lp19* टोमॅटो चिरताना सुरीला किंवा विळीला तेल लावल्यावर भराभर चिरला जातो. बारीक फोडी हव्या असतील तर आतील बाजूने चिरावा.
* टोमॅटो नरम झाले असतील तर मिठाच्या पाण्यात ठेवावेत, कडक होतात.
* उकडलेले बटाटे सोलताना सालासकट त्याचे चार तुकडे सुरीने करा. घाईच्या वेळेस बटाटे लवकर थंड होऊन सोलले जातील.

lp18शंकरपाळे
साहित्य :
दीड ते २ कप गव्हाचे पीठ (कणीक)
१/२ कप पातळ तूप
१/२ कप पिठी साखर
१/२ कप दूध
१/२ टिस्पून बेकिंग पावडर

कृती :
१) तूप आणि साखर परातीत घ्यावे. मिक्स करून मिश्रण हलके होईस्तोवर एकत्र फेसावे.
२) कणीक आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी.
३) तूपसाखरेच्या मिश्रणात साधारण २ कप कणीक घालावी आणि दूध घालून घट्ट गोळा बनवावा.
४) पिठाचा गोळा १० मिनिटं झाकून ठेवावा.
५) या १० मिनिटांत ओव्हन ३०० (१५०) वर प्रिहीट करावे. बेकिंग ट्रेवर अल्यूमिनियम फॉइल पसरवून तयार करावेत.
६) मिश्रणाचे मोठे गोळे बनवावे. किंचित जाडसर पोळी लाटावी. शंकरपाळे कातणाने कापून तयार करावेत. बेकिंग ट्रेमध्ये ठेवून ३० ते ३५ मिनिटे बेक करावेत. प्रत्येक शंकरपाळे सेपरेट राहिला पाहिजे.
ओव्हनमधून बाहेर काढून थोडे गार होऊ द्यावेत.
टीप :
ओव्हन जर लहान असेल तर वेळ कमी लागेल.

* कुकरमध्ये वेगवेगळ्या भांडय़ांमध्ये अन्न शिजवत असलात तर बटाटय़ाची साले टाकावीत. कुकर बऱ्यापैकी स्वच्छ होतो.
* अ‍ॅल्युमिनियमची भांडी, कुकर शक्यतो टाळावेत आणि वापरलीच तर त्यात जास्त वेळ जेवण ठेवू नये.
* लोखंडी, पितळी भांडय़ांमधला स्वयंपाक हा रुचकर आणि सत्त्वयुक्त होतो, शक्य असल्यास वापरावीत.

lp22बटरस्कॉच बर्फी
साहित्य:
कॅरेमलसाठी :
४ टेस्पून साखर
२ टेस्पून अक्रोड, बारीक चिरून
१ टेस्पून लोणी
२-३ थेंब बटरस्कॉच इसेंस
बर्फीसाठी :
१०० ग्राम खवा
सव्वाशे ग्राम साखर
२ कप दूध
२ टिस्पून लिंबाचा रस
२-३ थेंब बटरस्कॉच इसेंस

कृती :
१) एका ताटलीला तूप लावून तयार ठेवावी. कॅरेमलसाठी नॉनस्टीक पॅनमध्ये साखर मंद आचेवर गरम करावी. सतत ढवळत राहावे. साखर वितळून थोडी लाइट ब्राऊन झाली (करपू देऊ नये) की त्यात लोणी घालावे. मिक्स करून अक्रोड घालावे, इसेंस घालावा. आच बंद करावी. हे मिश्रण तूप लावलेल्या ताटलीत काढावे. गार होऊ द्यावे. गार झाले की कडक झालेले कॅरेमल काढून खलबत्त्यात किंवा लाटण्याने ठेचावे आणि भरडसर पावडर तयार करावी.
२) पनीर बनवण्यासाठी दूध गरम करावे त्यात लिंबू घालून दूध फाडावे. पनीर गाळून घ्यावे. तयार पनीर हलक्या हाताने धुवून घ्यावे, म्हणजे लिंबाची चव आणि वास निघून जाईल. पनीर सुती कपडात बांधून घट्ट पिळावे.
३) बर्फीसाठी नॉनस्टीक पॅनमध्ये आधी साखर घ्यावी. त्यात अगदी थोडेसेच म्हणजे साखर भिजेल इतपतच पाणी घालावे. साखर विरघळली की त्यात खवा मोकळा करून घालावा. मंद आचेवर ढवळत राहावे. २-४ मिनिटांनी पनीर आणि इसेंस घालावा. ढवळत राहावे.
४) मिश्रणाचा एक थेंब ताटलीत टाकावा. थोडा गार झाला की त्याची गोळी होतेय का ते पहावे. चिकट राहिला तर थोडे अजून आटवावे. जर गोळी झाली तर मिश्रण एका तुपाचा हात लावलेल्या लहान टीनच्या ट्रेमध्ये काढावे. वरून तयार कॅरेमलचा चुरा घालावा. मिश्रण थोडे आळले वडय़ा पाडाव्यात.

lp23चंपाकळी
साहित्य:
१०० ग्राम मैदा
१५ ग्राम वनस्पती तूप
चिमटीभर मीठ
पिठी साखर, गरजेनुसार
तेल किंवा तूप तळण्यासाठी.

कृती :
१) मैद्यामध्ये मीठ आणि वनस्पती तूप घालावे. मैद्याला वनस्पती तूप चोळून लावावे. तूप सर्व मैद्याला व्यवस्थित लागले पाहिजे. थोडे पाणी घालून नेहमीच्या कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून घ्यावे. १५-२० मिनिटे झाकून ठेवावे.
२) मळलेल्या पिठाचे साधारण १ इंचाचे गोळे करावे. प्रत्येकाची पातळ पुरी लाटावी. पुरीला उभ्या चिरा पाडाव्यात, पण कडा कापल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. चिरा शक्य तेवढय़ा जवळजवळ असाव्यात म्हणजे चंपाकळी नाजूक बनतात.
३) चिरा पाडून झाल्यावर पहिल्या चिरेपासून रोल करत जावे. शेवटची टोके सील करत न्यावी. अशा प्रकारे आकाश कंदिलाप्रमाणे आकार येईल.
४) चंपाकळ्या तेलात मंद आचेवर तळाव्यात. कोमट झाल्या की पिठीसाखर भुरभुरावी.

lp24चपटे चंद्रकोर
साहित्य :
१/२ वाटी बारीक रवा
१ वाटी मैदा
१/४ वाटी कडकडीत तेल, मोहनासाठी
१ चमचा ओवा, किंचित भरड
१/२ चमचा मिरपूड
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

मसाला :
१ चमचा पिठीसाखर
१/२ चमचा लाल तिखट
१/२ चमचा चाट मसाला
१/४ चमचा मीठ

कृती :
१) रवा, मैदा, ओवा, मिरपूड, आणि मीठ एकत्र करावे. त्यात तेलाचे मोहन घालून ढवळावे. पाण्याने मध्यम मळावे. ३० ते ४० मिनिटे झाकून ठेवावे.
२) नंतर पीठ व्यवस्थित कुटून घ्यावे. पिठाचे २ भाग करून पोळी लाटावी. छोटी वाटी घेऊन चंद्रकोरीच्या आकारात कापावे. मंद आचेवर तळावे.
३) तळून झाले की पेपरवर काढून ठेवावे. थोडे गार झाले की मसाला भुरभुरावा. हलक्या हाताने मिक्स करावे.
टीप :
१) मसाला ऐच्छिक आहे. चंद्रकोरी नुसत्या खायलाही छान लागतात.

* कणीक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई, तसराळे किंवा मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते.
* इडली पात्रातून गरमागरम इडली काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात.
* सॅलडच्या भाज्या चिरताना बर्फाच्या पाण्यात घालून ठेवा म्हणजे भाज्या ताज्या राहतील.

lp25चॉकलेट ट्रीपल
साहित्य:
२ कप चॉकोलेट केक किंवा चॉकोलेट ब्राउनीचा चुरा
२० ग्लेझ्ड चेरीज
अडीच कप व्हिप्ड क्रीम
१/४ कप पिठी साखर
२ टेस्पून कोको पावडर (अनस्वीटन्ड)
मिल्क चॉकोलेट, किसलेले (सजावटीसाठी)

