दिवाळी २००९

तथ्यांश
प्रकाशपर्वातील यंत्रसिद्धी
वाईरकरांचे आपटबार
जाणता मुघल
गायकीतला घराना!
मल्लिकार्जुन मन्सूर
चालचोरांची घराणी
रूद्रभीषण सौंदर्याचे मुक्तीद्वार! ग्रँड कॅनियन
लॉटरी, मॅजेस्टिक आणि मी!
फुलटायमर
ऐसे माझे बूड...
फिर छिडी रात, बात फूलों की...
नखलू नको पुन्हा पुन्हा...
मामुटी नावाची इंडस्ट्री
स्वातंत्र्यसैनिकाची सावली
मित्रा.. लव!
चावटिका आणि क्रिकेटिका
एका हिप्पीची डायरी
समृद्धीचं सोनं..
रॉयल मराठाज्!
भविष्य
संपर्क
मागील अंक

दिग्गज संगीतकारांना असा उचलेगिरीचा मोह का पडत असेल? स्वत:कडे अद्भुत चालींचे रांजण भरलेले असताना त्यांना इकडे तिकडे उधार उसनवारी करण्याची बुद्धी का होत असेल? आपल्या सृजनशीलतेवर आपणच अन्याय करतोय व श्रद्धाळू रसिकांचा विश्वासघात करतोय असं त्यांना वाटलं नसेल का?
शिरीष कणेकर

सरदार मलिक (‘हुवी ये हमसे नादानी..’ व ‘सारंगा, तेरी यादमें..’ फेम) या जुन्या जमान्यातल्या संगीतकाराने आपल्या हातावर, सैफने करीना गोंदवून घेतलंय त्याप्रमाणे ‘मेरा बेटा चोर है’ असं गोंदवून घेतलं होतं का? नसलं तर घ्यायला हवं होतं. किती माणसांना उत्तरं देत बसणार? त्यापेक्षा कोणी रस्त्यात भेटलं की काही बोलण्याआधी हात पुढे करायचा. अन्नू मलिकने ‘मॅकरीना’ची प्रसिद्ध चाल चोरली (तो म्हणतो निर्मात्याने चोरायला लावली. ‘मैय्या मोरी, मै नहीं माखन खायो..’) आणि चोर म्हणून त्याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं. संगीतकार कल्याणजीशी माझी यारी झाली होती. त्याच्याशी गप्पा मारताना मी एकदा त्याला म्हणालो- ‘‘कल्याणजीभाई, तुम्ही कधी चाली चोरल्यात का हो?’’
‘‘अरे बापरे!’’ कपाळावर हात मारून घेत तो म्हणाला, ‘‘चिक्कार. भरपूर.’’
कल्याणजीची पारदर्शक निरागसता मला स्पर्शून गेली. त्यानंतर त्याला अधिक छेडावंसं मला वाटलं नाही. पण एक ‘नोट’ही न बदलता एका संगीतकाराची चाल दुसऱ्या संगीतकाराला स्वतंत्रपणे जशीच्या तशी सुचू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण

 

जाते. असं सांगतात की नौशादच्या ‘उडन खटोला’मधील गाजलेल्या ‘मेरा सलाम ले जा..’च्या रेकॉर्डिगला हजर असलेल्या कोणी तरी ती चाल हुस्नलाल भगतरामना सांगितली. त्यांनी लगेच ती ‘शमा परवाना’मध्ये सुरैय्याच्या आवाजात स्वरबद्ध केली. गाणं होतं- ‘शामे बहार आयी..’. त्यानंतर नौशादने म्हणे बाहेरच्यांना रेकॉर्डिगला हजर राहायला बंदी केली.
