या वेळच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जोकोविचसारख्या दिग्गजाला नमवत वॉवरिन्काने पटकावलेला चषक ही कदाचित टेनिस क्षेत्रातल्या नव्या पर्वाची सुरुवात असू शकते. महिला टेनिसमध्ये मात्र आपल्याशिवाय पर्याय नाही, हे सेरेनाने याही वेळी सिद्ध केलं आहे.

पॅरिस म्हटलं की आभाळाशी स्पर्धा करणारा आयफेल टॉवर आठवतो. मात्र टेनिसपटूंसाठी आयफेल टॉवरच्या पाश्र्वभूमीवर लाल मातीत रंगणारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा म्हणजे कारकीर्दीतलं सगळ्यात मोठं आव्हान. कोकणातल्या मातीशी रंग आणि गुणधर्माच्या बाबतीत साधम्र्य साधणाऱ्या लाल मातीवर भले भले गारद झाले आहेत. ग्रास आणि हार्ड कोर्टच्या तुलनेत सर्वस्वी वेगळा पृष्ठभाग आणि संथ लयीत वावरणारा चेंडू यामुळे फ्रेंच ओपन जिंकणं नेहमीच खडतर असतं. राफेल नदाल लाल मातीवरचा अनभिषिक्त सम्राट. मात्र यंदा हा इतिहास बदलला. तब्बल सहा वर्षांनंतर लाल मातीवरली नदालशाही संपुष्टात आली. महिलांमध्ये अद्यापही सेरेनाचीच हुकूमत असल्याचे सिद्ध झाले. भारतासाठी जेतेपदांची झोळी रितीच राहिली.
नदालशाही उतरणीला
राफेल नदाल आणि लाल मातीचं सख्य अगदी घट्ट आहे. नदालच्या खेळाला साजेसा हा सरफेस. अफाट ऊर्जा, ताकदवान खेळ आणि झुंजार वृत्ती यामुळे नदालला लाल मातीवर हरवणं अशक्यच झालेलं. फ्रेंच खुल्या स्पर्धेत नदालची कामगिरी ७० विजय आणि एक पराभव अशी अचंबित करणारी. २००९ मध्ये रॉबिन सॉडर्लिगकडून चौथ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर नदाल या स्पर्धेत फक्त जिंकतो आहे. तो येतो, एकामागोमाग एक सामन्यात प्रतिस्पध्र्याना लोळवतो आणि जेतेपदाचा चषक उंचावतो- हे चित्र गेले अनेक वर्ष नित्याचं. वर्ष बदलायचं, कपडे बदलायचे पण माणूस एकच- राफेल नदाल. रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच या समकालीन दिग्गजांनाही नदालला लाल मातीवर नमवता आलं नाही, तर बाकीच्यांची काय कथा. मात्र यंदा इतिहास बदलेल असे संकेत स्पष्ट मिळाले होते. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या जेतेपदानंतर नदालच्या कामगिरीत घसरण झाली होती. ग्रास आणि हार्ड कोर्ट्सवर नदालला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. नदालच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झालेली आहे. या गुडघ्यांनी त्याला कमकुवत केले आहे. खांदे, मनगट तसेच पोटाच्या विकाराने त्याला त्रस्त केले आहे. परंतु जिंकण्याची ऊर्मी तसंच कोणत्याही परिस्थितीतून पुनरागमन करण्याची तयारी आणि अविरत मेहनत यामुळे नदाल केव्हाही परतू शकतो याची सगळ्यांना खात्री होती. फ्रेंच ओपनची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन स्पर्धामध्ये नदालला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळवा लागला. त्याच वेळी नदालची गाडी उताराला लागली आहे हे स्पष्ट झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली दहा वर्षे सातत्याने खेळून, जिंकून नदालच्या शरीराची झीज झाली आहे. आणि ही झीजच त्याला जेतेपदापासून रोखणार याविषयी उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. वर्षभरातली कामगिरी, रंगीत तालीम स्पर्धामधले प्रदर्शन हे लक्षात घेऊन फ्रेंच ओपनचे संयोजक खेळाडूंना मानांकन देतात. या स्पर्धेचा गतविजेता आणि तब्बल नऊ जेतेपदे नावावर असलेल्या नदालला सहावे इतके नीचांकी मानांकन देण्यात आले. यावर जगभरातल्या नदालच्या चाहत्यांनी जोरदार टीका केली. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या खेळाडूला अशी वागणूक का हा त्यांचा सवाल रास्तच होता. मात्र नदाल काहीही बोलला नाही. कदाचित त्यालाही पराभवाचे संकेत मिळाले असावेत. स्पर्धा सुरू झाली, सराईतपणे नदाल एकेक फेरी पार करू लागला. आणि तो दिवस उजाडला. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नोव्हाक जोकोव्हिचने नदालला चीतपट केलं. फ्रेंच ओपनमध्ये तब्बल ३९ विजयानंतर नदालला पराभवाला सामोरे जावं लागलं. लाल मातीवर दंतकथा सदरात गेलेल्या नदालचे पायही मातीचेच आहेत याचा प्रत्यय आला. जोकोव्हिचच्या अद्भुत किमयेपेक्षा नदालच्या पराभवाचीच चर्चा झाली. मात्र हा विजय आणि पराभवही निखळ नव्हता. जोकोव्हिच नदालपेक्षा सरस खेळला पण तो पूर्वीचा नदाल नव्हता. जीव काढणाऱ्या प्रदीर्घ रॅली, पल्लेदार शॉट्स, प्रतिस्पध्र्याना अचंबित करेल असे काही ठेवणीतले फटके आणि जिंकण्याची अमर्याद भूक हे सगळं अनुभवायला मिळालंच नाही. त्याच्या पोतडीत होतं हे सगळं पण दुखापतींनी वेढलेल्या शरीराने त्याला सगळी कौशल्यं कोर्टवर मांडू दिली नाहीत. महान खेळाडू महान असतात हे सिद्ध करत उमदेपणाने त्याने पराभव स्वीकारला. लाल मातीवर जेतेपदाचा चषकच घेऊन जाण्याची सवय असलेल्या नदालला चाहत्यांचे अभिवादन स्वीकारून मान खाली घालून जाताना पाहणं वेदनादायी होतं. एखाद्या पौराणिक ग्रीक योद्धय़ासारखी नदालचे व्यक्तिमत्त्व आहे. दुखापतींना ठेंगा देत हा लढवय्या योद्धा पुढच्या वर्षी परतेल याची खात्री असल्याने दुर्मीळ विजयानंतरही जोकोव्हिचने स्वत:ऐवजी नदालच्या महानतेला सलाम केला. यापुढे नदाल खेळेल, जिंकेल यात शंका नाही. परंतु यंदाच्या स्पर्धेने एका अविश्वसनीय वाटणाऱ्या नदालरथाला थांबताना पाहिलं. कदाचित ही नव्या पर्वाची नांदी ठरावी.
lp26
फेडररचा जेव्हा तेंडुलकर होतो..
अडीच वर्षांपूर्वी रॉजर फेडररने ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. त्यानंतर तिशी ओलांडलेल्या या दिग्गज खेळाडूची घसरणच होते आहे. आता कधी थांबणार, या प्रश्नापेक्षा का थांबलात अशी सन्मानपूर्वक निवृत्ती घ्यावी असा प्रघात आहे. कुठे थांबावं हे कळण्यातच महानता असते. फेडररला सिद्ध करण्यासारखं आता काहीच नाही. तब्बल १७ ग्रॅण्डस्लॅम जेतेपदं नावावर असलेल्या फेडररने शैलीदार खेळाचा, जंटलमन्स दृष्टिकोन आणि वावराचा मापदंड प्रस्थापित केला आहे. त्याच्याविषयीचा आदर मनामध्ये शिखरावर असतानाच त्याने अलविदा करावा, अशी त्याच्या जगभरच्या चाहत्यांची मनोमन इच्छा आहे. कोणी तरी सोम्यागोम्या खेळाडूने त्याला नमवावं हे पाहणं क्लेशदायी आहे. परंतु फेडररला असं वाटत नाही. अजूनही १८ वं विक्रमी ग्रॅण्डस्लॅम त्याच्या डोक्यात आहे. खेळायचा आनंद घेतोय असं तो वारंवार म्हणतो, त्याने पूर्वीच्या सातत्याने जेतेपद पटकवावं ही चाहत्यांची इच्छा आहे. मात्र जवळपास तीन वर्षांत जेतेपद दूरच, अंतिम चारमध्येही पोहोचणं त्याला कठीण होऊ लागलं आहे. केवळ विक्रमांसाठी त्याने खेळू नये, ही प्रामाणिक भावना त्याच्या चाहत्यांचा मनात आहे. मात्र दोनशेवी कसोटी आणि अन्य विक्रमांसाठी सचिनने लौकिकाला साजेशा धावा होत नसतानाही कारकीर्द लांबवली तसंच फेडररचं झालं आहे. यंदाच्या वर्षांतल्या पहिल्या अर्थात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो झटपट माघारी परतला होता. फ्रेंच ओपनमध्ये तर त्याचा खास मित्र आणि देशबंधू स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने त्याला नमवलं आणि तेही सरळ सेट्समध्ये. वॉवरिन्काच्या जोशपूर्ण सर्वागीण खेळासमोर फेडरर निष्प्रभ ठरला. आपल्या मित्राच्या खेळाची फेडररने खुल्या दिलाने प्रशंसा केली. परंतु ही हरण्याची मालिका अशीच सुरू राहणं फेडररसारख्या मातब्बराला साजेसं नाही.
 फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा २०१५
पुरुष एकेरी    –     स्टॅनिसलॉस   वॉवरिन्का
महिला एकेरी    –  सेरेना विल्यम्स
महिला दुहेरी    –   ल्युसी साफारोव्हा आणि
                            बेथानी मॅटेक सॅण्ड्स
पुरुष दुहेरी    –       इव्हान डोडिग आणि मार्केलो मेलो
मिश्र दुहेरी    –     बेथानी मॅटेक सॅण्ड्स
                          आणि माइक  ब्रायन

जोकोव्हिचचा स्वप्नभंग
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल ऐन भरात असताना टेनिसविश्वात अवतरलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने मोठय़ा कष्टाने अढळ स्थान मिळवलं. नैसगिक क्षमतेला अथक मेहनतीची जोड आणि प्रतिस्पध्र्याचा सखोल अभ्यास करून तयार केलेले डावपेच ही जोकोव्हिचची ओळख. हार्ड कोर्टवर होणारी ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपन आणि ग्रासवर होणारी विम्बल्डन या तिन्ही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धाची जेतेपदं जोकोव्हिचच्या नावावर आहेत. पण लाल मातीवर जेतेपदाने त्याला दूर ठेवलं आहे. कारकीर्दीत ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचं वर्तुळ पूर्ण करणं म्हणजे चारही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचं किमान एक जेतेपद नावावर असणं अतिशय प्रतिष्ठेचं मानले जातं. फेडरर आणि नदालला हा बहुमान प्राप्त आहे परंतु जोकोव्हिचला ते साध्य झालेलं नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान आणि अव्वल मानांकन मिळालेल्या जोकोव्हिचने उपांत्यपूर्व फेरीत नदालला पराभूत केल्यानंतर त्याचं जेतेपदं पक्कं असाच बहुतेकांचा समज होता. उपांत्य फेरीत जोकोव्हिचने अ‍ॅण्डी मरेचे आव्हान संपुष्टात आणत या समजाला खतपाणी घातलं. लाल मातीच्या जेतेपदापासून तो अवघा एक  विजय दूर होता. जेतेपदासह इतिहास नावावर करण्याची जोकोव्हिचला संधी होती. परंतु स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने जोकोव्हिचचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. अंतिम लढतीत जोकोव्हिचच्या खेळात सातत्य नव्हते, व्यावसायिक सफाई नव्हती. वॉवरिन्काला सहज नमवू, अशी एक बेफिकिरी जोकोव्हिचच्या खेळात जाणवली आणि तिथेच त्याचा घात झाला. पुढच्या वर्षी जोकोव्हिचला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.
