संपूर्णपणे कौटुंबिक मनोरंजन करणारे चित्रपट, मसाला चित्रपट, विनोदपट इत्यादी प्रकारच्या चित्रपटांबरोबरच हिंदी सिनेमामध्ये नीओ-नॉईर या चित्रपट प्रकारातील चित्रपट गाजले आहेत. नीओ-नॉईर या फ्रेंच शब्दाचा इंग्रजीतला अर्थ न्यू ब्लॅक असा होतो. हा चित्रपट प्रकार युरोप-अमेरिकेबरोबरच भारतीय तसेच जगभरातील दिग्दर्शकांनी हाताळला आहे. ‘बदलापूर’ हा आगामी हिंदी सिनेमा नीओ-नॉईर प्रकारातील सिनेमा आहे. रूढार्थाने ‘डार्क थ्रिलर’ अशा प्रकारचा हा चित्रपट आहे. थरारपट म्हणू शकतो. 

‘बदलापूर’ या शीर्षकामुळे या सिनेमाचा बदलापूर या परिसराशी काही संबंध आहे का असा सहज प्रश्न मनात येतो. सिनेमाच्या शीर्षक आणि पोस्टरवरून सूड घेण्याचा नायकाचा प्रयत्न यात पाहायला मिळेल असे लगेचच समजते. परंतु, बदलापूर या पूर्व उपनगरांतील शहराशी या चित्रपटाचा संबंध पोस्टर, ट्रेलरवरून तरी दाखविण्यात आलेला नाही. करण जोहरचा ‘स्टुडण्ट’ वरुण धवन; राघव ऊर्फ रघु ही प्रमुख भूमिका साकारतोय आणि त्याला घेऊन दिग्दर्शक-छायालेखक लोकलने दादरहून बदलापूरला गेले होते. तिथे त्यांनी काही चित्रीकरणही केले आहे; असे जाहीर केले असले तरी याबाबत संदिग्धता आहे.
या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वरुण धवन साकारत असलेला नायक राघव हा मराठी माणूस म्हणून दाखविण्यात येणार आहे. बॉय नेक्स्ट डोअर अशी वरुण धवनची प्रतिमा पहिल्या चित्रपटापासून बनली आहे. या त्याच्या प्रतिमेला उभा छेद देण्याचा प्रयत्न करणारा हा वरुण धवनचा पहिलाच चित्रपट ठरणार आहे.
एका चोरीच्या घटनेदरम्यान रघूच्या देखत त्याची बायको आणि मुलगा यांचा खून होतो. पंधरा वर्षांनंतर रघू खुन्यापर्यंत पोहोचतो. चित्रपटाचे संक्षिप्त सारांशरूप एवढेच जाहीर करण्यात आले आहे.
आजच्या काळात चित्रपटाची हवा फेसबुक-ट्विटरबरोबरच मुख्यत्वे यूटय़ूब ट्रेलरमुळे अधिक निर्माण होते. तशी ती या चित्रपटाची नक्कीच झाली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर केवळ दोन दिवसांत लाखो लोकांनी ट्रेलर पाहिला. त्याचबरोबर ‘जी करदा’ हे गाणंही ट्रेलरवरून प्रदर्शित करण्यात आले आहे.
चॉकलेट बॉय ही आपली प्रतिमा केवळ तीन-चार चित्रपटानंतर बदलण्याचे वरुण धवनने ठरविले हे कौतुकास्पद म्हणावे लागेल. कारण प्रतिमेत अडकून एकाच प्रकारचे चित्रपट करायला मिळतात. आणि लोकांना हीच प्रतिमा पाहायची सवय लागली तर मग वेगळ्या विषयांचे, पद्धतीचे चित्रपट करणे धोकादायक ठरते. परंतु, पडद्यावरील कारकीर्द नुकतीच कुठे सुरू झाली असतानाच वरुण धवनने प्रतिमेला छेद देण्याचे ठरविणे हा धाडसी निर्णय आहे. कदाचित हिंदी सिनेमामधील बदललेले विषय, मांडणी हेही कारण यामागे असू शकते. वरुण धवन ‘बदलापूर’मध्ये नव्या लुकमध्ये दिसणार आहे. त्याच्या अस्सल वयापेक्षा साधारण दहा वर्षे अधिक वयाची भूमिका तो साकारतोय.
दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा ‘एजंट विनोद’ हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला नव्हता. त्यात स्पाय थ्रिलर असा प्रकार हाताळला होता. ‘एक हसीना थी’, ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटांप्रमाणेच श्रीराम राघवन यांनी पुन्हा एकदा ‘बदलापूर’द्वारे नीओ-नॉईर प्रकारचा चित्रपट बनविला आहे.
श्रीराम राघवन हे फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियामधून शिक्षण घेतलेले दिग्दर्शक असून त्यांनी बनविलेला डिप्लोमा चित्रपट ‘दी एट कॉलम अफेअर’ला १९८७ साली राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. त्याचबरोबर सीरियल किलर रामन राघव याच्यावरील माहितीपटही त्यांनी बनविला होता. एकूणच नीओ-नाईर प्रकारचे चित्रपट बनविण्याकडे श्रीराम राघवन यांचा अधिक कल दिसतो. ‘बदलापूर’ या चित्रपटात वरुण धवनची प्रेयसी म्हणून यामी गौतम दिसणार असून नवाझुद्दिन सिद्दिकी, हुमा कुरेशी, विनय पाठक, दिव्या दत्ता, राधिका आपटे असे साधारणपणे किंचित ‘हटके’ चित्रपट करणारे कलावंतही आहेत. हा चित्रपट २० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
सुनील नांदगावकर