‘चुनरिया’ चित्रपटातील ‘दिले नाशादको जीनेकी हसरत हो गयी फिरसे..’ ही हंसराज बहलची चाल लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ‘जीवनमृत्यू’मध्ये कानामात्रा न बदलता ‘जमानेमें अजी ऐसे कई नादान होते है..’ या गाण्यात वापरली होती. (दोन्ही गाणी लताचीच ही एक गंमत.) नौशाद, श्यामसुंदर, सी. रामचंद्र, मदन मोहन प्रभृती संगीतकार, अन्नू मलिक, भप्पी लाहिरी, विजू शहा प्रभृती संगीत शर्विलक. हिमेश रेशमियाला संगीतकार व गायक म्हणायला लावताय ते लावताय, आता आणखी वर कल्याणजीपुत्र विजू शहाला संगीतकार म्हणायला सांगू नका. कल्याणजी अधूनमधून इकडे तिकडे हात मारत असेल; विजू फक्त हातच मारतो. विजू शहा व नदीम-श्रवण यांनाही. एकदा नदीम-श्रवण फिल्मफेअर पारितोषिक स्वीकारायला दिमाखात मंचावर गेले व तो मुहूर्त साधून आयोजकांनी ‘तुम्हे अपना बनाने की कसम खायी है..’ या नदीम-श्रवणच्या गाजत असलेल्या गाण्याची मूळ पाकिस्तानी धून पाश्र्वभूमीवर मोठय़ाने वाजवली. नदीमचा दाढीत लपलेला चेहराही उतरला. अशी थोतरीत कोणी कोणाच्या मारली नसेल. त्यांना पारितोषिकही दिले व ते चोर असल्याचे समारंभात ललकारून सांगितले.
सज्जादच्या ‘ये हवा ये रात ये चांदनी..’ (संगदिल- तलत मेहमूद) या गाण्यावरून बेतलेलं मदन मोहनचं ‘तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा..’ (आखरी दाव- महंमद रफी) गाजत होतं तेव्हा भडकू सज्जाद कडवटपणे म्हणाला, ‘‘आजकल हमारी तर्जेही नहीं, उनकी परछाईयाँ भी चलती है.’’ ओ.पी.ची परछाई एकदा चालली. त्यानंतर कायमची संपून गेली. ओ.पी. असता तर म्हणाला असता, ‘‘भाटिया (अक्षयकुमार जो बँकॉकमध्ये कुक होता) लोगोंका काम रसोई बनाना है, संगीत देना नहीं.’’ एकदा एक निर्माता ओ.पी.ला गर्वाने म्हणाला, ‘‘नायक अमिताभ बच्चन आहे.’’
तो ओ.पी.ला ओळखत नव्हता. ओ.पी. ताडकन म्हणाला, ‘‘अमिताभ होने दो नहीं तो कुत्ता होने दो, मुझे कोई फर्क नहीं पडता.’’ प्रत्यक्ष दिलीपकुमारला ‘‘तुझसे तो कामरान अच्छा है’’ असे तोंडावर म्हणणारा माणूस होता तो.
एकदा मदन मोहनची एक चाल मेहदी हसनच्या गजलेवरून कशी उचललेली आहे हे मला सप्रमाण दाखवून देत ओ.पी. म्हणाला होता, ‘‘साला मदन जैसा आदमी भी ऐसा करता है!’’
आणि ‘साला’ ओ.पी. नय्यर स्वत:च मला सांगत होता की गुरुदत्तने इंग्लिश रेकॉर्डस्चा गठ्ठा त्याच्याकडे आणून टाकला आणि त्यांच्यावरून ‘आरपार’ची गाणी करण्यास सांगितले. ही सत्यकथा ‘फ्रॉम हॉर्सेस माऊथ’ ऐकल्यानंतर मी कमालीचा नव्‍‌र्हस झालो होतो. म्हणजे ‘सुन सुन सुन सुन जालमा..’, ‘मुहोब्बत कर लो जी भरलो..’, ‘बाबुजी धीरे चलना..’ ,‘कभी आर कभी पार..’ ही वेड लावणारी गाणी ओ.पी.ची नव्हतीच? म्हणजे ‘आरपार’द्वारे ओ.पी.ने प्रस्थापितांना हादरा दिला असे जे आम्ही बोरूघाशे म्हणत होतो तो अज्ञानातून आलेला भाबडेपणा होता तर!
अज्ञानातील सुख चांगलं. ज्ञानातून केवळ मूर्तिभंजन होणार असेल तर ते ज्ञान काय कामाचं?.. मी असा विचार करीत असतानाच इंटरनेटवर मला एक ‘साइट’ सापडली. ती तर मूर्तिभंजन करणारी गझनीचा महमूद निघाली. ‘साइट’वर अन्नू मलिकचीच नाही तर भल्याभल्या संगीतकारांची गाजलेली गाणी व त्यांच्या मूळ चाली दिल्यात. नुसत्या दिल्या नाहीत तर ऐकवल्यात. हा सूर्य हा जयद्रथ!
सुखात मला वाटेकरी नकोत, पण दु:खात हवेत. तो मान मी तुम्हाला देतो. चला, सगळे मिळून हिरमुसले होऊ या. सगळे मिळून खंत करू या. सगळे मिळून मनातले देव्हारे नव्याने तपासून पाहू या. तिथे चुकून उषा खन्ना तर घुसून बसलेली नाही ना? क्या करते हो यार! उषा खन्ना ही ‘वन फिल्म वंडर’ होती. ‘दिल देके देखो’ या जॅकपॉटनंतर ती क्रांतिवीरासारखी भूमिगत झाली. नाही म्हणायला तत्कालीन पती सावनकुमार टाकच्या ‘सौतन’मध्ये ‘शायद मेरी शादी का खयाल दिलमें आया है..’ या द्वंद्वगीतात तिने थोडी चमक दाखवली होती, पण तेवढीच. संगीतकारांच्या प्रमुख प्रवाहात ती कधीच येऊ शकली नाही; कायम ‘आल्सो रॅन’ राहिली. मुळात ती कुठून उपटली व ‘दिल देके देखो’सारखा शम्मी कपूरचा बडा चित्रपट तिला कसा मिळाला (व आशा पारेखला का मिळाला? सगळ्या सुस्वरूप नायिका ‘मै कुवेमें छुप जाऊँगी’ म्हणत विहिरीत लपल्या होत्या का?) हा अनुत्तरित प्रश्न आहे. ‘दिल देके देखो’मध्ये सुपरहिट संगीत दिल्यानंतर उषा खन्नाकडे चित्रपटांची लाइन कशी लागली नाही हा दुसरा अधिक मोठा अनुत्तरित प्रश्न आहे. ‘दिल देके देखो..’ हे चित्रपटाचे टायटल साँग व ‘हाँ या ना.. ओ मेरी नीता..’ या दोन हिट गाण्यांची व्युत्पत्ती कळली आणि उषा खन्नाच्या सुपरहिट संगीताचं रहस्य कळलं.
इंग्रजी चित्रपटाची डी.व्ही.डी. आणली व संगीताच्या रेकॉर्डस्ची थप्पी मिळवली की एक अभारतीय हिंदी चित्रपट बनतो. मग ‘व्हेअर इगल्स डेअर’वरून ‘तहेलका’ निघतो, ‘अ प्यू गुड मेन’वरून ‘शौर्य’ निघतो, ‘डर्टी डझन’वरून ‘कर्मा’ निघतो, ‘क्रॅमर वर्सेस क्रॅमर’वरून ‘अकेले हम अकेले तुम’ निघतो व ‘अ‍ॅन अफेअर टु रिमेंबर’वरून भुक्कड व टुकार ‘मन’ निघतो. त्यानंतर आमीर खान टी.व्ही.वर येऊन हिरिरीने म्हणतो, ‘‘आमचा चित्रपट ‘टायटॅनिक’वरून मुळीच घेतलेला नाही.’’ हो, नाहीच घेतलेला. तो कॅरी ग्रँट व डेबोरा केर यांच्या क्लासिक ‘अ‍ॅन अफेअर टु रिमेंबर’वरून सरळ सरळ घेतलाय. (तरीही तो इतका वाईट करणे येरागबाळ्याचं काम नाही.) ‘कितना प्यारा तुझे रबने बनाया..’ (राजा हिंदुस्थानी: नदीम-श्रवण) हे गाणं ‘अंदाज’मधल्या ‘तोड दिया दिल मेरा..’वरून घेतलेलं नाही, असं उद्या नदीम म्हणेल. हो, नाहीच घेतलेलं. ते पाकिस्तानच्या नुसरत फतेह अलीच्या ‘कितना सोना तेणू रबने बणाया..’ची तंतोतंत नक्कल आहे. किसे उल्लू बना रहे हो यार?
राज कपूर-नर्गिस-अशोककुमार यांच्या ‘बेवफा’मध्ये तलत मेहमूद गायला होता-
‘तुमको फुरसद हो मेरी जाँ तो इधर देख तो लो
चार आँखे न करो एक नजर देख तो लो’
उचललेल्या चालींचं भारतीयीकरण करण्यात आलं, त्यांच्यावर या मातीचे संस्कार झाले तर केलेल्या उचलेगिरीचं बऱ्याच प्रमाणात पापक्षालन होतं असं मी तरी मानतो. निर्मात्याच्या अत्याग्रहापायी जातीवंत संगीतकार अनिल विश्वासने ‘मॅन हू न्यू टू मच’मधल्या डोरिस डेच्या ‘के सरा के सरा..’ या गाण्यावरून बेतलेले ‘जीवन है मधुबन..’ हे तलत महमूदच्या आवाजातील गाणे दिले. त्या मधुर गाण्याला लाभलेल्या अनिल स्पर्शामुळे सांगूनही ती नक्कल वाटत नाही. तीच कथा आर. डी. बर्मनने ‘इफ इट इज टय़ूसडे’वरून प्रभावित होऊन दिलेले ‘यादों की बारात’मधील गाजलेले गाणे ‘चुरा लिया है..’ याची. आर.डी.ने मूळ इंग्लिश गाण्यावर स्वत:च्या प्रतिभेचं कलम केलंय.
