0shitalपालक जेव्हा आपल्या पाल्याला नृत्यवर्गात घालण्याचा विचार करतात तेव्हा इंटरनेटवर आपल्या घराजवळ ‘डान्स स्टुडिओ’, ‘डान्स इन्स्टिटय़ूट’, किंवा ‘डान्स अकॅडमी’ असं ‘सर्च’ करतात. त्यानुसार त्या नृत्यवर्गाचे फोटो, इतर माहिती विशेष अधोरेखित करण्यासारखी असते अशी इत्थंभूत माहिती त्यांना उपलब्ध होते. त्यानुसार पाल्याचा नृत्यवर्ग सुरू होतो.
हल्ली पालक आपल्या पाच-सहा वर्षांच्या पाल्याला पंचतारांकित सुविधा देण्याकरिता सतत प्रयत्नशील असतात. जन्माला आल्यापासून ब्रॅण्डेड कपडे, थोडा मोठं झाल्यावर ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये प्रवेश असं आणि बरंच काही. हे सगळं काही कमी आहे म्हणून नृत्यवर्गाची निवड करतानासुद्धा वातानुकूलित, आरसे असलेला, भरपूर फी असलेला नृत्यवर्ग निवडतात. त्या ठिकाणी पाच/सहा वेगवेगळ्या नृत्यशैली शिकवल्या जात असतील तर तो डान्स स्टुडिओ सगळ्यात उत्तम! असा एक गैरसमज..
कुठून आली ‘स्टुडिओ’ची संकल्पना? ‘डान्स स्टुडिओ’ आणि ‘अमुक अमुक नृत्यालय’ यात खरंच काही फरक आहे का? याचे उत्तर ‘नाही’ असे ठामपणे देता येईल. ‘डान्स स्टुडिओ’ ही एक पाश्चिमात्य संकल्पना आहे. अशा नृत्यवर्गाचे इंटीरियर करताना जमीन विशिष्ट पद्धतीने तयार केलेली असते. खूप ठिकाणी ‘वूडन फ्लोअरिंग’ असते अथवा ‘स्पारटेक्स’ प्रकारची फरशी बसवण्यात आलेली दिसून येते. नृत्य करताना शरीराची ठेवण कशी दिसते किंवा शरीराच्या माध्यमातून ज्या रेखा उमटतात त्या कशा दिसतात हे बघण्यासाठी नृत्यवर्गामध्ये मोठे मोठे आरसे लावले जातात. त्याचप्रमाणे संगीत हा नृत्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे विशिष्ट प्रकारची ध्वनियंत्रणाही बसवलेली असते. ज्याचा उपयोग सीडी, डीव्हीडी, पेनड्राइव्ह लावून नृत्य करण्यासाठी होतो. नृत्यासाठी आवश्यक असणारे तक्ते भिंतीवर लावले जातात. या तक्त्यांमध्ये विविध नृत्यशैलींची छायाचित्रे लावून त्या शैलीबद्दल थोडक्यात माहिती, विविध प्रकारचे हावभाव, हस्तमुद्रा, वेगवेगळी वाद्ये अशा गोष्टी समाविष्ट केल्याने ते अभ्यासाच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त ठरते. नृत्यासाठी आवश्यक असणारी वाद्येसुद्धा गरजेनुसार घेतली जातात. नृत्यशिक्षकासाठी टेबल- खुर्ची असते. याव्यतिरिक्त नृत्याची पुस्तके, संगीताच्या सीडीज, व्हिडीओज, पोशाख, नेपथ्य (प्रॉपटी) या सर्व गोष्टी ठेवण्यासाठी एक कपाट. याचाच अर्थ वर नमूद केलेल्या सगळ्या गोष्टी ज्या वास्तूमध्ये एकत्रित बघता येतील त्याला ‘डान्स स्टुडिओ’ असे म्हणता येईल.
