पर्यटन विशेष

एडिनबरा इतकं टवटवीत, इतकं सुंदर आहे, ते मन भरून पाहायचं तर..
तर मात्र भक्कम चालण्याची तयारी हवी आणि निदान आठवडाभर तरी मुक्काम करायला हवा. एडिनबरातून बाहेर पडताना या मोहात पाडणाऱ्या शहरात परत यायचं वचन मी माझ्या मनाला देऊन टाकलं आहे.  
स्कॉटलंडला जायचं ठरलं नि माझ्या मनात कलकत्त्यामध्ये पाहिलेल्या स्कॉटिश नन्स, त्यांनी चालवलेल्या शाळा, त्यांचं इंग्रजी शिकवणंच आपलं येत राहिलं आणि मग आठवला जन्मानं स्कॉटिश असलेला शेरलॉक होम्सचा लेखक आर्थर कॅनन डायल.. रात्र रात्र जागून भीतीनं थरथरत कापत असतानासुद्धा मोठय़ा आवडीनं वाचलेल्या शेरलॉक होम्सच्या सस्पेन्सनं ठासून भरलेल्या कथा. तसेच डॉक्टर जॅकेल अ‍ॅण्ड मिस्टर हाइड, हे पुस्तकही मनाची पकड घेणारं त्याचा लेखक तर पुरेपूर स्कॉटिश! रॉबर्ट स्टिव्हन्सन आणि लहानपणी ट्रेझर आयलंडनं तर वेडच लावलं होत.  वाचण्याचं वेड ज्यांनी लावलं त्या या लेखकांच्या भूमीत जायला मिळणार म्हणून मला अक्षरश: स्वर्ग चार बोटं उरलाय असं वाटायला लागलं .
आजही स्कॉटलंडची आर्थिक तसंच राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एडिनबराला जाण्यासाठी म्हणून आम्ही जुलच्या शेवटच्या आठवडय़ात लंडनला आलो. लंडनमध्ये त्या वेळी विश्वास बसणार नाही एवढी गरमी होती. आपण युरोपमध्ये असलेल्या लंडनमध्ये नसून अकोला, अमरावती, नागपूर अशा कुठल्या तरी ठिकाणी आहोत, असा मला या काळात अनेकदा भास झाला होता.  ६ ऑगस्टला हिथ्रो एअरपोर्टवरून विमानानं सकाळी साडेसातला आकाशात झेप घेतली नि गरम हवेतून आमची सुटका होऊन एडिनबराच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला तेव्हा लंडनच्या गरमीतून सुटका झाल्याचा आनंद काही औरच होता.
एडिनबराच्या एअरपोर्टला विमान लँड झालं तेव्हा सोनेरी उन्हानं आसमंत न्हाऊन निघत होतं. सगळीकडे कसं अगदी प्रसन्न वाटत होतं. ऊन होतं तरीही हवा छान गारसरच होती. एअरपोर्ट बाहेर पडल्यावर टॅक्सी मिळायला फार वेळ लागला नाही. गुळगुळीत रस्त्यावरून  टॅक्सी धावत होती, झुळुझुळु वारं वाहत होतं. मधूनच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे फलक दिसत होते. स्कॉटलंड म्हणजे हिरवाई याची साक्ष पटवणारी दाट झाडी रस्त्याच्या  दुतर्फा दिसत होती. टॅक्सीतून दिसणाऱ्या इमारतींचं बांधकामही जॉर्जियन तसेच व्हिक्टोरियन आíकटेक्चरचे नमुनेच भासत होते. त्यामुळे हे शहर पायी िहडून बघायलाच हवं याची त्याच वेळी मनाशी खूणगाठ बांधली. रविवार असल्यानं एरवी एव्हाना लगबगीनं कामाला लागणारं शहर नऊ वाजायला आले होते तरीही तसं आळसावलेलं होतं त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाटच होता.
एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही हॉटेलवर पोहोचलो. हॉटेलवर पोहोचल्यावर अध्र्या तासाच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने होऊन आम्ही रिसेप्शन काऊंटरवरून नकाशा आणि सोयीस्कर बसेसची माहिती गोळा करून बाहेर पडलो. हॉटेलजवळच बसस्टॉप होता. युरोपमध्ये फिरताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं खासगीकरण झालं की प्रवाशांना कसा फायदा होतो याचा छान अनुभव येतो. वेगवेगळ्या खासगी कंपन्यांच्या बसेस पटापट ठरावीक रूटसवरून धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना जवळजवळ दर मिनिटाला हव्यात्या रूटवरून जाणारी बस पकडता येते तीदेखील अगदी स्वस्त तिकिटात.

