00gajananआपलं हृदय नेमकं कसं असतं, ते कसं काम करतं हे नीट समजून घेतलं तर आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. त्याबरोबरच हृदयविकार का होतो, कसा होतो आणि तो कसा टाळता येईल याचीही माहिती आपल्याला असायलाच हवी.

हृदय हा स्नायूंनी बनलेला अवयव आहे. ते दोन फुप्फुसांच्या मध्ये छातीच्या मध्यावर स्थिरावलेले असते. त्याचा आकार मुठीच्या आकारापेक्षा थोडा मोठा असतो आणि वजन ३०० ते ५०० ग्रॅम एवढे असते.
हृदय व साठ हजार मैल लांब असलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळय़ांसह साकारली जाते रक्ताभिसरण संस्था. हृदयाची कार्यक्षमता, गती, स्पंदने, स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण पावणे (Contraction and Relaxation) यावर शरीरातील सर्व अवयवांना योग्य त्या प्रमाणात रक्तपुरवठा होणे अवलंबून असते.
हृदयाचे चार कप्पे असतात. वरच्या कप्प्यांना उजवी/ डावी कर्णिका (left and right Atrium) आणि खालच्या कप्प्यांना जवनिका (left and right ventricle) असे म्हणतात. या चारही कप्प्यांना विभागणारा एक भक्कम असा पडदा असतो आणि कर्णिका-जवनिका याच्यामध्ये असतात हृदयाच्या झडपा. दोन जवनिकांमधील पडद्याला ‘इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम’, असे म्हणतात आणि दोन कर्णिकांमधील पडद्याला ‘इंटरअ‍ॅट्रिअल सेप्टम’ (IAS- Inter atrial Septum), असे म्हणतात.
शरीरातील इतर स्नायूंप्रमाणेच आणि अवयवांप्रमाणेच हृदयाच्या स्नायूंनासुद्धा प्राणवायूयुक्त रक्ताची गरज असते. या स्नायूंना ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात त्यांना ‘कोरोनरी धमनी’ (Coronary Arteries) असे म्हणतात. उजवी आणि डावी कोरोनरी धमनी नंतर वेगवेगळ्या शाखांमध्ये विभागल्या जातात. (left main coronary Artery devides into LAD and circumflex and Right coronary artery devides into PLV and PDA) या धमन्यांतून अविरत असे रक्ताभिसरण चालू असते आणि अखंडपणे काम करणाऱ्या हृदयाच्या स्नायूंना अखंडपणे रक्ताचा पुरवठा होत असतो.
या धमन्यांमध्ये अवरोध (Block) निर्माण झाल्यास हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो. या रक्तवाहिन्यांच्या अरुंदीकरणामुळे कमी रक्तपुरवठा झाल्यामुळे रुग्णामध्ये चालल्यानंतर छातीत दुखणे, दम लागणे, अस्वस्थ वाटणे, कमजोरी (Weekness) वाटणे यांसारखी लक्षणे दिसतात. जर आराम केला की ही लक्षणे कमी होतात किंवा थांबतात. याला ‘अन्जायना’ (हृदयशूळ.. Angina Pectoris) असे म्हणतात. हा सहसा ५० ते ७० टक्के अवरोधानंतर सुरू होतो.
जेव्हा कोरोनरी धमनीतील अवरोध हा शंभर टक्के होतो (शंभर टक्के Block) तेव्हा त्या भागातील रक्तपुरवठा बंद होतो आणि त्या भागातील हृदयाचे स्नायू हे हळूहळू मरून जाण्यास सुरुवात होते. यालाच ‘हृदयविकाराचा झटका’ (Heart Attack, Myocardial Intaraction) असे म्हणतात.
सहसा अवरोधांच्या जागी अचानक रक्ताची गुठळी निर्माण होऊन, रक्तपुरवठा शंभर टक्के बंद होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो. यामध्ये बसल्या बसल्या आरामाच्या अवस्थेतसुद्धा छातीत मध्यभागी डाव्या बाजूला तीव्र वेदना होतात. डाव्या हातात, दंडात दुखणे, पाठीमध्ये, मानेमध्ये दुखणे, दरदरून घाम फुटणे, भोवळ येणे, उलटी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे सहसा २० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ राहतात. यात अकस्मात मृत्यूसुद्धा होऊ शकतो. (Sudden cardiac death, arrest  ).
ज्या रुग्णांना मधुमेह आहे, अस्थमा आहे किंवा जे अतिवयस्क आहेत, अशा व्यक्तींना तीव्र वेदना होत नाही. त्याऐवजी अचानक दम लागणे, चक्कर येणे, खूप कमजोरी एकाएकी येणे यांसारखी लक्षणे दिसतात. कधी कधी तर काहीच लक्षणे दिसत नाहीत. याला ‘सायलेंट अ‍ॅटॅक’ असे म्हणतात. त्याचे निदान ईसीजी आणि इकोकार्डिओग्राफी (Echocardiography) या तपासण्याद्वारे होते.
रक्तवाहिन्यांच्या अरुंदीकरणाला ‘अ‍ॅथेरोस्कलेरोसिस’ (Atherosclerosis) जबाबदार आहे. यामुळे हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा बंद होऊ शकतो. त्यामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. कार्यक्षमता कमी होते. हृदय शरीरातील इतर अवयवांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा करू शकत नाही आणि शरीराची गुंतागुंत वाढते.
हृदयधमन्यांमध्ये आढळणारा अवरोध हा प्रामुख्याने कोलेस्टेरॉल आणि इतर काही पदार्थानी मिळून बनलेला असतो. एखाद्या भांडय़ांच्या पृष्ठभागावर गजांचा थर बसावा, त्याप्रमाणे हृदयधमन्याच्या आतल्या अस्तरावर हळूहळू हे किटण जमा होते. वर्षोनुवर्षे किटण जमत गेल्यामुळे रक्तवाहिनीची आतील पोकळी कमी होते आणि हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो. मग ‘अन्जायना’ (Angina Pectoris) ला सुरुवात होते.
कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा मेणासारखा पदार्थ असून शरीरपेशीचं काम व्यवस्थित चालण्यासाठी ऊर्जा पुरवण्याचे काम करतो. जर कोलेस्टेरॉलची (चरबीयुक्त पदार्थाची) मात्रा आहारात जास्त असेल किंवा यकृत (Liver) कोलेस्टेरॉलचे चयापचय (Metabolism of Cholesterol) योग्य प्रकारे न करता जास्त निर्मिती करत असेल, तर रक्तातली कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हृदयाच्या धमन्यांमध्ये जमण्यास सुरुवात होते. रक्तप्रवाहाबरोबर वाहणाऱ्या या कोलेस्टेरॉलचा धमन्यांच्या आतल्या बाजूला थर जमू लागतो. जसे मग थर बसण्याचं प्रमाण वाढत जाते, तेथे कोलेस्टेरॉल साठून साठून अडथळे तयार होतात. अवरोध (Blockage) तयार होतात. हे अडथळे हृदयधमन्यांमध्ये आणि शरीरातील इतर धमन्यांमध्येही होऊ शकतात.
हृदयधमनीच्या आतील अस्तराला जर काही कारणाने दुखापत झाली की, ती दुखापत, ती इजा बरी करण्याचा प्रयत्न आपलं शरीर करतं. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला बाहेरून झालेल्या एखाद्या जखमेवर आपण औषधाची चिकटपट्टी लावतो, त्याचप्रमाणे हृदयधमनी आतल्या जखमेवर.. आतल्या दुखापतीवर कोलेस्टेरॉल आणि तंतूंची (Fibres) औषध-चिकटपट्टी लावते. जर दुखापत लवकर बरी नाही झाली किंवा परत परत होत असेल तर कोलेस्टेरॉलच्या पट्टय़ांची पुनरावृत्ती होते आणि एक मोठा अडथळा तयार होतो.
हृदयधमनीला दुखापत होण्याची भरपूर कारणे आहेत. उदा. वाढलेला रक्तदाब, धूम्रपानामुळे (निकोटिनमुळे) इजा होते. जर हृदयाची गती मर्यादेपेक्षा वाढली की इजा होऊ शकते, ताण-तणावामुळे धमनीमध्ये आकुंचनाचा झटका (Spasm) होऊन इजा होऊ शकते.
हृदयधमनीला इजा झाली की तेथे रक्तपेशी (Platelets, RBCs, WBCs) आकृष्ट होतात आणि तंतुमय (फायबर) वातावरणात तेथे रक्ताची गुठळी तयार होते. कधी कधी ही गुठळी पूर्ण रक्तवाहिनी बंद करते, तेव्हा रुग्णाला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येतो. यामध्ये ही रक्तवाहिनी ज्या भागाला रक्तपुरवठा करते तेथील रक्तपुरवठा बंद होतो आणि तेथील स्नायू, तो भाग मृत होतो.
