नृत्य ही कला मुळातच ‘रंगमंच सादरीकरणाच्या’ कलांमध्ये गणली जाते. कलाकार अथक साधनेमधून नृत्य शिकतो, त्याची कसून तालीम करतो आणि या रियाझाने स्वत:ला घडवतो. त्यानंतर स्वत:ची कला लोकांसमोर सादर करायला नर्तक/ नर्तिका तयार होतात आणि तिथून त्यांचा कलाकार म्हणून खऱ्या अर्थाने वेगळा प्रवास चालू होतो. रंगमंचावर कोणतीही कला सादर करण्यासाठी कलाकाराचे ‘सादरीकरण कौशल्य’ महत्त्वाचे ठरते. जेव्हा कलाकार आपली कला प्रेक्षकांसमोर सादर करत असतो, तेव्हा कलेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांशी एक प्रकारचा संवाद साधत असतो आणि प्रेक्षकांची दाद ही कलाकाराला मिळालेली पोचपावती असते. हे सादरीकरण कौशल्य एका दिवसात शिकता येत नाही, किंबहुना शिकण्यापेक्षा ते अनुभवातून आणि सातत्याने केलेल्या प्रयासातून घडत जाते. ‘सादरीकरण कौशल्य’ हे बहुआयामी आहे. सर्वप्रथम म्हणजे कलाकाराला कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांशी ‘कनेक्ट’ होण्याचा सूर सापडणं महत्त्वाचं असतं. एकदा कला आणि प्रेक्षकांशी एकरूप झालं की प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायला आणि त्याचं मन जिंकून घ्यायला कलाकाराला फारसा वेळ लागत नाही; मात्र हे फार सोपं नाही. प्रत्येक कलाकाराला हे जमेलच असं सांगता येत नाही. रंगमंचावर नृत्यकला सादर करताना अनेकविध गोष्टींचं भान नर्तकाला ठेवायला लागतं. प्रत्येक ठिकाणचा रंगमंच आणि व्यवस्था वेगळी असते. कधी लाकडी फळ्या असतात तर कधी कार्पेट घातलेलं असतं, तर कधी सिमेंटचं स्टेज असतं. अशा वेळेला रंगमंचाचं स्वरूप पाहून, नृत्य करताना योग्य ती काळजी घ्यावी लागते. उदा. कथ्थक नर्तकीला कार्पेटवर गिरकी घ्यायला त्रास होतो, त्यामुळे अशा स्टेजवर विशेष काळजी घ्यावी लागते.

एकलनृत्य सादर करणं आणि समूहनृत्य करणं यातही फार मोठा फरक आहे. एकलनृत्य करताना संपूर्ण ताकद लावावी लागते आणि स्टेजचा जास्तीत जास्त वापर करून, सादरीकरण केले जाते. हा ‘वन मॅन शो’ सांभाळताना स्वत:चा वेगळा ठसा प्रेक्षकांवर उमटवणं, स्वत:ची विशेषता दाखवणं, एकलनृत्यातून स्वत:चं विविधांगी कलाकौशल्य दाखवणं गरजेचं असतं. उलटपक्षी समूहनृत्यामध्ये स्वत:ची खासियत न दाखवता समूहाची विशेषता दाखवणं, समूहाची सुसूत्रता, एकसारखेपणा नृत्यातून दाखवणं महत्त्वाचं असतं. समूहनृत्यात सहकलाकारांचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं असतं; कोणतीही कलाकृती समूहनृत्यात तेव्हा चांगली वाटते जेव्हा पूर्ण समूह ‘एक’ बनून तो सादर करतो. एकलनृत्य आणि समूहनृत्य या दोन्ही गोष्टी नर्तकाला करता येणं एक कलाकार म्हणून आवश्यक आहे. एकलनृत्यात स्वत:चा सराव, आत्मविश्वास, स्टेजवरील वावर या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात तर समूहनृत्यात पूर्ण समूहाचा एकत्रित सराव, एकमेकांना सावरून घेण्याची वृत्ती, संघटनकौशल्य या गोष्टी समूहनृत्याची शान वाढवतात.
