मालिकांच्या सादरीकरणासोबतच आता प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं जातंय ते त्यातल्या दागिन्यांमुळे. सोनेरी ते आर्टिफिशिअल अशा अनेक दागिन्यांनी जागा मिळवली ती थेट प्रेक्षकांच्या कपाटात. मालिकांमधले दागिने आता त्या-त्या नायिकांच्या नावे ओळखले जाऊ लागलेत. कथा, कपडे, सेट, लोकेशन यांसह आता दागिने हा मालिकांमधला महत्त्वाचा मुद्दा ठरतोय.‘घ्या ‘जान्हवी मंगळसूत्र’ दोनशेला एक.. दोनशेला एक..’, ‘ही बोरमाळ घालून ‘कळलं का’ म्हणा अक्कासाहेबांसारखं’ अशी आरोळी ऐकू आली आणि सईने मागे वळून बघितलं. मैत्रिणींसोबत विंडो शॉपिंगला गेलेल्या सईला हे सगळं ऐकून आणि बघून मजा वाटली. एरवी टीव्हीवर दिसणाऱ्या नायिकांची नावं अशी मोठमोठय़ा आवाजात थेट बाजारात ऐकून तिला गंमत वाटली. मग पुढच्या खरेदीसाठी ती एका सोनाराच्या दुकानात गेली. तिथेही तिला तसाच प्रकार बघायला मिळाला. अगदी दोनशेला एक वगैरे असं नाही किंवा जान्हवी मंगळसूत्र घ्या असंही नाही.. पण, उच्चभ्रू लोकांना शोभेल अशा भाषेत. ‘हे आमचं लेटेस्ट कलेक्शन. जान्हवी कलेक्शन’, ‘हे सध्या इन आहे.. निर्मला आत्तू ज्वेलरी’.. त्या दुकानातली ती सेल्सगर्ल अशा भाषेत समजावत होती. सईला तिथेही हसू आवरेना.. तिथून घरी आल्यावर टीव्ही सुरूच होता त्यामुळे तो बघणं तिच्या नशिबी आलंच. मग एकामागे एक मालिका आणि चॅनल सर्फिग करत तिच्या लक्षात आलं की बाजारात विकले जाणारे दागिने हे या मालिकेतल्या नायिकांच्या अंगावर आहेत. अहा.. मग पुढे जरा आणखी विचार केल्यावर लक्षात आलं की, हे एकदम उलट आहे.. मालिकेतले दागिने बाजारात आले आहेत. हुश्श.. इथे कोडं सुटलं.. मग तिलाही हे दागिने आवडले. तीही बाजारात गेलीच असेल ते घ्यायला..

पारंपरिकता जपत ट्रेंडवर लक्ष
एखाद्या मालिकेचं ज्वेलरी डिझाइन करताना ती मालिका कोणत्या राज्याच्या पाश्र्वभूमीवर आहे हे महत्त्वाचं असतं. ‘बालिका वधू’ ही राजस्थानातील एका कुटुंबाची कहाणी आहे. त्यामुळे त्यातल्या व्यक्तिरेखांसाठी कपडे, ज्वेलरी डिझाइन करताना त्या राज्यातली लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास करावा लागतो. राजस्थान हे रंगीबेरंगी राज्य आहे. त्यामुळे या मालिकेतल्या कलाकारांना कपडे आणि दागिन्यांच्या माध्यमातून कलरफुल केलंय. दागिन्यांमध्ये सोनं आणि कुंदन यांचा अधिकाधिक वापर केला गेलाय. त्यात थोडा आजचा टच दिलाय. सध्याचा ट्रेंड लक्षात घेत पांरपरिक गोष्टी जपून त्या दागिन्याला लुक दिला गेलाय. यासाठी जयपूर, मुंबई, राजकोट, अहमदनगर अशा अनेक ठिकाणहून वेगवेगळं साहित्य घेऊन दागिने तयार केले आहेत. याबाबतचा अभ्यास, मेहनत याचं फळ प्रेक्षकांची प्रेमाची थाप पडल्यावरच मिळतं. ‘आम्हाला आनंदीची ज्वेलरी आवडते’ असं सांगणारे मला अनेक ई-मेल्स येत असतात. तसं करूून देण्याची मागणीही वारंवार येत असते. मी आणि माझी टीम जमेल तसं त्यांना करून देतो. 
रचना वाधवा मलकनी, 
डिझायनर (बालिका वधू)