येथे मिळणारे नृत्याचे शिक्षण हे इतर नृत्यवर्गापेक्षा वेगळे आणि उच्च दर्जाचे असते का? तर ‘नाही.’ केवळ त्या वास्तूमुळे त्याला वेगळेपण आलेले असते. हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. पाल्याचा नृत्यवर्गामध्ये प्रवेश घेताना वास्तूकडे न बघता त्या ठिकाणी जी नृत्यशैली शिकवली जाते ती चांगल्या पद्धतीने शिकवली जात आहे की नाही याचा आढावा घेऊन मगच प्रवेश निश्चित करावा. अर्थात एक गोष्ट नक्की आहे की, ज्या ठिकाणी आपण काम करतो, शिकतो, शिकवतो त्या जागेमध्ये काम करताना मनाला प्रसन्न वाटले पाहिजे. वास्तूमधून कंपनं निर्माण होत असतात. त्याचा आपल्या कामावर नक्कीच परिणाम होतो. म्हणून नृत्यवर्गाची जागा ही कायमच स्वच्छ, नेटकी, सकारात्मक असायला पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे; परंतु यावरून नृत्यवर्गाची जागा एकदम चकाचक म्हणजे तो नृत्यवर्ग चांगला अशी भाबडी कल्पना करू नये.
जय मल्हार फेम ‘नकुल घाणेकर’ हा एक उत्तम नर्तक आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. त्याचा ठाण्यामध्ये स्वत:चा स्टुडिओ आहे. तो म्हणतो, ‘‘इथे नृत्याचा दर्जा महत्त्वाचा असतो. स्वत: शास्त्रीय कथक नर्तक असल्यामुळे शास्त्रीय नृत्याचं पारडं निश्चितच जड आहे असे मला कायमच वाटते. फक्त हिप हॉप, सालसाचे स्टुडिओ असावेत का? कथकचा स्टुडिओ का नसावा? येनकेनप्रकारेण जर आपण आपली नृत्यशैली प्रमोट करत असू तर ते केव्हाही चांगलेच आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की सालसा शिकायला येणाऱ्या विद्यर्थ्यांना वातानुकूलित यंत्रणेमध्येच शिकवणे बंधनकारक असते. परंतु कथक शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अजिबात एसीमध्ये नाचण्याची परवानगी देत नाही. घाम गाळूनच विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्याचा सराव करायला हवा’’ असे नकुल घाणेकर यांनी सांगितले.
खूप ठिकाणी केवळ शास्त्रीय नृत्याचे वर्गसुद्धा ‘स्टुडिओ’मध्ये नियमित घेतले जातात. ही निश्चितच शास्त्रीय नृत्यकलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. केवळ बॉलीवूड, वेस्टर्न, सालसा, हिप हॉप या नृत्यशैलींचेच स्टुडिओ का? शास्त्रीय नृत्यवर्गाचाही ‘स्टुडिओ’ असावा. म्हणूनच आज अनेक नर्तक/नर्तकी त्यांच्या नृत्यालयाचे रूपांतर ‘स्टुडिओ’ या संकल्पनेमध्ये करताना दिसतात. त्या निमित्ताने का होईना पालक शास्त्रीय नृत्याकडे आकर्षित होतील असाही हेतू त्यामागे असू शकतो. तसेच नृत्यशिक्षकाला आणि विद्यार्थ्यांला आपण अशा छान ठिकाणी शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देतोय आणि घेतोय याचा आनंद मिळत असतो.
‘‘नृत्यवर्गामध्ये आरसे लावल्यामुळे नृत्यशिक्षकाने एखादी स्टेप शिकवल्यानंतर आरशात बघून त्याचा सराव करणे सोपे जाते. आपण कुठे काही चुकतोय का हेही लगेच कळते, स्टुडिओमध्ये नृत्य करायला जास्त छान वाटते’’ असे ‘एकापेक्षा एक’ फेम उपविजेती नर्तकी स्नेहा चव्हाण आवर्जून सांगते.
‘डान्स स्टुडिओ’ ही संकल्पना खरंच स्वीकारण्यासारखी आहे. केवळ त्या वास्तूला वेगळे रूप दिले जाते. जे शिक्षण इतर नृत्यालयात मिळते तेच इथे मिळते. अर्थात या सगळ्यासाठी आर्थिक गणित जमवणे ही एक महत्त्वाची समस्या ठरू शकते. स्वत:ची जागा घेणे अथवा एखादी जागा भाडेतत्त्वावर घेऊन त्यामध्ये इंटीरियर करणे हे नवीन नृत्यवर्ग सुरू करणाऱ्या एखाद्या नर्तकाला वा नर्तकीला नक्कीच अवघड जाऊ शकते. परंतु सगळ्या गोष्टी व्यवस्थित ‘प्लॅन’ करून स्टुडिओ ही संकल्पना सुरू करायची असेल तर ते नक्कीच शक्य आहे.
कारण नथिंग इज इम्पॉसिबल..
शीतल कपोले – response.lokprabha@expressindia.com