१९८४ साली घडलेली गोष्ट. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील काही तरुण विद्यार्थी उत्खननाच्या निमित्ताने राजस्थानातील एका गावामध्ये गेले होते. गावाबाहेरच्या जागेत त्यांचे उत्खननाचे काम सुरू होते. काही गावकरी नित्यनेमाने तिथे येऊन आश्चर्यचकित नजरेने ते पाहायचे. हे सारे इथे येऊन गाडलेले मुडदे बाहेर काढण्याचे काम का बरे करताहेत, किंवा काय बरे हे शोधताहेत अशा आशयाचे गावकऱ्यांचे प्रश्न असत. त्यामध्ये पंच्याऐंशी पार केलेली एक वृद्ध स्त्रीदेखील होती. तीदेखील तेच प्रश्न या विद्यार्थ्यांना सारखेसारखे विचारत असे. एके दिवशी मात्र तिने वेगळाच प्रश्न विचारला आणि मग मात्र त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनाच भोवळ यायची वेळ आली. ती म्हणाली, ‘अरे बरेच दिवस एक विचारेन म्हणते.. पूर्वी आमच्या गावात खूप गोरे असलेले असे लोक खूपदा यायचे. अनेकदा ते घोडय़ावर तर कधी गाडीतून यायचे. पण बरीच वर्षे झाली ते काही दिसले नाहीत! कुठे गेले ते? माझ्या बालपणी तर मी त्यांना अनेकदा पाहिलंय, खूप उमदे दिसायचे ते. पण गेली काही वर्षे ते जणू गायबच झाले आहेत. काही माहित्येय का तुम्हाला त्यांच्याबद्दल?’
देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ३७ वर्षे झाली होती. पण राजस्थानातील एका दुर्गम खेडय़ात राहणाऱ्या त्या वृद्ध महिलेपर्यंत स्वातंत्र्य काही पोहोचलेले नव्हते. याला काय म्हणणार? हे अपयश कुणाचे? हा किस्सा एरवी कुणी सांगितला असता तर कदाचित विश्वास नसता बसला, पण देशातील त्या वेळचे सर्वाधिक लोकप्रिय असलेले पुरातत्त्वतज्ज्ञ या घटनेचे साक्षीदार होते. हे अपयश तुमचे, माझे, सर्वाचेच आहे! आजही अनेकदा एक विरोधाभास वर्तमानपत्रांतून पाहायला मिळतो. जागतिक महिला दिन किंवा बालहक्क दिन असतो. त्या दिवशी पाठीवर चाबुक ओढणाऱ्या कडकलक्ष्मी झालेल्या लहान मुलांची किंवा डोक्यावर ओझी वाहणाऱ्या महिलांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. आणि यांच्या लेखी या विशेष दिनाचे महत्त्व काय अशा प्रश्नांची चर्चा होते. हे सारे याच एका भारतीय समाजाचे घटक आहेत. कायदे झाले आहेत, त्या साऱ्यांना हक्कही कागदोपत्री मिळाले पण ते सारे त्यांच्यापर्यंत पोहोचणार केव्हा हा प्रश्नच आहे.
स्वातंत्र्याची चर्चा करताना आपण केवळ स्वतच्या स्वातंत्र्याबाबत, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याबाबत गप्पा मारतो. पण आपणही अभिव्यक्त होऊ शकतो, तो आपला अधिकार आहे, हेही माहीत नसलेला मोठा समाज आपल्याच देशात आहे. त्यांचा विचार आपण केव्हा करणार?
स्वातंत्र्योत्तर कालखंडात ७०-८०च्या दशकापर्यंत स्वातंत्र्याचे मूल्य माहीत असलेली पिढी होती. आता जागतिकीकरणानंतर जन्माला आलेली पिढी आहे. पिढीगणिक बदल होतच असतात, ते अपरिहार्यच आहेत. पण या पिढीच्या दृष्टीने देशप्रेम हे क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर तिरंगा फडकावण्यापर्यंत मर्यादित राहिलेले दिसते. स्वातंत्र्याच्या आशाआकांक्षा पोहोचायला हव्यात असाही एक समाज या देशात आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत या देशातील प्रत्येक लहान मुलगा शाळेत जाईल आणि घरच्या परिस्थितीमुळे त्याला/तिला शाळा सोडावी लागणार नाही, तेव्हा आपण खऱ्या स्वातंत्र्याच्या दिशेने पावले टाकलेली असतील कारण खरे स्वातंत्र्य आणि तिची मूल्ये ही त्यांचे भान देणाऱ्या शिक्षणातूनच येतात!

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
student copying Nashik division
नाशिक : पहिल्या दिवशी नक्कल करणारे दोन जण ताब्यात, विभागात दहावी परीक्षेला सुरुवात
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Rat tail in student food akola
अकोला : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उंदराचे शेपूट! दहा विद्यार्थ्यांना विषबाधा