0shitalमागच्या लेखात आपण नृत्य, संगीत या विषयांच्या परीक्षा पद्धतीचा आढावा घेतला. आता आपण परीक्षा पद्धतीचे फायदे-तोटे आणि त्याचे परिणाम यावर बोलू या. परीक्षा पद्धतीमुळे एखाद्या विद्यार्थ्यांची क्षमता न पाहताच सर्व अभ्यासक्रम शिकवावा लागतो. कारण त्या परीक्षेसाठी तेवढी तयारी करणे आवश्यक असते. यातील वाईट बाजू अशी की झेपत नसतानाही विद्यार्थ्यांना काही गोष्टी शिकाव्या लागतात, तर चांगली बाजू अशी की निदान या निमित्ताने का होईना, त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात.

या परीक्षा पद्धतीचा अजून एक फायदा असा आहे की अनेकजण एकेक पायरी ओलांडत विशारद अथवा अलंकार होतात. नृत्यकलेत पदवी प्राप्त झाल्यावर अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. हल्ली ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये नृत्य अथवा संगीत शिक्षकालासुद्धा इतर शिक्षकांप्रमाणेच समान दर्जा दिला जातो. या कला शिक्षकांना अर्धवेळ किंवा पूर्णवेळ असे दोन्ही पर्याय असतात. अनेक विद्यालयांमध्ये नृत्य आणि संगीत हे अनिवार्य विषय आहेत. त्यामुळे अशा ठिकाणीही नोकरीची संधी निर्माण होते. आपल्याकडे दुर्दैवाने अजून तरी कलाक्षेत्रात भक्कम पगाराची नोकरी उपलब्ध होत नाही त्यामुळे मग भाडेतत्त्वावर जागा घेऊन नृत्य शिकवणीचे वर्ग सुरू करणे हाच एक पर्याय समोर असतो. या प्रकारातही पुन्हा दोन बाजू आपल्याला पाहायला मिळतील. काही जण कलेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण द्यायचं याच हेतूने आपले क्लास चालवतात तर काही ठिकाणी २०-५०-१०० मुलींना प्रवेश देऊन नृत्य वर्ग शिकवणीचा पद्धतशीर ‘व्यवसाय’ सुरू होतो. अर्थात दोन्ही व्यक्ती आपापल्या ठिकाणी योग्य असतात त्यावर आपण खरं तर आक्षेप घेऊ शकत नाही, पण निदान या दोन्हीचा सुवर्णमध्य साधता आला तर उत्तमच. सदर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचीसुद्धा एक मुख्य अडचण असते ती अशी की ज्याप्रमाणे एखाद्या विषयातील पदवीधर त्या विषयात पारंगत असतोच असा काही नाही. त्या व्यक्तीला फक्त पदवी प्राप्त झालेली असते त्याच न्यायाने फक्त अलंकार पदवी मिळाली म्हणून ती व्यक्ती नृत्यकलेत पारंगत असेलच याची खात्री नाही. तसेच एखादी व्यक्ती अतिशय बुद्धिमान असते, त्याच्या विषयात पांडित्य प्राप्त करते पण म्हणून तो विषय त्या व्यक्तीला इतरांना चांगला शिकवता येईलच याची खात्री नसते. याच आधारे अलंकार पदवी मिळाली, ज्ञानही आहे, विषयाची जाणही चांगली आहे, पण शिकवण्याची हातोटी नाही असेही होऊ शकते. त्यामुळे आजकाल नृत्यवर्गात छंद म्हणून अथवा करियर म्हणून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु पालकांनी प्रवेश घेताना वर उल्लेख केलेल्या गोष्टींचा थोडा बारकाईने विचार करून, नृत्यशिक्षकाशी बोलून अथवा आधीपासून तेथे जात असलेल्या विद्यार्थ्यांशी बोलून मगच योग्य तो निर्णय घ्यावा. फक्त आपल्या घराजवळ क्लास आहे आणि आठवडय़ातून दोन दिवस संध्याकाळचे दोन तास आपला मुलगा किवा मुलगी बिझी राहात्ये ना एवढाच विचार करू नये. अशाने तुमचे पैसे आणि तुमच्या पाल्याचा वेळ दोन्ही फुकट जाण्याची हमखास खात्री आहे.
परीक्षा पद्धतीचा सगळ्यात मोठा तोटा असा कि साचेबद्ध शिक्षणामुळे त्या विद्यार्थिनींना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर विषयाची ओळखही होत नाही. जेवढा अभ्यासक्रम तेवढेच शिक्षण. कला ही अशी मोजून मापून शिकवली जाते का? अर्थातच नाही. पण यावरही इलाज आहे. तो असा की शिक्कामोर्तब होण्यासाठी पदवी प्राप्त करणे आवश्यकच आहे. पण तेवढय़ावर न थांबता आपल्या गुरूकडून जितक्या गोष्टी शिकणे शक्य आहे तितक्या शिकून घेतल्या पाहिजेत. नवनवीन कल्पनांचा धांडोळा घ्यायला हवा. म्हणजेच पदवीवर समाधान न मानता अखंड शिकत राहून आपला उत्कर्ष करण्याची तयारी ठेवायला हवी. थोडक्यात काय, तर परीक्षा पद्धती चांगली की वाईट किंवा हवी की नको या वादात न पडता त्यातील त्याज्य भाग वगळून जे चांगलं आहे, जे उपयोगी पडणारे आहे त्याचा स्वीकार करून पुढे जाणे हेच श्रेयस्कर.
शीतल कपोले

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Job Opportunity Recruitment of License Inspector Posts
नोकरीची संधी: अनुज्ञापन निरीक्षकपदांची भरती
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान