lp69गाणी आणि त्यापाठोपाठ येणारं नृत्य हा बॉलीवूड सिनेमांमधला अपरिहार्य घटक. पण काही सिनेमे तर त्याहीपलीकडे जाणारे म्हणजे केवळ नृत्य या विषयावरच आधारलेले आहेत. या सिनेमांनी नृत्यजाणीव अधिक समृद्ध केली आहे.

नृत्य म्हटलं की डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतं ते म्हणजे ‘नृत्याचं रंगमंचावरील सादरीकरण, विविध वेशभूषेत विविध नृत्यशैली सादर करणारे नर्तक आणि नर्तिका!!’ प्राचीन काळापासून रंगमंचावरील नृत्य सादरीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे आणि त्यामुळे नृत्यकला लोकांपर्यंत पोहोचण्यास निश्चितच खूप मोठय़ा प्रमाणावर फायदा झाला आहे. परंतु आजच्या जमान्यात जर मनोरंजनाचं आणि एकाच वेळी खूप प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं सर्वात मोठं, प्रभावी आणि ‘ग्लॅमरस’ माध्यम कुठलं असेल तर ते आहे- ‘चित्रपट!’ मोठय़ा पडद्यावर झळकण्यासाठी कित्येक कलाकार आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत असतात. ‘चित्रपट’ म्हटलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्या चित्रपटाचा ‘विषय’.. बहुतांश चित्रपटांच्या विषयाचा गाभा ‘प्रेम, प्रेमकथांशी’ निगडित असतो आणि या चित्रपटांमध्ये नृत्याचे स्थान मुख्यत्वे चित्रपटातील विविध गाण्यांमध्येच आढळून येते. पण जर ‘नृत्य’ हा चित्रपटाचा मध्यवर्ती विषय असेल तर मात्र अशा चित्रपटात नृत्याचे स्थान आणि अशा चित्रपटांमुळे समाजातील नृत्याचे स्थान अधोरेखित होण्यास अधिक साहाय्य होते! चित्रपट हे असं प्रभावी माध्यम आहे ज्यातून मनोरंजनाबरोबरच विविध गोष्टींबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होते, लोककल्याणासाठीसुद्धा या माध्यमाचा वापर होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाचा विविध विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास ‘चित्रपट’ फार मोठी कामगिरी बजावतात. चित्रपट लोकांना प्रेरित करतात, समाजात बदल घडवून आणतात; याचाच प्रत्यय विविध ‘नृत्यावर’ आधारित चित्रपटांतून येतो! या विषयावर जरी कमी प्रमाणात चित्रपट बनवले गेले असले तरी त्यांमुळे नृत्यकलेवर, नृत्यक्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर प्रभाव पडला आहे हे सत्य आहे..
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अइउऊ२’ या चित्रपटामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘बॉलीवूड’मध्ये प्रेम, मीठमसाला, मारामारी असलेले चित्रपट जास्त प्रमाणावर बनत असताना आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत असताना ‘नृत्य’ हा प्रमुख विषय घेऊन चित्रपट करणं नक्कीच आव्हानात्मक काम आहे. ‘रेमो डिसूझा’ या सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे आणि ‘अइउऊ- एनीबडी कॅन डान्स’ (प्रत्येक जण नृत्य करू शकतो/शकते) हा संदेश या चित्रपटाद्वारे जनमानसात पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. बरेचदा नृत्य या गोष्टीकडे ‘ते फार कठीण असतं, ते फक्त रंगमंचावर प्रशिक्षित कलाकार करू शकतात’ असं पहिलं जातं, मात्र ‘नृत्य’ हे केवळ व्यक्त होण्याचं माध्यम आहे, सर्वजण ते करू शकतात, सर्वाचा त्यावर अधिकार आहे हा विचार जास्त लोक करताना दिसत नाही. अशा विविध चित्रपटांमुळे हा विचारातील बदल घडण्यात निश्चितच मदत होते!! अइउऊ-२ मध्ये ‘वरुण धवन आणि श्रद्धा कपूर’ या मुख्य भूमिकेतील पात्रांनंतर विविध नर्तकांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गेली १२ वर्षे पाश्र्वनर्तक म्हणून १०० हून अधिक बॉलीवूड चित्रपटांत काम केल्यानंतर ‘सुशांत पुजारी’ या चित्रपटात द्वितीय प्रमुख भूमिकेत बघायला मिळत आहे. या अनुभवाबद्दल लोकप्रभाशी बोलताना सुशांत सांगतो की, ‘‘माझ्यासाठी हा खूप मोठा ब्रेक आहे. अनेक र्वष पाश्र्वनर्तन केल्यानंतर आज मला ही संधी रेमो सरांमुळे मिळाली आहे. डान्सर्समधलं कलाकौशल्य बघून त्यांना योग्य संधी रेमो सर मिळवून देतात. मला कधी वाटलं नव्हतं की मी मोठय़ा पडद्यावर नर्तक-अभिनेता म्हणून काम करेन!! नृत्यावर आधारित चित्रपटांमुळे नृत्याकडे बघायचा लोकांचा कल नक्कीच बदलतो. अनेक मुलांना अशा चित्रपटांमुळे स्फूर्ती मिळते आणि आधी घरातून विरोध असणाऱ्या कलाकारांनासुद्धा यामुळे पालकांचा नृत्यकलेसाठी पािठबा मिळतो. माझ्याबाबतीतसुद्धा काहीसे असेच झाले आहे. आज मला या चित्रपटामुळे नवीन ओळख मिळाली. माझ्यासारख्या एका पाश्र्वनर्तकासाठी वरुण आणि श्रद्धासारख्या आजच्या आघाडीच्या सेलिब्रिटीबरोबर महत्त्वाच्या भूमिकेत, मोठय़ा चित्रपटात काम करायला मिळणं हा माझ्या करिअरला कलाटणी देणारा अनुभव आहे. जे फक्त अशा ‘नृत्यावर’ आधारित चित्रपटांमुळेच घडू शकत.’’ नर्तकांनासुद्धा तितकेच महत्त्वाचे स्थान आणि सेलिब्रिटीसारखा दर्जा मिळवून देण्यात असे चित्रपट नक्कीच मोठं योगदान करतात, जेणेकरून नृत्यकलेकडेसुद्धा बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत होतो. बॉलीवूडच्या इतिहासात १९५५ मध्ये व्ही. शांताराम यांनी कथक नर्तक ‘गोपीकृष्णजींना’ घेऊन केलेला ‘झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट भारतातील नृत्याच्या प्रसाराकरिता विशेष महत्त्वपूर्ण ठरला आणि ‘नृत्यावर आधारित चित्रपटांमध्ये’ आजही आवर्जून या चित्रपटाचा उल्लेख केला जातो. त्याआधी १९४८ मध्येसुद्धा नृत्यदिग्दर्शक ‘उदय शंकर’ यांनी ‘कल्पना’ हा नृत्यावर आधारित चित्रपट केला होता. नंतरच्या काळात ‘दिल तो पागल है’, ‘चान्स पे डान्स’, ‘रब ने बना दी जोडी’, ‘आजा नचले’, ‘डिस्को डान्सर’ इत्यादी चित्रपटांत नर्तक, नर्तिकांच्या भूमिका विविध अभिनेते-अभिनेत्यांनी बजावल्या, अर्थातच या चित्रपटातील गाणी आणि नृत्यदेखील तितकेच लोकप्रिय झाले. परंतु या चित्रपटांमध्ये ‘नृत्य’ हा मध्यवर्ती विषय म्हणून सर्वस्वी हाताळला गेला नाही. त्यामुळे ‘बॉलीवूड’मध्ये अशा फक्त नृत्यावर आधारित चित्रपटांची संख्या मोजकीच आहे!
विविध परदेशी (हॉलीवूड आणि इतर) चित्रपटांनीदेखील ‘नृत्य’ हा विषय खूप छान प्रकारे मांडला आहे. ‘स्टेप अप’ च्या चित्रपटाचे तीनही भाग खूप लोकप्रिय झाले. ‘सेंटर स्टेज’मध्ये ‘बॅले डान्सर्सना’ नृत्यक्षेत्रात अनुभवावा लागणारा मानसिक आणि शारीरिक लढा आणि त्यातून प्रत्येक जण कसा स्वत:चा मार्ग शोधतो, हे समर्पकपणे दाखवले आहे. ‘डर्टी डान्सिंग’, ‘फूटलूज’, ‘द रेड शूज’, ‘श्ॉल वी डान्स’, ‘द टर्निग पॉइंट’, ‘स्टोम्प द यार्ड’, ‘टॅँगो लेसन’, ‘सेव द डान्स’, ‘स्ट्रीक्टली बॉलरूम’, ‘स्ट्रीट डान्स’, ‘ब्रिंग इट ओन’ अशा विविध चित्रपटांतून नृत्य हा विषय विविध प्रकारे हाताळला गेला आणि त्या त्या काळात या चित्रपटांनी नृत्यकलेतील विविध अडचणी, कलेसाठी द्यावा लागणारा लढा, नृत्यकला हा कसा आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग असू शकतो; अशा अनेक गोष्टींवर भाष्य केले. त्याबरोबरच या चित्रपटांनी समाजात नृत्यकलेला लोकप्रियता मिळवून देण्यात, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव करून देण्यात आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात मोठा वाटा उचलला!! ‘ब्लॅक स्वान’ या चित्रपटाने तर या विषयात नवीन इतिहास घडवला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. नर्तनाबरोबरच मानसिकदृष्टय़ा विविध गोष्टी प्रभावीपणे मांडणाऱ्या या चित्रपटातील अभिनेत्रीला ‘ऑस्कर’ या सर्वोच्च किताबाने सन्मानित केले गेले; यामुळे हा चित्रपट अधिकच लोकप्रिय झाला! त्याचबरोबर २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘डेजर्ट डान्सर’ या चित्रपटामध्ये ‘आफ्शीन घाफ्फरीअन’ या इराणमधील नर्तकाचा खऱ्या आयुष्यातील लढा दाखवला आहे. ‘इराण’मध्ये नृत्यकलेवर, नृत्याच्या सादरीकरणावर बंदी असताना या नर्तकाने नृत्यकलेसाठी दिलेला कठोर लढा नक्कीच प्रत्येकाला प्रेरणा आणि कलेसाठी लढण्याची ताकद, बळ देतो. ‘टेक द लीड’ हा चित्रपटदेखील एक महत्त्वपूर्ण चित्रपट आहे, ज्यात नृत्याच्या साहाय्याने वाढत्या वयातील मुलांमध्ये कसा सकारात्मक बदल घडून येतो, याबद्दल खूप प्रभावी प्रकारे कथा दाखवली आहे. आणि कुठलीही चांगली गोष्ट घडण्यासाठी फक्त कुणीतरी ‘सुरुवात’ करण्याची गरज असते, त्यामुळे तो बदल घडायला हवा असेल तर ‘तुम्ही सुरुवात करा’ असा संदेश ‘टेक द लीड’मधून दिला आहे.
अशा विविध चित्रपटांतून नक्कीच खूप काही शिकायला मिळतं, नृत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्याकडे पाहायच्या कक्षा रुंदावतात आणि कुठे ना कुठे असे चित्रपट आपल्याला कलेबद्दल अजून सीरिअस होण्याची, मनापासून साधना करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे नृत्यकलेच्या विद्यार्थ्यांसाठी तर हा ‘अभ्यासाचा विषय’ आहे!! त्याचबरोबर ‘चित्रपटासारख्या’ प्रभावी माध्यमाचा वापर नृत्यकलेच्या विकासासाठी उत्तम प्रकारे करता येऊ शकतो, याची प्रचीती मिळते. त्यामुळे तुम्हीदेखील हे चित्रपट आवर्जून पाहाल आणि त्यातून निश्चितच प्रेरणा घ्याल याची खात्री आहे!!
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com