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
A new storyline series for the audience on the occasion of Gudi Padwa 2024
गुढी नव्या मालिकांची
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे.. अशा अनेक सई आज आजूबाजूला दिसत असतील. म्हणजे कोडं पडलेल्या नव्हे. तर मालिकांचे दागिने घ्यायला बाजारात गेलेल्या अनेक सई सापडतील. मुद्दा हा की, मालिकांमधल्या कपडय़ांची फॅशन आजकाल कॉलेज कट्टय़ांवर, ट्रेनच्या ग्रुपमध्ये, ऑफिसमध्ये दिसतेच. पण, आता या फॅशनमध्ये भर पडतेय ती दागिन्यांची. सईला ऐकू आलेलं ते ‘जान्हवी मंगळसूत्र’ म्हणजे ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ मालिकेतलं तिचं तीन पदरी मंगळसूत्र. तर ‘अक्कासाहेबांसारखी माळ’ म्हणजे ‘पुढचं पाऊल’ मधल्या अक्कासाहेबांच्या अनेक दागिन्यांपैकी एक, मोठी बोरमाळ आणि ‘निर्मला आत्तू ज्वेलरी’ म्हणजे ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतल्या निर्मला आत्तूच्या बुगडय़ा, ठुशी आणि लक्ष्मीहार. ही झाली मोजकी उदाहरणं. पण, अशी अनेक उदाहरणं यामध्ये सहज मोडतात. ‘बालिका वधू’, ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘पवित्र रिश्ता’, ‘डोली अरमानों की’, ‘जावई विकत घेणे आहे’ अशा अनेक मालिकांचा उल्लेख इथे करता येईल. समाज आणि टीव्ही हे एकमेकांना पूरक असतं असं म्हटलं जातं. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचं प्रतिबिंब टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिसतं. तसंच टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात अमलात आणल्या जातात. तसंच सध्या मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या दागिन्यांचं आहे. मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या दागिन्यांनी आता अनेक महिलांच्या कपाटात जागा घेतली आहे.

‘जान्हवी’ असणं अभिमानास्पद
जेव्हा लग्नाचं आमचं शूट सुरू होतं तेव्हा एका सीनच्या वेळी तयार होताना मला आमच्या डिझायनर्सनी काही मंगळसूत्रं दाखवली. त्यात ते तीनपदरी मंगळसूत्र होतं. मला ते बघता क्षणी खूप आवडलं होतं. मला तेव्हाच ते मंगळसूत्र हवं होतं; पण लग्न झाल्यावरच्या ट्रॅकसाठी ते आहे, असं मला सांगितलं. मला ती तीनपदरी मंगळसूत्राची कल्पना भन्नाट वाटली. मी याआधी कधी असं बघितलं नव्हतं. आता जेव्हा तेच मंगळसूत्र ‘जान्हवी मंगळसूत्र’ या नावाने कुठे ऐकते तेव्हा एक वेगळीच गंमत वाटते. ती ‘जान्हवी’ असण्याची भावना खूप आनंद देणारी आहे. एखाद्याने आपली कला या मंगळसूत्रात वेगळेपण आणण्यात सादर केली आणि या सुंदर कलेशी आपलं नाव जोडलं गेलंय हे आनंदादायी आहे. मी कुठेही कार्यक्रमांसाठी गेले की, तिथे स्वागत करणाऱ्या आठ बायकांपैकी किमान पाच ते सहा बायकांच्या गळ्यात तीन पदरी मंगळसूत्र असतंच. तसंच अनेक बायका येऊन मला असंही सांगतात की, त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना तसं मंगळसूत्र बनवायला सांगितलं आहे. हे सगळं बघून, ऐकून मला गंमत वाटते. काही ठिकाणी ‘येथे जान्हवी मंगळसूत्र उपलब्ध आहे’ अशी पाटीही मी वाचली आहे; पण हा प्रतिसाद बघून खूप छान वाटतं. 
तेजश्री प्रधान (होणार सून मी ह्या घरची)

मालिकांमधल्या अनेक गोष्टींचं अनुकरण करणं हे पूर्वीपासूनच आलंय. अगदी ‘क्यूंकी साँस भी कभी बहू थी’ अशा एकता कपूरच्या ‘के’ फॅक्टर मालिकांपासून सुरू झालंय. या एकता काळातल्या मालिकांमधल्या खलनायिकांच्या कपाळावरच्या नागमोडी टिकल्या, एकाच हातात भरगच्च बांगडय़ा, गळ्यात दोरखंड असल्यासारख्या माळा हे आणि असं बऱ्याच गोष्टींचं अनुकरण केलं गेलं. मग टिकल्यांची उंची काहीशी कमी होऊ लागली. दोरखंडाची जाडीही कमी होऊ लागली. मालिका वळल्या त्या प्रादेशिक बाजाकडे. वास्तविक हा प्रादेशिक मुद्दा आधीपासूनच होता. पण, त्याचं प्रमाण वाढलं. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा राज्यातल्या कथा-कहाण्या टीव्हीवर झळकू लागल्या. या प्रादेशिक बाजामुळे तिथल्या दागिन्यांचं वैविध्यही प्रेक्षकांसमोर आलं. त्यात मोठा वाटा होता तो गुजराती धर्तीवर असलेल्या मालिकांचा. मोठमोठाल्या हवेल्या, त्यातला झगमगाट, नायिकांच्या भरगच्च डिझाइन असलेल्या जड साडय़ा आणि त्यावरचे जड दागिनेही. ही परंपरा पुढे आणखी काही काळ सुरूच राहिली. ‘क्यूंकी साँस भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘बा बहू और बेबी’, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘साथ निभाना साथिया’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘खिचडी’, ‘बंदिनी’, ‘मुक्तिबंधन’, ‘राम मिलाई जोडी’, ‘तीन बहुरानिया’, ‘कृष्णाबेन खाकरावाला’, ‘संस्कार लक्ष्मी’ अशा अनेक गुजराती पाश्र्वभूमीवरच्या मालिकांमुळे तिथले दागिनेही प्रेक्षकांसमोर आले. बिंदी, जरदोसी वर्क केलेले घागरे, गळ्यात, कानात मोठमोठाल्या इमिटेशनच्या ज्वेलरी असं सगळं या मालिकांमधून बघायला मिळालं. थोडं पुढे गेल्यावर राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा राज्यांतली दागिन्यांची परंपरा दिसली. महाराष्ट्राची नथ, मंगळसूत्र, इतर पारंपरिक दागिने असं दिसलं, तर पंजाबमधला रांगडेपणा दिसेल असे दागिने मालिकांमधून दिसले. मध्य प्रदेशातल्या जुन्या हवेल्या, राजवाडे याची परंपरा त्यांच्या दागिन्यांमधून नेहमीच दिसते. सोनं, चांदी, कांस्य अशा वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले दागिने ही मध्य प्रदेशाची ओळख. दणकट बांगडय़ा, पैेंजण, मोठमोठे झुमके, कडं अशी मध्य प्रदेशाची परंपरा मालिकांनी टिकवली. या पारंपरिक गोष्टींना काहीसा मॉडर्न टच देऊन नव्या रूपात हे दागिने आणले गेले. राजस्थानचाही काहीसा असाच प्रकार. मालिकांच्या या प्रादेशिक बाजामुळे दागिन्यांमधलं वैविध्य प्रेक्षकांसमोर आलं. हिंदीमध्ये हा ट्रेंड जोरात सुरू असताना तिकडे मराठीनेही आपल्या कक्षा रुंदावायला सुरुवात केली. पूर्वी कथा, विषय इथवर मर्यादित असणाऱ्या मराठी मालिका सादरीकरणावरही जोर देऊ लागल्या. म्हणूनच कालांतराने त्यात चकचकीतपणा, सेटवरचा झगमगाट, आकर्षक रूप अशा सगळ्यामध्ये प्रगती होत गेली. हिंदीची भव्यता हळूहळू यानिमित्ताने मराठीकडे सरकली. दागिने, कपडे, घरं, सेट्स हे सगळं खऱ्या अर्थाने ‘दिसू’ लागलं. यात सध्या लक्ष वेधून घेत आहेत ते मालिकांमधले दागिने. अमुक एका मालिकेतला दागिना वेगळा वाटला किंवा त्याचा पॅटर्न आवडला म्हणून तरुणींच्या गळ्यात, कानात दिसू लागलाय. सध्याच्या मराठी, हिंदी मालिकांनी दागिन्यांच्या माध्यमातून तरुणींच्या मनावर कब्जा केलाय असंच म्हणावं लागेल.
या ट्रेंडचं मराठीतलं एक उत्तम उदाहरण म्हणजे झी मराठीच्या ‘होणार सून मी ह्य घरची’ या लोकप्रिय मालिकेतलं जान्हवीचं मंगळसूत्र. हे नुसतंच मंगळसूत्र नाही तर तीनपदरी मंगळसूत्र. ही मालिका सुरू झाली तेव्हाच ती टीआरपीच्या शिखरावर होती. त्या वेळी मालिकेचा विषय, कलाकार, नायक-नायिकेतला रोमान्स यावरच प्रेक्षक भाळले होते. जान्हवी-श्रीचं लग्न झाल्यावर मात्र या प्रेमात आणखी भर पडली ती जान्हवीच्या त्या तीनपदरी मंगळसूत्रामुळे. लग्नात दाखवलेल्या चंद्रहारानेही तितकंच लक्ष वेधून घेतलं होतं. पण विशेष पसंती मिळाली ती या मंगळसूत्राला. हे मंगळसूत्र मालिकेत येऊन दोन आठवडे नाही झाले तोच बाजारात येऊन पोहोचलं. महिलांसाठी ही पर्वणीच. त्यातही नवीन लग्न झालेल्यांसाठी तर विचारायलाच नको. ट्रेन, छोटी दुकानं, मॉल अशा सगळ्या ठिकाणी विंडो शॉपिंगमधलं दोनशेचं, एक ग्रॅम सोनं, प्युअर सोनं, डायमंड अशा सगळ्या प्रकारांत ते मिळू लागलं. त्यामुळे इच्छुक महिला यापासून वंचित राहिल्या नाहीत. ‘होणार सून..’च्या जान्हवीचं तीनपदरी मंगळसूत्र लोकप्रिय झालं आणि ते लगेच ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतल्या मेघनाच्या गळ्यातही काही एपिसोड दिसलं होतं. नंतर काही एपिसोडनंतर मात्र मेघनाच्या गळ्यात नेहमीसारखं लहान, एकपदरी मंगळसूत्र दिसू लागलं. एका मालिकेतला लोकप्रिय झालेला प्रकार यानिमित्ताने दुसऱ्या मालिकेतही बघायला मिळाला.

हेतू सफल झाला
मालिका सुरू झाली तेव्हाच ठरवलं होतं की, यातल्या दागिन्यांमध्ये मराठी संस्कृती, परंपरा जपायची आहे. तसंच मालिकेतलं कुटुंब हे जुन्या रूढी, परंपरा जपणारं आहे. त्यामुळे चंद्रहार हा दागिना दाखवला. चंद्रहाराला प्रेक्षकांनी पसंती दिली. मग तीनपदरी मंगळसूत्र असा वेगळा प्रयोग करण्याचं आम्ही ठरवलं. हा प्रयोगही प्रेक्षकांनी उचलून धरला. परंपरा, संस्कृती, रूढी अशा पद्धतीचे दागिने केले आणि दाखवले की प्रेक्षकांना ते आपलेसे वाटतात. मालिकेतले दागिने करण्यामागे हाच हेतू होता. प्रेक्षकांना ते आवडलं पाहिजे आणि त्यांना ते जवळचं वाटलं पाहिजे. प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता आमचा हेतू सफल झाला, असं म्हणता येईल. 
संतोष गावडे, डिझायनर (होणार सून मी ह्य़ा घरची)

स्टार प्रवाहच्या ‘पुढचं पाऊल’मधल्या अक्कासाहेबांचंही तसंच काहीसं. मुळातच अक्कासाहेब व्यक्तिरेखा रुबाबदार, भारदस्त असल्यामुळे प्रेक्षक तिच्या पहिल्यापासूनच प्रेमात. काठापदराची साडी, मोठी टिकली, भरपूर गजरे, बांगडय़ा, मंगळसूत्रासह अनेक दागिने या सगळ्यामुळे ही व्यक्तिरेखा चमकते.

आनंद मिळतो
आम्ही कलाकार जे कपडे, स्टाइल किंवा दागिने घालतो ते प्रेक्षकांना आवडतात. त्यांच्याच प्रतिसादामुळे ते लोकप्रियही होतात. मालिकांमधल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण केलं जातं म्हणून छोटय़ा छोटय़ा गोष्टीही दागिने बनवताना महत्त्वाच्या ठरतात. मंगळसूत्राच्या वाटय़ांपासून ते साडय़ांच्या रंगांपर्यंत सगळा विचार करावा लागतो. त्यामागे अभ्यास असतो आणि या क्रिएटिव्हिटीला, मेहनतीला प्रेक्षकांची दाद मिळाली, की कलाकार आणि डिझाइनर्ससाठी ती पावती असते. मी जे दागिने घालते ते प्रेक्षक फॉलो करतात हे बघून आनंद होतो. फोन, मेसेजमधून प्रतिक्रिया येतच असतात; पण प्रत्यक्ष भेटल्यावरही भरभरून कौतुक केलं जातं. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. 
तन्वी पालव (जावई विकत घेणे आहे)

