दांडिया आणि इतरही नृत्यप्रकार फक्त सणावाराला न करता रोज गच्चीवर, दिवाणखान्यात, बागेत एकटय़ानेच नाच केला किंवा जमलं तर चार-सहा जणांनी मिळून रोज तासभर सांघिक नृत्य केलं तर त्यातून व्यायाम तर घडेलच. त्याचे फायदे लाभतील.

राघवच्या पन्नासाव्या वाढदिवसाला त्याचे शाळेपासूनचे मित्र जमले होते. गप्पा चालू असतानाच कुणीतरी भिंतीवरच्या जाळीदार तोफांतून गगनभेदी गाणेफेक सुरू केली. टक्कल- चष्मे- सुटलेली पोटं घेऊन मंडळी घुमायला लागली. त्यांच्या संसारी बायका घट्ट आंबाडा-मोठं कुंकू- चोपून नेसलेली साडी अशा काकूबाई अवतारात आल्या होत्या. पण ‘मुंगळा, मुंगळा’ चावल्यावर ‘लैला मैं लैला’ त्यांच्याही अंगात आली. एरवी ट्रेडमिलवर पंधरा मिनिटं चालल्यावर थकून जाणारी ती मंडळी पुढचे दोन-तीन तास बेभान नाचली.
विशी-पंचविशीचा पदन्यास पाऊलभर पुढेच असतो. हिंदी सिनेमातल्या आयटेम साँग्जची जशीच्या तशी नक्कल पेश करणं हा तरुणाईचा खास हुनर आहे. तशा नाचांमुळे बहुतेक बहुरंगी कार्यक्रम आता फक्त नाचरंगीच व्हायला लागले आहेत. टीव्ही, कॉम्प्युटर, अभ्यास वगैरे उद्य्ोगांत रमणारी ती बैठी पिढी घट बसले की उठते आणि टिपऱ्या घेऊन नवरात्रभर ठुमकते. ज्यांच्या खिशांना परवडतं त्यांना परीक्षांचे निकाल- सण- वाढदिवस साजरे करायला डिस्को-जॅझ-सालसाची साथ लागते. नाटक-सिनेमापेक्षाही नाच हे सांघिक विरंगुळ्याचं अधिक लोकप्रिय साधन झालं आहे.
तरी व्यायामशाळा-जिम वगैरेंना जे आदराचं स्थान असतं ते अद्याप त्या विरंगुळ्याच्या नाचाला लाभलेलं नाही. नाचामुळेही व्यायाम होतो. त्यानेही कॅलरीज खर्ची पडतात. वजन घटतं. रक्तदाब, रक्तातली साखर-कोलेस्टेरॉल यांचं प्रमाण कमी होतं. हृदय-फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. सांध्यांचं, स्नायूंचं चलनवलन वाढतं. व्यायामाने होणारे सगळे फायदे मिळतात. तसं पाहिलं तर सध्या शिष्टसंमत असलेला एरोबिक एक्झरसाइझ हाही एक प्रकारचा नाचच असतो. तरी बहुजन समाजाच्या विरंगुळ्याचा नाच कमी लेखला जातो.
विरंगुळ्याच्या नाचाला बहुधा सातत्याची आणि अभ्यासाची जोड नसते. सिनेमातल्या आयटेम साँगच्या मागे तो पेश करणाऱ्या नटीची आयुष्यभराची तपश्चर्या असते. लहानपणापासून कथक-भरतनाटय़म् शिकताना एकेका सांध्याच्या आणि स्नायूच्या हालचालींवर नियंत्रण मिळवायला कित्येक दिवस श्रम घेतलेले असतात. प्रत्येक हालचाल म्हणजे काय किमया आहे ते समजल्यावर ती वापरण्याचा आणि पूर्ण शरीराच्या एकत्रित हालचालींतून भावना व्यक्त करण्याचा उत्सव म्हणजे तो नाच. त्याची महती समजून न घेता केवळ गंमत म्हणून त्याची नक्कल केली तर शरीरावर भलता ताण येऊन दुखापत होऊ शकते. सांधे प्रमाणाबाहेर वाकवल्याने, बोटांच्या टोकांवर अधिक काळ नाचल्याने, उडय़ा मारताना गुडघ्यांची जाणीवपूर्वक काळजी न घेतल्याने कायमचं नुकसान होऊ शकतं. व्यायामाची नेहमीची सवय नसताना अचानक एक दिवस सतत दोन-तीन तास नाचल्याने होणारे कष्ट झेपवणं हृदयाला अवघड जातं.
