lp06‘तस्मै श्री गुरवे नम:’ असं म्हणून आपण मोकळे होतो खरे; पण गुरू या शब्दाचा नेमका अर्थ, त्याची व्युत्पत्ती, तिला असलेले वेगवेगळे आधार यांच्याविषयी आपल्याला माहिती असतेच असं नाही.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरू म्हणजे काय, गुरूपरंपरा काय आहे याचा विचार करता असे लक्षात येते की ज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रात जगाच्या पाठीवर विशेषत: आशियाई संस्कृतींमध्ये गुरूशिष्य ही परंपरा आहे. भारतानेच जगाला गुरूपरंपरेची देणगी दिली आहे असे म्हणणं वावगं ठरणार नाही.
शिक्षण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, संगीत, नाटय़, वैद्यक, न्यायशास्त्र, अध्यापन, राजनीती, अध्यात्म अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत ही गुरूपरंपरा दिसते. आपण येथे मात्र फक्त गुरू शब्दाची व्युत्पत्ती, व्याख्या, गुरूचे महत्त्व एवढय़ाच पुरती प्राचीन भारतीय परंपरेच्या आधारे तोंडओळख करून घेणार आहोत.
गुरू, आचार्य, उपाध्याय आणि अध्यापक असे अनेक समानार्थी शब्द असले तरी त्यांच्यात अर्थभेद आहेत, आणि गुरू आणि आचार्य हे दोन शब्द भौतिक संस्कृतीत म्हणजे शिक्षण क्षेत्र, संगीत, नाटय़ वगैरे आणि आध्यात्मिक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर आहेत.
गुरू अथवा गुर्वी (स्त्री-गुरू) या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ होतात जसे मोठा, जडत्व असलेला, महान, लांब, शक्तिमान वगैरे वगैरे; पण आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ आहे-आदरणीय, सन्माननीय, सर्वोत्तम, मूल्यवान, शास्त्राचा प्रणेता, वडीलधारी व्यक्ती, शिक्षक, पूर्वज असे अनेक अर्थ आहेत. पण गुरूचा सर्वात चांगला आणि तांत्रिकदृष्टय़ा शुद्ध असा अर्थ म्हणजे जो बालकाचे उपनयन संस्कार करून त्याला वेदाध्यायनाकडे नेतो तो गुरू. वेद म्हणजे ज्ञान. गुरू अज्ञान तिमिरातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत असतो. तत्त्व म्हणजे सत्य, त्रीकालातीत सत्य, सार. त्या निखळ सत्याची जाणीव करून देणारा तो गुरू. म्हणूनच गुरू हा ज्ञानसूर्य असतो. त्याच्या प्रज्ञेचे, प्रतिभेचे तेजस्वी किरण या अज्ञानरुपी अंध:काराचा नाश करतात. शिष्याला ‘स्वत्वाची’ जाणीव करून देतात आणि तो शिष्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मविद्येची साधना करत असतो. असा हा खरा तर गुरू शब्दाचा तत्त्वार्थ .
मग आचार्य कोणाला म्हणावे बरे? आ+र्च+ण्यत् (पाणिनी ५.२.३५)
आ+र्च – क्रिया करणे, सराव करणे, एखादे काम हाती घेणे, वर्तवणूक करणे, जवळ येणे, पोचणे, शोधणे, सहाय्य घेणे, मागोमाग जाणे अशा अनेक अर्थानी हे क्रियापद वापरले जाते. मग यातला नेमका कुठला अर्थ आचार्य शब्दासाठी लागू होतो? आचार्य म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या विषयातील निष्णात तज्ज्ञ; अनुभवसंपन्न शिक्षक; मुख्याध्यापक किंवा त्या त्या विषयातील मुख्य. आध्यात्मिक क्षेत्रात आचार्य म्हणजे सर्वोच्च. एखाद्या दर्शन शास्त्राचा प्रणेता; मुख्य सल्लागार, यज्ञातील मुख्य.
उपनीय तु य:शिष्यं वेदमध्यापयेत् द्विज:
सकल्पं सरहस्यं च तमाचरय प्रचक्षते (मनुस्मृती २.१४०)
अर्थ – जो बालकाचे उपनयन संस्कार करून त्याला वेद, वेदांगे, उपनिषद यातील सखोल ज्ञान देतो तो आचार्य. आपस्तंबधर्मासूत्रही तेच सांगते.
आता आपण प्रामुख्याने गुरू शब्धाच्या अर्थछटा बघणार आहोत.
lp10१. गिरत्यज्ञानमिति – अज्ञान दूर करतो तो
२. गृणाति धर्ममिति-धर्माचा उपदेश करतो तो
३. गीर्यते इति -ज्याचे स्तवन केले जाते तो
४. निषेकादिनी कर्मानी य: करोति यथाविधि
संभावयति चान्न्ोन स विप्रो गुरुरुच्यते (मनुस्मृती २.१४२)
अर्थ – निषेक. (गर्भादान), पुसंवन, उपनयन, कर्मे यथाविधी करणारा व अन्नदानाने पालनपोषण करणारा विप्र, गुरू म्हटला जातो. याचाच अर्थ पिता हा बालकाचा गुरू असतो.
५. याज्ञवल्क्य (१.३४) मध्ये सांगतो जो बालकाचे संस्कार करतो आणि वेद शिकवतो तो गुरू.
६. देवलस्मृतीत अकरा गुरू सांगितले आहेत –
आचार्यश्च पिता ज्येष्ठो भ्राता चैव महीपति:
मातुल: श्वशुरस्त्राता मातामहपितामहौ
वर्णज्येष्ठ: पितृव्यास्च पुंस्येते गुरवो मता:
आचार्य, पिता, थोरला बंधू, राजा, मामा, सासरा, रक्षणकर्ता, आईचे वडील, वडिलांचे वडील, वर्णाने ज्येष्ठ वा चुलता हे पुरुषाचे अकरा गुरू सांगितले आहेत.
वरील अर्थ हे भौतिक जीवनाशी संबंधित आहेत. जीवनातील संस्कार, वर्णाश्रम, शिक्षणव्यवस्था, दैनंदिन व्यवहार, आचार, थोडक्यात समाजव्यवस्था उत्तम चालण्यासाठी मनुष्याला आवश्यक असलेले ज्ञान देणारा माणूस म्हणजे गुरू.
आध्यात्मिक क्षेत्रात म्हणजेच विविध संप्रदायांमध्ये, आगम ग्रंथांमध्ये गुरू या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
१. मुंडक उपनिषद (१.१.१२) – गुरूचे पुढील दोन प्रकार सांगितले आहेत.-
अ- श्रोत्रीय – वैदिक कर्मकांडात निष्णात
ब- ब्रह्मनिष्ठ – ब्रह्मन्मध्ये स्थित
२. आगमसारात गुरू शब्दातल्या तीन वर्णाचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगितला आहे –
गकार: सिद्धिद: प्रोक्तो रेफ: पापस्य हारक:
उकारो विश्नुव्र्याक्तास्त्रीय्तायात्मा गुरु:पर:
अर्थ – गुरू शब्दातला गकार हा सिद्धी देणारा रकार हा पाफार्क व उकार हा अव्यक्त विष्णू आहे म्हणून गुरू या तिन्ही गोष्टींचा समावेश असलेला श्रेष्ठ आहे .
३. गुरूगीतेत गुरूचे, गुरूभक्तीचे सुंदर विवेचन आहे.-
अ- गुकारस्त्वन्धकारश्च रुकारस्तेज उच्यते
अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुदेव नं संशय:
‘गु’ हा वर्ण म्हणजे अंधका, ‘रू’चा अर्थ प्रकाश. ‘गु’हाच अज्ञानाचा नाश करणारे ब्रह्मा, यात काहीच शंका नाही.
वेदान्ताच्या अनुषंगाने गुरूगीतेत पुढील श्लोक आहेत.
ब- गुकार: प्रथमो वर्णी मायादिगुनाभासक:
रुकारो द्वितीयो ब्रह्म मायाभ्रान्तिविनाशकं
गुरू शब्दाचा प्रथम वर्ण गु मायादिगुनाचे प्रकटीकरण करतो तर द्वितीय वर्ण रु मायादि भ्रान्तिचा नाश करणाऱ्या ब्रह्मतत्त्वाचे द्योतक आहे.
याच गुरूगीतेत गुरूची व्याख्या करताना म्हटले आहे-
क- अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्ज्शलाकया
चक्षुरुन्मीलितं येण तस्मै श्रीगुरवे नम:
ज्ञानारूपी काजळाच्या शलाकेने (अज्ञानतिमिराचा नाश करून) अज्ञान अंधकारात सापडलेल्या अन्धाचे ज्ञानचक्षू उघडणाऱ्या त्या गुरूला नमस्कार.
४. कुलागमात गुरूचे सहा प्रकार सांगितले आहेत-
अ- प्रेरक- साधकाच्या मनात दीक्षेची प्रेरणा देणारा
ब- सूचक – साधना व दीक्षा यांचे प्रकार वर्णन करणारा
क- वाचक – साधनांचे वर्णन करणारा
ड- दर्शक – साधना व दीक्षा यांतील योग्यायोग्यता सांगणारा
इ- बोधक – साधना व दीक्षा यांचे तात्त्विक विवेचन करणारा
ई- शिक्षक – साधना शिकवणारा, दीक्षा देणारा
या सर्व गुरूंमध्ये बोधकगुरू हा सर्वश्रेष्ठ असतो.
५. पिश्चिला तंत्रात दीक्षागुरू व शिक्षागुरू असे गुरूचे दोन प्रकार सांगितले आहेत.
अ-दीक्षागुरू-पूर्वपरंपरेने प्राप्त झालेल्या मंत्राची दीक्षा देणारे
ब- शिक्षागुरू- समाधी, ध्यान, धारणा, जप, सत्व, कवच, पुरश्चरण, महापुरश्चरण आणि साधनेचे निरनिराळे विधी व योग या गोष्टी शिकवणारे
६. रामदासांनीही दासबोधात (५.२.६६-६८) मंत्रगुरू, यंत्रगुरू, वस्तादगुरू असे सतरा गुरू सांगितले आहेत आणि या सर्वात ब्रह्मज्ञान देणारा सद्गरू हा सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.
७. नामचिंतामणीत गुरूचे पुढील बारा प्रकार सांगितलेले आहेत.
६ धातुवादी गुरू- शिष्याकडून तीर्थाटन व नाना प्रकारची साधने करवून शेवटी ज्ञानोपदेश करणारा
६ चंदनगुरू- चंदन वृक्ष जसा जवळच्या सामान्य वृक्षांनाही सुवासिक बनवतो, त्याप्रमाणे केवळ सान्निध्याने शिष्याला तारून नेणारा
६ विचारगुरू- शिष्याला सारासार विवेक शिकवून पिपिलिका मार्गाने आत्मसाक्षात्कार घडविणारा
६ अनुग्रहगुरू – केवळ कृपानुग्रहाने शिष्याला ज्ञान देणारा
६ परीसगुरू – परीस जसा स्पर्शामात्रे लोहाला सुवर्ण बनवतो, त्याप्रमाणे केवळ स्पर्शाने साधकाला दिव्यज्ञान देणारा
६ कच्छपगुरू – कासवी जशी केवळ दृष्टीमात्रे पिलांचे पोषण करते, तद्वत शिष्याचा केवळ कृपालोकनाने उद्धार करणारा
६ चंद्रगुरू- चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंत:करणातल्या दया द्रवाने शिष्याला तारणारा
६ दर्पणगुरू- आरशात स्वत:चे मुख दिसते, त्याप्रमाणे केवळ आत्मदर्शनाने शिष्याला ब्रह्मज्ञान घडविणारा
६ छायानिधी गुरू – छायानिधी नावाचा एक मोठा पक्षी आसमंतात फिरत असतो. त्याची सावली ज्याच्यावर पडते, तो राजा होतो, अशी समजूत आहे. त्याप्रमाणे साधकावर केवळ सावली धरून त्याला स्वानंदसाम्राज्याचा अधिपती करणारा.
६ नादनिधी गुरू – नादनिधी नावाचा एक मणी आहे. ज्या धातूचा या मण्याला स्पर्श होतो, तो धातू जिथल्या तिथे सुवर्ण बनते, त्याप्रमाणे मुमुक्षूची करुण वाणी कानी पडताच त्याला तिथल्या तिथे दिव्यज्ञान देणारा
६ क्रौंचगुरु- क्रौंच पक्षिणी आपली पिले समुद्रतीरी ठेवून दूरदेशी चारा आणायला जाते. या संचारात ति वारंवार आकाशाकडे डोळे करून पिलांचे स्मरण करते. त्यायोगे ठेवल्या जागी तिची पिले पुसता होताताशी समजूत आहे. तद्वत शिष्याची आठवण करून त्याला स्वस्थानी आत्मानंदाचा उपभोग देणारा.
६ सूर्यकांत गुरु- सूर्याच्या किरणस्पर्शाने सूर्यकांत मण्यामध्ये अग्नी उत्पन्न होतो. तद्वत आपली दृष्टी जिकडे वळेल, तिकडच्या साधकांना विदेहत्व देणारा
असे विविध प्रकार गुरूंचे विविध ग्रंथांत सांगितले आहेत.
जेव्हा गुरुपरंपरेच्या इतिहासाचा विचार करता असे लक्षात येते की, प्राचीन काळात गुरू ही संस्था विकसित झालेली नव्हती. मंत्रकालात मंत्र स्वयंस्फूर्तीने तयार होत. मंत्रांच्या संहितीकरणाच्या काळात त्यांचे अध्ययन, अध्यापन, स्वाध्याय आणि विनियोग यांचे शिक्षण देणाऱ्या गुरुसंस्थेची आवश्यकता उत्पन्न झाली. त्याकाळातल्या अनेक आचार्याची नावे आज उपलब्ध आहेत. अंगिरस, गर्ग, अत्री, बृहस्पती, वसिष्ठ हे तत्कालीन आचार्य होत. यज्ञातला होता, अध्वर्यू, ऋत्विक, उद्गाता यांना त्या त्या कर्माचे शिक्षण त्यांच्या कारणमीमांसेसह या गुरूंकडून मिळत होती. त्यामुळे त्रिविद्यांच्या आचार्यपरंपरेतूनच ही परंपरा निर्माण झाली.
पारस्कर, बौधायन इ. गृसूत्रांत शिष्याने गुरूच्या सान्निध्यात राहून उत्सर्जनोपाककर्मादी कर्मे करावी व गुरूच्या आज्ञेनेच समावर्तन करावे, अशी विधाने आढळतात.
आरण्यके, ब्राह्मणे या काळात अध्यात्माज्ञानासंबंधीच्या अंशू-धनंजय, अग्निभू – काश्यप, वास्य-शांडिल्यायन या गुरु-शिष्य परंपरा दिसतात. छांदोग्य उपनिषदातील आरुणी श्वेतकेतूची जीवनविद्या- ‘तत्त्वमसि’चा बोध देणारी कथा किंवा कठोपनिषदातील यम-नचिकेत संवादातून पंचाग्नी विद्या सांगणारी कथा या सर्वातून किंवा शतपथ ब्राह्मण आणि जैमिनीय उपनिषदांतून गुरुपरंपरा दिसून येते. उपनिषद्, रामायण, महाभारत, पुराणे यांतून गुरुसंस्थेचे विकसित रूप दिसून येते.
गुरु-शिष्य संबंध हे चार प्रकारचे असत – भौतिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. गुरूचे शिष्यावर पुत्रवत प्रेम असते. विशुद्ध प्रेम, वात्सल्य, त्याला शिकवण्याची तळमळ. आत्यंतिक कणव, प्रसंगी अत्यंत कठोर, शिष्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीतून तावूनसुलाखून लावणारी शिक्षणपद्धती गुरूच्या ठायी होती. महाभारताच्या आदिपर्वात धौम्याच्या आश्रमात आरुणी, उपमन्यू व वेद या तीन शिष्यांनी अत्यंत कष्टाची कामे केली अशी कथा आहे.
शिष्याने आज्ञापालन, शिस्तपालन करावे, गुरूविषयी अनन्यसाधारण भक्ती असावी, अशी धारणा आहे. नंतरच्या पुराणांमध्ये ईश्वरविषयक भक्तीमध्ये गुरूचा सहभाग वाढला. गुरूशिवाय ईश्वरप्राप्ती अशक्यप्राय गोष्ट झाली. षड्दर्शनाचे सूत्रग्रंथ तयार झाले. प्रस्थानत्रयीवर निरनिराळी भाष्ये झाली. गुरुपरंपरेचा विकास झाला. योग आणि तंत्र या शास्त्रात गुरू आत्यंतिक महत्त्वाचा आहे. गुरू – परमगुरू – परात्परगुरू – परमेष्ठी गुरू अशी ही परंपरा आहे. योग आणि तंत्रात शिवपार्वती आद्यगुरू आहेत तर संन्यासमार्गात सनत, सनंदन, सनत्कुमार, सनातन हे गुरू आहेत. पण या सर्वाचे आद्य म्हणजेच व्यास महर्षी. व्यास, शुक, जैमिनी, सुत.. ही अशी व्यास गुरुपरंपरा.
