दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक हा बॉलीवूडमधला अलीकडचा ट्रेंड आहे. नव्या वर्षांची सुरुवातही या ट्रेंडनेच होणार आहे. त्यासाठी बोनी कपूर यांनी तेलुगू बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरलेल्या ‘तेवर’ची निवड केली आहे.

चालू वर्षांत बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक हिंदीत आले. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’सारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य पद्धतीच्या ‘मेकिंग’चे अनेक प्रयत्न चालू वर्षांत हिंदीच्या रुपेरी पडद्यावर झाले आहेत. वेगवान कथानक, भरमसाट आडवीतिडवी गाणी, गाण्यांचे भडक चित्रीकरण, वाट्टेल तो विनोद आणि बेसुमार हाणामारी हा अगोदरच सिद्ध झालेला दाक्षिणात्य फॉम्र्युला हिंदी चित्रपटांमध्ये न रुळता तरच नवल. आगामी २०१५ वर्षांची सुरुवातही अशाच एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकने होणार आहे.

‘तेवर’ म्हणजे इंग्रजीत ‘अ‍ॅटिटय़ूड’ आणि त्यासाठी हिंदीतला आणखी एक समानार्थी शब्द आहे ‘टशन’, मराठीतील ‘ठसन’ म्हणतो ती नव्हे.

हिंदी सिनेमांचे अर्थकारण आणि उलाढाल प्रचंड वाढल्यामुळे आणि वर्षांची सुरुवात म्हणून अनपेक्षित कथानक, नवीन गोष्ट, नवीन ‘ट्रीटमेंट’ प्रेक्षकांसमोर आणण्यापेक्षा अगोदर सिद्ध झालेला फॉम्र्युला आणि तिकीटबारीवर हमखास यश मिळण्याची आशा असलेला सिनेमाच का करू नये असा ‘गल्लाभरू’ विचार बॉलीवूडचे तथाकथित निर्माते-दिग्दर्शक सर्वच जण करताना दिसतात. यात गैर काहीच नसले तरी वर्षांची सुरुवातच दाक्षिणात्य यशस्वी सिनेमाच्या हिंदी रिमेकने होतेय ही प्रेक्षकांच्या दृष्टीने तापदायक बाब ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

lp60

‘इश्कजादे’, ‘गुंडे’, ‘टू स्टेट्स’ अशा चित्रपटांनंतर अर्जुन कपूर आता प्रथमच वडील बोनी कपूर आणि काका संजय कपूर निर्माते असलेल्या ‘तेवर’मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारतोय. त्यामुळे तसे पाहिले तर अर्जुन कपूरसाठी हा घरचाच मामला आहे. अमित शर्मा दिग्दर्शित ‘तेवर’ चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर अशी जोडी प्रथमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांपैकी तेलुगू आणि तामिळ या दोन भाषांतील चित्रपट हे बहुतांशी ‘स्टार’ कलावंतांसाठी लिहिले व दिग्दर्शित केलेले चित्रपट असतात. दाक्षिणात्य चित्रपटांचे प्रेक्षक हे स्टार कलावंतांवर प्रचंड प्रेम करतात. त्यामुळे वैशिष्टय़पूर्ण फॉम्र्युला पुन:पुन्हा वापरून, गोष्टीत थोडासाच बदल करून दाक्षिणात्य चित्रपट केले तरी तेथील प्रेक्षक पुन:पुन्हा डोक्यावर घ्यायला तयार असतात, असेही वरवर पाहिले तर आढळून येईल.

‘ओकाडू’ नामक तेलुगू चित्रपटाचा ‘तेवर’ हा हिंदीतील रिमेक आहे. बोनी कपूर आपल्या मुलाला घेऊनच चित्रपट करीत असल्यामुळे अखंड सिनेमातून अर्जुन कपूर ‘लार्जर दॅन लाइफ’ कसा दाखविता येईल किंवा गेलाबाजार अर्जुन कपूरची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कशी उंचावेल याची तजवीज या सिनेमाद्वारे केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अर्जुन कपूर हा आग्रा येथे राहणारा कॉलेज युवक आहे आणि तो नावाजलेला कबड्डीपटू आहे. मनोज बाजपेयीने या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे, तर ज्येष्ठ अभिनेता आणि लेखक कादर खान ‘तेवर’द्वारे बऱ्याच कालावधीनंतर हिंदीच्या रुपेरी पडद्यावर पुनरागमन करीत असून त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

मूळचा तेलुगू चित्रपट २००३ मध्ये झळकला असून प्रचंड गल्ला या चित्रपटाने गोळा केला. महेश बाबू हा तेलुगू सिनेमाचा स्टार कलावंत त्यात होता. तेलुगूमधील प्रचंड बॉक्स ऑफिस यश पाहिल्यानंतर लगेचच २००४ मध्ये या मूळ चित्रपटाचा तामिळ रिमेकही झळकला आणि त्यात तेथील विजय हा स्टार कलावंत होता. हा तामिळ रिमेक अवघ्या सहा कोटी रुपयांत बनविला होता आणि तब्बल ५० कोटींहून अधिक गल्ला जमविला. त्यामुळे असा एकदा यशस्वी रिमेक झालेल्या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांसमोर आणून हिंदीतही गल्ला जमवावा एवढे साधे गणित निर्मात्यांनी केले असावे. अर्थात आपण काही विजय किंवा महेश बाबू यांच्यासारखे ‘स्टार’ नाही, असे अर्जुन कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केले असले तरी वडील बोनी कपूर यांना मुलाला ‘स्टार कलावंत’ बनवायचे आहे हे यावरून दिसतेच.

हमखास यशाचा फॉम्र्युला म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक हे गणित आगामी वर्षांच्या सुरुवातीलाच झळकणाऱ्या ‘तेवर’ या चित्रपटाद्वारे सिद्ध होते किंवा नाही ते तेव्हाच समजेल. हा चित्रपट ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय.