‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहब, बिबी और गुलाम’ यासारख्या अभिजात चित्रपटांनी सिनेरसिकांच्या मनात कायमचं घर करणाऱ्या दिग्दर्शक गुरू दत्त यांना जाऊन १० ऑक्टोबर रोजी पन्नास वर्षे होत आहेत. त्यांच्या स्मृतींना वाहिलेली आदरांजली-

‘मतलब की दुनिया है सारी’ हे तीव्रपणे जाणवल्यावर आपला लाखमोलाचा जीव मनस्वी गुरू दत्तनं अल्कोहोलच्या अमलाखाली झोपेच्या अतिरिक्त गोळ्या घेऊन, वयाची चाळिशी ओलांडण्यापूर्वीच संपविला.. पन्नास वर्षांपूर्वी.
१० ऑक्टोबर १९६४ हा तो दिवस. अर्धशतक उलटून गेलं त्याला जाऊन, हे आजदेखील स्वीकारणं कठीण जातं. याला कारण त्याच्या वीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत, त्यातूनही शेवटच्या आठ-दहा वर्षांत तो जे काही मागं ठेवून गेलाय त्याचं मोल कसं अन् कुणी करायचं? तो जमाना कृष्ण-धवल चित्रपटांचा. त्याच्या बाबतीत ‘कमíशअल वा आर्ट’ हा चित्रपट निकषाचा मुद्दाच नव्हता. वेगळा विषय, उत्तम कथानक, बांधीव पटकथा, भन्नाट छायाचित्रण.. या साऱ्याबरोबरच अविभाज्य ‘संगीत अन् गाण्याचं चित्रण’ ही त्याची खासियत होती. ही खासियत अधोरेखित करणारे त्याचे महत्त्वाचे, तो निर्माता अन् दिग्दर्शक असलेले, दोन महत्त्वाचे चित्रपट म्हणजे ‘प्यासा’ (१९५७) अन् त्यानंतरचा ‘कागज के फूल’ (१९५९). ‘टाइम’ मेगॅझीनने जगातील सार्वकालिक १०० उत्तम चित्रपटांत ‘प्यासा’ निवडला. प्रदíशत झाला तेव्हा ‘प्यासा’ भरपूर चालला. ‘कागज के फूल’ दणक्यात आपटला, पण दोन दशकांनी जगभर ‘क्लासिक’ म्हणून गणला गेला. आजदेखील हे दोन चित्रपट अभ्यासकांसाठी खजिना आहेत. (‘साहब, बीबी और गुलाम’ हा गुरू दत्तने निर्माण केलेलादेखील त्याच तोडीचा ‘क्लासिक’ चित्रपट. दिग्दर्शक होते अबरार अल्वी. मात्र या चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण गुरू दत्तनंच केल्याचं जाणकार सांगतात.) या दोन्ही चित्रपटांतल्या निवडक गाण्यांविषयी बोलायचं झालं तरी या गाण्यांची कथेशी बांधीलकी प्रकर्षांनं जाणवते. या दोन्ही सिनेमांतली ही गाणी पाहणं वा ऐकणं हा कायम नवा अनुभव असतो. गुरू दत्तला ‘जीनियस’ का म्हणतात, ते अशा गाण्यांतून सहज कळतं. या निवडक गाण्यांतून गुरू दत्त या ‘माणसा’चे, त्याच्या व्यक्तिगत आयुष्याचे धागेदोरेदेखील हाती लागतात. नुसती झलक शब्दांतून घेण्यासाठी आधी ‘प्यासा’मधली महत्त्वाची, साहिर अन् सचिनदांची गाणी, त्यांतील अविभाज्य भाग असलेल्या काव्यासह..
‘प्यासा’ची सुरुवातीची टायटल्स संपताच रात्रीच्या वेळी बागेतल्या हिरवळीवर डोळ्यांवर हात ठेवून पहुडलेला गुरू दत्त- कवी विजय- दिसतो. हताश, विमनस्क अवस्थेत, फुलावर बसून रस पिणाऱ्या भंवऱ्याकडे पाहत असलेला, बाहेर मौन.. मात्र मनातलं काव्य चालूच. त्यासाठी पाश्र्वभूमीवर रफीचे संगीतविरहित स्वर..
