ख्रिसमसप्रमाणेच ईस्टर हा सणही ख्रिश्चन बांधव मोठय़ा उत्साहात साजरा करतात. ईस्टरची परेड, फीस्ट, अंडी रंगवणं अशा ईस्टरच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि अमेरिकेत साजऱ्या होणाऱ्या इस्टरविषयी

अमेरिकेत राहणारे जास्तीत जास्त लोक हे धर्माने ख्रिश्चन आहेत, तेव्हा साहजिकच ख्रिसमस आणि ईस्टर हे दोन्ही सण उत्साहात साजरे करतात. ख्रिसमस हा येशूच्या जन्माचा दिवस, गुड फ्रायडे हा त्याचा सुळावर जाण्याचा दिवस आणि नंतरचा रविवार- म्हणजे ईस्टर सण्डे हा त्याचा परत प्रकटण्याचा आणि लवकरच स्वर्गाला जाण्याचा दिवस. हे दोन्ही सण जरी ख्रिश्चन धर्मातले असले, तरी ख्रिसमसची तारीख जशी ठरलेली असते, तशी ईस्टरची नसते, कारण चर्चचं जे वेगळं कॅलेंडर असतं, त्याप्रमाणे या सणाची तारीख ठरते- साधारणपणे मार्च २२ ते एप्रिल २५ च्या मध्ये ईस्टर येतो. स्प्रिंग इक्विनॉक्सच्या (मार्च विषुव दिन) नंतरच्या पहिल्या पौर्णिमेनंतरचा पहिला रविवार हा ईस्टर सण्डे म्हणून साजरा करतात. पौर्णिमा कधी २८, कधी २९ दिवसांनी येते. नक्की तारीख ठरलेली नसल्याने या सणाला ‘मूव्हिंग हॉलिडे’ म्हणतात. यंदा एप्रिल तीनला गुड फ्रायडे आणि एप्रिल पाचला ईस्टर सण्डे आहेत. ‘मार्डी ग्रा’ (या मूळ फ्रेंच नावाचं इंग्रजी भाषांतर आहे ‘फॅट टय़ूसडे’) ईस्टरच्या ४७ दिवस आधी साजरा करतात. खूप खायचं, प्यायचं, छान, छान चकचकीत कपडे घालून, मण्यांच्या माळा, रंगीत पिसं, वेगवेगळे मास्क्स (मुखवटे) वापरून मिरवणुकांमध्ये भाग घ्यायचा, विविध बॅण्ड्सनी सादर केलेलं म्युझिक ऐकायचं आणि मेरी-मेकिंगमध्ये दिवस घालवायचा. (न्यू आर्लिन्स या स्टेटमधला मार्डी ग्रा खूप प्रसिद्ध आहे). आपल्याकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या कांदेनवमीची आठवण (फक्त खाण्या-पिण्याच्या बाबतीत) आल्याशिवाय राहत नाही. मंगळवारी मार्डी ग्रा झाला, की येतो अ‍ॅश वेन्सडे. या दिवशी काही ख्रिश्चन भाविक लोक चर्चमध्ये जातात, तिथे फादर त्यांच्या कपाळावर भस्माने क्रॉस काढतात (क्रूसावर चढलेल्या येशूचे प्रतीक). ही मंडळी नंतर पुढचे ४० दिवस- (याला लेंट म्हणतात) रविवार वगळून-मांसाहार, मद्यपान, चांगले कपडे, नट्टापट्टा, छानछोकीला फाटा देऊन चांगले विचार आणि आचार करीत घालवतात. तरुण लोक हल्ली पुढचे ४० दिवस टीव्ही न बघायचा, सॉफ्ट ड्रिंक्स न पिण्याचा, उडत्या चालीची गाणी न ऐकण्याचा, रोज थोडं तरी बायबल वाचायचा असा एखादा पण करतात. शरीराचं आणि मनाचं शुद्धीकरण करून सगळे ख्रिश्चन लोक ईस्टर सण्डेच्या दिवसाची वाट बघतात. भाविक नसले, तरी येणारा सण साजरा करायला सगळ्यांनाच आवडतं. त्या आधी येणारा गुरुवार म्हणजे येशून त्याच्या मोजक्या अनुयायांबरोबर घेतलेल्या ‘लास्ट सपर’चा दिवस. शुक्रवारी येशूला फासावर चढवलं. रविवारी तो पुन्हा भूतलावर अवतरला. हा ‘रिसरेक्शन डे’. नंतरचे ४० दिवस तो आईला, शिष्यांना, बाकी नागरिकांना भेटत होता. ४० दिवसांनी त्याला लोकांनी ढगांमध्ये अंतर्धान पावताना पाहिलं. या दिवसाला असेन्शन डे म्हणतात. भाविक ख्रिश्चन मात्र त्याच्या रिसरेक्शनच्या दिवसालाच खूप मानतात.
