‘वासंतीमावशी तुमच्याकडे पोस्टमन काका आले आहेत.’ शेजारच्या छोटय़ा राजूचे हे शब्द ऐकून खिन्नपणे तंद्रीत बसलेली वासंती एकदम भानावर आली. उठून उभी राहाते तोच पोस्टमनने विचारले, ‘‘आपणच वासंती गोसावी आहात का?’’ ‘‘हो’’ वासंती म्हणाली. पोस्टाने आपल्यासाठी काय आले असेल याचा तिला थोडासा अंदाज आला. पण तरीही त्यावर आणि आपल्या सरकारी यंत्रणेवर तिचा क्षणभर विश्वास बसला नाही. सरकारकडून तिच्या नावावर एक लाख रुपयाचा धनादेश आला होता. कारण काय तर सुभाष गोसावी तिचा नवरा नुकत्याच मुंबईत घडलेल्या दारूकांडाचा बळी झाला होता. पोस्टमनने तिच्या हातात पाकीट ठेवले. सही करताना तिचे डोळे भरून आले. तिच्या व सुभाषच्या लग्नाला २५-२६ वष्रे झाली होती. पण कधीही तिने कुठेही सही करून सौ. वासंती गोसावी असे लिहिले नव्हते. पण तरीही आज ते बंद पाकीट घेताना आपल्या नावामागे ‘सौ.’ नाही याचे तिला अतिशय दुख झाले. याच पत्राबरोबर अजूनही एक पत्र तिच्या नावावर आले होते. त्यावरचे पाठवणाऱ्याचे नाव बघून पुन्हा तिला दुखाचे भरते आले. ते पत्र होते नम्रता कॉलेजच्या प्राचार्याचे. सुभाष त्याच कॉलेजात शिपाई होता. बारावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले होते. पण घरच्या अडचणीमुळे पुढे न शिकता आल्यामुळे त्याने नोकरी धरली होती. नोकरीची २०-२१ वष्रे व्यवस्थित गेली. संसार व्यवस्थित चालू होता. दोन मुलींचा जन्म पाठोपाठ झाला. त्यानंतर मुलगा व्हावा या कारणाने घेतलेल्या संधीच्या वेळी मुलगा होण्याऐवजी दोन जुळ्या मुली झाल्या. आता चार मुलींचा सांभाळ करणे ओढाताणीचे होऊ लागले. चार मुलींचे शिक्षण, कपडालत्ता, करता करता नाकी नऊ येऊ लागले. विवंचना, काळज्या विसरण्याचा सोपा मार्ग म्हणून सुभाष सहजच एखादा पेग घेऊ लागला.
त्यामुळे मनाला तात्पुरता विरंगुळा वाटायचा. तिथे रोज येणारे काहीजण हळूहळू त्याचे मित्र झाले. वेगवेगळी कारणे म्हणून एकमेकांना दारूची पार्टी देणे घेणे यातून व्यसन वाढू लागले. मुली, संसार इतकेच काय आपली नोकरीसुद्धा त्याच्या स्मरणातून गेली. मागची तीन ते चार वष्रे तो काहीही न करता रात्रंदिवस याच ठिकाणी दारू पिऊ लागला. कॉलेजमधून अनेक वेळा पत्रे येऊनही त्याने बिनधास्तपणे त्याकडे दुर्लक्ष केले. कॉलेज सरकारी होते त्यामुळे त्याला कोणीही नोकरीतून काढू शकत नाही याची त्याला खात्री होती. पण आज त्याच्याच कुकर्माने त्याला केवळ कॉलेजमधूनच नव्हे तर या जगातूनही कायमचे हद्दपार केले होते. त्याच्या जगण्याची शिक्षा मात्र त्याला कमीच, पण वासंती आणि तिच्या मुलींना जबरदस्त भोगायला लागणार होती. मोठय़ा दोघींच्या वयात दोन-दोन वर्षांचेच अंतर होते. त्यामुळे योग्य वेळी त्यांची लग्ने झाली होती. त्याच्या कॉलेजमधील प्राचार्याच्या ओळखीच्या एका सुरतच्या मुलाबरोबर मोठीचा विवाह झाला होता. जावई हिऱ्याच्या कारखान्यात