थोडक्यात, हृदयधमन्यांमध्ये कोलेस्टेरॉलची जमावट, धमनीच्या आतील बाजूला होणारी इजा-दुखापत, दुखापतीनंतर धमन्यांमध्ये जमणाऱ्या रक्ताच्या गुठळय़ा आणि धमनीचे आकुंचन पावने (Spasm) या सर्व गोष्टी एकत्रित आल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
हृयविकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना कराव्या लागतात. हृदयविकाराचा झटका आल्यावर किंवा आल्यासारखी लक्षणे दिसल्यावर ताबडतोब डॉक्टरला बोलावणं पाठवावं किंवा वाहनातून रुग्णाला जवळच्या रुग्णालयात न्यावं. रुग्णालय कितीही जवळ असेल तरी चालत नेण्याचा प्रयत्न करू नये. जितक्या लवकर औषधोपचार सुरू होईल तितक्या जास्त प्रमाणात स्नायू (Muscle) वाचतील. आपण आतापर्यंतच्या लेखात वाचले की रक्तवाहिन्यांमध्ये अरुंदीकरणाच्या प्रक्रियेला ‘अ‍ॅथरोस्कलेरॉसिस’ (Atherosclerosis) असे म्हणतात. याची सुरुवात अगदी बालवयातच सुरू होते. रक्तवाहिन्यांच्या आतील थरात स्नायूमय धाग्याचे जाळे तयार होते, त्यात चरबीचा थर जमा होतो आणि अशा प्रकारे Atherosclerosis ची सुरुवात होते. नंतर धोक्याच्या घटकांमुळे ही प्रक्रिया वेगाने वाढायला सुरुवात होते. धोक्याचे घटक जर जास्त असतील तर अ‍ॅथरोस्कलेरॉसीसचा वेग पण जास्त असतो आणि तरुणपणीच हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा संभव असतो.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

धोक्याचे घटक
धोक्याचे घटक हे दोन गटांत विभागले जाऊ शकतात. १) न बदलण्याजोगी घटक. उदा. वय, लिंगभेद आणि आनुवंशिकता (Non Modifiable Risk Factors)
२) बदलण्याजोगी (Modifiable Risk Factors) जे धोक्याचे घटक – आपण औषधोपचार, जीवनशैलीतील बदल, व्यायाम, आहार या प्रतिबंधात्मक उपायांनी बदलू शकतो किंवा नियंत्रणात ठेवू शकतो. त्यांना बदलण्याजोगे धोक्यांचे घटक म्हणता येईल. (Modifiable Risk Factors) ते खालीलप्रमाणे आहेत.
१) अति रक्तदाब (Hypertension)
२) मधुमेह (Diabetes Mellitus)
३) चरबी (Hyperlipidemia) (High Cholesterol)
४) धूम्रपान व तंबाखू सेवन (Smoking Tobacco Consumption)
५) लठ्ठपणा, वाढलेले वजन (Obesity and Overweight)
६) व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली (Lack of Exercise and Sedentary Lifestyle)
७) व्यक्तिमत्त्वाचे प्रकार (अ आणि ब व्यक्तिमत्त्व) (Type A and Type B Personality)
८) Stressful Lifestyle
९) मद्यपान आणि इतर व्यसने (Alcohol)
१०) इतर घटक उदा. लायपोप्रोटिन ‘अ’ जंतूचा प्रादुर्भाव, Pollution इत्यादी.
आजही रक्तवाहिन्यांच्या अरुंदीकरणाचे नेमके कारण कळले नाही आहे. वरील धोक्याच्या घटकांचा प्रादुर्भाव असलेल्या व्यक्तीमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त असते. जर हे घटक नियंत्रणात ठेवले किंवा कमी केलेत तर हृदयविकाराचे प्रमाण नक्कीच कमी होते. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यासाठी या धोक्याच्या घटकांचा योग्य तो अभ्यास करून त्याचा शक्य असल्यास मुळापासून नायनाट करण्याचा प्रयत्न करावा. पुढील लेखामध्ये या धोक्याच्या घटकांबद्दल..
डॉ. गजानन रत्नपारखी