टीम लोकप्रभादेशभर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. या देशातला सुबुद्ध, जबाबदार नागरिक म्हणून तुम्हीही तुमचं अमूल्य मत देणार आहात. तुमचं प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे, कारण ते देशाचं भवितव्य घडवायला हातभार लावणार आहे.

मतदानाचा दिवस सुट्टीचा असं समजण्याचे दिवस आता गेले..
मत दिल्यामुळे कुठे काय बदलतं, असं मानण्याचे दिवस आता नाहीत..
माझं एक मत नाही मिळालं तर कुठे बिघडतं असा तर विचारही करू नका.

कारण तुमचं प्रत्येकाचं मत अमूल्य आहे. ते उद्याचा देश घडवणारं आहे. या बदलाच्या प्रक्रियेचे आपण या देशाचे नागरिक साक्षीदार असणार आहोत. भारतीय मतदाराचं वर्णन शहाणपणाने वागणारा असं केलं जातं, कारण हा मतदार थेट बोलत नसला, त्याला चेहरामोहरा नसला तरी तो शांतपणे त्याला हवं तेच करत असतो. तो शांतपणे मतपेटीच्या माध्यमातून भल्याभल्यांना त्यांची जागा दाखवून देतो. जगात किती तरी देशांमध्ये रक्तरंजित संघर्षांतून सत्तापालट झाला आहे, पण शहाण्या भारतीय मतदाराने आजवर रक्ताचा एक थेंबही न सांडता, मतपेटीच्या माध्यमातून सत्तापालट करून दाखवला आहे. सत्तेचा दर्प निर्माण झालेल्यांना आपल्या एका मताच्या माध्यमातून घरी पाठवले आहे. प्रत्येक नागरिकाचं एक मत असलं तरी त्यांची संख्या कोटय़वधींच्या घरात जाते. म्हणून आपलं प्रत्येकाचं मत अतुल्य आहे, अमूल्य आहे. ते आपलं सामथ्र्य आहे. मी मागच्या वेळी अमक्या तमक्याला मत दिलं, पण तो निवडून आलाच नाही, माझं मत वाया गेलं, असं कुणी तरी सहज म्हणून जातं. हा विचार बदलला पाहिजे, कारण त्या मताच्या माध्यमातून दिल्लीत जाऊन आपलं प्रतिनिधित्व कुणी करावं हे आपण सांगत असतो. त्यामुळे मत म्हणजे आपली भूमिका असते. आपलं म्हणणं असतं. ते कधीच वाया जात नसतं. म्हणूनच मतदानाला जाताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की, आपल्याला हवा तो उमेदवार निवडून आला नाही म्हणजे आपलं मत वाया गेलं असं अजिबात होत नाही.
या पाश्र्वभूमीवर आपण यंदा मतदान करणार आहोत. यंदाची निवडणूक ही जितकी राजकीय पक्षांच्या जाहिरातबाजीने गाजली तितकीच ती निवडणूक आयोगाच्या जाहिरातींमुळेदेखील चर्चेत आहे. पक्षांच्या बॅनरबाजीवर आलेल्या नियंत्रणामुळे मोठमोठे कटआऊट्स, फलक तुलनेने कमी झाले असले तरी गेल्या एक-दोन महिन्यांत निवडणूक आयोगाने मात्र अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स झळकवले आहेत. ‘ही खूण मोलाची आहे’. ‘आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र आहे, पण आपले नाव मतदार यादीत आहे का?’ अशा जाहिरातींचा काही प्रमाणात का होईना भडिमार आयोगाने केला आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांमध्येदेखील मोठय़ा प्रमाणात मतदानाविषयी संदेशांची देवाणघेवाण वाढली आहे. या सर्वाचा परिणाम असा की, या निवडणुकीत तब्बल दहा कोटींहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यातील तरुणाईचा टक्कादेखील लक्षणीय आहे. परिणामी आपल्याला पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या वाढीव टक्केवारीत दिसलाच आहे. हा लेख हातात येईल तेव्हा महाराष्ट्रातदेखील मतदानाचे दोन टप्पे पार पडले असतील. त्यातही भरघोस मतदान झालेले असेल, कारण आपण सगळेच जण आपलं पवित्र कर्तव्य पार पाडणार आहोत. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस न समजता मतदान करणार आहोत.
नेमके कोणाला मत द्यायचे?
आपल्याकडील सर्वच निवडणुका या हमखास एकगठ्ठा आणि पारंपरिक मतदारसंघाच्या गणितावर लढवल्या जातात. त्याच अनुषंगाने उमेदवार देणे, विकासकामात झुकते माप देणे अशा गोष्टी सुरू असतात, पण केवळ माझ्या आजोबा-पणजोबांनी, वडिलांनी एखाद्या ठरावीक चिन्हावर शिक्का मारला म्हणून मीसुद्धा मारायचा का? असं अजिबात करू नये आणि यापूर्वी केलं असेल तर यापुढे तरी करू नये. यंदाच्या निवडणुकांत मोठय़ा प्रमाणात मतदान करणारी तरुण पिढी हे गृहीतक साफ मोडून टाकणार आहे, किंबहुना हे सर्वानीच करणे गरजेचे आहे, कारण कार्यकर्त्यांनी पक्षांशी वाहिलेल्या निष्ठा, त्यावर उभे राहिलेले पक्ष ही परिस्थिती आता राहिलेली नाही. पक्ष बदलले, निष्ठावान बदलले, नवे पक्ष आले, नवे विचार आले, मग आपल्या मतातदेखील बदलत्या विचारांचे, घटनांचे प्रतिबिंब हवेच हवे. अन्यथा वाडवडिलांच्याच कीर्तीचे गोडवे गात बसणे जसे मूर्खपणाचे लक्षण मानले जाते तसेच वडील सांगतील त्याला मत द्यायचे हे मूर्खपणाचेच लक्षण असल्याचे आधीच सांगितले गेले आहे.
