lp16आपल्याकडे सुट्टय़ा लागल्या की कुटुंबीयांबरोबर मजा करायला जायचे बेत ठरतात. कुणी समुद्रकिनाऱ्यावर जातो तर कुणी डोंगरदऱ्या भटकायला जातं. अमेरिकेत हॉलीवूड बीचवर सुट्टीमधला फेरफटकाही असाच मन ताजंतवानं करणारा..

साउथ फ्लॉरिडामध्ये किती तरी बीचेस आहेत, माझा सगळ्यात आवडता म्हणजे माझ्या परसदारातला हा हॉलीवूड बीच. बीच जरी घराच्या जवळ असला, तरी वारंवार जायला मात्र जमतंच असं नाही. जूनमधल्या मोठय़ा सुट्टीत, ख्रिसमसच्या तीन आठवडय़ांच्या सुट्टीत किंवा एक आठवडय़ाच्या स्प्रिंग-ब्रेकमध्ये अमेरिकेत दोन वेगवेगळ्या दिशांना राहणारी मुलं आपला कुटुंबकबिला घेऊन डेरेदाखल होतात. वेगवेगळे प्लॅन्स आधीच ठरविलेले असतात. शनिवारी किंवा रविवारी बीचला सगळ्याच्या सगळ्या ११ जणांच्या जथ्यांनी जायचं हे ठरलेलंच असतं.
तीन गाडय़ांमध्ये लहान-मोठी माणसं, धाकटय़ा नातवाची कार-सीट, आईची व्हीलचेअर, बीचवर बसायला आईसाठी फोल्डेबल लाउंज चेअर, वाळूत बसायला ब्लँकेटं (धुता येणारी), सँडविचेस, मुलांना वाळूत खेळायला प्लॅस्टिकची बादली, खुरपं, बीच-बॉल, त्यांचे स्विमिंगचे कपडे, रबरी फ्लिप-फ्लॉप्स, सँडविचेस, लाडू, प्यायचं पाणी असं सगळं सामान भरलेलं असतं. सगळ्यांनी सन-टॅन लोशन चोपडलेलं असतं आणि डोक्यावर हॅट्सही असतात. मोठय़ांनी डोळ्यांवर काळे चश्मे घातलेले असतात.
बीचवर जाणारा एक रस्ता बाकी रस्त्यांपेक्षा जास्त रम्य आहे. उन्हाळ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फुललेले गुलमोहोर, छोटी टुमदार घरं, त्यांच्या आजूबाजूच्या बागा या सगळ्यांनी या रस्त्यावरचा ड्राइव्ह अजूनच छान वाटतो. बीचच्या अगदी जवळ तीन मजली प्रशस्त गराज आहे. काहीही पैसे द्यावे लागत नाहीत. गाडय़ा पार्क करून जमेल ते सामान उचलून आईला व्हीलचेअरमध्ये बसवून आमचा ग्रुप बीचच्या दिशेने चालू लागतो. बीचवर तशी बरीच गर्दी असली, तरी ती प्रमाणात असते(जास्ती गर्दीमुळे होणारा त्रास नाही आणि शुकशुकाटही नाही). पाच मैल लांबीचा सोनेरी-तपकिरी वाळूचा पट्टा सगळ्यांचंच स्वागत करतो. मुलांना पाण्यात जाण्याची घाई झालेली असते. भराभर चालून (वाळूत जितक्या भराभर चालता येईल तितक्या) आईची लाउंज चेअर उघडून तिला तिचं आवडतं पुस्तक देऊन मग ब्लँकेट पसरून मी, मुलगी, सून आणि मुलीची सासू (माझी मैत्रीण ज्योत्स्ना)जरा टेकतो. मोठी नातवंडं पुरुष मंडळींबरोबर पाण्यात जातात. छोटय़ा नातवाला वाळूत किल्ला बांधायचा असतो. बादलीतून तो उत्साहाने पाणी आणतो. या बीचवर समुद्राचं पाणी किनाऱ्यापासून आत खूप लांबवर जाईपर्यंत अगदी उथळ आहे. बीचवर येऊन समुद्राच्या पाण्याचा पायाला स्पर्शही होऊ न देता परतणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतील. माझी आई ९४ वर्षांची आहे. बीचवर आल्या आल्या नातीचा हात धरून समुद्राच्या पाण्यात पाय भिजवल्याशिवाय ती खुर्चीत बसलेली मला आठवत नाही. मी आणि ज्योत्स्ना ओल्या वाळूत चालायला जातो. आजूबाजूला गोरे, काळे, सावळे लोक आपापल्या आवडीप्रमाणे बीचचा आस्वाद घेत असतात. कमीत कमी कपडे घालून सूर्यस्नान करणारे स्त्री-पुरुष, थंड बीअरचे घुटके घेत समुद्रात लांब वर नांगरलेल्या जहाजांकडे बघत गाणी ऐकत प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेणारे प्रौढ, तालावर जमेल तसे नृत्य करणारे तरुण-तरुणी, दोन पामच्या मध्ये झोळी बांधून त्यात आरामात पुस्तक वाचत बसलेले किंवा गाणी ऐकत बसलेले एकटे जीव, पाण्यात आत-बाहेर करणारी तरुण मुलं- सगळेच या बीचचं सौंदर्य वाढवीत असतात. जरा उंचीवर आपल्या छोटय़ा घरात -खरं तर घराच्या बाहेर बसून समुद्रावर लक्ष ठेवणारा लाइफ गार्ड पाण्यातल्या आणि पाण्याबाहेरच्या लोकांना सारखीच मदत करतो. एकदा आम्ही बीचवर गेलो होतो, तेव्हा एक छोटी मुलगी आपल्या माणसांपासून कशी कोण जाणे, लांब गेली. इकडच्या सगळ्याच मुलांना कुठल्या प्रसंगी कोणाची मदत घ्यायची, ते व्यवस्थित माहीत असते) लौकरच लाइफ गार्डनी माइक वापरून सगळ्यांना ऐकू जाईल, अशी अनाउन्समेंट केली. मुलीची माणसं तिला शोधत होतीच. एव्हाना लाइफ गार्डच्या ऑफिसबाहेर बरीच गर्दी झाली होती. मुलीला तिची माणसं मिळाल्यावर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. लाइफ गार्ड हरिकेन सीझनच्या दिवसांत समुद्रात पोहणं सुरक्षित आहे अथवा नाही ती माहिती बोर्डवर लिहून आपल्या ऑफिसच्या बाहेर बोर्ड ठेवतो. कधी जर त्याच्या ऑफिसच्या बाहेर जांभळ्या रंगाचं निशाण फडकत असेल, तर पाण्यात उतरणं सुरक्षित नाही असाही अर्थ असतो.
वाळूत चालत असताना वर्दळ जराशी कमी झाली, की पाण्यापासून जरा लांबवर वाळूच्या शिल्पांचा पट्टा दिसतो. या बीचवर वाळूची शिल्पं बनवायला शिकवणाऱ्या कलावंतांचे स्पेशल क्लासेस असतात. वाळूमधली शिल्पं बघायला लोक लांबून येतात. पाण्याने पातळ केलेल्या व्हाइट ग्ल्यूचा स्प्रे जरी शिल्पांचं आयुष्य थोडं वाढवत असला, तरी भरतीवर आणि वाऱ्या-पावसावर यांचं आयुष्य अवलंबून असतं. एकंदरीत ही शिल्पं तशी अल्पायुषीच. बघायला येणाऱ्या लोकांची गर्दीही म्हणूनच जास्ती. कलाकाराला लोक मागे उभं राहून फुकटचा सल्लाही देताना दिसतात.
lp17समुद्रावरच्या वाळूची काळजी वेगवेगळ्या प्रकारे घेतली जाते. वाळूंच्या खाणींमधून ठरावीक इंटरव्हल्सनी वाळू आणून बीचवरच्या वाळूची लेव्हल सांभाळणं, रोज वाळू रेक करणं-पिंजणं, कचरा उचलणं-बीचच्या वाळूत ठिकठिकाणी ट्रॅश कॅन्स ठेवलेले असतात-ते रिकामे करणं, (वाटेल तिथे कचरा टाकणारे लोक अमेरिकेत अपवादानेच दिसतात) पामच्या झाडांची निगा राखणं ही सर्व कामं सकाळी अगदी लवकर स्वच्छता कामगार करतात. वाळू रेक करण्याचा उद्देश तिचा थर जास्ती घट्ट होऊ नये असा असतो. लेदरबॅक जातीच्या समुद्री कासवांच्या माद्या समुद्रातून बाहेर येऊन वाळू आपल्या पायांनी खणून खड्डे करतात आणि त्यात अंडी घालून खड्डे परत वाळूने झाकून टाकतात. अंडय़ांमधून पिल्लं बाहेर आली, की ती ताबडतोब समुद्राच्या दिशेने जायला लागतात. चंद्र, चांदणं यांच्या नैसर्गिक प्रकाशात त्यांना समुद्राची दिशा बरोबर कळते. अलीकडे असं लक्षात आलं आहे की बीचवर असलेल्या मोठय़ा इमारतींच्या बाहेर रात्रभर जे प्रकाशाचे झोत असतात, त्यांनी ही कासवांची पिल्लं समुद्रात न जाता रस्त्यावर येतात आणि मरून जातात. या अवाढव्य कासवांची संख्या जगभर कमी होते आहे (मलेशियातून तर ती नामशेषच झाली आहेत.) आपल्या परीने हा ऱ्हास थांबवायला अमेरिका प्रयत्न करीत असते. आमच्या हॉलीवूड बीचच्या जवळ असलेल्या मोठय़ा बिल्डिंग्जनी बाहेरचे दिवे अगदी मंद केले आहेत. बीचवर दर शनिवारी आणि रविवारी इच्छुकांसाठी मरिन बायॉलॉजीचे फुकट क्लासेस असतात.
