ए. एच. मुल्लर – जर्मन वडील आणि केरळीय आईच्या पोटी जन्माला आलेल्या मुल्लर यांनी चित्रकलेचे शिक्षण मद्रास स्कूल ऑफ आर्टमधून घेतले. त्यानंतर मात्र त्यांनी कारकीर्दीचा दीर्घ काळ मुंबईमध्ये व्यतीत केला आणि उत्तरायुष्यात ते उदयपूरला स्थायिक झाले. त्यांनी भारतीय आणि खास करून हिंदूू पुराणकथांवर आधारित भरपूर चित्रण केले. त्यातही मनुष्याकृतीप्रधान चित्रे हा त्यांचा हातखंडा विषय होता. बॉम्बे आर्ट सोसायटीह्णच्या प्रदर्शनातही त्यांना ‘राम आणि सीता’ या चित्रासाठीच प्रतिष्ठेचे असे सुवर्णपदक मिळाले होते. त्यांची अनेक चित्रे आजही सांगली आणि साताऱ्याच्या औंध येथील संग्रहालयात पाहायला मिळतात. प्रस्तुतचे चित्र पुराणातील ‘कमळजा लक्ष्मी’ सध्या सांगली येथील संग्रहालयात पाहायला मिळते.