लंडनप्रमाणे इथेसुद्धा बस सव्‍‌र्हिस खासगी वाहतूक कंपन्यांमार्फत चालवली जात होती आणि आपापसातली स्पर्धा टाळण्यासाठी ठरावीक कंपनीची बस फक्त ठरावीक मार्गावरूनच धावत होती.
आम्ही सिटी सेंटरला जाणारी बस पकडली. बस डबलडेकर होती तशी रिकामीही होती. आम्ही पहिल्याच मजल्यावर बसलो. मी सहज पाहिले, ड्रायव्हर महाशयांच्या मागच्या बाजूला एक कायदेशीर नोटीस छापलेली होती. ‘जर कुणी ड्रायव्हरशी गरवर्तन केले, तर अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आमच्या कर्मचाऱ्याला आहे.’ एवढय़ा ठसठशीतपणे ही नोटीस अशी दर्शनी भागात लावण्याची वेळ कंपनीवर का आली असावी?  विचार करता करता संपूर्ण युरोपलाच ग्रासणाऱ्या ड्रग्जच्या गंभीर समस्येची आठवण झाली आणि डब्लिनमध्ये असेच बसने प्रवास करत असताना घडलेला किस्सा आठवला. युरोपच्या सौंदर्याला ‘ड्रग्ज’चा  शाप चांगलाच भोवतो आहे. याचंच हे चिन्ह तर नाही? मनात आलं ते शेजारी बसलेल्या मुलीला विचारलं तेव्हा तिने माझ्या बोलण्याला पुष्टी देत तिचे या शहरातले काही अनुभव सांगितले. प्रवासात भेटलेल्या सहप्रवाशाला जर इंग्रजी येत असेल आणि तो बोलक्या स्वभावाचा असेल तर अशी स्थानिक पातळीवरची माहिती मिळू शकते.
सिटी सेंटरला आम्ही बसमधून उतरलो नि सोनेरी उन्हात रिमझिम पाऊस पडायला लागला. त्या मस्त वातावरणावर आम्ही एकदम खूश होतो. मनात येत होतं या अशा नागडय़ा पावसाशी हस्तांदोलन करून आमचा इथला पहिला दिवस उलगडायला सुरुवात झालीय म्हणायची! पण आमची ही खुशी फार काळ टिकली नाही, कारण बघता बघता अंधारून आलं नि धुवाधार पावसाला सुरुवात झाली. सिटी सेंटरला आमच्यासारख्या प्रवाशांची बऱ्यापकी गर्दी होती. पाऊस चुकवण्यासाठी आम्ही पटकन आमच्या समोरच असलेल्या ‘कíडश अ‍ॅण्ड यमडिल इस्ट’ या उपाहारगृहात आश्रय घेतला. बाहेर पाऊस कोसळतच होता आता आश्रयाला उपाहारगृहात घुसणाऱ्यांची गर्दी वाढायला लागली होती. वेटर मंडळी आता जास्तच वेगानं इकडेतिकडे करू लागली होती. एव्हाना काही सुज्ञ प्रवाशांनी खुच्र्यावर बठक मारून काहीबाही खाण्याची ऑर्डर देऊन आपापली आसनं घट्ट केली. आता आम्हीही पटकन ब्रेकफास्टसाठी सँडविचेस मागवली आणि खुच्र्या पकडल्या. सँडविचेस, थोडी पेस्ट्री आणि गरमागरम कॉफी. बाहेर तर पावसानं चांगलीच झिम्मड लावली होती. उपाहारगृहात खाणं संपवल्यानंतर अधिक वेळ बसणं शिष्टाचाराला धरून नव्हतं. आम्ही तिथून बाहेर पडलो. पावसात भिजतच चार पावलं चालत गेलो असू-नसू तोच आमची नजर रस्त्याकडेच्या एका स्टॉलवर गेली तिथे ब्रिटिश नॅशनल फ्लॅगचं डिझाइन असलेल्या लहान-मोठय़ा आकाराच्या छत्र्या ठेवलेल्या होत्या. आम्ही पटकन कसलीही घासाघीस न करता दोन छत्र्या विकत घेतल्या नि रिल माइलच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. पुरती पाच मिनिटंदेखील आम्ही चालत राहिलो असू किंवा नसू, युरोपमधल्या पावसाचा प्रसिद्ध गुण प्रत्ययाला आला. इतका वेळ धिंगाणा घालणारा पाऊस एका क्षणात कुठे गायब झाला देव जाणे! पुन्हा सगळीकडे इतकं छान ऊन पडलं की काही मिनिटांपूर्वी या परिसरात पावसानं धुमाकूळ घातला होता हे कुणाला खरंही वाटलं नसतं. खरंतर युरोपमध्ये धूळ हा प्रकार मुळीच आढळत नाही, तरीही पाऊस पडून गेल्यामुळे समोरचा काळाभोर रस्ता.. रस्त्याकडची झाडं, इमारती सगळंच कसं नुकत्याच स्नान करून आलेल्या सुंदरीसारखं प्रसन्न दिसायला लागलं होतं.

रील माइलच्या पायथ्याला असलेल्या एका भव्य इमारतीनं आमचं लक्ष वेधून घेतलं. स्कॉटिश पार्लमेंट म्हणून ही इमारत मिरवत होती. स्कॉटलंडला स्वतंत्र पार्लमेंट आहे? आम्ही थक्क होऊन या इमारतीसंबंधी अधिक महिती वाचू लागलो तेव्हा समजलं लंडनमधलं पार्लमेंट संपूर्ण ब्रिटनच्या संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि चलन व्यवस्था या बाबींबद्दल निर्णय घेते तर एडिनबरात बांधलेल्या या स्कॉटिश पार्लमेंटमध्ये इथल्या जनतेचे प्रतिनिधी चर्चा करून आरोग्य, शिक्षण वगरे बाबींबद्दल धोरणात्मक निर्णय घेत असतात. २००४ ला इथे पहिली सभा भरवण्यात आली. ती इमारत पाहिली नि मला आपल्या देशातली काही राज्यं सातत्यानं अधिक स्वायत्ततेची मागणी करत असतात हे आठवलं. प्रत्येक देश आपल्या जखमांवर आपल्या परीनं तोडगे शोधत असतो हेच खरं.
आम्ही आता एडिनबरातल्या जगप्रसिद्ध किल्ल्यापाशी येऊन पोचलो होतो. या किल्ल्यानं त्याच्या आश्रयाला आलेल्या प्रत्येकाचं रक्षण केल्याचं इतिहास सांगत होता. स्कॉटिश आणि इंग्रज यांच्यात वेळोवेळी झालेल्या लढायांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मारुतीच्या शेपटासारखी प्रवाशांची भलीमोठ्ठी रांग होती तरीही दर पंधरा मिनिटांनी बराच मोठ्ठा गट आत सोडत असल्यामुळे आम्ही तिकिटे काढून चूपचाप ओळीत उभे राहिलो. आम्हाला आत सोडल्यावर आम्ही किल्ल्याच्या पायऱ्या चढू लागलो. किल्ल्याच्या प्रत्येक टप्प्यावरून खाली पहिलं की शहराचं अतिसुंदर रूप दिसत होतं. प्रवासी मधे मधे थांबून जागजागी लावलेले महितीचे फलक वाचत होते, काहीच ओळख नसलेल्या पण शेजारी उभ्या असलेल्या आणि प्रवासी या एकाच नात्याने बांधल्या गेलेल्या त्या जमावात परस्पर बोलणंदेखील होत होतं. ब्रिटिशांनी  जिथे जिथे वसाहती उभारल्या, राज्य केलं त्या घटनेला आजमितीला शे-दीडशे र्वष उलटून गेले होते तरी तो किल्ला पाहताना ब्रिटिशांच्या कूटनीतीबद्दल स्कॉटिश असो की भारतीय अगदी पोटतिडिकीनं माणसं बोलत होती. या वेळी या प्रत्येकाच्या मनात त्याच्या त्याच्या देशात ब्रिटिशांनी केलेल्या खेळी, लढलेल्या लढाया, झालेले तह, जिंकून घेतलेले प्रदेश हे सगळं येत असणार हे नक्की.

ब्रिटिश राजघराणं हे स्कॉटिश रक्ताचं का आहे? या पश्नाचं उत्तरसुद्धा जागोजागी लिहिलेल्या महितीवरून मिळत गेलं. स्कॉटिश आणि इंग्रज यांच्यात मुळी तसा तहच झाला होता. इतक्या लढाया, इतका रक्तपात झाल्यानंतर सुचलेलं शहाणपण होतं ते.
आता एक वाजायला आला होता नि सगळ्यांनाच बरोब्बर एक वाजता प्रथेनुसार उडवल्या जाणाऱ्या तोफेचं प्रात्यक्षिक पाहायचं होतं. झाडून सगळे प्रवासी किल्ल्याच्या त्या बुरुजाजवळ जाऊन मोक्याच्या जागा पकडून उभे राहिले. आश्चर्य म्हणजे इतक्या वेळात अजिबात पाऊस पडला नव्हता. आकाश अगदी निरभ्र होतं.  बरोब्बर एक वाजता शिस्तबद्ध पद्धतीने खाड खाड बूट वाजवत सनिक जमा झाले. त्यांचा तो परंपरागत पेहराव, ते शिस्तबद्ध संचलन, मंडळी मोठय़ा उत्सुकतेनं आणि कौतुकानं तो सोहळा पाहात होती. ठीक एक वाजता तोफ डागली जाऊन गोळा उडवला गेला नि मोठ्ठा आवाज झाला. स्कॉटलंडच्या इतिहासात पोचलेली मंडळी त्यानंतर वर्तमानकाळात यायला जरा वेळच लागला. काही वेळानंतर प्रवासी किल्ल्यावर फिरू लागले. कुणी तिथल्या म्युझियमकडे वळले, तर कुणी इतर स्थळं पाहायला गेले. आम्ही म्युझियम पाहायला गेलो. तिथे अत्यंत व्यवस्थित पद्धतीने ब्रिटिशांच्या अनेक ऐतिहासिक वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. इथे मांडलेल्या इतिहासाच्या पानांवरून फिरताना मला १९९५ मध्ये पाहिलेल्या ‘ब्रेव्हहार्ट’ या मूव्हीची आठवण झाली. आता पोटात कावळे कोकलत असल्यामुळे आम्ही तिथल्या कँटीनमध्ये गेलो नि पोटातल्या ओरडणाऱ्या कावळ्यांना आहुती टाकली तेव्हा कुठे मनाला पुढचा कार्यक्रम सुचणं शक्य झालं.
जवळ शहराचा नकाशा होता शिवाय बस रूट्सबद्दल गोळा केलेली महिती होती. किल्ला उतरून खाली आलो नि प्रिन्सेस स्ट्रीटवर जाण्यासाठी बस पकडली. हा इथला फार जुना असा बाजार. या बाजारात आलो नि गंमत वाटली कारण इथे रस्त्याच्या फक्त एकाच बाजूला दुकानांची रांग होती त्यामुळे कुठूनही पाहिलं तरी एडिनबराचा किल्ला दिसत होता. रस्त्यावरून फिरत होतो. आता ऊन्हं कलली होती. रस्त्यावर दिवे लागू लागले होते. या शहरात बागा तरी किती असाव्यात! आम्हाला फिरता फिरता कितीतरी सुंदर बागा दिसल्या, त्यातल्या एका बागेत आम्ही गेलो तर तिथे विविध आकारात कलात्मक पद्धतीनं कापलेली झुडपं होती शिवाय कितीतरी अनोळखी वृक्ष डेरेदार सावली धरून जागोजागी उभे होते. रंगी-बेरंगी फुलांनी बहरलेले फुलांचे ताटवे मनाला सुखवत होते. ते पाहून चालून आलेला थकवा कुठल्या कुठे पळून गेला. बागेतली रंगीबेरंगी फुलांची ही उधळण म्हणजे या सीझनचं हे लेणं म्हणायचं!
बागेतून बाहेर पडलो तर समोरच एक मोठा चौक होता तिथे सुरेखपकी ऑर्केस्ट्रा रंगला होता. रिकामी खोकडी समोर मांडून सहा लोक तालासुराचा मेळ साधत वेगवेगळी वाद्यं वाजवत उभे होते. लोक थबकून कान देऊन ऐकत होते आणि या ऑर्केस्ट्रावाल्यांनी मांडलेल्या खोक्यात पसे टाकत होती. तिथून पुढे गेलो तर दुसऱ्या एका चौकात चक्क डोंबाऱ्याचा खेळ चालला होता. दोरीवरून चालणारा लहान मुलगा पसरलेल्या सतरंजीवर कोलांटउडय़ा आणि इतर कसरती करणारी चार मुलं आणि या सगळ्याला प्रोत्साहन देणारं संगीत. या मंडळींनीही त्यांच्या समोर रिकामी पेटी तसंच एक हॅट उलटी ठेवलेली होती. ते सगळं पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी जमलेली, लोक दोरीवरून चालणाऱ्या मुलाचं, कोलांटउडय़ा आणि इतर कसरती करणाऱ्या लहानग्यांचं टाळ्या पिटून आणि शिट्टय़ा  मारून कौतुक करत होते. सढळ हातानं हॅटमध्ये आणि त्या रिकाम्या पेटीतसुद्धा पसे टाकत होते. ते सगळं बघताना माझ्या डोळ्यांसमोर आपल्याकडे भर दुपारी टळटळीत उन्हात पाठीला तान्हुलं बांधून डोंबाऱ्याचा खेळ दाखवत असतानाच जम्रेलची ताटली फिरवत दीनवाण्या आवाजात तिथे जमलेल्या लोकांना मदतीचं आवाहन करत फिरणारी बाई येत राहिली आणि मनात आल्यावाचून राहिलं नाही की युरोप असो नाही तर आशिया!  गरिबाला पोट भरण्यासाठी करामती करत राहणं चुकत नाही. चौकातून बाहेर पडून हॉटेलवर पोचण्यासाठी आम्ही योग्य त्या बस थांब्याच्या शोधाला सुरुवात केली, कारण आता अंधाराचं राज्य अधिक तीव्र झालं होतं. जवळ नकाशा होता तरीही रस्ता चुकलोच.