अक्कासाहेबांच्या लुकवर सगळेच फिदा. पण त्यातही विशेष प्रेम हे दागिन्यांवर. तिच्या गळ्यातले दागिने रोज बदलतात. पण मंगळसूत्रासोबत असलेल्या दोन माळा मात्र कायम असतात. नेमकं हेच प्रेक्षकांनी हेरलं आणि ते लोकप्रियही झालं. खरंतर या माळा अगदीच साध्या. विशेष कलाकुसर यामध्ये नाही. तरी इतर दागिन्यांना पूर्णत्व देण्याचं महत्त्वाचं काम या माळा करतात. अशी ही बोरमाळ. एक छोटी आणि दुसरी मोठी. खरंतर बोरमाळेची उंची फार नसते, पण नेहमीपेक्षा दहा-बारा इंच वाढवून मंगळसूत्राच्या उंचीइतकी ती तयार केल्याचं डिझायनर आणि अभिनेत्री हर्षदा खानविलकर सांगतात. मंगळसूत्राच्या उंचीची असलेली ही बोरमाळ प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. वास्तविक मालिकांमधल्या खलनायिकांचा प्रेक्षक सतत द्वेष करतात. पण तो जमाना गेला बॉस..! पूर्वीसारख्या नागमोडी वळणाच्या टिकल्या आणि विचित्र रंगांच्या लिपस्टिक लावलेल्या खलनायिका फारशा बघायला मिळत नाहीत. आता खलनायिका चमकतात त्या वेगवेगळ्या दागिन्यांवर. ई टीव्ही मराठीच्या ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतली निर्मला आत्तू सतत कुरघोडय़ा करण्यात व्यग्र. आणि इकडे प्रेक्षक तिचे दागिने बघण्यात व्यग्र. या आत्तूचेही दागिने बदलत असतात. पण तिच्या गळ्यातले ठुशी, लक्ष्मीहार हे दागिने लक्ष वेधून घेताहेत. तसंच तिच्या बुगडय़ाही लोकप्रिय आहेत. खलनायिकांचा लूक भडक करणं अशी स्मॉलस्क्रीनची परंपरा. पण मेकअपऐवजी दागिन्यांमध्ये हा भडकपणा आणला की वेगळा लूक येतो याचं निर्मला आत्तू हे उदाहरण.

साधेपणातलं सौंदर्य
व्यक्तिरेखा साधीच, पण आकर्षक बनवायची असेल तर अभ्यास हा लागतोच. मालिकेतल्या एका घरात जर चार बायका असतील तर त्या प्रत्येकीची ज्वेलरी वेगवेगळी कशी दिसेल हेही लक्षात घ्यावं लागतं. त्यातही नायिकेचे दागिने उठून दिसण्यावर भर दिला जातो. मग उठून दिसण्यासाठी भडक दागिने बनवण्यापेक्षा त्यात आकर्षक पद्धतीने काय करता येईल याचा विचार केला जातो. प्रांजलचे दागिने बनवताना हाच विचार केला गेला. मुळात तिचं माहेर गडगंज श्रीमंत. तर सासर मध्यमवर्गीय कुटुंब. माहेरून सासरी आल्यावर तिने मध्यमवर्गीय कुटुंबात शोभावं असा तिचा लुक बनवावा लागला. त्यानुसार दागिने ठरले. तसंच प्रेक्षकांची पसंती हाही एक महत्त्वाचा मुद्दा असतो. हा सगळा विचार, क्रिएशन प्रेक्षकांना पसंत पडलं की तिथे आम्हाला आमच्या कामाची पावती मिळते. काही वेळा काही व्यक्तिरेखांसाठी काही दागिने खास डिझाइन देऊन बनवून घेतले जातात. 
संगीता सारंग, डिझायनर 
(जावई विकत घेणे आहे)

झी मराठीची ‘जावई विकत घेणे आहे’ ही मालिका तशी मध्यमवर्गीय कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारी. पण सणासुदीला दिसणारे या मालिकेतले दागिने मात्र प्रेक्षकांना आकर्षित करताहेत. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातल्या एका भागामध्ये मालिकेच्या नायिकेने घातलेला दागिना तरुणींना भावला आणि पुढच्या सणांसाठी त्या तो दागिना घ्यायला तयार झाल्या. मालिकेची नायिका, प्रांजल हिच्या गळ्यात मोगरावेल हा दागिना दिसला. काठापदराच्या साडीवर बारीक डिझाइन असलेला हा साधासुधा दागिना सोबर लुक देतो. सध्याच्या फॅशन, ट्रेंडी जमान्यात तरुणी पारंपरिक दागिन्यांना प्राधान्य देताहेत हे मालिकांचं यश म्हणावं लागेल. मराठीमध्ये सध्या वास्तवदर्शी मालिका दाखवल्या जातात म्हणून दागिन्यांमध्ये तसा फारसा वाव नसतो. पण तरी, त्यातही दाखवले जाणाऱ्या दागिन्यांमध्ये प्रयोग होत असल्यामुळे त्यांना चांगलीच पसंती मिळतेय.

