lp30प्रोजेक्ट मेघदूतचा गट आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. गेले काही दिवस या गटाने गंगा जिथे समुद्राला मिळते त्या गंगासागरपासून आपला प्रवास सुरू केला होता. त्यानंतर पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश ही राज्ये पार करून गट उत्तराखंडमध्ये आला आहे. इथे गंगेच्या उगमस्थानी पोहोचण्यासाठी ते अनेक अडथळे पार करणार आहेत!

माणसापेक्षा निसर्गाचं नियोजन महत्त्वाचं. प्रवासाचं कितीही नियोजन केलं तरी अनेकदा स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याला त्यात बदल करावा लागतो आणि हा प्रवास तर मान्सूनचा. गंगेच्या काठाकाठाने, तिची अनेक रूपं अनुभवत केलेला प्रवास. त्यामुळे हा प्रवासही पूर्वनियोजनापेक्षा २-३ दिवस लांबलाच. नियोजनानुसार नितीन ताम्हणकर म्हणून या गटातले एक सदस्य पुण्याहून थेट गंगोत्रीला पोहोचणार होते. गटही तेव्हाच गंगोत्रीला पोहोचेल अशी अपेक्षा होती. गंगोत्रीला पोहोचल्यावर इथल्या गटातले दोघे त्यांच्याबरोबर गोमुखापर्यंत, म्हणजे गंगेच्या उगमस्थानापर्यंत चालत जाणार होते. गंगोत्री ते गोमुख ही वाट साधारण १८ किलोमीटरची. पण इथे गाडी जात नाही. त्यामुळे हा रस्ता पायीच पार करावा लागतो. गोमुखाच्या इथलं पाण्याचं सॅम्पल आणणं गरजेचं असल्याने हा प्रवास करणं आवश्यक होतं. या प्रवासात या सगळ्या भागातल्या वनस्पती, प्राणी, खनिजे यांचं अभ्यास करायचं ठरवलं होतं. पण हे सगळं करणं शक्य झालं नाही. परंतु हा अभ्यास अर्धवट राहू नये म्हणून नितीन ताम्हणकर यांनी हा १८ किलोमीटर्सचा प्रवास, म्हणजे खरंतर ट्रेकनं एकटय़ाने पार केला. स्वत:च मुलाखती, छायाचित्रे आणि पाण्याचा नमुना आणायचं काम त्यांनी केलं. खरंतर हा गट ताम्हणकरांना वाटेत भेटणार होता. पण नरेंद्रनगरच्या जवळ दरड कोसळल्याने त्यांची येण्याची वाट बंद झाली होती. म्हणून ही भेट आणि पुढचा एकत्र प्रवास होऊच शकला नाही. हाच या गटाला या पहाडी प्रवासात बसलेला पहिला धक्का होता.
इथल्या प्रत्येक प्रवासात ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारलेले आहेत. प्रत्येक गाडय़ांची तिथे नोंद होते आणि प्रवाशांचे दूरभाष क्रमांक घेतले जातात. एक नोंद या भागांत आलो की आणि दुसरी या भागातून बाहेर जाताना. इतक्या खडतर प्रवासात आणि इतक्या दुर्गम रस्त्यावर कोण आहे आणि कोण नाही याची इत्थंभूत माहिती ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रवासाची सुरुवात केली तेव्हा हृषीकेशमध्येही पाऊस नव्हता. दरड कोसळली असली तरी ती साफ करण्यात आली होती. पुण्यापासून निघतानाही रात्रीत अधिकाधिक अंतर गाठून मोठा, म्हणजे ३००-४०० किलोमीटरचा प्रवास पार करायचा हे अनेक वेळा केलं होतं. पण इथली गोष्ट वेगळी होती. इथे केवळ चढण होती. गंगोत्री २८० किलोमीटरवर होतं. म्हणजेच पुढचा २८० किलोमीटर्सचा प्रवास दरडींना पार करत, पावसात, धुक्यात आणि मुख्य म्हणजे संपूर्ण चढाईवर होणार होता. महाराष्ट्रामधल्या घाटांची सवय असताना घाट तासाभरात संपतो. पण पश्चिमघाट आणि हिमालय हे दोन्हीही भूप्रदेश पूर्णत: वेगळे आहेत.