कृती :
१) एक मध्यम आकाराचा बोल घेऊन त्यात व्हिप्ड क्रीम, पिठी साखर आणि कोको पावडर घालावे. साखर विरघळेस्तोवर मिक्स करावे. मिक्स झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे.
२) ४ सव्‍‌र्हिग कप घ्यावे. त्यात तळाला केकचा एक थर द्यावा. त्यावर थोडे व्हिप्ड क्रीम पसरावे. त्यावर थोडे चेरीजचे तुकडे घालावे. परत केकचा, व्हीप्ड क्रीमचा आणि चेरीजचा लेयर द्यावा.
परत एक केकचा थर आणि व्हीप्ड क्रीमचा लेयर द्यावा. वरती चेरी आणि किसलेले चॉकोलेट घालावे.

lp26कॉर्न फ्लेक्स चिवडा
साहित्य :
६ ते ७ कप कॉर्न फ्लेक्स (प्लेन)
१/४ कप तेल
फोडणीसाठी: १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ६-७ पाने कढीपत्ता
६-७ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
२/३ कप शेंगदाणे
१/४ कप बेदाणे
२ टिस्पून धणे-जिरे पूड
१ टेस्पून आमचूर पावडर
मीठ आणि साखर चवीनुसार
कृती :
१) मोठय़ा पातेल्यात १/४ कप तेल गरम करावे. त्यात शेंगदाणे तळून घ्यावे. शेंगदाणे एका ताटलीत काढून ठेवावेत.
२) गरम तेलात मोहोरी, जिरे आणि हिरव्या मिरच्या घालावे. मिरच्या कुरकुरीत होईस्तोवर तळाव्यात. नंतर हिंग, हळद, लाल तिखट कढीपत्ता घालून तडतडू द्यावा. बेदाणे घालावेत काही सेकंद परतून शेंगदाणे आणि कॉर्नफ्लेक्स घालावेत. कॉर्नफ्लेक्स ६-७ भागात घालावेत. एकदम घालू नयेत, जेणेकरून तेल सर्व कॉर्नफ्लेक्सना लागेल.
३) गॅस एकदम मंद ठेवून चिवडा नीट मिक्स करून घ्यावा. आता धणे-जिरेपूड, आमचूर पावडर, मीठ आणि पिठीसाखर घालून मिक्स करावे.
४) गॅस बंद करून चिवडा निवू द्यावा. चिवडा निवला की हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
टीप :
१) शेंगदाण्याप्रमाणेच सुक्या खोबऱ्याचे पातळ काप आणि चण्याची डाळं तळून चिवडय़ात वापरू शकतो.
२) मिरच्या व्यवस्थित तळाव्यात. जर मिरच्या मऊ राहिल्या तर चिवडा मऊ पडू शकतो. जर मिरच्या वापरायच्या नसतील तर फक्त लाल तिखट वापरू शकतो.
३) काही सिरीयल्स (ूी१ीं’) पातळ तर काही जरा जाड असतात. त्यावरती तेल किती लागेल हे अवलंबून असते, म्हणून एका वेळी सर्व सिरियल्स तेलात न घालता एकेक कप घालावेत.

lp27ड्रायफ्रुट पराठा
साहित्य :
१ कप मैदा
२ टिस्पून तेल
चिमूटभर मीठ
दीड कप खजुराचे तुकडे
१ कप काजू, बदाम, पिस्त्याची पावडर
१/२ कप पिठी साखर
पराठे भाजायला तूप
कृती :
१) कढईत खजुराचे तुकडे आणि ते बुडेल इतपत पाणी घालून गॅसवर ठेवावे. मंद आचेवर वाफ काढावी. खजुराचा कडकपणा जाऊन मळता येईल इतपत मऊ झाले पाहिजे. लागल्यास अजून पाणी घाला.
२) खजूर आटवून घट्टसर करा. ताटलीत काढून गार होऊ द्या. नंतर त्यात ड्रायफ्रुट्सची पावडर आणि पिठी साखर घालून कणकेसारखा मध्यम घट्ट गोळा बनवा. मळताना थोडेसे तूप घ्या.
३) मैदा, तेल आणि मीठ एकत्र करून पाण्याने पीठ भिजवून घ्या. १५ मिनिटे झाकून ठेवा.
४) भिजवलेल्या पिठाचे दीड इंचाचे गोळे करा. तेवढेच गोळे ड्रायफुट्स आणि खजुराच्या मिश्रणाचे करा. मैद्याच्या गोळ्याची पारी करून मधोमध सारणाचा गोळा ठेवा. पारी बंद करा.
५) कोरडा मैदा घेऊन पराठा लाटा. मध्यम आचेवर पराठा भाजा. भाजताना कडेने तूप सोडा.
टीप :
साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त करावे.

lp28कॉकटेल सामोसा
साहित्य :
कव्हरसाठी
१०० ग्राम मैदा
२५ ते ३० ग्राम लोणी (डालडासुद्धा चालेल)
१/२ टिस्पून मीठ
सारणासाठी
३ टेस्पून सुक्या खोबऱ्याचा किस (भाजून चुरून घ्यावा)
३ टेस्पून बारीक शेव
१ टिस्पून भाजलेल्या तिळाचा कूट
१/२ टिस्पून चाट मसाला
१/२ टिस्पून गोड मसाला
१/२ टिस्पून बडीशेप
१/४ टिस्पून ओवा
१५-१६ बेदाणे, चिरून
१ ते २ टिस्पून पिठीसाखर
चवीपुरते मीठ
१ टिस्पून तेल
१/४ टिस्पून हिंग
१/४ टीस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट
इतर साहित्य :
तळण्यासाठी तेल
कृती :
१) मैदा एका वाडग्यात घ्यावा. त्यात मऊ लोणी घालून मिक्स करावे. लोणी सर्व मैद्याला छान चोळून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. अगदी १ ते २ चमचे पाणी घालून मध्यम मळून घ्यावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
२) सारणासाठी खोबऱ्याचा कीस, शेव, तिळाचा कुट, चाट मसाला, गोडा मसाला, बडीशेप, ओवा, बेदाणे, मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. लहान कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले की आच बंद करावी. हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. ही फोडणी सारणात घालून मिक्स करावी. सारणाची चव पाहून लागेल ते आवडीनुसार घालावे.
३) मैद्याचे सुपारीएवढे गोळे करावे. पारी लाटून दोन अर्धे भाग करावे. एक भाग घेऊन कडा जुळवून कोन बनवावा. आतमध्ये १/४ चमचा सारण भरावे. समोसावरून बंद करावा. अशा प्रकारे सर्व सामोसे बनवून घ्यावे.
४) कढईत तेल गरम करून सामोसे मंद आचेवर तळावे. रंग चांगला बदामी येऊ द्यावा. तळलेले सामोसे कागदावर काढून ठेवावे. गार झाले की डब्यात भरावे.

टिपा :
१) सारण कोरडे असावे. नाहीतर सामोसे मऊ पडतात.
२) समोशाच्या कडा व्यवस्थित सील कराव्यात. नाहीतर गरम तेलात सारण बाहेर येऊ शकते.
३) तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करावे.

* अळूची पातळ भाजी करताना पानांचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत म्हणजे भाजी चांगली होते.
* व्हेजिटेबल सूप उकळताना चमचाभर मिल्क पावडर सुपात घातल्यास मळी दूर होऊन, स्वच्छ नितळ सूप तयार होते.
* कोबीची भाजी करताना, चिरून झाल्यावर धुऊन मीठ लावून ठेवावे. त्यामुळे कोबी चटकन शिजतो व उग्र वास येत नाही.

lp29ज्वारीच्या चकल्या
साहित्य :
१ कप ज्वारीचे पीठ
२ टिस्पून मैदा
१/२ टिस्पून तीळ
१/२ टिस्पून जिरे, कुटलेले
१/४ टिस्पून ओवा
१ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हिंग
साधारण १/२ कप पाणी
१/२ टिस्पून मीठ
चकल्या तळण्यासाठी तेल
कृती :
१) ज्वारीचे पीठ मोठय़ा सुती रुमालात बांधून पुरचुंडी बनवावी. कुकरमध्ये तळाला १ इंच पाणी घालावे. त्यात भोकाची ताटली ठेवावी. त्यावर कुकरच्या आतील डबा ठेवून त्यात पिठाची पुरचुंडी ठेवावी.
२) कुकरच्या ३-४ शिट्टय़ा होऊ द्याव्यात. गॅस बंद करावा. कुकरचे प्रेशर कमी झाले की कुकर उघडून पुरचुंडी काढावी. त्यातील पीठ जरा घट्ट झाले असेल.
३) हाताने गुठळ्या फोडून चाळून घ्यावे. त्यात मैदा, तीळ, जिरे, ओवा, लाल तिखट, हिंग आणि मीठ घालून मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालत मध्यमसर मळावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. खूप घट्ट किंवा खूप सैलसुद्धा नको.
४) चकली यंत्राला आतून तेलाचा हात लावावा. चकलीची चकती बसवून साच्यात पीठ भरावे. कढईत तेल गरम करून आच मध्यम करावी. चकल्या पाडून बदामी रंगावर तळाव्यात.
तळलेल्या चकल्या कागदावर काढून गार होऊ द्याव्यात. नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
टिपा :
१) ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो म्हणून चकल्या पाडताना त्या तुटण्याची शक्यता असते. पीठ घट्ट वाटले तर पिठाला थोडा पाण्याचा हात लावून मळावे.
२) चकलीची जाड भोकाची चकती घ्यावी. बारीक भोकाच्या चकतीमुळे चकल्या पडताना तुटतात.

