दिवाळी २०१४
खरे तर सारे काही सूर्यप्रकाशाइतकेच स्वच्छ आणि स्पष्ट होते. महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नव्हती. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या भवितव्याची झलकच पाहायला मिळाल्याची चर्चा होती आणि त्यात तथ्यही होतेच; पण.. हा ‘पण’च मोठा ठरला आणि अनेकांनी केलेले ‘पण’ आडवे आले. त्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी सारे काही पणाला लावायचेच ठरवले आणि मग नैर्ऋत्य मोसमी वारे परतीच्या मार्गावर असतानाच महाराष्ट्रावर मळभ दाटले, सारे काही झाकोळून गेले. प्रत्यक्षात हा मथितार्थ प्रकाशित होईल, त्या वेळेस दिवाळीच्या पूर्वसंध्येला ते मळभ दूर झालेले असेल आणि महाराष्ट्र पुन्हा प्रकाशाच्या दिशेने पावले टाकू लागेल, अशी अपेक्षा आहे. 

आपल्या सर्वाच्याच आयुष्यात या प्रकाशाला सर्वाधिक महत्त्व असते. कधी हा प्रकाश म्हणजे प्रत्यक्ष उजेड असतो, तर कधी तो ज्ञानाचा प्रकाश असतो. सातत्याने होणारे नवे संशोधन क्षितिजाची कक्षा वाढवत जाते. मानवाची दिशा योग्य की अयोग्य, असे प्रश्न प्रसंगी मनात येतात. अशा भविष्यवेधी प्रश्नांचा वेध घेण्याची ‘लोकप्रभा दिवाळी’ अंकाची परंपरा याही वर्षी कायम आहे. सध्याचे दिवस आहेत ते बेतून मोजून मापून कपडे शिवून घेतो त्याप्रमाणे मानवी शरीर बेतण्याचे. प्लास्टिक सर्जरी हे त्याचे माध्यम आहे. गरज म्हणून नव्हे, तर सुंदर दिसण्याच्या माणसाच्या नैसर्गिक मनोभूमिकेमुळे त्याला प्रतिसाद मिळतोय. या ह्य़ूमन बॉडी मेक टू ऑर्डर प्रकरणाची व्याप्ती व त्याचे चांगले-वाईट परिणाम यांची सखोल चर्चा तज्ज्ञांनी केली आहे, ‘लोकप्रभा दिवाळी’मध्ये.
तरुण म्हणजे केवळ वायफळ चर्चा, त्यात गांभीर्य मुळीच नसते, असा गैरसमज आहे; पण ‘लोकप्रभा’चा या तरुण पिढीवर जबरदस्त विश्वास आहे, किंबहुना तीच आपले देशाचे भविष्य आहे. एफएम चॅनल्सवर आरजे म्हणून सध्या गाजत असलेल्या पहिल्या पिढीतील या व्यावसायिकांचे चित्रण यंदाच्या दिवाळी अंकात वाचायला मिळेल. ही पिढी किती करिअरिस्ट आहे आणि गंभीरही ते यातून नक्कीच जाणवेल. त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत, ‘लोकप्रभा युथफूल’च्या तरुण टीमने.
स्पेशल इकॉनॉमिक झोन अर्थात सेझची चर्चा आपण गेली वीसेक वर्षे करतो आहोत; पण तब्बल ११० वर्षांपूर्वी आपल्याच कोल्हापूरच्या परिसरात असेच एक सेझ वसले आणि वाढलेही. हुपरी म्हणजेच चांदीचे गाव हेच ते सेझ होय. त्याचा इतिहास, व्याप्ती आणि भविष्याचा वेध हाही वाचायला मिळेल ‘लोकप्रभा स्पेशल’मध्ये.
दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन असेही एक समीकरण आहे. ही लक्ष्मीपूजनाची प्रथा प्राचीन आणि रोचक आहे. हीच प्रथा हेही दाखवून देते की, समाजाने एखादे प्रतीक स्वीकारल्यानंतर कोणताही धर्म त्याला आडवा येऊ शकत नाही. धर्माचे बंधन झुगारून ती प्रथा कायम राखण्याची ताकद लोकमानसात असते. लक्ष्मीपूजन हाच इतिहास सिद्ध करते. या परंपरेच्या एका विलक्षण आढाव्याने हा दिवाळी अंक समृद्ध केला आहे.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या आणि प्रगतिपथावर नेणाऱ्या, राज्याची भाग्यलक्ष्मी ठरलेल्या कोयना विद्युत प्रकल्पाला यंदा ६० वर्षे पूर्ण झाली. हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी चमत्कारच भासावा, असे आजही या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर जाणवते. सह्य़ाद्रीच्या पोटात खोलवर उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाचा एक अनोखा फेरफटका आणि त्यामागे असलेल्या भगीरथांचे प्रयत्न यावर या दिवाळी अंकात एक प्रकाशझोत टाकलेला आहे!
यंदाचा हा प्रकाशाचा उत्सव ‘लोकप्रभा दिवाळी’समवेत आपली जाणीव अधिक प्रकाशमान करणारा ठरो,
हीच प्रार्थना!
प्रकाशमान् भव!
01vinayak-signature