हिमालय आणि मान्सूनचा संबंध
हिमालय अजून तयार होतो आहे, हिमालयात दरडी कोसळतात हे ऐकून होतो. तसं घडणं हे साहजिकच होतं. कारण हिमालय अजून घडतो आहे. पश्चिमघाट हे घडण्याची प्रक्रिया संपवून स्थिरस्थावर झालेले आहेत. निसर्गनियमाप्रमाणे वेदरिंग होतं, पण मूळ ढाच्यामध्ये बदल होत नाही. पण हिमालय तसा नाही. तो अजून घडतो आहे, उचलला जातो आहे. त्यामुळे इथे भूकंपही होत असतात. या घडण्यामध्ये खाली सगळा मातीचा गाळ आहे. खाली दगड नाही, त्यामुळे भूकंप झाला की हे सगळं खाली कोसळतं. त्यात मान्सूनचा पावसानंतर ती माती वाहून गेल्यावर हे सगळंच खूप ठिसूळ झालेलं असणार आहे.
हिमालयात मान्सून
दक्षिणेकडून येणारे वारे हे हिमालयाला जाऊन धडकत असतात. असं म्हणतात की मान्सूनची निर्मितीदेखील हिमालयाच्या निर्मितीमुळेच झाली आहे. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी ही सगळी प्रक्रिया झाली. भारतीय उपखंडाची प्लेट आणि युरेशियाची प्लेट एकमेकांना चिकटली आणि त्यातून या हिमालयाच्या निर्मितीला सुरुवात झाली. तिबेटचं पठारही तेव्हाच बनलं. ही प्रक्रिया झाल्यावर नियमितपणे भारतीय उपखंडात मान्सूनचे वारे यायला सुरुवात झाली. गटाचा प्रवास ज्या भागातून होत होता त्याची उंची साधारण २००० ते ३००० मीटर.
हरिद्वार आहे ३०० मीटरवर. त्यामुळे हा समुद्रसपाटीपासून ३०० मीटर ते ३००० मीटर एवढय़ा उंचीचा प्रवास गटाला करायचा होता. प्रवास सुरू केल्यावर ळ्रेी छंस्र्२ी च्या मदतीने काही फुटेज घेण्यात आलं. गंगा आणि तिच्यावर दाट काळे ढग असं ते दृश्य होतं. गंगोत्रीच्या वाटेवर सगळ्यात आधी लागणार होतं चंबा, मग उत्तर काशी आणि त्यानंतर गंगोत्री असा तो प्रवास होता. दिसताना अंतर जरी ९० किलोमीटर दिसत असले तरी अंतर आणि वेळ असा हिशेब इथे करता येत नाही. इथले सगळे रस्ते हे नद्यांना लागून केलेले आहेत. डोंगर जसा वळेल तसा रस्ता वळणार. पूल बांधणे अशक्यच. त्यात परत इथे रस्ते चांगले असले तरी अतिशय अरुंद. महाराष्ट्रात गाडी चालवण्याची सवय असलेला चालक इथे गाडी चालवूच शकणार नाही. ट्रक आला तर आपली गाडी जरा रुंद रस्ता मिळेपर्यंत मागे न्यायची, त्याला जाऊ देऊन मग आपला प्रवास सुरू करायचा, अशी इथली तऱ्हा.