lp30टूटी-फ्रुटी कुकीज
साहित्य:
१०० ग्राम मैदा
६० ग्राम लोणी/ बटर (अनसॉल्टेड)
५० ग्राम साखर
२ चिमटी बेकिंग सोडा
३ टेस्पून टूटीफ्रुटी
१/२ टिस्पून वॅनीला इसेंस

कृती :
१) मैदा, मीठ आणि बेकिंग सोडा चाळून घ्यावे. ओव्हन १७५ वर प्रिहिट करावे.
२) लोणी आणि पिठी साखर व्यवस्थित फेसून घ्यावी. नंतर त्यात वॅनीला इसेंस घालून मिक्स करावे.
३) मैदा आणि टूटी-फ्रुटी घालून नरम असा गोळा बनवावा.
४) तूप लावलेल्या बेकिंग ट्रेवर मळलेल्या पिठाचे सुपारीएवढे गोळे करून ठेवावे. दोन गोळ्यांच्या मध्ये किमान २-३ इंच जागा असावी. (कुकीज बेक झाल्या की आकाराने वाढतात.)
५) साधारण ८ ते १० मिनिटे बेक करावे. (जर मायक्रोवेव्हमधील कन्व्हेक्शन ऑप्शन वापरत असाल तर साधारण ८ मिनिटे लागतात. मोठय़ा ओव्हनमध्ये जरा जास्त मिनिटे लागतात.)
६) कुकीज बेक झाल्या की वायर रॅकवर गार होण्यासाठी काढून ठेवाव्यात. गार झाल्या की खाव्यात.

चॉकलेट
साहित्य :
७० ग्राम डार्क चॉकलेट
३० ग्राम मिल्क चॉकलेटlp31
आवडीनुसार इसेंस (ओइलबेस्ड इसेंस वापरावा) (कॉफी, ऑरेंज इत्यादी)
आवडीप्रमाणे स्टफिंग – रोस्टेड बदाम, काजू वगैरे

कृती :
१) मायक्रोवेव्हमध्ये चालेल अशा काचेच्या भांडय़ात चॉकलेट चिरून घालावे. ३०-३० सेकंद गरम करून ढवळावे. मिश्रण पातळ झाले की त्यात इसेंस घालावा. मिक्स करावे.
२) सिलिकॉन मोल्ड्समध्ये पातळ चॉकलेट अध्र्यापर्यंत भरावे. बदाम किंवा काजू घालून वर परत चॉकलेटचा लेयर द्यावा. फ्रीजमध्ये ५ ते १० मिनिटे सेट करावे.
चॉकलेट सेट झाले की मोल्डमधून काढावे.
टीप :
जर मायक्रोवेव्ह नसेल तर उकळत्या पाण्यावर एक स्टीलचे भांडे धरावे. वरच्या भांडय़ात चॉकलेट घालावे. वाफेच्या उष्णतेवर चॉकलेट वितळवावे. चॉकलेट आणि पाण्याचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.

