सेसमे ब्रिटल्स (तिळाची चिक्की)

साहित्य
* ३ ते ४ चमचे तीळ
* १ वाटी साखर
* २ चमचे पिस्त्याचे काप

कृती
* थोडेसे तूप लावून एक ट्रे किंवा ताटली तयार ठेवावी. तसेच एका वाटीला बाहेरून तळाला तूप लावावे.lp33
* तीळ आणि पिस्त्याचे काप हलकेच भाजून घ्यावे. तीळ आणि पिस्ता दोन्ही थंड होऊ द्यावे.
* नॉनस्टिक पॅनमध्ये नुसती साखर घालून मध्यम आचेवर विरघळवावी. साखर पूर्ण वितळली की आच एकदम मंद करावी किंवा बंद करावी. त्यात लगेच तीळ आणि पिस्त्याचे काप घालावे.
* पटकन हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढावे. वाटीने पातळ पसरवावे. मिश्रण लगेचच आळेल. थंड झाले की मध्यम आकाराचे तुकडे करावे.

टीप
* साखर नुसतीच विरघळवायची आहे, पाणी अजिबात घालायचे नाही.
* साखर पूर्ण विरघळली की पुढची कृती भरभर करावी, कारण साखर लगेच घट्ट होते.
* यामध्ये थोडे किसलेले चॉकलेट घातले तरी छान चव येते किंवा भाजलेलं सुकं खोबरंही घालू शकतो.

तिळाच्या शेंगा

साहित्य
* २-३ शेवग्याच्या शेंगा
* १/२ वाटी तीळ
* १/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
* २-३ चमचे किसलेलं सुकं खोबरं

फोडणीसाठी
* २-३ चमचे तेल, १/४ चमचा मोहरी, २-३ चिमटी हिंग, १/४ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट आणि lp34कढीपत्ता
* १ लहान चमचा गोडा मसाला
* १ चमचा किसलेला गूळ
(आवडीनुसार कमी-जास्त करावा.)
* १ चमचा चिंचेचा कोळ
* चवीपुरते मीठ

कृती
* तीळ, खोबरं वेगवेगळे भाजून घ्यावे. मिक्सरमध्ये तीळ, शेंगदाण्याचा कूट आणि खोबरं यांची बारीक पूड करावी.
* शेंगांचे ३ इंचाचे तुकडे करावे. वाफवून घ्यावे.
* कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रण घालावे, मध्यम आचेवर परतावे व पाणी घालून थोडे पातळ करावे.
* त्यात चिंचेचा कोळ, मीठ आणि वाफवलेले शेंगाचे तुकडे घालावे. मंद आचेवर २-४ मिनिटे उकळी काढावी. गूळ घालून थोडा वेळ उकळवावे.
* भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तिळाच्या शेंगा वाढाव्यात.

टीप
* शेंगांऐवजी छोटय़ा वांग्याचे तुकडे तळून घालू शकतो.

तिळाचा भात

साहित्य
*दीड कप शिजलेला भात (मोकळा)
* २ चमचे तीळ
* १ चमचा उडीद डाळ
* २ सुक्या लाल मिरच्या

फोडणीसाठी
* ३ चमचे तेल, २ चिमटी मोहरी, १/४ चमचा हिंग
* १ डहाळी कढीपत्ता
* मूठभर शेंगदाणे
* चवीपुरते मीठ

कृती
* तीळ भाजून घ्यावे. उडीद डाळ लालसर रंग येईस्तोवर कोरडी भाजावी. मिक्सरमध्ये आधी उडीद डाळ lp35आणि मिरची बारीक करून घ्यावी. ती एका वाटीत काढावी. नंतर तिळाची बारीक पूड करावी.
* कढईत तेल गरम करून आच बारीक करावी. त्यात शेंगदाणे खमंग तळून घ्यावे. त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. भात आणि मीठ घालून परतावे. नंतर तिळाची आणि उडीद डाळीची पूड घालावी. मिक्स करावे.
* झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढावी.

हा भात गरमच खावा. खाताना तूप घालून खाल्ल्यास अधिक चविष्ट लागतो.
वैदेही भावे