हॉटेलकडे जाण्यासाठी म्हणून समोरच उभ्या असलेल्या बसमध्ये बसलो आणि लक्षात आलं बस एडिनबरातल्या अगदी पुरातन भागातून जाऊ लागली होती. इमारती अगदी जुन्या स्ट्रक्चरच्या. गंमत म्हणजे इथे इमारतींना वरच्या बाजूला खिडक्या दिसत होत्या, पण त्या खिडक्यांना दारं नसून काचा बसवलेल्या होत्या. असं का? कदाचित इथे जबरदस्त थंडी असते बर्फही खूप पडतं म्हणून मग दारांच्या फटींमधून झोबरं वारं आत येऊ नये म्हणून खिडक्यांना दारच न बसवण्याची चतुराई केलेली दिसते असं काहीसं मनात येत असतानाच एक गोष्ट लक्षात आली आधुनिक जॉर्जयिन स्ट्रक्चरच्या खिडक्यांना नक्षीदार दारं बसवलेली आम्ही फिरता फिरता पहिली होती. हा प्रश्न मनात घोळवतच आम्ही दुसरी बस पकडून एकदाचे हॉटेलवर परत आलो. खूप थकले होते तरी मनात दारं नसलेल्या तरीही काचा बसवलेल्या खिडक्या होत्याच म्हणून मग रूमवर न जाता या संबंधीची माहिती कोण देईल याचा शोध घेतला असता चक्क महितीचं पुस्तकच काउंटरवर मिळालं. आणि वाचता वाचता समजलं जुन्या शहर भागातल्या बसमधून पाहिल्या त्या इमारती तर दुपारीसुद्धा आम्ही तशा पाहिल्या होत्याच, पण तेव्हा आम्ही इतरही इतक्या गोष्टी पाहात चाललो होतो की ही गोष्ट आमच्या लक्षातही आली नव्हती. अरे या इमारती म्हणजे तर युनेस्कोनं जतन केलेला मानव संस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा. माहिती वाचत गेले तसं लक्षात आलं, काचा बसवलेल्या जुन्या इमारतींच्या त्या उंचावरच्या खिडक्या म्हणजे राजानं जर जाचक कर बसवला तर आम जनता कशा पळवाटा काढते याचंच उदाहरण होतं. काही शतकांपूर्वी स्कॉटलंडच्या राजानं म्हणे खिडक्यांवर कर बसवला. हा कर जनतेला मान्य नव्हता पण राजाज्ञा सरळ मोडताही येत नव्हती म्हणून मग जनतेनं ही युक्ती केली, दार नाही ती खिडकी नाहीच! असं राज्यकर्त्यांला मान्य करायला लावून जनतेनं खिडकीवर बसवलेला कर दिला नाही. एकूण काय जनता आपला हिसका दाखवतेच.
सायीसारख्या दाट झालेल्या अंधारात अंथरुणाला पाठ लावली तेव्हा एडिनबराची कितीतरी दृश्यं डोळ्यांसमोर तरळत होती. झोपेच्या अधीन होता होता मनात आलं एडिनबरा इतकं टवटवीत, इतकं सुंदर, ते मन भरून पाहायचं तर.. तर मात्र भक्कम चालण्याची तयारी हवी आणि त्यासाठी तंगडय़ादेखील भक्कम हव्या. आणि निदान आठवडाभर तरी मुक्काम करायला हवा. या वेळी तेवढी सवड नव्हती. मन तर एडिनबराच्या प्रेमात पडलं होतं. भल्या  सकाळी फ्लाइट पकडून परतीचा प्रवास सुरू करणं भाग होतं, पण झोप येत नव्हती. मन भलतंच बेचन होतं. शेवटचा उपाय म्हणून मी स्वत:लाच वचन देऊन टाकलं. आता पुन्हा प्रवासाची संधी मिळाली की बॅग उचलून धावत सुटायचं नि थेट यायचं ते या मोहात पाडलेल्या शहराकडे.