व्यक्तिरेखेच्या नावाचा दागिना
नुकताच घडलेला एक किस्सा सांगते. आमच्या मालिकेत असलेल्या नायकाचे आई-बाबा वाशीला एका दागिन्यांच्या दुकानात गेले होते. तिथे एक सेल्सगर्ल एक दागिना दाखवताना म्हणाली, ‘‘ही बघा ‘आत्तू ज्वेलरी’. हे आमचं नवं कलेक्शन आहे.’’ हे ऐकून त्याचे आई-बाबा आणि आजूबाजूचे अनेक लोक तिच्याकडे बघायला लागले. त्यावर तिने ‘‘ती ज्वेलरी ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ मालिकेतली आत्तू आहे ना, तिच्यासारखी ज्वेलरी,’’ असं स्पष्टीकरण दिलं तेव्हा सगळ्यांना कळलं. मालिकेतल्या निर्मला आत्तूची गळ्यातली ठुशी, लक्ष्मीहार आणि बुगडय़ा खूप लोकप्रिय आहेत याचा प्रत्यय हा किस्सा ऐकल्यावर मला आला. माझे मालिकेतले कानातले बघून ओळखीच्या अनेकांनी तसे बनवून घेतलेत. मी स्वत: बुगडय़ा करायला दिल्यात. मालिकेत माझ्या गळ्यात काही वेळा जी मोठी माळ असते त्याला टेंपल ज्वेलरी म्हणतात. तीही मला खूप आवडते. तीही घेण्याचा मी विचार करतेय. आपण मालिकेत जे दागिने घालतो ते लोकप्रिय होतात आणि आपल्या व्यक्तिरेखेच्या नावाने बाजारात येतात ही खूप आनंद देणारी भावना आहे. ओळखीचे लोक, नातेवाईक प्रत्यक्ष भेटून कामाचं कौतुक तर करतात, पण दागिन्यांविषयीही आवर्जून बोलतात. मला स्वत:ला आर्टिफिशिअल ज्वेलरी खूप आवडते. त्यामुळे कुठे फिरायला गेले तर तिथले वेगळ्या प्रकारचे दागिने मी नक्कीच घेते. अशा दागिन्यांचा संग्रह करायला मला आवडतो. 
संयोगिता भावे (असावा सुंदर स्वप्नांचा बंगला)

दुसरीकडे हिंदीत दागिन्यांना भरपूर वाव असल्यामुळे वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. प्रादेशिक बाजाच्या मालिका होत असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यातली दागिन्यांची संस्कृती त्यांना टीव्हीवर आणता येते. म्हणूनच ‘बालिका वधू’, ‘पवित्र रिश्ता’, ‘दिया और बाती हम’, ‘साथ निभाना साथिया’, ‘बेइंतेहा’, ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कबूल है’ अशा वेगवेगळ्या प्रांतातल्या मालिका बघायला मिळतात. पर्यायाने तिथल्या परंपरा, रूढींबरोबरच त्यांच्या दागिन्यांमधलं वैविध्यही दिसून येतं. त्याला थोडा आजच्या जमान्यासारखं ट्रेंडी बनवलं की झालं, प्रेक्षकांना आपलंसं वाटलंच म्हणून समजा. हा फंडा टीव्हीवाले अजमावतायत. आणि तो यशस्वीही होतोय. ‘बालिका वधू’ही राजस्थानी कुटुंबावर आधारित मालिका आहे. त्यामुळे तिथला घरंदाजपणा, रूढी-परंपरा जतन करणारे लोक असं सगळं काही या मालिकेतून झळकतं. आनंदीच्या दागिन्यांकडे पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचं लक्ष. तिच्या दागिन्यांमध्ये कुंदनचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. सुरुवातीला तिच्या हातात असणाऱ्या चौकोनी बांगडय़ा तिच्या दागिन्यांचं वैशिष्टय़ ठरल्या. सहजासहजी अशा चौकोनी बांगडय़ा बघायला मिळत नाहीत. त्यामुळे या बांगडय़ा मालिकेचं आकर्षण ठरल्या. अशा बांगडय़ा मिळवण्यासाठी तरुणींनी धाव घेतली ती दुकानांकडे. ‘बेइंतेहा’, ‘कबूल है’, ‘जिंदगी गुलजार है’, ‘औन झारा’ या मुस्लिम समाजावर आधारित मालिकांमध्ये त्यांच्या पारंपरिक दागिन्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे त्याही दागिन्यांची ओळख प्रेक्षकांना झाली आणि लोकप्रियतेत वाढ झाली.

प्रयोग करायलाच हवेत
मला स्वत:ला दागिने आणि कपडय़ांची खूप हौस आहे. त्यात वेगवेगळे प्रयोग करणं माझी आवड आहे. त्यामुळे प्रत्येक वेशभूषेचं वेगळेपण उठून दिसावं यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असते. ‘पुढचं पाऊल’मधली अक्कासाहेब या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आधी तिच्या पेहरावावर काम करणं आवश्यक होतं. अक्कासाहेबांचा लुक मीच डिझाइन केलाय. कोल्हापूरच्या धर्तीवर असलेली मालिकेची कथा लक्षात घेता अक्कासाहेब रुबाबदार दिसणं ही गरज होती. त्यामुळे त्याप्रमाणे साडी, दागिन्यांवर काम केलं. तसंच तिची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असल्यामुळे आणि कोल्हापूरमधलं प्रतिष्ठेचं नाव असल्यामुळे तसा आब असणारी व्यक्तिरेखा वठवायची होती. म्हणून साडय़ांबरोबरच दागिन्यांनाही तितकंच महत्त्व दिलं. अक्कासाहेबांच्या अंगावर वेगवेगळे दागिने असतात; पण त्यात महत्त्वाची भूमिका बजावते ती बोरमाळ. खरं तर बोरमाळ तीस ते बत्तीस इंच इतकी असते; पण ती थोडी वाढवून तिचा समावेश इतर दागिन्यांमध्ये केलाय. अक्कासाहेबांचं मंगळसूत्र लांब असल्यामुळे बोरमाळेचीही उंची ४०-४२ इंचांवर आणली आहे. मंगळसूत्र आणि इतर दागिने उठून दिसावेत आणि परिपूर्णता यावी यासाठी बोरमाळ उपयुक्त ठरते. म्हणून अक्कासाहेबांचे इतर दागिने बदलत असले तरी बोरमाळ कायम असते. असे दागिने प्रेक्षकांच्या लक्षात येतात. मी बाहेर कुठेही गेले, की लोक आवर्जून दागिन्यांविषयी बोलतात, चांगल्या प्रतिक्रिया देतात. कार्यक्रमांना गेले की, प्रेक्षकांचं लक्ष आधी माझ्या दागिन्यांकडे जातं. नेहमीच मी अक्कासाहेबांसारखे दागिने घालून बाहेर जात नाही. त्यामुळे ‘आज इतके कमी दागिने कसे’ असंही बोलतात. अर्थात ते कौतुकच असतं; पण मला वाटतं योग्य दागिना आणि योग्य कपडे याचं गणित जुळलं, की ती व्यक्तिरेखा उठून दिसते. पूर्वी सिनेमांमधल्या दागिन्यांवर बोललं जायचं. आता मालिकांमधल्या दागिन्यांकडेही प्रेक्षकांचं बारीक लक्ष असतं. ही टीव्ही माध्यमासाठी चांगली गोष्ट आहे. 
हर्षदा खानविलकर, अभिनेत्री-डिझायनर (पुढचं पाऊल)

साधंच, पण आकर्षक
मला स्वत:ला कपडे आणि दागिन्यांची हौस असल्यामुळे मालिकांमधल्या नायिकांच्या दागिन्यांकडे माझं नेहमी लक्ष असतं. सोन्याच्या दागिन्यांसोबतच मला आर्टिफिशिअल ज्वेलरीमध्ये रस आहे. त्यामुळे मालिकेत कोणी काही वेगळे प्रयोग केलेत का हे मी बघत असते. ‘जावई विकत घेणे आहे’ या मालिकेच्या गणेशोत्सवाच्या एपिसोड्समध्ये प्रांजलने मोगरावेल ही सोन्याची माळ आणि त्याचेच कानातले घातले होते. मंगळसूत्रासोबत तो दागिना सुंदर दिसत होता. बारीक असला तरी तो काठापदराच्या साडीवर उठून दिसत होता. ते आवडल्यामुळे मी लगेच तो मोगरावेल घेऊन आले. सोन्याचा नसला तरी त्याला सोन्याची शाइन नक्कीच आहे. 
नेहा कुलकर्णी