असे असले तरी जनमानसावर ज्यांचा प्रभाव आहे असे आपले अनेक तारे तारका मतदानाच्या काळातच आयफा अ‍ॅवॉर्डसाठी परदेशात निघाले आहेत. आपल्या अमूल्य मतापेक्षा त्यांना त्यांचे आर्थिक व्यवहारच जास्त महत्त्वाचे वाटतात. आणि त्यांना आपण अतोनात महत्त्व देत असतो. हेही मूर्खपणाचेच लक्षण.
पक्ष की उमेदवार
सर्वसाधारणपणे सर्वानाचा हा प्रश्न बऱ्याच वेळा छळत असतो. नेता म्हणून एखादी व्यक्ती खूप चांगली असते, पण तिच्याच पक्षाचा स्थानिक उमेदवार मात्र काम करणारा नसतो. हीच परिस्थिती कधी कधी नेमकी उलटीदेखील असते.
मग नेता म्हणून जी व्यक्ती हवी असते तिला पाठबळ म्हणून त्या पक्षाच्या उमेदवाराला मत देणे बऱ्याच वेळा क्रमप्राप्त होऊन बसते. देशपातळीचा विचार महत्त्वाचा की स्थानिक प्रश्न महत्त्वाचा? स्थानिक प्रश्न महत्त्वाचाच, पण तो सोडविण्यास स्थानिक प्रशासन असते. देशपातळीवरील विचार करताना लोकसभेत देशाच्या धोरणांना दिशा देण्याचे काम होते. त्यातून सुरू होणाऱ्या प्रक्रियेत देशाला अतुल्य बनविण्याची ताकद असते. या सर्वाचे बीज अर्थातच आपल्या अमूल्य मतात असते
‘नोटा’ची किंमत काय?
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार यंदाच्या निवडणुकांमध्ये ‘नोटा’ – नन ऑफ द अबव्ह हा पर्याय मतदारांना उपलब्ध झाला आहे. मात्र या पर्यायाबद्दल आजदेखील अनेकांच्या मनात संभ्रमच अधिक आहे. आपल्या मतदारसंघातून जे उमेदवार उभे आहेत, त्यातला कोणताच उमेदवार योग्य नाही, असे एखाद्या मतदाराला वाटत असेल आणि यापैकी कोणत्याही उमेदवाराला आपले मत द्यायचे नाही आणि हे सर्वापासून गुप्त ठेवूनच त्याची नोंददेखील करायची आहे, अशी जर एखाद्या मतदाराची इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतदान यंत्रावर सर्व उमेदवारांच्या यादीत सर्वात शेवटी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ‘कोणताही उमेदवार नको’ हे मत नोंेदविण्याचा हा पर्याय असला तरी सध्या तरी या मताला काहीच किंमत नाही, कारण ‘नोटा’ला किती मतं मिळाली यावर मतदानाचा निकाल अवलंबून असणार नाही. ‘नोटा’च्या मतांची नोंद झाली तरी वैध मतांपैकी सर्वात जास्त मते ज्याला मिळाली आहेत त्यालाच विजयी उमेदवार म्हणून घोषित केले जाणार आहे. एखाद्या मतदारसंघात एकच उमेदवार उभा असेल, तर त्याला आपोआपच विजयी घोषित केले जाणार आहे. अशा प्रसंगी मला हा उमेदवार नको, हे सांगायची कसलीही सोय असणार नाही. थोडक्यात काय, तर ‘नन ऑफ द अबव्ह’ म्हणजेच कोणीच लायक नाही, असे मत नोंदविण्याचा अधिकार आहे, पण त्याला कसलीही किंमत अजिबात नाही. मग अशा प्रकारे आपले मत नोंदविण्यातून आपण काय साधणार?
त्यामुळे ‘नोटा’ हा पर्याय दिला असला तरी तो खरोखरच पर्याय आहे का याचा आपण आपल्यापुरता तरी गांभीर्याने विचार करायला हवा. खरं तर प्राप्त परिस्थितीत तो व्यवहार्य पर्यायच नाही. समजा, की आपल्या सोसायटीत कार्यकारिणी निवडताना यातला कुणीच योग्य नाही, असं सगळ्यांनीच म्हटलं आणि कुणीच निवडून आलं नाही, तर सोसायटी कोण चालवणार? हा प्रश्न निर्माण होतो. तसंच देशाचंही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
म्हणूनच मतदान केले पाहिजे. जागरूकतेने केले पाहिजे. सर्वच स्तरांतून मतदानाविषयी झालेल्या जागरूकतेमुळे मतदान तर वाढणार आहेच, पण त्या मतदानात जर विवेक नसेल तर मात्र केवळ आकडेवारीचे डोंगर तयार होतील. आपलं मत अमूल्य आहे, पण त्यात अतुल्य भारत घडविण्याची ताकद आहे. ही ताकद पेलायची तयारी असणाऱ्यालाच आपलं मत द्यावं लागेल, अन्यथा अतुल्य भारत केवळ जाहिरातीतच पाहावा लागेल.