ch06सतत आणि टोकाचा संशय घेणं, कोणीतरी आपल्या शरीरात वास करतंय, कोणीतरी आपल्या विरोधात आहे, आपल्याला मारायला टपलंय असे भ्रम आणि काही वेळा भासही होणं म्हणजे स्किझोफ्रेनिया. तो आजार आहे आणि त्यावर उपचार करता येतात. मात्र घरच्यांनी वेळीच त्याची लक्षणे लक्षात घेऊन रुग्णांना डॉक्टरांकडे नेले पाहिजे.

मागच्या लेखात आपण स्किझोफ्रेनियाच्या महत्त्वाच्या लक्षणांबद्दल पाहिले. आपण ‘देवराई’सारख्या चित्रपटात स्किझोफ्रेनियाबद्दल बरेच काही समजावून घेतले. या आजाराची लक्षणे विविध प्रकारांची व विविध पातळीवरची आहेत. काही रुग्णांमध्ये वैचारिक बदल अधिक असतात तर काही रुग्णांमध्ये वागणुकीतील बदल अधिक असतात. यामध्ये संशयाच्या भ्रमात हरविलेले रुग्ण खूप आढळतात. याचा त्रास त्यांच्या नातेवाईकांना खूप प्रमाणात होतो.
माझ्याकडे एक उच्चशिक्षित व उच्च पदावर काम करणारे सद्गृहस्थ त्यांच्या प्रचंड संशयी पत्नीला उपचारासाठी आणत असत. कित्येक वर्षांपासून तिला पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया हा आजार होता. ती अत्यंत सुंदर व सुशिक्षित होती. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाआधी अगदी सकाळी सहा वाजता फोन करून ती त्यांना ‘सुप्रभात’ म्हणायची. त्यांच्या दिवसभरच्या दिनचय्रेबद्दल विचारून घ्यायची. रोज भेटायचेच हा तिचा आग्रह असायचा. दुपारी लंचच्या वेळेला ती फोन करायची. काय लंच घेतो आहेस याबद्दल सखोल चौकशी करत असे. त्यांच्या ऑफिसमधील इतर लोकांबद्दलही ती माहिती घेत असे. अर्थात लग्नापूर्वीच्या दिवसांत प्रियकराबद्दलचा हा मालकीहक्क त्यांनाही खूप आनंद देत असे. सहज एकदा प्रीतीला चिडविण्यासाठी त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या एक सहकारी स्त्रीच्या काळ्याभोर लांब केसांची स्तुती केली. प्रीती इतकी चिडली की तिने स्वत:चे लांब केस कापले व त्याचा बॉबकट केला. या गृहस्थांना याचा प्रचंड धक्का बसला. पण त्यांनी प्रीतीचे आपल्यावर निस्सीम प्रेम आहे व ती संवेदनशील असल्याने आपणच तिला खूप सांभाळून घेतले पाहिजे असे ठरविले.
लग्नानंतर मात्र तिचा त्यांच्यावरचा कब्जा वाढत गेला. ती त्यांच्याबरोबर मीटिंगला कोण बसले आहे, त्यात स्त्रिया किती आहेत याविषयी संशयाने चौकशी करत असे. हा सगळा मामला संशयकल्लोळ आहे हे कळायला त्यांना खूप वेळ लागला. कारण आतापर्यंत ‘एक दुजे के लिए’ असा त्याचा गरसमज होता. ते घरी आल्यावर प्रीती त्यांच्या कपडय़ांचा ताबा घेई व कपडे कपाटात व्यवस्थित ठेवीत असे. पण एकदा त्यांच्या कपडय़ाला वेगळ्या परफ्यूमचा वास येत आहे व तो परफ्यूम फक्त स्त्रिया वापरतात असे सांगून तिने भांडण काढले. हे गृहस्थ आता हादरूनच गेले. रोज कसला ना कसला संशय, कधी रुमालावरून कधी परफम्यूवरून. मोबाइलच्या कॉल्स व एसएमएसचा वेगळा चेकअप होताच. मीटिंगच्या निमित्ताने त्यांना दुसऱ्या शहरात राहावे लागत असे. तेव्हा प्रीती त्यांची हॉटेलची व विमानाची तिकिटे स्वतला पाहायला पाहिजे असा आग्रह धरीत असे. अलीकडे तर ते दुसऱ्या शहरात असताना रात्री एक वाजता तिने त्यांना फोन करून विचारायला सुरुवात केली की बरोबर कोण झोपले आहे. त्या गृहस्थांना खूप बेचन वाटू लागले. मधल्या काळात तिने त्यांच्या वहिनीबरोबर त्यांचा संबंध आहे असेही आरोप केले. ती स्वत:च्या बहिणींनाही घरी येऊ देईना. स्वत: मात्र नवऱ्याला बरोबर न घेता (काहीबाही कारणे सांगून) त्यांच्या घरी जाई. एके दिवशी ते लवकर घरी आले आणि तिने कुलूप बदलल्याने त्यांना स्वत:च्याच घरात प्रीती येईपर्यंत पुरते दहा तास शिरता येईना. तिचा स्वभाव तिरसट होताच, नको तो प्रश्न विचारणे, इतर माणसे आपल्या वाईटावर आहेत, आपल्या श्रीमंतीवर जळतात आणि आपल्याविषयी वाईट वाईट बोलतात हे तिचे नेहमीचेच समज झाले होते. पण इतर माणसांना तिच्या या साऱ्या विचित्र वागणुकीची आणि संशयी भ्रमाची माहितीही नव्हती. ती थोडी चिडचिडी आहे व नवऱ्याला ताब्यात ठेवते. इतरांनी तिच्या नवऱ्याबरोबर जवळीक दाखविलेली तिला अजिबात आवडत नाही. इतकीच माहिती नातेवाईकांना व मित्रमंडळींना होती. या गृहस्थांना लग्नाचे पावित्र्य आपणच जपून ठेवायला पाहिजे, नाहीतर आपले हसे होईल या भावनेने कुणाशी याबद्दल बोलताही येत नव्हते. त्यांचा कोंडमारा झाला होता.
अशा रुग्णांमध्ये, त्यांच्या विचारप्रक्रियेत बदल जाणवतात. त्यांची सामाजिक वागणूक तशी ठिकठाकच असते. थोडेसे संशयी आणि विक्षिप्त अशी माणसे एवढेच लोकांच्या लक्षात येते. अशा पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाच्या तीव्र प्रमाणात आपल्या जेवणात कोणीतरी विष घातले आहे, आपले विचार व वागणे कोणीतरी पूर्ण ताब्यात ठेवत आहे, आपला पाठलाग होत आहे, कधी कधी आपल्याबद्दल टीव्हीवर व रेडिओवर माहिती दिली जात आहे, वर्तमानपत्रातून आपल्याबद्दल बातम्या छापल्या जात आहेत, असे अनेक भ्रम या रुग्णाच्या मनात येत असतात. या भ्रमाच्या विरोधात कितीही समजाविले वा पुरावे दिले तरी ते त्यांच्या मनातून जात नाहीत. मेधा नावाची तरुणी आपले कुटुंबीय आपल्या विरोधात असून आपल्याला मारण्याचा त्यांनी घाट घातला आहे या भ्रमाने घाबरून घर सोडून गेली. घरी नातेवाईकांनी दिलेले अन्नपाणी ती घेतच नसे. तर याच्या दुसऱ्या टोकाला ४५ वर्षांच्या राधाकाकू आपला नवरा व मुलगा आपल्या विरोधात आहे आणि त्यांना मला मारून टाकायचे आहे म्हणून ते रक्तदाबाची औषधे देत नाहीत, अशी तक्रार करत.
कधी कधी काही साध्या गोष्टींतूनही ही मंडळी लोकांचा आपल्या विरोधात काहीतरी हेतू आहे असा अर्थ काढतात. भ्रमांबरोबर भास असले तर खूपच त्रासदायक असते. सुधा आपल्या वडिलांना नेहमी सांगत असे की शेजारच्या इमारतीत राहणारा शेखर तिच्याशी लग्न करणार आहे. त्या दोघांचे तसे बोलणे झाले आहे. तो तिला नेहमी एसएमएस पाठवीत असतो. त्याचा आवाज तिला सतत ऐकू येतो. अनेकदा घरात बसून ती कुणाचा तरी आवाज ऐकते आहे असे तिच्या आईबाबांनासुद्धा जाणवायचे. पण सुरुवातीला ती काही सांगत नसे. नंतर नंतर ती शेखर थेट तिच्याशी बोलतो आहे असे सांगत असे.
कधी कधी दोन-चार व्यक्ती मिळून आपल्याबद्दल वाईटसाईट (चारित्र्याबद्दल) बोलतात असेसुद्धा या रुग्णांना वाटते. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज कानात येतात. कधी धाक दाखवितात, कधी कधी शिवीगाळही करतात. कधी त्यांच्याकडून काहीबाही करवून घेतात तर कधी आपल्या प्रत्येक गोष्टीवर धावते समालोचन करतात असे त्यांना वाटते. या आवाजाच्या प्रभावाखाली एखादा रुग्ण दुसऱ्यावर आघात करतो किंवा आत्महत्याही करतो. हे भ्रमाचे, भासाचे व विचित्र विचारांचे काल्पनिक जग त्या रुग्णाचे मात्र रोजचे विश्व असते. कधी कधी कुठल्या तरी भूत-प्रेतात्मक आत्म्यांकडून व अतिंद्रिय शक्तींकडून आपल्या शरीराचा पूर्ण कब्जा घेतला आहे असे काहींना वाटते.