lp25
‘वॉव’रिन्का
फेडरर-नदाल-जोकोव्हिच या त्रिकुटाची सद्दी असताना गुणवान खेळाडूंची एक पिढी सातत्याने त्यांना अनुभवत होती. ही सद्दी पहिल्यांदा मोडली स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने. गेल्या वर्षी त्रिकुटाला बाजूसा सारत वॉवरिन्काने ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं. अनेक र्वष दुसऱ्या फळीत स्थिरावलेल्या खेळाडूंची प्रतीक्षा वॉवरिन्काने थांबवली. फेडरर-जोकोव्हिच आणि नदाल यांनाही हरवता येतं, हा विश्वास वॉवरिन्काने दिला. या विश्वासाच्या बळावरच मारिन चिलीचने अमेरिकन ओपनचं जेतेपद नावावर केलं होतं. काहीसा स्थूल वाटणारा वॉवरिन्का दरवर्षी जानेवारी महिन्यात भारतात येतो चेन्नई ओपनच्या निमित्ताने. आणि जेतेपद जिंकून घेऊन जातो. ताकदवान खेळ आणि त्यातही खास एक हाती बॅकहॅण्ड आणि मॅरेथॉन लढतींसाठी आवश्यक स्टॅमिना ही वॉवरिन्काच्या खेळाची वैशिष्टय़े. लाल मातीवर आपला खेळ उंचावत, प्रतिस्पध्र्याचे कच्चे दुवे हेरून खेळ करीत वॉवरिन्काने जेतेपद पटकावले. जेतेपदापर्यंतच्या प्रवासात सोंगाने रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांना चीतपट केले. मोठय़ा खेळाडूंसमोर खेळताना त्यांच्याभोवतीच्या वलयाचे दडपण न घेता वॉवरिन्काने कारकीर्दीतील दुसरे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावले. फेडरर-नदाल-जोकोव्हिच सद्दी संपून आता संक्रमणाची वेळ आली आहे याचं प्रतीक म्हणजे वॉवरिन्काचे जेतेपद आहे.

सेरेना हरेना..
lp24महिला टेनिसमध्ये जेतेपद सेरेना पटकावणार ही जवळपास औपचारिकता असते. असंख्य प्रतिभावान युवा खेळाडू आहेत मात्र त्यातल्या एकीलाही सातत्य टिकवता आलेले नाही. साधारणत: जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या खेळाडूंना मानांकन दिले जाते. यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये बहुतांशी मानांकित खेळाडूंनी प्राथमिक फेऱ्यांमध्येच गाशा गुंडाळला. यावरूनच दर्जा किती उथळ आहे हे सिद्ध झालं. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचा उपांत्य फेरीचा मुकाबला अपरिचित, नावंही न ऐकलेल्या नवख्या खेळाडूंमध्ये व्हावा यातच महिला टेनिसचं अपयश दडलेलं आहे. दुसरीकडे अन्य सहयोगींकडून काहीही स्पर्धा नसताना, पूर्णत: मक्तेदारी सदृश वातावरणात जिंकण्यासाठी स्वत:ला प्रेरित करणं खूप कठीण आहे. मात्र सेरेनाने प्रत्येक ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत हे कसब साधलं आहे. यंदा सेरेनासाठी जेतेपद कठीण होतं. प्रतिस्पर्धी तुल्यबळ झाले म्हणून नाही तर तिला दुखापतींनी सतवलं होतं. अंतिम लढतीआधी तर तापामुळे तिने सरावही केला नाही. मात्र अफाट ऊर्जा, प्रचंड ताकद आणि जिंकण्याची भूक यामुळे सेरेना प्रत्येक अडथळ्यावर मात करते आणि जेतेपदाचा चषक उंचावते. यंदाही तसंच झालं. महिला टेनिसपटूंमध्ये तीस ही कारकीर्दीची संध्याकाळ असते. महान खेळाडू नियमाला अपवाद असतात. ३४व्या वर्षी सेरेना दुखापतग्रस्त शरीराला सांभाळत जिंकते आहे. सेरेनाने अन्य खेळाडूंसमोर अत्युच्च व्यावसायिकतेचं उदाहरण सादर केलं आहे. दुर्दैवाने सेरेनाकडून प्रेरणा घेण्यापेक्षा तिच्याकडून हरण्यातच त्यांचं समाधान होत असल्याने सेरेनाच्या जेतेपदांमध्ये भर पडते आणि महिला टेनिसच्या गुणवत्तेत्त घट होते.
भारताची फक्त उपस्थिती
गेली पंधरा वर्ष ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा म्हटलं की चार नाव ठळकपणे समोर येतात. लिएण्डर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा ही ती चौकडी. यंदा महेश भूपती नव्हता. सानिया मिर्झा जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. अनुभवी मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळणारी सानिया जेतेपदाची दावेदार होती. मात्र अनपेक्षितपणे या जोडीला प्राथमिक फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. लिएण्डर आणि रोहनचंही तसंच झालं आणि अतिप्रचंड लोकसंख्या असलेल्या भारताला केवळ उपस्थितीतच समाधान मानावे लागले. फ्रेंच ओपनच्याच ज्युनियर गटात मात्र युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. जेतेपद मिळालं नसलं तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अव्वल खेळाडूंना दिलेली टक्कर प्रशंसनीय आहे.
पराग फाटक -response.lokprabha@expressindia.com