‘ये हंसते हुवेसे फूल, ये महेका हुवासा गुलशन,
ये रंग और नूर में डुबी हुवी राहें,
ये फुलों का रस पीकर मचलते हुवें भंवरे,
मं दूं तो क्या दूं तुम्हें ये शोख नजारें,
ले लेके मेरे पास, कुछ आंसू हैं कुछ आहें..’
त्याच्या कानांवर पलीकडनं काव्यमय शब्द सुरांत येतात-
‘फिर न कीजे, मेरी गुश्ताख निगाही का गिला,
देखिये आपने फिर प्यार से देखा मुझको..’
तो चमकतो. पलीकडच्या बाकावरून एक तरुणी ते काव्य म्हणत असते, त्याचं लक्ष वेधण्यासाठी. ती उठून चालू लागते. तो तिला थांबविण्याचा प्रयत्न करतो, ‘सुनिये.. मंने कहा..’ पण ती न थांबता हसते अन् चालताना गाऊ लागते,
‘जाने क्या तूने कहीं, जाने क्या मंने सुनी,
बातें कुछ बनही गयीं..’
गीता दत्तच्या आवाजात गाणं सुरूच राहतं. गुरू दत्तदेखील त्या सुरांच्या मागे, ते गाणाऱ्या गुलाबोच्या- वहिदाच्या मागे- खेचून नेल्यासारखा चालू लागतो. ती त्याला भुलवत नेत राहते. मतलबी हसणं, नजरेचे मोहक कटाक्ष, लुभावणारे मुरके.. ती शरीरविक्रय करणारी स्त्री असते अन् तो तिच्यासाठी ‘गिऱ्हाईक’ असतो. गुरू दत्तदेखील तिच्या शब्दांमागे भारल्यासारखा चालतच राहतो. अखेरीस तिच्या घराच्या दारापर्यंत ती पोहोचते. तिला वाटत असतं, तो तिच्यात इंटरेस्टेड आहे; पण तो त्या गाण्याच्या ओढीनं मागे आलेला असतो.. ते शब्द, ती नज्म त्याचीच असते. ती तिच्याकडे कशी आली? दाराशी पोचल्यावर तसं तो तिला विचारतो, तेव्हा त्याला कळतं, त्याच्या काव्याची-शायरीची वही रद्दीतून तिच्या हाती लागलेली असते! अन् जो तिचा आवडता शायर असतो, ज्याच्यावर तिनं जीव ओवाळून टाकला असतो, तो समोर उभा असतो.. याची तिला कल्पनादेखील नसते!
या एवढय़ा संपूर्ण सात-आठ मिनिटांच्या प्रसंगात सुरुवातीलाच कितीतरी गोष्टी ‘एस्टॅब्लिश’ होतात, केवळ एका गाण्यातून! ही गुरू दत्तची दिग्दर्शक म्हणून खासियत. त्याला साथ लाभली व्ही. के. मूर्तीच्या अफलातून कृष्ण-धवल छायाचित्रणाची. ग्रीक पाथ्रेनॉनच्या वास्तूच्या भव्य खांबांभोवताली त्याला भुलवत नेणारी ती, अन् साथीला प्रकाश-सावल्यांचा तो अप्रतिम खेळ. सगळंच परस्परपूरक. (एके सुरे दुई गान, मोनो दिलो ना बंधू.. या मूळ सचिनदांनीच गायलेल्या बंगाली गाण्यावर हे गाणं बेतलेलं होतं. तर ‘फिर न कीजे मेरी गुश्ताख.’ हे या प्रसंगातील साहिरचं काव्य नंतर ‘फिर सुबह होगी’ (१९५८) मध्ये खय्याम याचं मुकेश-आशाचं द्वंद्वगीत म्हणून समोर आलं.) चित्रपटाच्या नंतरच्या भागात कॉलेजच्या ‘रियुनियन’ समारंभात माला सिन्हा अन् रेहमान- मिसेस एंड मि. घोष- यांच्यासमोर स्टेजवर विमनस्क, भरकटलेल्या अवस्थेत विजय त्याची कविता सादर करतो..