हल्ली अनेक तरुण व्यवस्थित गुरूकडून नाच शिकतात. तशा परिश्रमाने नाच शिकल्यावरही तो पेश करण्यात संयम आणि तारतम्य बाळगणं महत्त्वाचं असतं. अनेक वेळा यशाच्या हव्यासाने भरीला पडून आणि चढाओढीने इरेला पेटून ते पथ्य पाळलं जात नाही. अॅनिमेशन-सिनेमावाले नर्तकांना एक मार्कर्सवाला अंगरखा वापरायला देतात. त्याने नर्तकाच्या नाचत्या शरीराच्या वेगवेगळ्या पवित्र्यांतल्या प्रतिमा मिळवता येतात. त्या प्रतिमांची एमआरआयशी सांगड घालायचं तंत्र आता येतं आहे. त्या तंत्राने नाचताना उद्भवणारे ताणबिंदू नेमके हेरता येतील. त्यानुसार नृत्यपद्धतीत सुधारणा केली की दुखापत टळेल.
व्यावसायिक नृत्य सादर करणारा कलाकार कधी कधी अगतिक असतो. विठाबाई नारायणगावकरांना प्रसूत झाल्या झाल्या तडक जाऊन तमाशात नाचावं लागलं. ‘खेळ चालू राहिलाच पाहिजे’ हे ब्रीद पाळताना गावोगाव होणारी भटकंती; भटक्या, अस्थिर जीवनातली सततची अशाश्वती आणि रोजच्या वणवणीत विश्रांतीकडे-खाण्यापिण्याकडे होणारं दुर्लक्ष आणि लागणारी व्यसनं प्रकृतीला पोखरत जातात. तशा दगदगीमुळे कित्येक व्यावसायिक नर्तकांना वयाच्या तिशीला निवृत्ती पत्करावी लागते. सत्तरीपर्यंत नाचणाऱ्या सितारादेवी आणि पंचाहत्तरीला समर्थपणे नृत्यदिग्दर्शन करू शकणारे पंडित बिरजू महाराज विरळा.
पण स्वत:च्याच मनोरंजनासाठी केलेल्या नृत्यात जबरदस्ती, चुरस, अगतिकता नसते. त्यामुळे दुखापतीचा धोका सहज टाळता येतो. त्यात साचेबंद एरोबिक व्यायामासारखी रूक्ष कवाईत नसते. ते आनंददायी, उत्स्फूर्त नृत्य असतं. उत्स्फूर्त नृत्य हा फक्त माणसातच आढळणारा गुण आहे असं उत्क्रांतीबद्दलच्या संशोधनात दिसून आलं आहे. मोर नाचतो तो लांडोरीच्या वरपरीक्षेत पास व्हायला. मधमाश्या नाचतात त्या इतर मधमाश्यांना अन्नाचा नेमका पत्ता सांगायला. तो नाच त्यांच्या कर्तव्याचा भाग असतो. संगीताच्या तालावर, देहभान विसरून, स्वत:च्याही नकळत आनंदाने थिरकतो तो फक्त माणूस.
त्यासाठी माणसाच्या मेंदूतले तीन विभाग काम करतात. कानाकडून मेंदूकडे जाणाऱ्या ‘ऐकीव’ संदेशांच्या वाटेवरचा एक टप्पा लहान मेंदूला संगीताचा ठेका कळवतो. लहान मेंदूचा एक भाग त्या ठेक्यावर हालचालींसाठी ताल धरतो. मोठय़ा मेंदूतला एक खास विभाग नाचाच्या प्रत्येक हालचालीचा शरीराच्या आकृतिबंधातला योग्य संदर्भ ठरवतो. त्या तीन भागांमध्ये माहितीची देवाणघेवाण होते आणि स्नायूंना हालचालींचे आदेश परस्पर दिले जातात. त्या नृत्यदिग्दर्शनाची जाणत्या-जागत्या मेंदूला चाहूल लागण्यापूर्वीच पायांनी- बोटांनी ताल धरलेला असतो, शरीर ठुमकायला लागलेलं असतं.
कॅनडाचं मॅकमास्टर विद्यापीठ आणि इंग्लंडचं शेफिल्ड विद्यापीठ या दोघांत मिळून, एफएमआरआय हे प्रगत तंत्रज्ञान वापरून हा मेंदूचा अभ्यास केला गेला.
बोलण्या-लिहिण्याचं खातं डाव्या मेंदूकडे असतं, तर अभिनयातून मनोगत व्यक्त करायचं काम उजव्या मेंदूच्या अखत्यारीत असतं. सांघिक नाचात दुसऱ्याची मनोभूमिका त्याच्या देहबोलीवरून समजून घेत आपली प्रतिक्रिया हावभावांतूनच त्याच्यापर्यंत पोहोचवायची असते. साचेबंद नाचात ती देवाणघेवाण पाठ करावी लागते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. पण उत्स्फूर्त नृत्यात, जिथे आधीपासून काही ठरलेलं नसतं तेव्हा क्षणाक्षणाला भिडूचा पवित्रा बदलत असतो. नव्या अनपेक्षित माहितीवरून नवे तात्कालिक निर्णय घ्यावे लागतात. म्हणजेच क्षणोक्षणी बुद्धीला चालना मिळते. सांघिक नृत्यात संगीत, देहबोली, शरीराचं भान, तोल सांभाळणं यांचा समावेश असतो. त्या सगळ्या माहितीचं विश्लेषण करायला डावा मेंदू, हावभावांसाठी उजवा मेंदू, स्नायूंच्या आणि सांध्यांच्या संतुलनासाठी लहान मेंदू आणि हालचाली थरथरत-अडखळत न होता सफाईदार व्हाव्या म्हणून मेंदूच्या बुडाजवळची केंद्रं असे अनेक भाग नृत्यासाठी सतत कार्यरत राहावे लागतात. जेव्हा सगळा मेंदू असा खडबडून जागा होतो तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या भागांत नवाच संवाद सुरू होतो. प्रत्येक गोष्ट अनेक नव्या दृष्टिकोनांतून दिसते आणि नवेच अर्थ ध्यानात येतात. हेच लॅटरल थिंकिंग! उत्स्फूर्त नर्तनामुळे विचारांना नव्या दिशा मिळतात. प्रतिभेच्या आविष्काराला वाव मिळतो.
तमाशातल्या किंवा मंगळागौरीच्या नाचातल्या हजरजबाबी सवाल-जवाबांतूनही तसा आविष्कार साधता येतो. नृत्यविशारद मल्लिका साराभाई आपल्या कलाकृतींतून सामाजिक समस्यांना वाचा फोडतात. त्यामुळे समाजाला फायदा होतोच, पण मल्लिकाजींच्या, आधीच बहुआयामी असलेल्या व्यक्तिमत्त्वाला दर वेळी नवे पैलू पडतात.
लॅटरल थिंकिंगमुळे मेंदूच्या वेगवेगळ्या विभागांतल्या पेशींमध्ये संवाद साधला जातो. वेगवेगळ्या खात्यांमध्ये नवे लागेबांधे जुळतात. वय वाढतं तशा मेंदूतल्या पेशी हळूहळू कमी होतात. पण नव्याने जुळलेले लागेबांधे मागे उरणाऱ्या पेशींची कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढवतात. बुद्धीचा आवाका टिकून राहतो. डिमेन्शिया किंवा बुद्धिमांद्य झालंच तरी उशिरा होतं. न्यूयॉर्कच्या आल्बर्ट आइनस्टाइन मेडिकल कॉलेजने एक सर्वेक्षण केलं. त्यात त्यांनी वेगवेगळ्या छंदांमुळे डिमेन्शियाचा धोका किती कमी होतो, त्याचा अभ्यास केला. वाचनामुळे तो धोका ३५ टक्के तर शब्दकोडी सोडवल्याने ४७ टक्के कमी होतो. सायकल चालवणं, पोहणं, गोल्फ खेळणं वगैरे शारीरिक छंदांनी त्यात काहीही घट होत नाही. पण नियमितपणे नाच केल्यामुळे मात्र डिमेन्शियाची शक्यता ७६ टक्क्य़ांनी कमी होते!
आर्जेन्टीन टॅन्गो या नाचात शरीराचा तोल तर सांभाळायचा असतोच, पण शिवाय पाऊल-पाऊल सावकाश मागे सरकवत न्यायचं असतं. त्या दोन्ही घटकांमुळे चालण्याचा समतोल साधायचं आणि पडझड टाळायचं शिक्षण स्नायूंना मिळतं. पार्किन्सन्स डिझीझ या मज्जासंस्थेच्या आजारात रुग्णांना त्या शिक्षणाचा फार फायदा होतो. हे वॉशिंग्टन विद्यापीठात केलेल्या संशोधनात सिद्ध झालं आहे.
स्कॉटलंडच्या बहुतेक गावठी नाचांत फार उडय़ा वगैरे नसतात. त्यांच्या डौलदार, गतिमान हालचालींनी स्नायू बळकट होतात, सांधे बिनबोभाट हालतात, तोल सांभाळणं उत्तम जमतं. तसे नाच नियमितपणे नाचणाऱ्यांना मोठय़ा वयातही फायदा होतो. त्याचाही स्ट्रॅथक्लाईड विद्यापीठात मोठा अभ्यास झाला आहे.
तसाच फायदा गरबा खेळून किंवा मंगळागौरीच्या झिम्मा, फुगडय़ा वगैरे खेळांनी होऊ शकतो. नाचत नाचत बिनचूक गोफ विणणं आणि तो पुन्हा अचूक उलगडत जाणं हा तर अप्रतिम खेळ आहे. त्याला संगीताच्या तालावर, कित्येक गोष्टींचं भान, संतुलन आणि स्मरण सांभाळावं लागतं आणि त्याच वेळी हालचालींचा डौल टिकवायची बौद्धिक आणि शारीरिक कसरत करावी लागते. यांच्यातल्या कुठल्याही खेळाला महागडी साधनं, उच्चभ्रू क्लबची मेंबरशिप यांतलं काहीही गरजेचं नाही. भांगडय़ासारखा जोशीला नाच किंवा कोंबडा-बसफुगडीसारखे सांध्यांवर दबाव पाडणारे खेळ टाळले तर त्या नाचांना वयाचंही बंधन नाही. नातीबरोबर आजी झिम्मा खेळू शकते.
पण क्वचित सणावाराला नाचून फायदा होणार नाही. गच्चीवर, दिवाणखान्यात, बागेत एकटय़ानेच नाच केला किंवा जमलं तर चार-सहा जणांनी मिळून रोज तासभर गरब्यासारखं सांघिक नृत्य केलं तर त्यातून व्यायाम तर घडेलच. त्याचे फायदे लाभतील. शिवाय इतरही बरंच काही साधेल. त्यासाठी महागडय़ा ‘दांडिया नाइट्स’सारखा डामडौल, कानठळ्या किंवा रोषणाई नको. लयबद्ध संगीताच्या साथीने, निखळ आनंदासाठी, स्वत:ला निर्भरपणे व्यक्त करत सारेजण मनमोकळे नाचले तर सगळे ताणतणाव वाहून जातील. त्याच वेळी त्यांनी दुसऱ्यांची पुढची पावलं कल्पनेने ताडली आणि त्यांच्याशी आपली खेळी जुळवून घ्यायचा जाणीवपूर्वक प्रयत्नकेला तर त्या मनकवडय़ा पदन्यासातून आश्चर्याचे सुखद धक्के दिले-घेतले जातील. त्याने आनंदाची पातळी उंचावेल.
चैतन्य महाप्रभू नामसंकीर्तनाचं नृत्य करत. मीराबाई तिच्या गिरिधरासाठी इतर संतांसोबत नाचत असे. ते एक प्रकारचं ध्यान असे. त्यांचं चित्त नाचाच्या लयीत परमेश्वराशी एकरूप होई. संगीताच्या तालावर, स्वत:ला झोकून देऊन, देहभान विसरून नाचलं की सर्वसाधारण माणसांनाही त्या तऱ्हेचा अपार श्रीमंत अनुभव येतो. मग तो केवळ स्नायूंचा, सांध्यांचा आणि हालचालींचा खेळ राहत नाही. तो मानव्याचा महोत्सव बनतो.