श्रद्धांजली
नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूमुळे आपल्या समाजाची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे. अलीकडच्या काळात आपल्याकडे नरेंद्र दाभोलकर म्हटलं की लोकांना जादूटोणाविरोधी विधेयक एवढंच आठवतं. पण दाभोलकरांचं काम या विधेयकापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी आयुष्यभर अत्यंत व्यापक अशा कामाला स्वत:ला वाहून घेतलं होतं. महाराष्ट्रातल्या लोकांना सुबुद्ध करायचं, त्यांना कोणत्याही गोष्टीचा मुळापासून विचार करायला प्रवृत्त करायचं, त्याआड येणाऱ्या धर्माच्या, जातीच्या चुकीच्या समजुती दूर करायच्या हे दाभोलकरांच्या आधीच्या पिढीतल्या लोकांनी सुरू केलेलं समाजप्रबोधनाचं काम दाभोलकरांनीही हातात घेतलं आणि व्यापक जीवनदृष्टीने ते आयुष्यभर पुढे नेलं. त्यासाठी त्यांनी स्वत:ची डॉक्टरकीची प्रॅक्टिसही सोडून दिली. त्यामुळे त्यांना जादूटोणाविरोधी विधेयकापुरतं सीमित करणं योग्य नाही. दाभोलकर त्याच्याही पलीकडे खूप मोठे होते.
‘साधना’ साप्ताहिक त्यांनी ज्या पद्धतीने चालवलं, त्याला स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभं केलं, त्याला व्यावसायिक रूप दिलं ते पाहा किंवा सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार घ्या. या अर्थाने डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आगरकर, कर्वे यांच्या परंपरेतले कृतिशील विचारवंत होते. तात्कालिक आविष्कारातून जादूटोणा विरोधी विधेयकाला होणारा विरोध बघून त्यांचा त्यांना खूप खेद व्हायचा. खूपदा अशी काही विधेयकं असतात, ज्यांचा समाजातल्या काही विशिष्ट घटकांना फायदा होणार असतो. जादूटोणाविरोधी विधेयकामुळे असा कुठल्या एका घटकाचा फायदा होणार नव्हता तर त्यात संपूर्ण समाजाचंच हित होतं. वारकरी समाजाचा या विधेयकाला विरोध आहे, असा एक चुकीचा समज उगीचच पसरवला गेला आहे. वास्तविक तसं कधीच नव्हतं. याबद्दल डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी माझी नेहमी चर्चाही होत असे. आपल्याकडे धर्म आणि पुरोगामी विचार यांचा एकमेकांना विरोध असतो असं मानण्याची पद्धत आहे. पुरोगामी कार्यकर्ते समाजाची धर्माच्या अस्तित्वाची गरज समजून घेत नाहीत, असं माझं म्हणणं आहे. ते मांडलं जावं, त्यावर चर्चा व्हावी यासाठी दोन महिन्यांपूर्वी पुण्यात पिंपरी चिंचवडला त्यांनी एक सभा घेतली होती. त्यात माझं भाषण ठेवलं होतं. तेव्हाही मी हाच मुद्दा मांडला होता की अंधश्रद्धा निर्मूलन हे संतांचंच काम आहे आणि तुम्ही ते करता आहात त्यामुळे तुम्हाला आमचा, वारकऱ्यांचा विरोध असण्याचं काही कारणच नाही. त्यांनी माझं हे भाषण साप्ताहिक ‘साधना’मध्येही प्रसिद्ध केलं.
आपल्याबरोबरचे वेगवेगळे मतप्रवाह समजून घ्यायचे, त्यांचा आदर राखायचा याचं उत्तम भान डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना होतं. लोकशाहीत जशी माणसं असणं गरजेचं असतं तसे ते होते. ते सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत. एखादी गोष्ट पटली नाही तरी कधीही चिडत नसत. युक्तिवाद करायची, चर्चा करायची त्यांची नेहमीच तयारी असे. वादविवाद करताना, तत्त्वांसाठी लढताना त्यांचा कधीही पारा चढला नाही. आपल्या विरोधकांनाही त्यांनी सन्मानाने वागवलं. एकीकडे आपल्या तत्त्वांसाठीचा काटेकोरपणा आणि दुसरीकडे अत्यंत मृदूपणा असं अनोखं मिश्रण त्यांच्या स्वभावात होतं. पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा वाद होत. एकमेकांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होत अशा वेळी दाभोलकर स्वत: ते वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेत. मी हा अनुभव घेतला आहे. काही कारणाने माझ्यामध्ये आणि आ. ह. साळुंखे यांच्यात वाद निर्माण झाला होता. आम्ही एकमेकांविरोधी लिखाणही केलं होतं. त्याचा कार्यकर्त्यांवर परिणाम व्हायला लागला होता. तेव्हा दाभोलकरांनी पुढाकार घेऊन बाबा आढाव, डॉ. श्रीराम लागू, पुष्पा भावे आणि अनेकांना बोलवून एक बैठक घेतली होती आणि सामाजिक काम करणाऱ्यांनी एकमेकांबद्दल स्नेहबंध ठेवला पाहिजे असा मुद्दा मांडला होता. वास्तविक या सगळ्यात त्यांचा वैयक्तिक फायदा काहीच नव्हता, पण त्यांची ही तळमळ मला महत्त्वाची वाटते.
ते नेहमी अत्यंत व्यग्र असत. सतत फिरती, वेगवेगळी कामं पण या व्यस्त दिनचर्येतूनही त्यांनी स्वत:ला फिट ठेवलं होतं. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा हा आदर्श ठेवायला हवा.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ज्या पद्धतीने गोळ्या घालून हत्या झाली आहे ती फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. यामुळे लोक जाहीरपणे आपली भूमिका मांडायला बिचकतील. आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी संघर्ष करण्यापेक्षा सोपे मार्ग स्वीकारायला सुरुवात करतील हे दाभोलकरांच्या जाण्यामुळे होऊ घातलेलं मोठं नुकसान आहे.