टिहरी धरण
चंबा मागे टाकल्यावर वाटेतच टिहरी धरणाचे फलक दिसायची सुरुवात होते. टिहरी हे भागीरथी नदीवर बांधलेलं सर्वात वादग्रस्त असं धरण. या ठिकाणी धरणं बांधण्याचं कारण म्हणजे उतार. कमी कष्टात अधिक वीज उत्पादन होऊ शकतं. म्हणून आपल्याला हिमालयात ठिकठिकाणी धरणं बांधलेली दिसतात. हे धरण वादग्रस्त असण्याचं कारण म्हणजे भूकंप. अनेक तज्ज्ञांच्या मते हे धरण जरी ८ रिश्टरचा भूकंप पेलू शकेल एवढं भक्कम बनवलं गेलं असलं तरी या भागांत यापेक्षाही शक्तिशाली भूकंप होऊ शकणार आहेत. म्हणूनच हे धरण संपूर्ण काँक्रीटने न बांधता अर्थ रॉक या पद्धतीने बांधलं गेलं आहे. यामुळे हे धरण मोठे धक्के झेलू शकेल, असं हे बांधणाऱ्या इंजिनीअर्सचं म्हणणं आहे. आय.आय.टी. मधल्या शास्त्रज्ञांचं म्हणणं तरीही यापुढे या भागांत मोठी धरणं बांधू नका, असंच आहे. ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या प्रवासादरम्यानही त्यांना या धरणाला काहीही झालं तर त्याचे परिणाम आणि अशा मोठय़ा धरणांना काहीही होण्याची शक्यता, दोन्हीही दिसून आलं.
आगे भूस्खलन क्षेत्र है!
टिहरी धरण सोडलं की मार्गावर ठिकठिकाणी पुढे दरड कोसळू शकेल तर संयमाने प्रवास करा, अशी सूचना करणारे फलक दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे जे फलक दाखवले होते, तसं होताना पाहता येतं. म्हणजे भूस्खलन म्हटल्यावर दरड कोसळू शकेल, असा प्रदेश असा लक्षात येतो. त्यानंतर, वरून दगड पडू शकतील असं चित्र असलेला फलक असतो. तिथे अक्षरश: वरून मातीपासून वेगळे झालेले दगड दिसू लागतात. आपली गाडी जाताना आपण हे दगड पाहू शकतो. रस्ते लहान असल्याने तिथूनच आपण जायचं. वेगळा रस्ता नाही. हे सर्व पावसाळ्यात अधिकच वेगाने होतं. हे असे फलक दिसले की तिथलेसुद्धा चालक थांबतात, वर बघतात, काही धोका नाही अशी खात्री झाली की आपली गाडी सुरू करतात. महाराष्ट्रातल्या घाटांमध्ये केवळ पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती असते. ही दरडही कदाचित वर्षांतून एकदा पडेल, अशी शक्यता असते. पण इथे हे सगळे भाग कायम ूं३्र५ी असतात. इथे जिथे जिथे हे फलक आहेत, तिथे तिथे भूस्खलन सततच होत असतं आणि ते आपण पाहू शकतो. आपल्याला आपली गाडी जाताना तर काही होणार नाही याचीच काय ती काळजी घ्यावी लागते. पाऊस येत असेल तर असे शेकडो स्पॉट आपल्याला दिसतात.
घरं आणि माणसं
इकडे वस्ती फार दाट नाही. मुख्य भागांमध्ये आहे, पण इतर ठिकाणी नाही. आणि घरंसुद्धा विखुरलेली आहेत. एकगठ्ठा घरं बांधायला तशी सपाट जागाच नाही! डोंगराच्या ६००-७०० मीटरच्या उतारावर लोक रीतसर घरं बांधून राहत आहेत आणि घर जर एका डोंगरावर असलं, तर त्यांची शेती दोन टेकडय़ा सोडून थोडी आणि थोडी अशीच घराखालच्या उतारावर अशीच विखुरलेली, आपल्याकडे आपण पडकाई शेती म्हणतो तशी. शेतीचं प्रमाण खूप नसलं तरी प्रती एकर चांगलं उत्पन्न देणारी अशी सुपीक जमीन आहे. गळाचीच जमीन असल्यामुळे इथे काहीही लावा, उत्पन्न उत्तम प्रकारे मिळतं. ही माणसं दिवसातून अनेकदा वर-खाली करतात, मुलं शाळेसाठी जातांना एखादा सिंहगड एवढं अंतर आणि उंची पार करून दररोज जातात. त्यामुळे इकडची माणसं दिसायलाही भलतीच काटक दिसतात. या भागात उत्पन्नाची फारशी साधनं उपलब्ध नाहीत. पर्यटन आत्ता-आत्ता सुरू झालं आहे आणि तेही खूप मोजक्या लोकांच्या हातात आहे, पण मुख्यत: शेती. तीही पुष्कळशी स्वत:च्या घरासाठी आणि जी उरेल ती विकण्यासाठी. राजमा हे इथलं मुख्य पीक. महाराष्ट्रात जशी तूर रोजच्या जेवणात असते, तसचं तिथे राजमा असतो. शेतीचं प्रमाण कमी असल्यामुळे ईशान्य भारताप्रमाणेच इथे बाहेरून बऱ्याच गोष्टी आणल्या जातात. उत्तर काशीपर्यंतच्या भागात अगदी भातही पिकवला जाऊ शकतो, पण त्यानंतरच्या भागात खूपच कमी पिकं घेता येतात. त्यामुळे सफरचंद आणि राजमा ही दोनच पिकं इथे घेतली जातात.