* अळूची पाने खाजरी असतील तर प्रथम ती पाने धुवावीत नंतर एका पसरट भांडय़ात पाणी घेऊन त्यात लिंबू पिळावे. १०-१५ मिनिटे तसेच ठेवावे. अळूची पाने चाळणीत निथळून घ्यावीत म्हणजे खाज कमी होईल.
* हरभरा सोलण्याचे काम चटकन उरकण्यासाठी निर्लेप कात्रीने हरभरा दोन्हीकडून थोडा थोडा छाटावा. दाणा चटकन बाहेर पडतो.

lp32सोया नानकटाई
साहित्य:
१/२ कप अनसॉल्टेड बटर (किंवा लोणी)
६ टेस्पून पिठी साखर
१/२ कप गव्हाचे पीठ
१/२ कप सोयाबिन पीठ
१/४ टीस्पून बेकिंग पावडर
१/४ टीस्पून वेलची पावडर
२ टेस्पून पिस्त्याचे काप
कृती :
१) नानकटाई बनवण्यापूर्वी बटर २ तास फ्रिजबाहेर काढून ठेवावे म्हणजे एकदम मऊसर होईल. एका मध्यम आकाराच्या खोलगट ताटलीत बटर आणि साखर घ्यावी. आणि मिश्रण हलके होईस्तोवर जोरजोरात फेसावे.
२) ३५० डीग्री (१७५ डीग्री सेल्सियस) वर ओव्हन प्रिहीट करावे.
३) बेकिंग ट्रेला तुपाचा किंवा बटरचा हात लावून तयार ठेवावा. वरील प्रमाणासाठी साधारण २ ट्रे लागतील. एकच ट्रे असल्यास दोन विभागांत नानकटाई बनवावी.
४) सोयाबीन पीठ, गव्हाचे पीठ, वेलची पावडर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी. चाळणीत जर पिठाचे गोळे अडकले असतील तर ते फोडून घ्यावेत. चाळलेले पीठ, बटर-साखरेच्या मिश्रणात घालावे आणि हाताने मळावे. व्यवस्थित गोळा तयार करावा. (कदाचित एखादा चमचा पीठ वाढवावे लागेल)
५) तयार गोळ्याचे साधारण २० ते २२ समान भाग करावे (१ इंच). प्रत्येक गोळा एकमेकापासून २ इंचांच्या अंतरावर ठेवावा. प्रत्येक गोळ्यावर पेढय़ाला लावतो तसे पिस्त्याचे काप लावून चेपावे.
६) ओव्हनच्या मधल्या रॅकमध्ये ट्रे ठेवावा व साधारण १२ ते १४ मिनिटे बेक करावे. बेक केल्यावर ट्रे बाहेर काढावा आणि गार होऊ द्यावा. १५ मिनिटांनी खुसखुशीत अशा नानकटाई खाण्यासाठी तयार होतील.
टिपा :
१) मीठ नसलेले बटर वापरावे. बटर नसल्यास लोणी, डालडा वापरले तरी चालेल.
नानकटाईच्या मिश्रणात बदाम, काजू, पिस्त्याचे पातळ काप मिक्स केले तरीही छान चव येते.
३) नानकटाईसाठी मळलेला गोळा एकदम तुपकट नसावा. जर बटर जास्त वाटत असेल तर चमचाभर पीठ घालावे. कारण खूप तूपकट गोळा बेक केला तर नानकटाई एकदम बसक्या होतात. कणकेला मळतो इतपत गोळा घट्ट असला पाहिजे.

lp33पाइनापल कोकनट बर्फी
साहित्य :
२ कप ताजा नारळ खवलेला
१ कप साखर
५-६ अननसाचे स्लाइस (शक्यतो टीनमधील वापरावे)
३ ते ४ टेस्पून पाइनॅपल क्रश (मॅप्रो)

कृती :
१) अननसाचे स्लाइस मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
२) नारळ, साखर आणि वाटलेला अननस एकत्र करून शिजवावे. सतत ढवळावे. मिश्रणाचा गोळा होत आला की पाइनॅपल क्रश घालावा. मिक्स करून तूप लावलेल्या ताटलीत वडय़ा सेट कराव्यात. गार झाले की वडय़ा पाडाव्यात.
टीप :
१) जर पाइनॅपल क्रश मिळत नसेल तर २ ते ४ थेंब पाइनॅपल इसेंस वापरावा.
२) मिश्रणाचा गोळा होत आला की १-२ चमचे पिठीसाखर घालावी. ढवळून मग वडय़ा थापाव्यात. यामुळे वडय़ा थोडय़ा खुरखुरीत होतात.

* कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांडय़ातून ऊतू जाऊन भात कुकरमध्ये सांडतो. हे टाळण्यासाठी कुकरच्या भांडय़ात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे (पाव चमचा) मीठही घालावं, म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही.
* गाजराच्या कोशिंबिरीत दोन-तीन कुटाच्या मिरच्या तळून चुरा करून घालाव्यात. कोशिंबिरीची लज्जत वाढते.

lp34पुदिना शेव
साहित्य:
१/२ कप पुदिन्याची पाने
१/२ कप चिरलेला पालक
३-४ तिखट मिरच्या
१ मध्यम बटाटा, उकडलेला
१ टिस्पून ओवापूड
१/२ टिस्पून मिरपूड
१/४ टिस्पून चाट मसाला
२ टेस्पून तांदळाचे पीठ
१.५ टेस्पून गरम तेलाचे मोहन
बेसन लागेल तसे
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती :
१) पुदिना, पालक आणि मिरच्या एकत्र बारीक वाटून घ्याव्यात. त्यात ओवापूड, चाट मसाला, मिरपूड आणि मीठ घालून मिक्स करावे. बटाटा बारीक किसून पुदिना पालकच्या मिश्रण मिक्स करावा.
२) यावर तांदळाचे पीठ आणि थोडे बेसन घालावे. पिठांवर कडकडीत तेलाचे मोहन घालावे. मिक्स करून घ्यावे. लागेल तसे बेसन घालून चिकटसर असे मिश्रण बनवावे. हे मिश्रण तेल लावलेल्या सोऱ्यात भरावे. शक्यतो मध्यम भोकाची शेवेची जाळी वापरावी.
३) कढईत तेल गरम करावे. शेव पडून मध्यम आचेवर शेव तळावी.

lp35बालुशाही
साहित्य :
१०० ग्राम मैदा
४० ग्राम वनस्पती तूप
१५ ग्राम दही
चिमुटभर बेकिंग सोडा
चिमुटभर मीठ
१०० ग्राम साखर
तळण्यासाठी तेल

कृती :
१) मैदा, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र चाळावे. तूप मैद्यामध्ये चोळून घ्यावे. मैदा ब्रेड क्रम्ब्ज सारखा दिसला पाहिजे. दही आणि १-२ चमचे पाणी घालून मैदा एकत्र आणावा. पीठ खूप मळू नये. हलक्या हाताने गोळा एकत्र आणावा.
२) साखरेचे दोन तरी पाक करावे.
३) पिठाचे लिंबाएवढे गोळे करावे. मध्यभागी थोडा दाब द्यावा. तेलात मंद आचेवर तळावे. गोळा तेलात सोडला की जास्त हलवू नये. बदामी रंग आला की बालुशाही बाहेर काढाव्यात. २-३ मिनिटे जरा निवू द्याव्यात. नंतर पाकात ४-५ मिनिटे मुरू द्याव्यात. बाहेर काढून ताटात ठेवावे. वरून पिस्त्याचे काप घालून सजवावे.

lp36मेथी शंकरपाळे
साहित्य :
३/४ कप गव्हाचे पीठ
१/४ कप मैदा
१ टेस्पून तेल
२ टीस्पून कसूरी मेथी
२ चिमटी ओवा
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) मैदा, गव्हाचे पीठ आणि मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात १ टेस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. चमच्याने ढवळावे.
२) कसुरी मेथी हाताने चुरडून पावडर बनवावी आणि पिठात घालावी. तसेच ओवा घालून मिक्स करावे. पाण्याने घट्ट भिजवून १५ मिनिटे झाकून ठेवावे.
३) १५ मिनिटांनी मळलेल्या पिठाचे २ समान भाग करावे. १ पिठाचा गोळा एकदम पातळ लाटावा आणि सुकू नये म्हणून त्यावर झाकण ठेवावे. नंतर दुसऱ्या गोळ्याची पोळी लाटावी. त्याच्या वरील बाजूस तेल लावावे आणि झाकलेली पोळी त्यावर ठेवावी. वरून थोडे दाबून एकदा लाटून घ्यावी. खूप जोरात लाटू नये दोन्ही पोळ्या एकमेकांना चिकटाव्यात म्हणून लाटावे.
४) कातणाने शंकरपाळाच्या आकारात कापून तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत. एकदम सर्व न तळता ३-४ विभागात तळावेत. मोठय़ा आचेवर तळले तर वरून ब्राऊन होतात, पण लगेच मऊ पडतात. म्हणून मंद किंवा मध्यम आचेवर कडक होईस्तोवर तळावेत.