ईस्टरची फीस्ट ख्रिसमससारखीच. जेवणात हॅम, अंडी, भाज्या यांची रेलचेल असते. हॉट क्रॉस बन्स बनविण्याची प्रथाही तशी जुनीच आहे. आता बनवर आइसिंग शुगर वापरून क्रॉस काढतात.(येशूला ज्या क्रॉसवर खिळे ठोकून मारलं, त्या क्रॉसचं प्रतीक). पूर्वी आइसिंग शुगर न वापरता प्रत्येक बनवर नुसत्याच खाचा करीत. पेगन (हा खूप जुना म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या किती तरी पूर्वीपासून प्रचारात असलेला धर्म) धर्मात हा चार खाचा दाखविणारा बन हे चंद्राचं- त्याच्या चार कलांचं प्रतीक मानत. दाराच्या बाहेर ठेवलेला बन घराचं रक्षण करतो, स्वयंपाकघरात ठेवलेला बन आगीपासून सगळ्यांचं रक्षण करतो आणि स्वयंपाक बिघडत नाही, आणि बोटीत हा बन बरोबर असला, की बोट बुडण्याचं संकट येऊ देत नाही अशा समजुतीही पेगन धर्मातल्याच. ख्रिश्चन लोक गुड फ्रायडेच्या दिवशी एकमेकांना बन देतात, आणि म्हणतात- ‘हाफ फॉर यू, हाफ फॉर मी, बिटवीन अस टू, द गुडविल बी.’ (दसऱ्याला आपण आपटय़ाची पानं एकमेकांना देतो किंवा संक्रांतीला तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ म्हणतो, तसाच थोडासा हा प्रकार आहे). लेंट महिना सगळं ‘सपक’ खाऊन-पिऊन राहिलेल्या ख्रिश्चन लोकांचं ईस्टर सण्डेला पारणं असतं. ईस्टरच्या मेजवानीत ‘डेव्हल्ड एग्स’ नावाचा खाद्यपदार्थ बरेच वेळा केला जातो.
विल्यम अंडरवूड नावाच्या माणसाचं मसाले विकायचं दुकान बॉस्टनमध्ये होतं. १८६८ साली त्याच्या मुलांनी वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याच्या उद्देशाने बरेच प्रयोग करून स्पेशल मसाले वापरून चटकदार केलेले अंडी, हॅम, चिकन, टर्की पदार्थ विकायला सुरुवात केली. अशा झणझणीत मसालेदार पदार्थाना ‘डेव्हल्ड’ असं विशेषण त्यांनी दिलं. ईस्टरला डेव्हल्ड एग्स खाण्याची प्रथा पुष्कळ ख्रिश्चन लोक पाळतात. (लेंटमध्ये अंडय़ांचा उपास घडला असेल, तर हा पदार्थ विशेषच रुचकर लागतो).
जर्मनीतून १७००च्या सुमाराला अमेरिकेत सेटल होण्यासाठी आलेल्या लोकांनी आपल्याबरोबर ईस्टरच्या खूप प्रथा आणल्या. आजही त्या बऱ्याच लोकप्रिय आहेत. ईस्टर बनीचं दाराबाहेर मुलांकरिता चॉकलेटं, जेलीबीन्स, बन्सने भरलेली बास्केट ठेवून जाणं, एग हंट, एग रोलिंग असे अंडय़ांशी निगडित खेळ, एग डेकोरेशन (अंडी ब्लो करून रिकामी झाली, की आतून, बाहेरून स्वच्छ करून पेंट करायची, मण्यांनी, टिकल्यांनी सजवायची आणि त्यांच्या विविध रचना करायच्या), ही सगळी जर्मन इमिग्रंटसची देन आहे, असे म्हणतात. एग डेकोरेशनकरिता रशिया खूप प्रसिद्ध आहे. १८०० च्या अखेरीस रशियातल्या श्रीमंत सरदारांनी फ्रान्समधल्या ‘फॅबरजे’ (Faberge) नावाच्या प्रसिद्ध ज्वेलरला एनॅमलची, हिरे, माणकं जडवलेली अंडी करायच्या ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली. एका अंडय़ासारखं दुसरं नसे. या अंडय़ांची आज किंमत प्रत्येकी मिलियन पाऊंड्स इतकी आहे. एकंदरीतच या सणाला अंडय़ांचं महत्त्व खूप असतं. डेव्हिल्ड एग्स, टिकल्या, रिबिनींनी सजवलेली ‘डेकोरेटेड अंडी, चॉकलेटची अंडी, एग-हंट, एग-रोलिंगच्या शर्यती, ईस्टरच्या ‘सेक्यूलर’ अवतारात अंडं म्हणजे नवीन आयुष्याच्या सुरुवातीचं प्रतीक समजतात.
चर्चला जाताना चांगले कपडे घालून जाण्याचा रिवाज पुष्कळ भाविक पाळतात. (लेंटच्या महिन्यात नवीन कपडे घालत नाहीत. हिंदू धर्माच्या सुतक पाळण्याच्या रिवाजाशी लेंटचं बरंच साम्य असल्याचं जाणवतं). सगळे नवीन कपडे नाही, तरी महिला निदान नवीन बॉनेट तरी घालतात डोक्यावर.
ख्रिश्चन धर्मावर (चर्चवर) बरेच वेळा असे आरोप केले जातात, की धर्म स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात इतर धर्माच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी, धर्माची लोकप्रियता वाढविण्यासाठी चर्चनी त्यावेळी प्रचलित असलेल्या पेगन या धर्मातल्या बऱ्याच प्रथा आपले थोडेसे संस्कार करून आपल्या म्हणून वापरायला सुरुवात केली.
पेगन धर्माचं सखोल वर्णन करण्याचं हे ठिकाण नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर काही धर्माच्या ग्रुपला पेगन म्हणत. एकापेक्षा अनेक देव, पशु-पक्षी, डोंगर, नद्या, झाडं, सूर्य, चंद्र, तारे या सर्वात देवत्वाचा अंश असल्याचा विश्वास हा सगळ्या पेगन धर्माचा पाया मानतात. हिंदू धर्मालासुद्धा कधीकधी पेगन धर्माच्या समूहात घेतल्याचे आढळून येते.
पेगन धर्मामध्ये ‘एओस्ट्रे’ किंवा ‘ओस्ट्रा’ नावाची देवता ही प्रजोत्पादनाची (माणसांच्या आणि पशु-पक्ष्यांच्या) देवता. तिचं वाहन ससा. (ससा हा प्राणी त्याच्या प्रजोत्पादन क्षमतेबद्दल प्रसिद्ध आहे). चर्चनी येशूच्या नव्याने जन्म घेण्याची, वसंत ऋतूची, निसर्गातल्या पशु-प्राण्यांच्या नवनिर्मितीची सांगड घालून ईस्टर म्हणजे सगळ्या नवनिर्मितीचा सत्कार करण्याचा समय अशी भावना लोकांच्या- विशेषत: तरुण, सुशिक्षित, आणि ख्रिश्चनेतर- मनात चांगली रुजवली आहे.
धर्माने ख्रिश्चन नसलेले लोक हा सण जरी स्प्रिंग फेस्टिवल म्हणून मानत असले, तरी मुळात हा सण पेगन धर्माचे लोक साजरा करीत. म्हणजे तसा हा धार्मिक सणच आहे. ख्रिश्चन धर्मातला नाही, पण पेगन धर्मातला. त्यात अर्थात गैर काहीच नाही.
प्रत्येक धार्मिक, अथवा सेक्युलर सणांचं सेलेब्रेशन व्यापाऱ्यांच्या सहकार्याशिवाय कसं होणार? कुठल्याही छोटय़ा-मोठय़ा सेलेब्रेशनची सुरुवात वर्तमानपत्रं, मासिकं, कॅटलॉग्स, जाहिरातदार, दुकानदार, छोटी-मोठी हॉटेलं, एअर-लाइन्स, अम्युझमेंट पार्क्‍स दोन-दोन महिने आधीपासून करतात. अमेरिकेची ही व्यापारी वृत्ती कधी कधी अचंबित करते. दुकानांमध्ये वेगवेगळ्या शेप्स आणि साइझेसच्या ईस्टरच्या बास्केट्स, सशाच्या आकाराची चॉकलेट्स, पिवळ्या रंगाचे, कोंबडीच्या पिलांच्या आकाराचे मार्शमेलोज या सर्वाची रेलचेल असते.
१८७८मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते रदरफर्ड. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने स्टाफच्या छोटय़ा मुलांसाठी एग-रोलिंगची प्रथा सुरू केली. ईस्टर मण्डेच्या दिवशी व्हाइट हाऊसचं लॉन सर्वाना खुलं असतं. लांब दांडय़ाच्या मोठय़ा चमच्याने मुलं हिरवळीवरून अंडी रोल करायच्या शर्यतीत भाग घेतात. व्हाइट हाऊसचा स्टाफ सशाचे कॉस्च्युम घालून मुलांना हेल्दी चॉकलेटं (?) आणि इतर अल्पोपाहार देतात, काही अधिकारी मुलांना पुस्तकं वाचून दाखवितात.