फॅशनचा चांगला पर्याय 
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतल्या जान्हवीचं तीन पदरी मंगळसूत्र मला खूप आवडलं होतं. पण, तेव्हा माझं लग्न ठरलं होतं. हे मंगळसूत्र मालिकेत दाखवल्यानंतर दोन महिन्यांनी माझं लग्न होतं. तेव्हाच मी ठरवलं होतं की, असं मंगळसूत्र घ्यायचं. छोटय़ा मंगळसूत्राची फॅशन तर आहेच. पण, त्यातही तीन पदरी मंगळसूत्राचं क्रिएशन मला खूप आवडलं. लग्न झाल्यावर लगेचच दोन महिन्यांनी मी ते घेतलं. मालिका मनोरंजनासाठी तर आपण बघतच असतो. पण, मला वाटतं, मालिकांमधूनच अशा वैविध्यपूर्ण गोष्टींचीही नव्याने ओळख होते. मंगळसूत्रातही फॅशन शोधणाऱ्या तरुणींसाठी हा चांगला पर्याय आहे असं मला वाटतं. 
दीप्ती मुळे

पॅटर्न आवडला पाहिजे
रोज वेगवेगळ्या मालिका बघणं होत असतं. त्यात नेहमी लक्ष जातं ते त्यांच्या दागिन्यांकडे. काही मालिकांमध्ये विशिष्ट दागिने दिसतात, तर काही मालिकांमध्ये एकच पॅटर्न दिसतो. तो पॅटर्न मला आवडला की मी तशा प्रकारचे दागिने घेते. सोन्याच्या दागिन्यांपेक्षा इमिटेशन ज्वेलरी मला आवडते. त्यामुळे मालिकेतल्या वेगवेगळ्या पॅटर्नवर माझं लक्ष असतं. ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेत पंखुरीचे कश्मिरी झुमके मला आवडले होते. मग साधारण तशाच प्रकारचे झुमके मी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत राधाच्या कानात बघितले. तो पॅटर्न आवडला. मग तशा झुमक्यांच्या शोधात फिरत मी ते शेवटी मिळवले. तसंच काहीसं बांगडय़ांबद्दल. ‘बालिका वधू’मधल्या आनंदीच्या हातात चौकोनी बांगडय़ा बघायला मिळाल्या. सर्वसाधारणत: अशा चौकोनी बांगडय़ा बघायला मिळत नाहीत. हा नवा प्रकार मला भावला आणि लगेचच अशा बांगडय़ा घेतल्या. त्यामुळे एखाद्या मालिकेतला विशिष्ट दागिना आवडण्यापेक्षा तो पॅटर्न किती आकर्षक वाटतो हे मला महत्त्वाचं वाटतं. 
अर्पिता लिमये

‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेतल्या पंखुरीच्या पंजाबी ड्रेसवर आधीच प्रेक्षक फिदा झाले होते. त्यातच तिचे कश्मिरी झुमके हे लोकप्रियतेचे कारण ठरले. त्यात वेगवेगळे प्रकार असले तरी त्याचा पॅटर्न एकच असतो. त्यामुळे या कश्मिरी झुमक्यांनाही मागणी आहे. ‘साथ निभाना साथिया’, ‘उतरन’, ‘दिया और बाती हम’, ‘डोली अरमानों की’ अशा मालिकांमधली कुटुंबं वेगवेगळ्या प्रांतातली दाखवली असली तरी घरंदाज आहेत. त्यामुळे त्यांना शोभेल असे दागिने मालिकेत दाखवले आहेत. त्या-त्या राज्यातली परंपरा जपत आधुनिक लूक देत हे दागिने तयार केले आहेत. त्यामुळेच अशा दागिन्यांना मोठी मागणी आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतली अक्षरा ही प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे तिचं अनेक तरुणी अनुकरण करतात. विशेषत: तिच्या कानातल्यांवर त्यांचं लक्ष असतं. वैविध्यपूर्ण कानातले यात दिसत असल्यामुळे ते घेण्यासाठी तरुणी प्रयत्नशील असतात. त्यामुळे मराठीप्रमाणे हिंदीतही हा ट्रेंड सध्या जोरात आहे. मराठीप्रमाणे हिंदीतही ‘आनंदीचे कंगन’, ‘पंखुरीचे झुमके’ अशा नावांनी मालिकेतले दागिने लोकप्रिय झाले आहेत.