हॉलीवूड बीचचं वाळूमधलं वातावरण जसं आकर्षक आहे, तसंच वाळूच्या बाहेरचं.
समुद्रात पोहून आणि डुंबून झालं की मुलं बीचवर असलेल्या गोडय़ा पाण्याच्या शॉवर स्टॉलमध्ये जाऊन कावळ्याची अंघोळ करतात (अंगावरची वाळू, खाऱ्या पाण्याचे ओघळ घालवण्यापुरती)आणि मग ‘भूक-भूक’ करायला लागतात. ही भूक पिझ्झा आणि आइस्क्रीमची असते खरं तर. आमची मिरवणूक वाळूमधून चालत छोटी दगडी भिंत ओलांडते आणि बोर्ड-वॉक ओलांडून पिकनिक पॅव्हिलियनमध्ये येऊन स्थानापन्न होते. पॅव्हेलियनमध्ये बसायला खूप बेंचेस, डोक्यावर छत असतं. बार्बेक्यू करायला ग्रिल्सही असतात.
पॅव्हेलियनच्या एका बाजूला तोंड केलं तर समुद्र, बोर्ड-वॉक, वाळू आणि समुद्र. दुसऱ्या बाजूला मान फिरवली, की दिसतं खास छोटय़ा मुलांकरिता असलेला कमी उंचीचा तरणतलाव आणि त्यात असलेलं कारंजं. आजूबाजूला खूप मोकळी जागा. माझा लहान नातू जेव्हा तलावात उतरतो, तेव्हा आम्ही पॅव्हेलियनमध्ये बसून त्याच्यावर लक्ष ठेवतो. कधी कधी एखादी स्पॅनिश गाण्यांच्या तालावर नाचत, जेवण बनवत, मजा करणारी फॅमिली आपल्याबरोबर पॅव्हिलियन शेअर करते. शॉपिंग कार्टमध्ये आपलं बिऱ्हाड घेऊन हिंडणारा एखादा बेघरही बर्गर खात समुद्राकडे रिकाम्या नजरेने बघत असलेला दिसतो. खाणं झालं की सगळी मंडळी जरा शतपावली करायला निघतात. पॅव्हेलियनला लागून लांबच्या लांब बोर्ड-वॉक असतो. (या बीचवर लोक त्याला ब्रॉडवॉक म्हणतात). बीचला लागून रमतगमत पायी फिरायला हा रस्ता असतो. रस्त्याच्या बाजूला बीचवर लागणाऱ्या सामानाची, बाहेरून आलेल्या प्रवाशांना खास फ्लॉरिडाच्या वस्तू विकणारी, औषधांची, खेळण्यांची खूप दुकानं आणि कॅफेज-जिथे आत किंवा बाहेर बसून लोक खाण्या-पिण्याचा आणि संगीताचा आस्वाद घेतात- यांची लाइन असते. फक्त शनिवारी आणि रविवारी जॉशचं पिकनिकला लागणाऱ्या आणि आवडणाऱ्या लिकला ऑरगॅनिक फळं, भाज्या, ड्राय फ्रूट्स, सॅण्डविचेसचं दुकान लागतं आणि खूप लोकांना खुणावतं. ब्रॉडवॉकवर वेगवेगळ्या राइड्स घ्यायला लागणारी वाहनं भाडय़ानेही घेता येतात. (मोटरवर चालणाऱ्या वाहनांना इथे परवानगी नसते). बायसिकल्स, ट्रायसिकल्स, घोडा गाडय़ा, सायकलरिक्षा, स्केट्स अशा वेगवेगळ्या ‘वाहनांनी’ किंवा पायी रमत-गमत लोक ब्रॉडवॉकचा फेरफटका करताना दिसतात. वाळू आणि ब्रॉडवॉक वेगळे करणाऱ्या छोटय़ा भिंतीवर शांत बसून डोळ्यांपुढून एका लयीत चाललेलं जग बघत असलेले मस्त मुसाफिरही खूप असतात. शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या संध्याकाळी बीचवरच्या ओपन एअर थिएटरमध्ये गाण्यांचे किंवा इतर करमणुकीचे चांगल्या दर्जाचे कार्यक्रम विनामूल्य असतात. बीचवर एखादा सुंदर दिवस घालवायला हे सगळं पुरं आहे, नाही का?
शशिकला लेले