लहान वयाच्या (साधारणपणे ७ वर्षांपर्यंतच्या वयाच्या) मुलांबरोबर त्यांच्या शिक्षिका एग-हंटचा खेळ खेळतात. प्लास्टिकच्या रंगीत अंडय़ांमध्ये चॉकलेट घालून वर्गातल्या प्रत्येक मुलाच्या वाटय़ाला निदान दोन तरी अंडी येतील अशा हिशेबाने सगळी अंडी बागेत, पटांगणात लपविली जातात. मुलं जास्तीत जास्त अंडी शोधून आणतात. सगळी एकत्र करून मग शिक्षिका सर्वाना अंडी वाटते. घरांमध्ये मोठी माणसं शनिवारी अंडी तयार करतात (प्लास्टिकच्या अंडय़ांमध्ये गोळ्या, चॉकलेटं घालून) आणि ती रात्री कुठे कुठे लपवून ठेवतात. रविवारी सकाळी मुलं ‘हंट’ करून सगळी अंडी शोधून काढतात. मुलांच्या समजुतीप्रमाणे ती अंडी ‘बनी’नी आणलेली असतात. मुलांना ईस्टर बनीनी आणलेली बास्केटही मिळते. तिच्यात चॉकलेटं, मार्शमेलोज, केक्स, जेली बीन्स अशा तऱ्हेचा मेवा असतो. जर्मन लोकांनी अंडी देणाऱ्या सशाची आख्यायिका पूर्वीच लोकप्रिय केलेली आहे. (पेगन धर्मात अशी गोष्ट सांगत की, इओस्ट्रे या देवीला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये एक जखमी पक्षीण दिसली. तिने तिला बरं तर केलं, पण थंडीत तिचा टिकाव लागणार नाही हे कळल्यावर तिने तिला ससा केलं. मात्र ससा झालेली पक्षीण आपला अंडी घालण्याचा गुणधर्म टिकवून होती.) पाचवीपर्यंतची मुलं अंडय़ांपासून मोबाइल्स, फुलं, झाडं, इतर शोभेच्या वस्तू, सशाच्या आकाराच्या ईस्टर बास्केट्स, नाजुक ईस्टर लिलीची फुलं, रॉबिन पक्ष्याची सुंदर अंडी, कापसाला पिवळा रंग देऊन कोंबडीची पिल्लं अशा अनेक हस्तकलेच्या वस्तू करतात.
बऱ्याच मोठय़ा शहरांमध्ये ईस्टरची परेड असते. न्यूयॉर्कच्या ५व्या अव्हेन्यूवरची परेड खूपच प्रसिद्ध आहे. परेडमध्ये सर्वात पुढे चालणाऱ्या लीडरच्या हाती ईस्टरची मेणबत्ती असते. टेलिव्हिजन घरोघरी येण्यापूर्वी लोकांना जगभरात चालू असलेल्या घडामोडी, घरात बसून बघता येत नसत. फॅशनच्या जगात काम करणाऱ्या लोकांना पॅरिस या त्यांच्या फॅशनची ‘मक्का’ असलेल्या ठिकाणी जाणं सोपं नव्हतं. ५व्या अव्हेन्यूवरच्या परेडमध्ये शहरातले श्रीमंत लोक फॅशनेबल कपडे घालून सहभागी होत असत. साईड-वॉकवर उभं राहून फॅशन डिझायनर्स फॅशनचे सगळे नवीन ट्रेंड्स डोळे भरून बघत, आणि नोट्स काढत. टी.व्ही. आणि इतर टेक्नॉलॉजीने जग जवळ आल्याने परेडचं रूपही बदललं. आता परेडमध्ये भाग घेणारे लोक आपल्या कुत्र्या-मांजरांना विविध तऱ्हेने सजवतात, आणि स्वत: गमतीच्या हॅट्स, बॉनेट्स घालून मिरवतात.
पुष्कळ युगुले ईस्टर संडेच्या दिवशी लग्न करतात. ईस्टर संडे हा फार पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. हे वाचून कुठे तरी बरं वाटतं. असा दिलासा मिळतो की विवाह संस्था जरी मोडकळीला आली असली, तरी अजूनही काही तरुण लोकांची आपलं लग्न खूप टिकावं अशी तीव्र इच्छा असते. हेही नसे थोडके.
शशिकला लेले