नृत्य सादरीकरणात अजून एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे, तुम्ही ध्वनिफितीवर नृत्य करत आहात की ‘लाइव्ह’ वादक-गायकांबरोबर! वाद्यवृंदाबरोबर नृत्य करताना सहकलाकारांबरोबर तालीम होणं आवश्यक आहे. एकमेकांना पूरक असं सहकार्य करत रंगलेल्या अशा मैफलीची मजा काही औरच!! यात वादक, गायक नृत्याला साथसंगत करीत असले तरी ते नृत्यप्रस्तुतीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. वेळेचं बंधन थोडं शिथिल असेल तर जुगलबंदी, फर्माईश अशा गोष्टी सहकलाकारांच्या मदतीने अधिक सुंदर प्रकारे सादर करता येतात. ठरवलेल्या गोष्टी सादर करण्याबरोबर मैफल रंगत असेल तर जास्तीच्या गोष्टी सादर करण्याची मुभा कलाकार घेऊ शकतो. ‘लाइव्ह’ वाद्यवृन्दाबरोबर नृत्य करताना वादक-गायक-नर्तक यांमध्ये चांगला मेळ असणं आवश्यक आहे, तरच ती कलाकृती खुलून येऊ शकते. हल्ली बरेचदा ध्वनिफितीवरसुद्धा नृत्य करावे लागते, तेव्हा त्याबरोबर खूप सराव करणं महत्त्वाचं ठरतं. कारण, ध्वनिफितीवर नृत्य करताना, चूक झाली तर ती सावरायला वेळ मिळत नाही. ‘लाइव्ह’ सादरीकरणात ती गोष्ट परत करण्याची संधी मिळते. शिवाय ध्वनिफितीवर नृत्य करताना स्वत:ला जास्त ‘एनर्जी’ लावावी लागते, कारण वादक-गायकांकडून मिळणारी ‘एनर्जी’ इथे मिळत नाही.
कार्यक्रमाच्या आधी रंगीत तालीम मिळेलच असं नाही, परंतु नृत्य करण्याआधी थोडा वेळ स्टेजवर वावर करून, त्याची लांबी, रुंदी, लाइट्सची व्यवस्था बघून घेणं फायदेशीर ठरतं. प्रकाशयोजनेचा वापर कलाकृती खुलवण्यासाठी केला जातो, परंतु त्यासाठी नर्तकीला त्याचं भान ठेवून सादरीकरण करणं महत्त्वाचं आहे. योग्य ठिकाणी ‘पोज’ बनवणं किंवा ‘लाइट’ पकडणं, स्टेजच्या मध्याची (सेंटर) जागा डोक्यात ठेवून नृत्य करणं; अशा गोष्टींमुळे प्रकाशयोजनेचा वापर नृत्याची मजा, त्याचा रसास्वाद वाढवायला करता येतो.
‘सादरीकरण कौशल्यात’ अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे- ‘स्टेज सेन्स’ म्हणजेच ‘रंगमंचावर बाळगायचे भान’.. एखादी गोष्ट चुकली तरी प्रेक्षकांपर्यंत ती पोचणार नाही याची काळजी घ्यावी लागते किंवा कुठला दागिना पडला, केस सुटले, घुंगरू सैल झाले किंवा सुटले, सहकलाकार चुकले, ध्वनिफीत अडकली; तरी अशा कुठल्याही परिस्थितीत नृत्यात बाधा न येऊ देता कार्यक्रम चालू ठेवणं गरजेचं असतं. कारण या गोष्टी बरेचदा आपण थांबवू शकत नाही, परंतु त्यामुळे प्रेक्षकांच्या रसास्वाद आणि मनोरंजनात खंड न पडू देणं; ही कलाकाराची जबाबदारी असते. थोडक्यात काय तर, नर्तक/नर्तकीला नृत्याबरोबरच तांत्रिक बाजू, रंगभूषा, वेशभूषा, वाक्-कौशल्य, ‘प्रेझेन्स ऑफ माइंड’, सहकालाकारांबरोबर जुळवून घेण्याची मानसिकता, कुठल्याही संवादांचा आधार न घेता केवळ नृत्य आणि अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत अर्थ पोचवण्याची क्षमता, अशा विविध गोष्टींवर प्रभुत्व मिळवणं गरजेचं आहे; जेणेकरून एक ‘परिपूर्ण कलाकार’ म्हणून नर्तक प्रतिभा संपादन करू शकतो. ‘सादरीकरण कौशल्य’ हे कठीण असलं तरी अशक्य मुळीच नाही. दैनंदिन रियाझ, विविध कार्यक्रमांतून आलेला अनुभव, अनुभवातून शिकून स्वत:त बदल घडवण्याचा प्रयास; यामधून हे नक्कीच साध्य होते. फक्त ही प्रक्रिया अविरत चालू राहणं महत्त्वाचं आहे. ‘नृत्य सादरीकरण कौशल्य’ हे सततच्या प्रयत्नातून आणि अनुभवातून खुलवत जाण्याचं कौशल्य आहे, हे मात्र विसरू नका!

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू