पाणी उकळून प्या, भाज्या धुवून घ्या, हलका आहार घ्या, स्वत:चे स्वास्थ्य सांभाळा असे या ऑगस्ट महिन्याचे सांगणे आहे.

भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय इतिहासात श्रावण व त्याच सुमारास येणाऱ्या ऑगस्ट महिन्याला काही आगळेवेगळेच महत्त्व आहे. या वर्षी श्रावण महिन्याला दि. २८ जुलैला सुरुवात होऊन तो २५ ऑगस्टला संपत आहे. समस्त हिंदू व जैन धर्मीयांच्या दृष्टीने श्रावण मासाला खूप खूप धार्मिक महत्त्व आहे. या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याची सुरुवात नागपंचमी या सणाने होत आहे. त्याच दिवशी ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून तुम्हा आम्हा सर्वाना माहीत असणाऱ्या लो. बाळ गंगाधार टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. आपल्या धार्मिक परंपरेप्रमाणे श्रावण महिन्यातील दर सोमवारी श्री शंकराला शिवामूठ वाहून शिवपूजन करण्याची पद्धत आहे. यंदा चार ऑगस्ट, अकरा ऑगस्ट, अठरा ऑगस्ट व पंचवीस ऑगस्ट या दिवशी अनुक्रमे तीळ, मूग, जवस व सातू यांची शिवमूठ अर्पण करावयाची आहे. यानिमित्ताने आपल्या दैनंदिन जीवनात तीळ, मूग, जवस व सातू आपणास कसे उपयुक्तपणे वापरता येतील याचाही एक विचार व्हावा.
आपल्या देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्याकरिता हजारो हजार सत्याग्रहींनी म. गांधींच्या नेतृत्वाखाली जबरदस्त लढे दिले. ८ ऑगस्ट रोजी अ. भा. काँग्रेसची प्रचंड बैठक झाली. म. गांधींनी ब्रिटिश राजवटीला, परकीयांना ‘भारत छोडो, क्विट् इंडिया’ असा नारा दिला. लाखोंनी अहिंसक सत्याग्रहात भाग घेतला. त्यामुळेच तुम्ही-आम्ही दर १५ ऑगस्टला, ‘झंडा ऊंचा रहे हमारा।’ असे म्हणत प्यारा तिरंगा फडकवत असतो. १७ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण व श्रीज्ञानेश्वर महाराज जयंती असा योग आहे. १८ ऑगस्ट या दिवशी एक जबरदस्त पेशवे व्यक्तिमत्त्व, थोरले बाजीराव यांची जन्मतिथी आहे. त्या दिवशी आपण मंडळी गोपाळकाला साजरा करण्याच्या मूडमध्ये बहुधा असणार. २७ ऑगस्ट रोजी महानुभव पंथाचे थोर संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांच्या जयंतीनिमित्त आठवण ठेवून; आपले जीवनात साधी राहणी आणता येईल का? याचा विचार जरूर करावा. त्या अगोदर २३ ऑगस्टला जैन धर्मीयांचा वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा दिवस ‘पर्युषणपर्वारंभ’ सुरू होत आहे. या दिवसाच्या निमित्ताने, प्रत्येक विचारी मनाने आत्मपरीक्षण करून, आपले काही चुकले आहे का?, असे आपल्या परिवारात विचारून क्षमा मागण्याची पद्धत आहे. तिची आठवणीने आठवण ठेवूया! दि २८, २९ व ३० ऑगस्ट रोजी अनुक्रमे हरतालिका, श्रीगणेश चतुर्थी व ऋ षीपंचमी हे तीन एकमेकास पूरक असे सण येत आहेत. या सणांच्या निमित्ताने आपणास ‘देवांना आवडणाऱ्या’ तीन प्रमुख वनस्पती दूर्वा, तुळस व बेल व गणेशपत्रीतील अन्य उपयुक्त औषधी वनस्पतींची जवळीक म्हणजे अभ्यास करण्याची संधी येत आहे. ती अजिबात दवडू नये.
अष्टांगहृदयकार श्रीवाग्भटाचार्याचे मते श्रीवर्षांऋतू श्रावण- भाद्रपदा म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये येत असतो. ऑगस्ट महिना हा वर्षांऋतूतील उत्तरकाल आहे. या काळात आपल्या आसपासचे वातावरण सर्वसाधारणपणे स्निग्ध असते. मे-जून-जुलैमधील रूक्ष वातावरण संपलेले असते. असे असूनही सर्व प्राणिमात्रात तुलनेने बल कमी असते. ऑगस्ट महिन्यात साहजिकपणे आपल्या शरीरात वातप्रकोप व त्यामुळे काही संबंधित पोटाचे आजार यांना तोंड द्यायची पाळी खूप लोकांवर येत असते. तसे पाहिले तर ऑगस्ट महिन्यात बहुधा सर्वत्र पुरेसा पाऊस झालेला असतो. नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत असतात. ते वाहत असताना, स्वाभाविकपणेच आपल्या सभोवतालची काठाची दगडमातीही वाहून नेत असतात. पाणी स्वाभाविकपणेच लालसर रंगाचे व भरपूर गढूळ असू शकते. आयुर्वेदीय शास्त्रकार अशा पाण्याला ‘आम्ल विपाकी’ असे म्हणून तुम्हा आम्हाला थोडी ‘वॉर्निगच’ देत असतात.
असे आम्ल विपाकी पाणी ऑगस्ट महिन्यात अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरते. ऑगस्ट महिन्यातील बराच काळ ‘आदान’ काळाचा असल्यामुळे आपला जठराग्नि मंद झालेला असतो. वाताचा खूप खूप जोर असतो. त्यामुळे ज्यांना नदी, नाले, ओढय़ांचे पाणी नाइलाजाने प्यावे लागते, त्यांना ते उकळून प्यायला हवे हे सर्वानाच माहीत आहे. अशा उकळलेल्या पाण्यामध्ये आपण थोडी सुंठ मिसळून नियमितपणे आपल्या आमाशयाच्या पचनक्रियेची काळजी घेतली तर अनेकानेक पोटाच्या विकारांना लांब ठेवता येईल. ऑगस्ट महिन्यामध्ये वातावरण व कमी-अधिक पाण्यातील अशुद्धता यामुळे अग्निमांद्याच्या विकारांना त्यांच्या कमी-अधिक स्वरूपाच्या उपद्रवांना तोंड देण्याची अनेकांवर पाळी येत असते. पोट फुगणे, पोट डब्ब होणे, भूक मंदावणे, शौचाला पातळ होणे, शौचाला वारंवार जायला लागणे, असे अनेकानेक ‘अमिबा’ या पोटातील कधीही नष्ट न होणाऱ्या जंतूंमुळे रोगांचा सामाना, केव्हा न केव्हा बहुसंख्यांना करायला लागतो. श्री सुश्रुताचार्यानी या ऑगस्ट महिन्यातील वर्षांऋतूच्या भागाला ‘प्रावृट्’ असे नाव दिले आहे.
या काळात खराब पाण्याच्या तक्रारींबरोबरच आसपासच्या परिसरातील डास, मुंग्या, रानावनात साप, नाग, विंचू अशा सगळ्यांपासून जपावे लागते. एक काळ घरोघर डासांपासून बचावाकरिता मच्छरदाणीचा उपयोग बहुसंख्य लोक करत असत. ज्यांना डासांपासून उपद्रव व सतत पंखा चालू ठेवणेही सोसत नाही त्यांनी डासांचा उपद्रव टाळण्याकरिता, आपल्या अंगाला गवती चहा अर्कयुक्त तेल लावावे. त्यामुळे झोपच्या सुरुवातीच्या काळात शांत झोपेचा आनंद घेता येतो. ऑगस्ट महिन्याच्या काळात ज्यांना काही कारणाने घर सोडून प्रवास व निवास नाइलाजाने करावा लागतो, त्यांनी आपल्यासोबत ‘नागरमोथा’ या वनस्पनीचे पन्नास-शंभर ग्रॅम चूर्ण जरूर ठेवावे. अनोळख्या ठिकाणी, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सदासर्वदा खात्रीचे शुद्ध पाणी मिळेल याची खात्री नसते. त्याकरिता ५०० मिली पाण्यात ५ ग्रॅम नागरमोथा चूर्ण मिसळून असे पाणी पिण्याकरिता अवश्य वापरावे. अलीकडे देशभर मोठमोठय़ा शहरातच नव्हे तर लहानसहान गावांतही बाटलीबंद पाण्याचे खूपच खूळ माजले आहे. प्राचीन आयुर्वेद शास्त्राप्रमाणे तुम्हाआम्हाला नेहमीच सतावणाऱ्या, त्रास देणाऱ्या, ज्वर समस्येवर- नेहमीच्या विविध तापांच्या प्रकारावर नागरमोथा हे एक अत्यंत उपयुक्त व तत्पर गुण देणारे, अनपायी सोपे औषध आहे. आपल्याजवळ नागरमोथाचूर्ण आजीबाईच्या बटव्यातील एक आवश्यक भाग म्हणून अवश्य ठेवावे.

रोजच्या जेवणात अल्प प्रमाणात घरगुती तुपाचा वापर अवश्य करावा. कटाक्षाने डालडा किंवा वनस्पतीजन्य तूप असणाऱ्या पदार्थाचा, बेकरी प्रॉडक्ट्सचा वापर टाळावा.

पावसाळ्यात विविध आजारांविषयी माहिती व धास्तीपण असते. आपल्या आसपास, गल्लोगल्ली, कोपऱ्याकोपऱ्यावर अनेकानेक वैद्यकीय चिकित्सक आपणास योग्य ती सल्लामसलत व औषधांची निरंतर सेवा देण्याकरिता खूप खूप तत्पर असतातच. केवळ औषधांच्या भरोशावर राहण्यापेक्षा आपण कोणता आहार घ्यावा, कशा पद्धतीने घ्यावा याची माहिती करून घेतली तर ती माहिती आपल्या स्वत:करिता व संपूर्ण कुटुंबाकरिता खूपच उपयोगी पडेल. ऑगस्ट महिन्यात आपण घेत असणारा सकाळ, दुपार व सायंकाळचा आहार हा पचावयास हलका असायला हवा, हे सूत्र लक्षात ठेवून पुढील तपशिलाप्रमाणे व आपल्या कुवतीप्रमाणे खाद्यपदार्थाची योग्य ती निवड करावी.
१) ढगाळ वातावरण असल्यास खूप ‘खा, खा’ करू नये.
२) मांसाहार, अती उष्ण, तळलेले पदार्थ, मेवा मिठाई, हॉटेलमधील किंवा शंकास्पद अन्न कटाक्षाने टाळावे.
३) आपण घेत असलेल्या प्रमुख आहारामध्ये मुगाच्या डाळीचे वरण, तांदूळ भाजलेल्या भाताची पेज यांचा समावेश केला तर ताप वा पोटाच्या आजारांना लांब ठेवता येते. ज्यांना गव्हाशिवाय जेवणात रंगत येत नाही त्यांनी मऊ फुलके किंवा सुक्या चपातीचा वापर करावा.
४) पावसाळी हवा व ढगाळ वातावरण यामुळे मंद भूक व अरुची या दोन्ही लक्षणांचा सामना ऑगस्ट महिन्यात करावा लागतो. त्याकरिता जेवणात पुदिना, आले, लसूण, ओली हळद अशा स्वरूपाची चटणी जेवणात असावी. याव्यतिरिक्त सुंठ, मिरे, जिरे, भाजलेला हिंग, बडीशेप अशांची कमी-अधिक प्रमाणात तोंडीलावणी म्हणून वापर करावा.
५) ऑगस्ट महिन्यात, अगोदरच भरपूर पाऊस पडून गेला असल्यामुळे भाजी मंडईत पालेभाज्या तुलनेने स्वस्त व मोठय़ा प्रमाणावर मिळतात. शेतात, रानावनात, रानावनातून येणाऱ्या पालेभाज्या या आपल्याबरोबर अत्यंत सूक्ष्म प्रमाणात मातीचे कण घेऊन येत असतात. स्वयंपाकघरातील गृहिणी पालेभाजीची गड्डी आठवणीने धुवून घेतात. तरीपण पालेभाजीची प्रत्येक काडी गरम गरम पाण्यात स्वच्छ धुऊन घेतली नाही तर आपले पोटाचे आजार नव्याने जडू शकतात, याकरिता पालेभाज्यांचे प्रमाण कमी करावे.
६) विविध तऱ्हेच्या फळभाज्या तुलनेने स्वच्छ करून वापरणे सोपे आहे, त्यामुळे या पावसाळी हवेच्या काळात दुध्याभोपळा, पडवळ, दोडका टिंडा, परवल, घोसाळी, कमी बियांची काटेरी छोटी वांगी, कोवळा नवलकोल, कोहळा, फ्लॉवर, कोबी, गोवार, तांबडा भोपळा, गाजर, कोवळी भेंडी अशा भाज्यांमधून निवड करावी. यातील फ्लॉवर व कोबी हे स्वच्छतेकरिता काळजीपूर्वक तपासावे. माफक प्रमाणात मोड आलेली कडधान्ये आठवडय़ातून एक-दोन वेळा वेगळा पर्याय म्हणून जरूर खावीत. हरभरा, मका, उडीद ही कडधान्ये सोडून मूग, चवळी, राजमा यांचा वापर जरूर करावा. मटकी अवश्य टाळावी.
७) जेवणात रुचीपालट म्हणून मुगाच्या डाळीचे किंवा कुळथाचे कढणही या ऋ तूत पोषक असते. आपल्या रोजच्या जेवणात अल्प प्रमाणात घरगुती तुपाचा वापर अवश्य करावा. कटाक्षाने डालडा किंवा वनस्पतीजन्य तूप असणाऱ्या पदार्थाचा, बेकरी प्रॉडक्ट्सचा वापर टाळावा.
८) या काळात तळलेले पदार्थ रोजच्या रोज खाणे कटाक्षाने टाळावे. कारण ते पचविण्याकरिता आपला जाठराग्नि पुरेसा समर्थ नसतो. अशा पदार्थामुळे पित्त व वायू हे दोन्ही दोष वाढतात.
९) या काळात दुपारचे अन्न रात्री किंवा सायंकाळचे अन्न दुसऱ्या दिवशी, असे प्रकार कटाक्षाने टाळावेत. दोन्ही वेळचे जेवण ताजे हवेच, हे मी सांगावयास नकोच.
१०) दिवसेंदिवस सर्वच लहानमोठय़ा शहरांत सर्व तऱ्हेची फळे विपुल प्रमाणात सर्वानाच उपलब्ध होत आहेत. आपण सगळीच फळे स्वच्छ धुऊन मगच खात असतो, हे बरोबर आहे. या महिन्यात फळांची निवड करत असल्यास अधिक पिकलेली फळे उदा. आंबा, केळी, पोपई अशी फळे टाळावीत. या महिन्यात पुणे-मुंबईत जांभळे, करवंदे, पांढरे जाम आपणाला ठिकठिकाणी खुणावत असतात. मुंबईत दादरच्या पुलावर छोटय़ा छोटय़ा द्रोणांमध्ये करवंदे, जांभळे मिळतात. आठवडय़ातून एक-दोन वेळा अशा रानमेव्याचा आनंद अवश्य घ्यावा. घरातील बालबच्च्यांना द्यावा. त्यामुळे ती मंडळी चॉकलेट, बिस्किट, गोळ्या असे अपायकारक पदार्थ नक्कीच मागणार नाहीत. या ऋ तूत बीट वा गाजर तारतम्याने खावे. काहींना काकडी बाधते, ती त्यांनी टाळावी.