‘तंग आ चुके हैं, कश्मकशे जिंदगी से हम,
ठुकरा न दे जहां क ो कहीं बेरुखी से हम!
हम गमजदां हैं, लाये कहां से खुशी के गीत,
देंगे वोही जो पायेंगे, इस जिंदगी से हम!
उभरेंगे एक बार अभी दिल के वलवलें,
माना के दब गयें हैं, गमें जिंदगी से हम!
लो आज हमने तोड दिया, रिश्ता-ए-उम्मीद,
लो अब कभी गिला न करेंगे किसी से हम!
गुरू दत्त- माला सिन्हा- रेहमान यांचे संबंध अतिशय सहजपणे प्रस्थापित करणारी ही रफीच्या आवाजातील साहिरची नज्म कुठल्याही वाद्यांशिवाय सादर होते, अन् कथा पुढे सरकते. (आशा भोसलेच्या आवाजात साहिरचं हे गाणं एन. दत्ता यांनी ‘लाइट हाउस’ (१९५८) मध्ये सादर केलं; तर सचिनदांच्या या मूळ वाद्यविरहित सुरावटीवर ओ.पी. नय्यरनं ‘एक मुसाफिर एक हसीना’ (१९६४) साठी रफीच्या आवाजात गाणं दिलं, ‘हमको तुम्हारे इश्क ने क्या क्या बना दिया..!’ सुरुवातीला या चित्रपटाचं ‘कश्मकश’ हे नाव होतं, नंतर ‘प्यास’ होतं, ते ‘प्यासा’ झालं. ‘प्यासा’ची मूळ कथा ग. दि. माडगूळकरांची असल्याचा उल्लेख आनंद माडगूळकर लिखित ‘मंतरलेल्या आठवणी’मध्ये आहे. सुरुवातीला ‘प्यासा’चा हिरो दिलीपकुमार असणार होता अन् नíगस अन् मधुबाला नायिकांच्या भूमिकांत असणार होत्या. पण मुहूर्ताच्या ठरल्या वेळी दिलीपकुमार शूटिंगला न आल्यामुळे स्वत: गुरू दत्त शायर विजयच्या भूमिकेत उभा राहिला. नायिकांच्या भूमिका वहिदा अन् माला सिन्हा यांच्याकडे आल्या.)
‘जाने क्या तूने कहीं’ म्हणणारी गुलाबो ही तर शरीरविक्रय करणारी स्त्री आहे, पण हा बाजार निर्माण करणाऱ्यांवर, समाजाच्या दांभिकतेवर बोट ठेवणारं ‘जिन्हें नाज हैं िहद पर वो कहां हैं?’ हा खोचक प्रश्न विचारणारं साहिरचं रफीच्या आवाजातलं नंतरचं गाणं हा सहृदयी माणसाला हलवून टाकणारा एक दुर्मीळ अनुभव. अशा बाजारांत स्वत:चं दु:ख मद्याच्या प्याल्यात विसरण्याचा प्रयत्न करत दुभंगलेल्या अवस्थेत फिरताना कवी विजय समाजाचा विद्रूप चेहरा वेशीवर टांगतो! गल्लीबोळांतून घुंगरांचे-नृत्याचे-गाण्यांचे, तबला-सारंगीचे सूर बेसूर करणारा शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रीच्या बाळाचा आईच्या दुधासाठी चाललेला आकांत.. अन् आईची शरीराचा बाजार मांडून पोटासाठी, चाललेली धडपड.. हे पाहताना विजय मुळातून ढवळून निघतो अन् विचारतो..
‘जिन्हें नाज हैं िहद पर वो कहां हैं?’
खिडकीतल्या गजांआड बसलेल्या बायकांना निरखणाऱ्या शोधक नजरा.. विजयला ‘बाई’त इंटरेस्ट नाही हे कळल्यावर त्याला झिडकारणाऱ्या बायका.. त्यांच्या शरीराचा बाजार मांडून रोगट झालेल्या शरीराचं खोकणं..
‘ये उजले दरीचों में पायल की छमछम,
थकी हारी सांसों पे तबले की धनधन,
ये बेरूह कमरो में खांसी की ठनठन..
जिन्हें नाज हैं िहद पर वो कहां हैं?