उदाहरणार्थ, अट्टल गुन्हेगार नदीम-श्रवण यांनी ‘आशिकी’तील ‘तू मेरी जिंदगी है..’ हे गाणे गाण्याच्या शब्दांसकट पाकिस्तानी गायिका तसव्वूर खानुम हिचे राजरोस चोरले आहे. मग अन्नू मलिक थोडाच मागे राहणार? त्याने ‘याराना’तील ‘मेरा पिया घर आया..’ हे गाणे नुसरत फतेह अलीवरून जसंच्या तसं घेतलंय. ‘पिया’चं ‘सजना’ करावंसंही त्याला वाटलं नाही. हॉटेलातून आणलेल्या ‘डिश्’मध्ये आपण हळद-तिखट घालत बसतो का? नदीम श्रवण व अन्नू मलिक (व अर्थातच भप्पीदा व विजूमामा शहा) यांना ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणायला हरकत नाही.
पकडला जाईपर्यंत कुठलाही चोर हा सावध असतो. असे अनेक सावध हिंदी चित्रपट संगीतात सुखेनैव संचार करतायत. त्यांचा पर्दाफाश होत नाही किंवा झालेला नाही ही अन्नू मलिकची खरी व्यथा आहे. एक म्हण आहे- ‘नामचिन रंडी कमा खावे और नामचिन चोर मार खावे!’ अन्नू त्याच्या दुर्दैवाने ‘नामचिन चोर’ ठरलाय व म्हणून तो सगळीकडून मार खातोय. आगाऊपणामुळे बुडत्याचा पाय जास्तच खोलात गेलाय. त्याला काहीच येत नाही, असं कोणीही उठून म्हणायला लागलंय. ही बदनामी व अवहेलना अन्नू मलिकने स्वहस्ते ओढवून घेतली आहे. ‘मुझे नींद ना आये..’ (दिल), ‘ओ जाने जाना..’ (इन्साफ) व ‘अकेले है तो क्या गम हैं..’ (कयामत से कयामत तक) या चाली दुसऱ्याच्या चोरून देणारे चित्रगुप्त पुत्र आनंद-मिलिंद एकूणच मागे पडले व त्यामुळे चौर्यकर्माच्या स्पर्धेतूनही बाहेर फेकले गेले. नवीन डल्लामारूंच्या स्पर्धेत जुने डल्लामारू मागे पडणे स्वाभाविक आहे. निखिल-विनय, विशाल भारद्वाज, संदीप चौटाला, प्रीतम हे पाश्चिमात्य रेकॉर्डस्चा मागोवा घेत गल्लीबोळ फिरतायत याचे पुरावेही आता उपलब्ध होतायेत.
दिग्गज संगीतकारांना असा उचलेगिरीचा मोह का पडत असेल? स्वत:कडे अद्भुत चालींचे रांजण भरलेले असताना त्यांना इकडे तिकडे उधार उसनवारी करण्याची बुद्धी का होत असेल? आपल्या सृजनशीलतेवर आपणच अन्याय करतोय व श्रद्धाळू रसिकांचा विश्वासघात करतोय असं त्यांना वाटलं नसेल का? या प्रश्नांची समाधानकारक उकल कदाचित कधीच होणार नाही. हेमंतकुमारसारख्या धीरगंभीर गायक संगीतकाराने ‘पोलीस’ चित्रपटात ‘ओ ओ ओ बेनॅडीन..’चे ‘ओ ओ ओ बेबी..’ असे केले होते. हे म्हणजे बालब्रह्मचारी साधकाने तरुणीचा हात पकडण्यासारखे वाटते. ‘ब्रूटस्, यू टू द’ असं ज्युलियस सीझर म्हणाला होता तसंच म्हणावंसं वाटतं. ‘हेमंतकुमार, तूसुद्धा?’
कामाच्या रेटय़ापायी भुरटी चोरी करण्याची इच्छा काही गुणीजनांना होत असावी. एरव्ही शंकर-जयकिशननी पोती भरभरून उत्तम गाणी दिली. (व ‘फिल्मफेअर’ पारितोषिक चुकू नये यासाठी ‘फिल्मफेअर’चे गठ्ठेच्या गठ्ठे विकत घेऊन मित्रांकडून आपल्या नावाची कूपने भरून घेतली.) पण ‘बरसात’, ‘आह’, ‘आवारा’, ‘बादल’, ‘पूनम’, ‘औरत’, ‘यहुदी’, ‘दाग’, ‘राजहट’, ‘अनाडी’ हे संगीतखजिने उधळल्यानंतर उतरतीच्या काळात ‘है ना बोलो बोलो..’ (अंदाज), ‘देखो अब तो..’ (जानवर), ‘गुमनाम है कोई..’ (गुमनाम), ‘बिन देके और बिन पहेचाने..’ (जब प्यार किसीसे होता है), ‘मै आशिक हूँ बहारोंका..’ (आशिक), ‘कौन है जो सपनोंमे आया..’ (झुक गया आसमान) या चोरलेल्या चीजा ते खपवायला लागले. एवढं करूनही ‘सीमा’ची जादू त्यांना पुन्हा पकडता आली नाही. ‘मनमोहना बडे झुटे..’ची भैरवी त्यांना सोडून गेली.
कधी कधी चांगला संगीतकारही एखाद्या चालीच्या असा काही प्रेमात पडतो की त्यातलं काहीतरी घेण्याचा त्याला अनावर मोह होतो. सी. रामचंद्र सज्जादच्या ‘दोस्त’ चित्रपटातील नूरजहानने गायलेल्या ‘बदनाम मुहोब्बत कौन करे..’च्या असेच प्रेमात होते. विशेषत: त्यातल्या ‘बदनाम’ या शब्दावर नूरजहान जी थबकते व लाडीक झटका देते त्याची अण्णांना भुरळ पडली होती. अखेर मराठी ‘घरकुल’ चित्रपटात ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे..’ या गाण्यात त्यांनी ‘मलमली’ या शब्दावर तो प्रयोग आशा भोसलेच्या लवचिक आवाजात यशस्वीपणे केला. माझ्या मते ही नक्कल नसून एका थोर संगीतकाराने दुसऱ्या थोर संगीतकाराच्या नजाकतीला दिलेली संगीतमय दाद होती. भेंडीबाजारातील एका मुसलमान कव्वालाने लावलेला एक सूर रामचंद्रना इतका भावला की ‘अमरदीप’ मधल्या ‘दिलकी दुनिया बसाके सावरिया..’मध्ये तो चपखल बसला म्हणून बसवला. एका भंग्याकडच्या लग्नात ऐकलेला ठेका त्यांनी ‘भोली सूरत दिलके खोटे..’मध्ये त्याच्याकडूनच वाजवून घेतल्याचा अजब किस्सा अण्णांनी मला सांगितला होता. अन्नू मलिक सांगून गेलाच आहे की ‘ओन्ली गॉड इज ओरिजिनल’ पण हे ‘अरे बाबा, अरे बाबा’या ‘औजार’मधल्या दरोडय़ाचं समर्थन कसं होऊ शकतं?
लता मंगेशकरला ‘नाउमीद होके भी, दुनियामे जिये जाते है..’ (संगीता) हे स्वत:चे अप्रतिम गाणे विशेष आवडत नाही हे जाणून एका मुलाखतकाराला अतोनात आश्चर्य वाटले होते व ते त्याने लेखी व्यक्त केले होते. त्यावर बोलताना लता मला म्हणाली, ‘‘रसिकांच्या व माझ्या आवडीत तफावत असू शकते. माझा दृष्टिकोन भिन्न असू शकतो. ‘नाउमीद होके भी’ची मूळ चाल मी ऐकल्येय. अण्णांनी अरेबियन गाण्याची रेकॉर्ड मला ऐकायला दिली होती. साहजिकच मला त्या चालीचं एवढं अप्रूप नाही.’’
आता पुढला प्रश्न मोठा व महत्त्वाचा ठरतो. चार गाणी (आठ म्हणा हवं तर!) इकडून तिकडून उचलल्यामुळे दिग्गज संगीतकारांच्या धवल नावाला बट्टा लागतो का? काही प्रमादांबद्दल उत्तुंग कर्तृत्व गाजवणाऱ्या महान संगीतकारांना आपण सुळावर चढविणार आहोत का? त्यांच्या तुरळक चोऱ्या पकडल्या गेल्यामुळे त्यांची अवघी कारकीर्द मातीमोल ठरते का? तेवढय़ामुळे आपण आपल्या मनमंदिरातून त्यांची अवहेलनापूर्वक हकालपट्टी करणार आहोत का? ‘साला मैं तो साब बन गया’ (सगीना) किंवा ‘ये चंदा रूसका..’ (इन्सान जाग उठा) किंवा ‘ये भी कोई रुठनेका मौसम है दीवाने..’ (सोलवा साल) यांच्या चाली एस.डी.ने उचलल्या असल्या तरी त्यामुळे ‘आठ दिन’ व ‘शिकारी’पासून सुरू झालेली त्याची प्रदीर्घ व देदिप्यमान कारकीर्द क्षणात आपण कुचकामी ठरवायची का? मोठय़ा-मोठय़ा संगीतकारांचे पायही शेवटी मातीचेच असतात, असे ओठ मुरडून बोलण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो का? नाही, नाही, त्रिवार नाही! थोडं नाउमेद व्हायला होईलही (‘बाबूजी धीरे चलना..’ हे ‘ओरिजनल’ नाही कळल्यावर मन खट्टू होणारच!) परंतु ही नाराजी प्रमाणात ठेवायला हवी. त्यापायी त्या संगीतकाराचं संपूर्ण योगदान अव्हेरण्याची आततायी, अन्याय्य व टोकाची भूमिका आपण घेता कामा नये. मात्र ही समंजस भूमिका आपण मेसर्स विजू शहा आणि कंपनी यांच्या बाबतीत घेऊ शकत नाही. विजू शहाने स्वत: चाल लावलेलं व एकदा ऐकण्याजोगं असलेलं एक गाणं तरी सांगू शकाल? (‘त्रिदेव’मधलं ‘ओये ओये..’ही त्याचं नाही.) बोलायला बरं वाटत नाही पण या लोकांचा सगळा डोलारा चौर्यकर्मावर उभा आहे. कोणाच्या घरी, कशाची व कशी चोरी करायची याचं प्राथमिक ज्ञानही यांच्याकडे नाही. रॉकफेलरच्या घरी जाऊन खिळा उचलून आणतील व स्वत:च्या भिंतीवर ठोकत बसतील.
स्वत:चं काही नाहीच. मग एस. डी. बर्मन व भप्पी लाहिरी, सी. रामचंद्र व नदीम श्रवण, शंकर-जयकिशन व अन्नू मलिक यांना एकाच पारडय़ात टाकून कसं चालेल? रोशन व सुपुत्र राजेश रोशन सारखेच? लता मंगेशकरही गायिका व शारदाही गायिकाच?
राजेश रोशन कधीच सुधारला नाही. भाऊ राकेश बडा निर्माता आहे म्हणून त्याला त्याचे चित्रपट तरी मिळतात. पण ऋतिक काकाला चित्रपट मिळवून देऊ शकत नाही किंवा देऊ इच्छित नाही. अन् लता मंगेशकरने एके काळी ‘भैरवी’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती घाटली होती तेव्हा विश्वासाने तिने संगीत रोशनकडे सुपूर्द केले होते. रोशन म्हणजे केवळ ‘आरती’, ‘बरसात की रात’ व ‘ताजमहल’ नव्हेत तर ‘हमलोग’, ‘रागरंग’, ‘देवर’, ‘आगोश’, ‘अनहोनी’ ‘नौबहार’ व ‘भिगी रात’!
उद्या अन्नू मलिकविरुद्ध चोरीबद्दल संगीत कोर्टात खटला उभा राहिला व अन्नूने मला त्याचं वकीलपत्र दिलं तर मी मांगाची काळी वस्त्रे परिधान करून ललकारून म्हणेन, ‘‘मिलार्ड, अन्नू हा छोटामोठा भुरटा चोर आहे. त्याला शिक्षेची नाही तर अनुकंपेची गरज आहे. त्याच्यात टॅलंट असते तर त्याने कशाला चोरी केली असती? अन्नू असा झाला त्याला समाज व मोठे संगीतकार कारणीभूत आहेत. आजही तो स्वत:ला आधुनिक शंकर-जयकिशन समजतो. यावरून हे स्पष्ट होतं की उसकी दिमागी हालत ठीक नहीं. रहेम मेरे आका, रहेम.. जाओ बेटा अन्नू.. जजसाबके चरण छूके माफी मांगो. पण त्यांच्या बुटाची लेस चोरू नकोस!..’’
shireeshkanekar@hotmail.com