काम करत होता. त्याच्याच एका मित्राबरोबर दुसरीचे लग्नही झाले. तो जावई कपडय़ाच्या गिरणीत काम करत होता. त्या दोघींचीही वासंतीला अजिबात काळजी नव्हती. आता जुळ्या दोघी यंदा बारावी पास झाल्या होत्या. तिनेच धडपड करून सुभाषच्या कॉलेजमधील प्रोफेसरांच्या मदतीने त्यांच्यासाठी प्रवेश अर्जाचे फॉर्म आणले होते. मोठय़ा दोघी दहावीपर्यंतच शिकल्या, पण या जुळ्या दोघींना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण आता सगळेच वातावरण बदलले होते. दोघींपकी एकीला कॉलेजमध्ये कारकून म्हणून अनुकंपा तत्त्वावर नोकरी देऊ करण्याचे पत्र आता वासंतीच्या हातात होते. मनोमन तिने देवाचे आभार मानले. अशा बिनकामाच्या नवऱ्याला पोसायचे, वरून त्याला व्यसनासाठी पसे पुरवायचे या गोष्टीचा आता आता तिला तिटकारा यायचा. स्वत:चाच राग यायचा. घटस्फोट घेऊन त्याच्यापासून दूर जायचे असेही अनेक वेळा मनात यायचे. पण तरीही त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिने असे पाऊल उचलण्याचे धर्य दाखवले नाही.
धाकटय़ा दोघींपकी एकीला नोकरी मिळाली तरी दुसरी शिकली असती, पण त्या जुळ्या होत्या त्यामुळे एकमेकींपासून वेगळे वागणे त्यांना जमत नव्हते. त्यांनी दोघींनी विचार करून ठरवले की मुलीच्या जागी आईनेच नोकरी करावी. तिचे वय अजून ४५-४६च होते. त्यामुळे अजून १५ वष्रे ती नोकरी करू शकली असती आणि धाकटय़ा दोघींना मनासारखे उच्च शिक्षण घेता आले असते.
विचार पक्का झाल्यावर तिने मुलींच्या मदतीने कॉलेजच्या प्राचार्याची भेट घेतली. त्यांनाही तिचा विचार पटला. ‘संस्थाचालकांशी बोलून मी तुम्हाला कळवते’ असे त्या म्हणाल्या. वासंतीला खूप हायसे वाटले. आता जुळ्या दोघी पुढे शिकणार होत्या. एकीने ठरवले होते पोलीस इन्स्पेक्टर व्हायचे आणि असे दारूचे अड्डे उद्ध्वस्त करायचे, तर दुसरीने ठरवले होते सनदी अधिकारी होऊन गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या समाजातील सर्वाना जबर शिक्षा व दंड करायचा. कायद्याची अंमलबजावणी करून ती मोडणाऱ्याला समाजातून वाळीत टाकायचे. जुळ्या दोघींचे विचार ऐकून वासंतीला त्यांचे खूप कौतुक वाटले. इतक्या लहान वयात मोठे निर्णय घेणे हे त्यांना परिस्थितीने शिकवले होते.
कॉलेजातील प्रोफेसरांनी मदतीचे हात पुढे केले होतेच. प्रश्न होता फक्त खूप कष्ट व मेहनत करून अभ्यास करण्याचा. तो दोघींनी आईला पटवून दिला. तिघींच्या चेहऱ्यावरच्या दु:खाची जागा आता आनंद आणि समाधानाने घेतली होती. त्याच्या परमोच्च शिखरावर असताना फोन खणखणला. एकीने फोन उचलला. पलीकडून आवाज आला. ‘मी नम्रता कॉलेजमधून बोलतेय. संस्थाचालकांनी वासंती गोसावी यांना नोकरी देण्याचे ठरवले आहे.’ ‘‘काय आईला नोकरी!’’ तिघींच्याही डोळ्यांतून घळाघळा दुखांचे आणि आनंदाचे मिश्र अश्रू ओघळू लागले.
आरती उकिडवे – response.lokprabha@expressindia.com