पुरुषांच्या भुकेसाठी शरीराचा बाजार मांडून बसलेल्या या कुणाची आई, बहीण, कुणाची बेटी..
मदद चाहती हैं ये हव्वा की बेटी,
यशोदा की गमगीन ये राधा की बेटी,
पयम्बर की उम्मद, जुलेखां की बेटी..
जिन्हें नाज हैं िहदपर वो कहां हैं?
शेवटी हताश होऊन स्वत:शीच हसत अखेरीस निरुत्तर झाल्यासारखा विचारतो..
जिन्हें नाज हैं िहद पर वो कहां हैं?
शरीरविक्रयाच्या प्राथमिक, सर्वात जुन्या व्यवसायाला जबाबदार असणाऱ्या समाजावर कोरडे ओढीत विचारलेला हा निरुत्तर करणारा चिरंतन प्रश्न. कमीतकमी वाद्यांत असलेलं हे रफीचं, साहिरच्या शब्दांची ताकद अधोरेखित करणारं, एरवीदेखील कधीही सुन्न करणारं, अजरामर गाणं. कलकत्त्याच्या ‘रेडलाइट’ एरियात हे गाणं प्रत्यक्ष शूट करायचं होतं, परंतु तिथल्या दलालांच्या गँगनी हल्ला केल्यामुळे गुरू दत्तनी तो नाद सोडला अन् स्टुडिओत तसा संपूर्ण सेट उभारून या गाण्याचं चित्रीकरण झालं! कुठेही कृत्रिमतेचा लवलेश न येता तेच वातावरण, तसाच धूसर प्रकाश अन् पुन्हा व्ही. के. मूर्तीच्या छायाचित्रणाचा परीसस्पर्श. या गाण्याचा ‘कथानक पुढे सरकणं’ हा हेतू नव्हताच, तर विजयचा त्याला मिळालेल्या कौटुंबिक तिरस्काराच्याही पलीकडे, त्याचा समाजाचीदेखील दांभिकता पाहून झालेला क्षोभ अधोरेखित करणारं, त्याच्या व्यक्तिरेखेतील ठामपणा, त्याचा मनस्वीपणा अधोरेखित करणारं हे गाणं होतं.
‘गुलाबो’ हा त्याच बाजारातला त्याचा एकमेव दिलासा होता. कथेचा टìनग-पॉइंट असलेल्या त्याच्या कथित ‘मृत्यू’नंतर त्याला आलेला एकूणच स्वार्थी, दुटप्पी दुनियेचा अनुभव त्याला आयुष्याच्या प्रवासात अशा वळणावर आणून सोडतो की, आता त्याला या दुनियेविषयी काहीच देणंघेणं नव्हतं, कसलीच अपेक्षा नव्हती..! ‘मृत’ विजयच्या कवितांच्या पुस्तकाचं, त्याच्या अर्धपुतळ्याचं अनावरण होणाऱ्या समारंभाच्या भव्य सभागारांत भाषण करताना पुस्तकाचा प्रकाशक रेहमान – मि. घोष- म्हणतो, ‘आज विजय जिवंत असता, तर त्याच्यावर सारी संपत्ती ओवाळून टाकली असती..’ हा दांभिकपणा पाहून दुभंगलेला विजय.. बाल्कनीच्या दरवाज्यांत चौकटीवर हात ठेवून भ्रमनिरास झालेला विजय.. मागच्या प्रखर प्रकाशामुळे प्रकाशित झालेलं त्याचं निव्वळ प्रोफाइल पडदा व्यापून राहतं! प्रेषित वा क्रुसावर ठोकलेला ख्रिस्त म्हणा, पण तो जणू पलीकडच्या जगातूनच समोर ठाकल्यासारखा भासतो.. अन् रफीच्या आवाजात वाद्यविरहित शांत शब्द येतात..
‘ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया,
ये इन्साके दुष्मन समाजों की दुनिया,
ये दौलतके भूखे रीवाजों की दुनिया,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?’
विजय जिवंत आहे हे माहीत असणारा रेहमान धास्तावतो. त्याला पकडण्यासाठी माणसं पाठवतो. प्रेक्षकांत बसलेल्या वहिदाचा प्रथम विश्वास बसत नाही, पण नंतर तिची खात्री पटते, ती सुखावते.. शांत होते. मुख्य सभागृहांतले प्रेक्षक मागं वळून वर बाल्कनीकडे बघतात.. पायऱ्या उतरत बाल्कनीच्या रेिलगपर्यंत आलेल्या विजय स्टेजवरील स्वतच्याच आवृत्त अर्धपुतळ्याकडे पाहात म्हणतो,
‘यहाँ इक खिलौना है इन्सा की हस्ती,
ये हस्ती है मुर्दा-परश्तों की बस्ती,
यहांपर तो जीवनसे है मौत सस्ती,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?’
सभागृहांतील लाइटस घालवले जातात. मि. घोषची माणसं विजयला पकडायला धावतात, गर्दीचा रेटा दाराकडे धाव घेतो. विजयकडे धाव घेऊ पाहणारी गुलाबो त्यांत तुडवली जाते. झटापटीत विजयचे कपडे फाटतात.. तो तरीही तारस्वरांत त्वेषानं आक्रोश करतो..
‘जला दो जला दो, जला दो ये दुनिया,
मेरे सामनेसे हटा लो ये दुनिया,
तुम्हारी हैं तुमही संभालो ये दुनिया..
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?’
अखेरीस या दांभिक दुनियेमुळे भ्रमनिरास झालेला विजय म्हणतो,
‘..मं वो विजय नहीं हूं!’ अन् गुलाबोला विचारतो, मी निघालो.. तू साथ देशील? अन् गुरू दत्त अन वहिदा ‘नव्या दुनियेकडे’ जातात..!
या नोटवर क्लायमेक्स संपतो अन् चित्रपटाचा काव्यात्म शेवट होतो. संपूर्ण वास्तववादी चित्रपटाचा ‘अवास्तव’ शेवट होतो. विजय एकटा निघून जातो अज्ञातवासात, हा मूळ कथेचा शेवट होता. प्रेक्षकांना शेवट ‘आशादायी’ हवा म्हणून बदल करण्यात आला.. विजय अखेरीस ‘प्यासा’ न राहणं, हा खरं तर अँटीक्लायमेक्स. पण प्रेक्षकांना तो शेवट पटला अन् ‘प्यासा’ भरपूर चालला!
त्यानंतरचा ‘कागज के फूल’ प्रचंड अपयशी ठरला. प्रेक्षकांना नाही पटला.. गुरू दत्त सर्वार्थानं उद्ध्वस्त झाला! संपूर्ण ‘फ्लॅशबॅक’मध्ये असलेल्या या चित्रपटाची सुरुवात शेवटापासून होते.
वृद्धावस्थेतला, शुभ्र केस-दाढीमिशा असलेला गुरू दत्त – सुरेश सिन्हा- फिल्म स्टुडिओच्या भव्य फ्लोअरवरील माळावजा ‘कॅटवॉक’च्या रेलिंगला धरून उभा असलेला.. पाश्र्वभूमीवर कैफी आझमींचे शब्द, बर्मनदांचं संगीत अन् रफीचा शांत स्वर..
‘देखी जमानेकी यारी, बिछडे सभी बारी बारी..’
रेलिंगचा आधार घेत हळूहळू चालत जिन्याची एकेक पायरी चढत शेवटच्या पायरीवर बसतो..अन् भूतकाळात हरवून जातो.. फ्लॅशबॅक सुरू होतो.. चित्रपटगृहाच्या बाल्कनींत सुटाबुटात, पाइप ओढत उभा असलेला यशस्वी दिग्दर्शक रमेश सिन्हा! चित्रपट संपल्यावर क्राउड बाहेर येतो अन् त्याला पाहून गर्दी करतो, हात मिळविण्यासाठी, सहीसाठी.. सुरुवातीच्या रफीच्या नुसत्या सुरांबरोबर आता सौम्य ऑर्केस्ट्रा अन् कोरस..
‘वक्त है मेहेरबां, आरझू है जवां,
फिक्र कलकी करें, इतनी फुरसत कहां!’
कथा उलगडत जाते. असफल वैवाहिक जीवनांत निराश झालेल्या रमेश सिन्हाला शांती- वहिदा रेहमान- भेटते. त्याच्या चित्रपटांची नायिका होते. जवळीक निर्माण होते; पण ती अव्यक्तच राहते. हे सारं काही एका गाण्यांत व्यक्त होतं..
‘वक्तने किया क्या हंसी सितम,
तुम रहे ना तुम, हम रहें ना हम..’
इथेदेखील पुन्हा तोच स्टुडिओ फ्लोअर अन् तिथला अंधार अधिकच गडद करणारा स्टुडिओच्या दारांतून अन् छताच्या झरोक्यांतून येणारा प्रखर प्रकाशझोत.. त्यांचे फ्लोअरवर पडलेले कवडसे.. स्टुडिओच्या एका कोपऱ्यात गुरुदत्त तर दुसऱ्या कोपऱ्यांत वहिदा.. दोन टोकांवर, तरीही एकाच अवघड वळणावर..
‘बेकरार-ए-दिल इस तरह मिले,
जिस तरह कभी, हम जुदा न थे,
हम भी खो गये, तुम भी खो गये,
एक राहपर चल के दो कदम..’
छतांतून येणाऱ्या प्रकाशाच्या झोतांत, दोघांच्या मनाची ओढ दाखवत सावल्यांसारख्या ‘स्प्लिट फिगर्स’ एकत्र आल्यासारख्या भासतात. पुन्हा विलग होतात, दुरावतात.
त्याच्यासाठी विणायला घेतलेल्या स्वेटरचे लोकरीचे गुंडे अन् सुया ती जवळ धरते, अन् मिटल्या डोळ्यांतून असहाय्य अश्रू ओघळतात.. अन् तो कोट घातल्यामुळे भक्कम अन् ताठ वाटणारा, पण आंतून पार मोडून गेलेला, स्टुडिओच्या दरवाज्याच्या प्रकाशझोताकडे जातो.. अन् एक सर्व दृष्टीनं अप्रतिम गाणं संपतं!
सचिनदांची वाद्यांचा कमीत कमी उपयोग करणारी धून, गीता दत्तचा मनाच्या गाभाऱ्यातून आलेला आवाज, कैफी आझमीचे नि:शब्द करणारे शब्द! एका परीनं गीता दत्तदेखील व्यक्तिगत आयुष्यांतील कैफियत मांडणारे शब्द.. कारण तिच्या व्यक्तिगत आयुष्यातदेखील तिच्यापासून दुरावलेला गुरू दत्त वहिदाच्या प्रेमात पडला होता! विशेष म्हणजे हे गाणं या सिनेमासाठी नव्हतंच लिहिलं. गुरू दत्तनं हे कैफीचं गाणं कधीचं स्वतसाठी ठेवून घेतलं होतं, त्याचा असा परिपूर्ण उपयोग केला.. ‘वक्तने किया क्या हंसी सितम..!’ असो.
मोडून गेलेला रमेश सिन्हा परत कधीच उभा राहत नाही. दिग्दर्शक म्हणून झाकोळला जातो, प्रवाहांतून दूर फेकला जातो.. इतका की कालांतराने पुन्हा स्टुडिओत परत येतो, तो एक ‘एक्स्ट्रा’ कलाकार – ज्युनियर आर्टस्टि- म्हणून! त्याला कुणी ओळखतदेखील नाही, अशा दाढीमिशा वाढलेल्या अवतारांत. त्याला याचकाच्या भूमिकेच्या गेटपसाठी एक शाल दिली जाते अन् एक डायलॉग. आजही लोकप्रिय असलेली नायिका वहिदा संन्याशिनीच्या वेषांत त्याला भिक्षा वाढायला येते. तेव्हा तीदेखील आधी ओळखत नाही, पण त्याच्या डोळ्यांत पाहून तिला शंका येते.. तो डायलॉग विसरतो, तेव्हा त्याला बाहेर हाकलतात.. ‘कहांसे उठा के लाते हैं..’ वगरे ऐकावं लागतं. तो निघून जाताना त्याच्या अंगावरची शाल काढून घेतली जाते, तेव्हा वहिदाचं त्याच्या फाटक्या-उसवल्या स्वेटरकडे लक्ष जातं अन् ती त्याला ओळखून कळवळून हाक मारते.. ‘सिन्हासाब..’! अन् त्याच्यामागे धावत सुटते.. जिवाच्या आकांतानं तोदेखील धावू लागतो.. त्याला पुन्हा या दुनियेच्या मोहजालात अडकायचं नसतं. पाश्र्वभूमीवर रफीच्या सुरुवातीच्याच गाण्याचं कंटिन्यूएशन..