११) लहान बालकांना तांदूळ भाजून किंचित जिऱ्याची फोडणी दिलेली मऊ पेज, मुगाच्या डाळीचे वरण, कमीतकमी तेल-तूप असणाऱ्या भाज्या, टोमॅटो सूप, असे पदार्थ आवर्जून द्यावेत. आपल्या घरातील आजारी वयस्कर व्यक्तींना पचनाला हलके असे कढण, सूप भाताची पेज, साबुदाणा लापशी असे पदार्थ द्यावेत. वृद्धांनी सकाळचा नाश्ता व्यवस्थित करावा. सायंकाळी लवकर व कमी जेवावे. त्यामुळे त्यांना रात्रौ पहिली झोप भरपूर व सुखाची लागते. ऑगस्ट महिन्याच्या या पावसाळी हवेत नारळपाणी किंवा विविध कोल्ड्रिंक्स अवश्य टाळावी. आपल्या सर्व प्रकारच्या आहारात सर्वाकरिता आरोग्यदायी पेय म्हणून ताकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजारातून दही आणण्यापेक्षा घरी विरजण लावून, चार तासांनी ते दही घुसळून केलेले ताक ऑगस्ट महिन्यात काही विशेष एनर्जी देते. ती आपण जरूर अनुभवा! ज्यांना एवढय़ा तेवढय़ा ताकाने सर्दी होईल असे वाटते त्यांनी आले, लसूण मिसळून तयार केलेली ताकाची कढी एकवेळ अवश्य घ्यावी. दुपारच्या वेळेत चहाऐवजी कैरीचे पन्हे, लिंबू सरबत किंवा कोकम सरबत घ्यावे हे मी सांगायला नकोच.
ऑगस्ट महिन्यामध्ये आपण आपल्या भागातील भाजीमंडीत सकाळी नऊ-दहा वाजता जर नित्य फेरी मारत असाल तर तुम्हाला तऱ्हतऱ्हेच्या आंब्याच्या विविध जातींच्या कैऱ्या खूप मोहात टाकत असतात. त्यात गावठी आंबे, तोतापुरी कैऱ्या, केशर आंबा असे अनेक प्रकार असतात. बाजारातून विविध तऱ्हेची मिठाई वेळोवेळी आणण्यापेक्षा आपण या भाजीबाजारातून चांगल्या टणक, वजनाला जड व फार आंबट नव्हे, अशा कैऱ्यांची निवड करावी. गुळांबा, साखरांबा, मेथांबा, वर्षभर टिकू शकतील अशी कैरीची कमी-अधिक तिखट-गोड लोणची किंवा लिंबू, ओली हळद कैरीयुक्त पंचरंग लोणची अवश्य करून पाहावी. हे पदार्थ तुम्हाला किमान दोन-चार महिने तरी आठवडय़ातून एकदा तरी खूपच चांगली साथ देत असतात. अशी लोणची वा साखरआंबा, मेथांबा करण्याकरिता जवळपासच्या अनुभवी गृहिणींचा सल्ला अवश्य घ्यावा. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हे तुम्हा-आम्हा सर्वानाच माहिती आहे. ऑगस्ट महिन्यातील आहाराबद्दल काही शंका असल्यास दै. ‘लोकसत्ता’ प्रकाशित पूर्णब्रह्मची मदत अवश्य घ्यावी. शुभं भवतु.