हृषीकेश आणि उत्तर काशी या भागांतली शेती संपूर्णपणे पावसावरच आधारलेली असते. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांना गंगेच्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण पाणी खालून उपसून वर घेणं हे अशक्यच काम आहे, वीज आत्ता आत्ता यायला लागली आहे. त्यामुळे त्यांना पावसाच्या पाण्यावर आणि वरून येणाऱ्या काही झऱ्याच्या पाण्यावर विसंबून राहावं लागतं.
बिहारमधल्या गाळाच्या मैदानाचा आणि संस्कृतीचा स्रेत
बिहार आणी पश्चिम बंगालमध्ये फिरताना बऱ्याच ठिकाणी नदीच्या जवळ गाळाची विस्तृत मैदानं बघायला मिळाली. या विस्तृत मैदानांचा स्रोत म्हणजे इथले डोंगर. अनेक ठिकाणी ही प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते. एकटय़ा भागीरथी नदीच्या पत्रात प्रचंड प्रमाणात तयार होणारा गाळ बघायला मिळाला. अशीच अलकनंदा, मंदाकिनी अशा १०-१५ नद्या आहेत. त्या ज्या वेळेत पावसाळ्यात उत्तरेकडून हिमालयाच्या डोंगरांमधून वाहून येत असतात तेव्हा विचार करा की या नद्या किती गाळ वाहून आणत असतील! एक प्रकारे मान्सूनचा पाऊस हिमालयाला घालतो आणि हिमालय धुवून निघतो. हा गाळ म्हणजे हिमालयाचा मळ असं म्हणावं लागेल. या गाळाच्या निर्मितीची प्रक्रिया ही अशी पावसावर अवलंबून असते. महाराष्ट्रात असा गाळ तयार होत नाही, कारण आपल्याकडे खडक आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गाळ तयार होत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गाळाची समृद्ध मैदाने तयार होण्याची ही प्रक्रिया असते आणि त्यासाठी महत्त्वाचा असतो हो मान्सून!
ही भरपूर पिकं देणारी विस्तृत मैदाने, नियमित पडणारा मान्सूनचा पाऊस त्यामुळे २५०० ते ३००० वर्षांपूर्वी या सगळ्या भागांत संस्कृतीचं केंद्र होण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी होत्या. भारताच्या दुसऱ्या कोणत्याही भागात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकणार नव्हती. आज आपण म्हणतो ती नदीची मैदाने. पण एकदा का पूर आला की ही मैदानेही वाढतात. जमीन अधिक सुपीक होते. त्यामुळे हे पूर जरी आपल्याला आत्ता संहारक वाटले तरीही या पुरांमुळे मनुष्य वसाहती निर्माण व्हायला, त्या जगायला आणि संस्कृती निर्माण व्हायला फारच मदत झाली आहे.
हे संस्कृतीचे स्रोत बघून ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात निघाला आहे. हा टप्पा आहे गंगोत्रीपर्यंतचा या टप्प्यामध्ये, हिमालयाची जीओलॉजी, इकडची खडतर परिस्थिती, धोकादायक रस्ते आणि या परिस्थितीमध्ये नेटाने आपली ओळख टिकवत काम करणारी माणसं त्यांना भेटणार आहेत.
प्रज्ञा शिदोरे – response.lokprabha@expressindia.com