‘एक हाथसे देती हैं दुनिया,
सौ हाथोंसे ले लेती हैं,
ये खेल हैं कबसे.. जारी,
बिछडे सभी.. बिछडे सभी बारी बारी!’
स्टुडिओच्या बाहेर असलेल्या तिच्या चाहत्यांच्या गर्दीचा तिला गराडा पडतो. तो निसटून जातो.. फ्लॅशबॅकमध्ये असणारी दिग्दर्शक रमेश सिन्हाची ही कहाणी येथवर शेवटास येऊन, कॅमेरा पुन्हा मूळ फ्रेममध्ये स्थिर होतो. पाश्र्वभूमीवरचं गाणं संपतं. नीरव शांततेत त्याच स्टुडिओ फ्लोअरच्या कॅटवॉकवरून रमेश सिन्हा सावकाश चालत मेनफ्लोअरवर ट्रॉलीज, लाइटस, कॅमेऱ्यांच्या मध्ये असणाऱ्या खुर्चीत बसतो.. अन् त्या खुर्चीतच शेवटचा श्वास घेतो.. त्या खुर्चीच्या मागं लिहिलं असतं, ‘डायरेक्टर’!
‘प्यासा’ हा गुरू दत्तचा समाजाच्या दांभिकतेवर, दुटप्पी वृत्तीवर कोरडे ओढत आरसा दाखविणारा चित्रपट, तर ‘कागज के फूल’ हे गुरू दत्तचं सिनेमास्कोप स्वप्न, कदाचित त्याच्याच व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेलं. या दोन्ही चित्रपटांतील या निवडक गाण्यांतून संपूर्ण कथेचा मूड सांभाळणारं व्ही.के. मूर्तीचं कृष्णधवल, प्रकाशाच्या साहाय्यानं अंधार गडद करणारं, छायाचित्रण महत्त्वाचं. लहानपणी गुरू दत्तला प्रकाशाच्या पाश्र्वभूमीवर हाताच्या-बोटांच्या सावल्यांनी भावंडांना गोष्टी सांगायची सवय होती. प्रकाशानं अंधाराचा गडदपणा दाखवायचा, हा मोठय़ा पडद्यावरील आविष्कार! गुरू दत्तनंतर व्ही.के. मूर्तीनी श्याम बेनेगल, गोिवद निहलानी, कमाल अमरोही वगरेंसाठीदेखील चित्रीकरण केलं. प्रामुख्यानं रंगीत अन् त्यांच्या परीने उत्तमच; पण गुरू दत्तबरोबरची त्यांची कृष्णधवल जादू दुर्मीळ होती हे खरं.
दोन्ही चित्रपटांतील या निवडक गाण्यांमधून, त्यांच्या चित्रीकरणातून, गुरू दत्त या मनस्वी माणसाचा थोडाफार शोध घेण्याचा हा अपुरा प्रयत्न. स्वतचं आयुष्य संपवितानाच्या त्याच्या गूढ मानसिकतेचा अंदाज कुणाला आणि कसा येणार? आत्महत्येविषयी अबरार अल्वीसारख्यांशी तो चर्चादेखील करायचा. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईनं, वासंती पडुकोण यांनी पुस्तक लिहिलं ‘माय सन गुरू दत्त’, त्यांनादेखील आपल्या या मनस्वी मुलाचा शोध घ्यावासा वाटला! आज या सगळ्याशी संबंधित कोण उरले आहेत? गुरू दत्त पाठोपाठ सचिनदा, साहीर, कैफी आझमी, रेहमान, व्ही.के. मूर्ती..
बिछडे सभी बारी बारी!
हे बिछडण्यापासून कुणाचीच सुटका नसते.. गुरू दत्तसारख्या मनस्वी माणसांची तर नसतेच.