0shitalआषाढ महिन्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठिकठिकाणी नृत्य, संगीत विद्यालयांमध्ये ‘गुरुपौर्णिमेच्या’ कार्यक्रमांची रेलचेल सर्वत्र बघायला मिळते. शिष्यगण गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यातून काही तरी नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. विद्यार्थ्यांचा हाच प्रयत्न ते गुरुचरणी ‘गुरुदक्षिणा’ म्हणून अर्पण करतात.
परवा डोंबिवलीमध्ये तबलागुरू प्रवीण करकरे यांच्या तबला वर्गाच्या गुरुपौर्णिमेला जाण्याचा योग आला. दोन दिवस संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवसाची सांगता ‘फ्यूजन’ने करण्यात आली. तबला, सतार, कीबोर्ड, कहोन, जेंबे वाद्ये आणि त्याच्या बरोबरीने कथक नृत्य असे त्या फ्युजनचे स्वरूप होते. ज्येष्ठ सितारवादक पंडित रवींद्र चारी यांची ‘मायरा’ ही रचना दोन नृत्यांगना आणि वादकांनी फ्युजनच्या माध्यमातून सदर केली. त्याची नृत्यसंरचना ही मानसी देशपांडे ह्यांनी केली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाणवलं की खरंच फ्युजन ही संकल्पना लोकप्रिय आहेच परंतु दोनपेक्षा अधिक कलाकार त्या निमित्ताने एकत्र येतात, विचारांची देवाण-घेवाण करतात आणि सतत काही तरी नवीन करण्यासाठी जोमाने काम करताना दिसतात.
कोणत्याही दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर त्या दोन्ही गोष्टींचे ‘स्वत्व’ टिकवून त्यातून होणारी नवनिर्मिती म्हणजे ‘फ्यूजन’ असे म्हणता येईल. सध्याचा जमाना हा ‘फ्यूजन’चाच आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत, कपडय़ांच्या बाबतीत आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला याची उदाहरणे बघायला मिळतातच; परंतु या सगळ्यामध्ये ‘नृत्य’ही कुठे कमी नाही. नृत्याच्या बाबतीत फ्युजन हे दोन व अधिक नृत्यशैलींचे असू शकते किंवा संगीत आणि नृत्याचे असू शकते.
मुळात ‘फ्यूजन’ ही संकल्पना वाढीस का लागली कारण प्रेक्षकांना काही तरी नवीन पाहण्याची आणि अर्थातच स्वत: कलाकाराला सतत नवीन काही तरी प्रयोग करण्याची इच्छा असते. यामुळे कॉस्च्युम डिझाइनमध्येसुद्धा खूप प्रयोग करता येतात. पारंपरिकपेक्षा हटके परंतु अभिरुची जपणारा तरीही आकर्षक अशा पोशाखाची निर्मिती होऊ शकते. दोन भिन्न क्षेत्रांतील उत्तम कलाकारांचे उत्तम काम जर एकमेकांत मिसळले गेले तर त्यातून निर्माण झालेली कलाकृती निश्चितच उजवी असेल. अर्थात यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते. किंबहुना फ्युजन प्रस्तुत करताना नेहमीपेक्षा जास्त विचार करून काम करण्याची जबाबदारी असते. केवळ दोन गोष्टी एकत्र करायच्या आणि त्याला ‘फ्यूजन’ म्हणायचे हे योग्य नाही. यासाठी खूप संगीत ऐकायला हवे, विषय नीट समजून घ्यायला हवा कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन्ही गोष्टींचे स्वत्व टिकून राहणे महत्त्वाचे आहे.
आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी ‘फ्यूजन’चे प्रयोग केले आहे आणि ते यशस्वीसुद्धा झाले आहेत. सत्यजित तळवलकर, रवींद्र चारी, निलाद्री कुमार. पं. विजय घाटे, राकेश चौरासिया, आदित्य कल्याणपूरकर, अभिजित पोहनकर ‘फ्यूजन’चे विविध प्रयोग करताना दिसतात. ही सर्व मंडळी ‘फ्यूजन’मध्ये का रमतात? लोकांना आवडते म्हणून की शास्त्रीय संगीताच्या मैफिलीपेक्षा यात काही तरी जास्त आहे म्हणून?
या विषयावर सध्याच्या काळातील काही आघाडीच्या कलाकारांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या मानसी देशपांडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘फ्युजन’वर काम करताना वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आल्यामुळे आपले अखंड शिक्षण चालू असते. उदा. गिटार आणि बास गिटार यातला फरक मला ‘फ्यूजन’साठी काम केल्यामुळे कळायला लागला. ड्रम, तबला, बासरी यातील बारकावेही यामुळेच लक्षात आले. मानसीताई पुढे म्हणाल्या की, ‘‘अर्थातच माझा कल पारंपरिक नृत्याकडे जास्त आहे तरीही ‘फ्यूजन’मुळे नृत्यातील अनवट जागा शोधायची सवय लागली.’’ पुढे मानसी ताई म्हणाल्या की, ‘‘नृत्य आणि संगीत असं फ्यूजन असेल तर ते संगीत तुम्ही सारखं सारखं एवढय़ा वेळेला ऐकायला हवं की त्यातले बारकावे तुमच्या लक्षात येतील आणि मग नृत्याशी त्याची सांगड कशी घालायची हे कळेल.’’
‘फ्यूजन’साठी काम करणाऱ्या अजून एक आघाडीच्या कलाकार अमृता गोगटे-परांजपे म्हणाल्या की, ‘फ्यूजनमध्ये दोन गोष्टींचे असे बेमालूम मिश्रण झाले पाहिजे की त्यातून त्या दोन गोष्टी वेगळ्या दाखवणे अशक्य व्हावे. जसे की
पं. उदयशंकरजी. मी स्वत: रॉकी
पूनावालासारख्या कलाकाराबरोबर काम करताना कथक, साल्सा आणि हिपहॉप अशा तीन भिन्न शैलींचे फ्यूजन केले जे अतिशय आव्हानात्मक परंतु अतिशय मजेशीर होते. कथक तर अशी शैली आहे की ती कोणत्याही शैलीशी जुळवून घेऊ शकते.’’
याच क्षेत्रात काम करणारा तरुण, तडफदार युवा कलाकार म्हणजे पवित्र भट. पवित्र म्हणतो की, ‘‘भरतनाटय़म्शिवाय इतर कोणत्याही शैलीची ओळख करून घ्यायला मला फार आवडते. जेव्हा मी इंडोनेशियातील कलाकारांबरोबर काम केले आणि त्यांच्या नृत्यातील बारकावे जाणून घेतले तेव्हा मला स्वत:च्याच नृत्य संरचना करताना त्याकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी लाभली. अर्थात तरीही माझा कल पारंपरिक नृत्याकडेच जास्त असेल.’’
अखेरीस आपण असे म्हणू शकतो की, कोणत्याही क्षेत्रातील पारंपरिक रचना या कायमस्वरूपी राहणारच आहे तरीही फ्यूजनमुळे या सर्व गोष्टींना एक वेगळा आयाम लाभू शकतो, ज्यामुळे कलाही पुढे जाते आणि निखळ आनंदही प्राप्त होतो.
शीतल कपोले – response.lokprabha@expressindia.com