मध्ययुगातील धार्मिक संप्रदायांत तर गुरूला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. वैष्णव संप्रदाय पुढीलप्रमाणे आहे – (सोबतचा तक्ता पाहा)
वैष्णव पंथातील वैखानस आगमांद्वारे वैदिक परंपरा जपली जाते. होमहवन, कर्मकांड केले जाते. वैष्णव संप्रदायातील मूर्तिपूजा, नित्यकर्मे, सेवा याद्वारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रपत्ती अर्थात शरणागतीद्वारे सर्वसामान्य माणसाला गुरूच्या साहाय्याने ईश्वरप्राप्ती होते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, निर्गुण संप्रदाय, दत्ता संप्रदाय, नाथसंप्रदाय यात गुरू हा सर्वश्रेष्ठ आहे. सर्वानीच गुरूची आवश्यकता अपरिहार्यपणे मानलेली आहे. अज्ञानी साधकाला सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही. दक्षिण भारतातील शैव सिद्धांत, काश्मिरी शैव संप्रदाय, कापालिक, पाशुपत, वीरशैव अशा शैव पंथांमध्ये गुरूकडून दीक्षा मिळाल्यावरच सदनामार्गाद्वारे मोक्षप्राप्ती होते.
या सर्व संप्रदायांमध्ये शिष्याने आत्यंतिक विनम्रता बाळगणे, त्याचे स्वत्व गळून जाणे, पापाची आणि कमजोरीचा स्वीकार करणे, एका सच्च्या शरणार्थीप्रमाणे गुरूला संपूर्ण शरण जाणे यावर भर दिला आहे.
जैन धर्मातही गुरुपरंपरा आहे. २४ र्तीथकर, गांधार, गच्च, आम्नाय याचे स्मरण करणे, काल्प्सूत्रातील गुरुवावालीचे पारायण करणे यातून त्यांची आचार्य परंपरा दिसून येते. या श्रमणपरंपरेतील श्रमण आणि श्रावक यांचे संबंध, श्रमण – साधू – साध्वी – यांची परंपरा आजही अव्याहतपणे चालू आहे.
बौद्ध धर्मात प्रारंभीच्या काळात गुरुपरंपरा नव्हती. बुध्दाला कोणी तरी एकदा प्रश्न विचारला. ‘तुमचा गुरू कोण?’ त्यावर बुद्धाने उत्तर दिले ‘माझा कोणीही गुरू नाही. मी स्वत:च्या अभिज्ञानाने सर्व काही प्राप्त करून घेतले आहे.’ पण असे जरी असले तरी बुद्धाने अनेक जणांकडून ज्ञान मिळवले परंतु खरे ज्ञान मात्र त्याला त्याच्याच ध्यानधारणेने मिळाले. त्याला बोधित्व प्राप्त झाले म्हणून त्याने वरील उत्तर दिले. वज्रयान पंथाच्या अद्वायव्रजा या ग्रंथात गुरूला दूती म्हटले आहे. ही दूती प्रज्ञा व उपाय या दोन प्रेमिकांची मध्यस्थ होऊन, त्या दोघांचे मीलन घडवून आणते. गुह्य़समाजतंत्रात प्रत्येक तथागताचा गुरू म्हणून एकेक वज्राचार्य मानला गेला. प्रत्येक तथागत आपल्या वज्राचार्याची गुरू म्हणून पूजा करत असे. तिबेटमध्ये गुरू हा आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती आणि आध्यात्मिक साधनामार्गाचा मूलाधार आहे.
ज्ञान मिळण्यासाठी गुरूचा शोध घ्यायला लागतो आणि त्याची सेवा करावी लागते. सद्गुरूच्या कृपेनेच सर्वकाही प्राप्त होते. परमार्थ विचारात गुरू हवाच. गुरुकृपा झाल्यावाचून कोणालाही परमेश्वराची प्राप्ती होत नाही व कोणालाही परमार्थाचे खरे ज्ञान होत नाही, हा मोक्षमार्गातला शाश्वताचा व अबाधित सिद्धांत आहे.
ज्ञानेश्वरांना निवृत्तिनाथांनी गुरुपदेश दिल्यावर ‘धवळले जगदाकार’ असा अनुभव आला. श्रीरामकृष्ण परमहंसांनी आपले सर्व आध्यात्मिक धन नरेंद्रच्या मस्तकावर हात ठेवून दिले आणि नरेंद्र या युवकाचा स्वामी विवेकानंद झाला. तर असा हा गुरुमहिमा.
या अंधकारमय जगात जो दिव्यप्रकाश झिरपत असतो तो गुरूच्या द्वारेच होय.
म्हणूनच गुरु वंदन करून या लेखाचा शेवट –
ब्रह्मानंदं परमसुखदाम केवलं ज्ञानमूर्ति
द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम्
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसर्वसाक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि
डॉ. प्राची मोघे – response.lokprabha@expressindia.com

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…