जयाबेनचा नवरा जयाबेनला याच कारणांसाठी घेऊन आला होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे गेली कित्येक वष्रे तिच्या लहानपणी शेजारी राहणारा एक माणूस तिच्या शरीरात जाऊन बसला होता. तसा तो शांत बसत असे. पण कधी कधी तो तिला आतून गुदगुल्या करत असे. चिमटे काढत असे तर कधी मीठ जास्त टाक, चपाती करपून टाक असे सांगत असे. तो माणूस तिच्याशी संभोग करतो याची तिला खात्री होती. जयाबेनने घरचे काम व इतर दैनंदिन व्यवहार व्यवस्थित करत असे. पण तिचे हे भ्रम व भास मात्र चालू राहिले. तिच्या नवऱ्याने दहा वष्रे देवदेवस्की केली व शेवटी तिला उपचारासाठी आणले.
वरील प्रकारची सर्व लक्षणे बाह्य़दर्शनी आपल्या लक्षात येतात. विचारांची भ्रमिष्टता, विचित्र वागणूक, आक्रमकता, असंबद्ध वेडेवाकडे बोलणे, भ्रामक जगात वावरणे ही सारी पॉझिटिव्ह लक्षणे मानली जातात. काही रुग्णांमध्ये मात्र आपल्याला नकारात्मक लक्षणे दिसतात. कीर्ती दहावीपर्यंत अगदी व्यवस्थित होती. शाळेत नियमित जात असे. टापटीप राहण्याची तिला आवड होती. अकरावीत गेली व हळूहळू तिच्या वागणुकीत बदल जाणवू लागला. नेहमी खेळकरपणे राहणारी आता ती आता कमी बोलायला लागली. एक वा दोन शब्दांत उत्तरे द्यायची. सांगितल्याशिवाय काही करायचे नाही. काहीतरी कारणे सांगून कॉलेजात जायला टाळाटाळ करू लागली. हळूहळू बाहेर पडायचे टाळू लागली. पूर्वी ज्या मत्रिणी तिच्याबरोबर कॉलेजात जात असत त्यांनाही ती टाळत होती. त्याही कॉलेजजीवनात रमल्या. तिचा निरुत्साह पाहून, तिच्याबरोबर राहणे त्यांना कंटाळवाणे वाटले असावे म्हणून त्याही तिला टाळू लागल्या. सुरुवातीला मी कॉलेजला नाही गेले तरी घरी अभ्यास करेन असे आईबाबांना सांगून ती पुस्तक घेऊन बसे खरी, पण अभ्यास करत नसे. मग ती झोपून राहू लागली. बारा-एकपर्यंत उठायची नाही. रोजचे दात घासणे, केस विंचरणे, आंघोळ करणे टाळू लागली. कपडय़ाचेसुद्धा तिला भान राहात नसे. रात्री उशिरापर्यंत जागायची. घरी आलेल्या नातेवाईकांशी बोलायचे नाही. त्यांना टाळायची. डोळ्यांमध्ये किंवा चेहऱ्यावर निर्वकिारपणा दिसायचा. मध्यंतरी तिची आई खूप आजारी पडली तर तिच्यावर काही परिणामच झाला नव्हता. कीर्ती जणू निर्जीव झाली होती. एकलकोंडी व मूक झाली होती. कुठल्याही गोष्टीत तिला रस वाटत नव्हता. भावनांचं अस्तित्व तिच्या वागण्या-बोलण्यात दिसत नव्हतं. आईबाबांनी समजावून सांगितले. रागावून, चिडून सांगितले तरी काही परिणाम होत नव्हता. दु:ख नाही, राग नाही, कुठली भावनाच नाही. तिने स्वत:चाच एक कोष निर्माण केला होता. त्या कोषातून ना ती बाहेर पडू शकत होती ना कुणाला आत येऊ देत होती. ही लक्षणे इतरांच्या हळूहळू लक्षात यायला लागतात. सुरुवातीला उदासीनतेसारखी वाटणारी ही लक्षणे असतात मात्र स्किझोफ्रेनियाची!
पुढच्या लेखात (१३ जून) आपण स्किझोफ्रेनियाच्या उपचारांविषयी जाणून घेऊया.
डॉ. शुभांगी पारकर

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल