्षकास खेळविण्याचा फटका त्यांना पहिल्या दोन सामन्यांमध्ये बसला आहे.
वेस्ट इंडिज संघातील खेळाडूला आपण राजे असल्याचेच वाटत असते. विशेषत: ख्रिस गेल हा स्वत:ला सम्राट मानत आहे. एकेरी धावा काढणे हे आपल्या तत्त्वात बसत नाही असेच त्याला वाटत असावे. बेभरवशी फलंदाजी ही वेस्ट इंडिजची मोठी अडचण आहे. क्षेत्ररक्षणात त्यांच्या खेळाडूंना भरपूर शिकण्यासारखे आहे.
मला सर्वात भावला तो आर्यलडचा संघ. त्यांच्या खेळाडूंना इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. मात्र कौंटी स्पर्धेत इंग्लंडचे खेळाडूही खेळत असतात. असे असले तरी इंग्लंडच्या खेळाडूंपेक्षाही आर्यलडच्या खेळाडूंमध्ये सातत्य जाणवत आहे. तो अतिशय समतोल संघ आहे. अन्य सहयोगी संघांमधील खेळाडूंनी त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्याकडे खोलवर फलंदाजी आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. सव्वातीनशे धावांपेक्षा जास्त धावांचे लक्ष्य साध्य करणे ही सोपी गोष्ट नाही. तरीही केवळ जिद्दीस कामगिरीची जोड देत त्यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले.
इंग्लंडमधील साहेबांचा खेळ म्हणून क्रिकेटची लोकप्रियता आहे. त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे फलंदाज व गोलंदाज आहेत. असे असूनही त्यांना अजूनही बरेच काही शिकण्याची गरज आहे. आर्यलडच्या खेळाडूंकडूनही त्यांनी बोध घेतला पाहिजे. कौंटीमध्ये खरं तर इंग्लिश खेळाडूंना अन्य देशांमधील खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळते, मात्र ही अनुभवाची शिदोरी ते घरीच विसरतात की काय असे वाटते.
श्रीलंकेची गाडी डिझेल इंजिनाची आहे. हळूहळू त्यांची गाडी तापत आहे. त्यांच्याकडे ‘दादा’ फलंदाज आहेत. दिलशान तिलकरत्ने, महेला जयवर्धने व कुमार संगकारा या तीन खेळाडूंनी मिळून प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये चाळीस हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ते अतिशय ‘कॉपीबुक’ खेळाडू आहेत. त्यांच्याकडून अन्य युवा फलंदाजांना बरेच काही शिकता येईल. मात्र त्यांच्या फलंदाजीस साजेशी गोलंदाजी सध्याच्या संघात नाही हे आतापर्यंत जाणवले आहे.
न्यूझीलंड संघाने आतापर्यंत मिळविलेले दिमाखदार यश पाहून मला १९९२ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील मार्टिन क्रो याच्या नेतृत्वाखालील त्यांच्या संघाची आठवण झाली. तेव्हादेखील त्यांच्या संघाने साखळी सामन्यांमध्ये सतत यशाची चढती कमान ठेवली होती. उपांत्य फेरीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आताही त्यांचे खेळाडू ‘ब्रँड’ क्रिकेट खेळत आहेत. ब्रँन्डन मॅकलम व केन विल्यमसन हे पिंचहिटरचे काम करीत आहेत. विल्यमसन हा क्रिकेट इतिहासातील अत्यंत महान खेळाडू होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने मारलेला विजयी षटकार अतिशय संस्मरणीय होता. न्यूझीलंडचा संघ अतिशय समतोल आहे. प्रौढ वयातही अत्यंत हुकमी फिरकी गोलंदाज म्हणून डॅनियल व्हिटोरी चमक दाखवत आहे. तो जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियाची कामगिरी संभाव्य विजेतेपदास साजेशी होत आहे. त्यांचा ग्लेन मॅक्सवेल हा ‘मॅचविनर’ म्हणून कामगिरी करण्यात पटाईत आहे हे त्याने दाखवून दिले आहे. त्यांच्या फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांनीही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कर्णधार मायकेल क्लार्क याला अपेक्षेइतका सूर सापडलेला नाही. निर्जीव खेळपट्टीवर अनेक वेळा फिरकी गोलंदाज चांगले यश मिळवू शकतात. बाद फेरीत त्यांना प्रभावी फिरकी गोलंदाजाची उणीव भासण्याची शक्यता आहे. या दृष्टीने त्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
बांगलादेशचा संघ अत्यंत लाडावलेला संघ आहे असेच म्हणावे लागेल. त्यांच्या तुलनेत आर्यलडचा संघ खूपच उजवा आहे. अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती यांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांमध्ये प्रत्येक संघाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. साखळी सामन्यांमध्ये झालेल्या चुका पुन्हा बाद फेरीत झाल्या तर अशा संघांना घरचा रस्ता पकडावा लागेल. एखादी गंभीर चूकही सामन्यास कलाटणी देणारी असते. हे ओळखूनच प्रत्येक संघास बाद फेरीतील सामने पूर्ण ताकदीनिशी खेळावे लागणार आहेत. तेथेच चाहत्यांना क्रिकेटचा निखळ आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
सुलक्षण कुलकर्णी