नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत भारत चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. आपण हॉकीचा सुवर्णकाळ अनुभवला होता हे स्वप्न वाटावे अशी आपली शोकांतिका का झाली आहे?

बेभरवशी कामगिरी व आत्मघातकी खेळ हे भारतीय हॉकीपटूंचे कायमचेच वैशिष्टय़ ठरले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी केल्यानंतर नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत भारत चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. घरच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीत व त्यानंतरच्या कांस्यपदकाच्या लढतीत आत्मघातकी खेळ करीत पराभव ओढवून घेतला. त्यांच्या या कामगिरीमुळे प्रेक्षकांची सपशेल निराशा झाली.
भारताने यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. पाठोपाठ त्यांनी दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. एवढय़ा या चांगल्या कामगिरीनंतर या वर्षांची सांगता ते चॅम्पियन्स स्पर्धेतील जेतेपदाने करतील अशी अपेक्षा होती. घरचे मैदान, अनुकूल वातावरण व प्रेक्षकांचा पाठिंबा या तीन गोष्टींचा लाभ ते घेतील अशी अपेक्षा होती. मात्र सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव हा भारतीय हॉकीचा अविभाज्य घटक असल्यामुळे संघाच्या कामगिरीत सतत चढउतार पाहावयास मिळतात. त्याचाच प्रत्यय घडवीत भारताने उपांत्य लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकडून हार स्वीकारली. कांस्यपदकाच्या लढतीतही त्यांना ऑस्ट्रेलियासारख्या तुल्यबळ संघापुढे हाराकिरी स्वीकारावी लागली. जर्मनीने अंतिम लढतीत पाकिस्तानला सहज हरवत पाच वर्षांनंतर ही स्पर्धाजिंकण्यात यश मिळविले. ही स्पर्धा पाकिस्तानी खेळाडूंच्या बेशिस्त वर्तनामुळेही खूप गाजली. त्यांच्या तीन खेळाडूंनी उपांत्य लढतीत भारतावर विजय मिळविल्यानंतर जो उन्माद केला तो खरोखरीच अशोभनीय होता. त्यातच त्यांच्यावर घाईघाईने कारवाई करीत भारतीय हॉकी संघटक व चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळले.
या स्पर्धेत साखळी गटातच भारताची अग्निपरीक्षा होती. अर्थात स्पर्धेतील आठही संघांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार असल्यामुळे साखळी सामन्यांना फारसा अर्थच नव्हता. एवढेच की उपांत्यपूर्व फेरीतील स्थान व प्रतिस्पर्धी संघ ठरविण्यापुरतेच त्याला महत्त्व होते. भारतापुढे साखळी गटांत जर्मनी, अर्जेन्टिना व नेदरलँड्स यांचे आव्हान होते. भारतीय बचावरक्षक शेवटची एक दोन मिनिटे बाकी असताना ढिसाळपणा करतात व प्रतिस्पर्धी संघ त्याचा पुरेपूर फायदा घेतात याचा प्रत्यय या स्पर्धेतही पाहावयास मिळाला. जर्मनीविरुद्धच्या सामन्यातील ५९ मिनिटे भारताचा गोलरक्षक श्रीजेश याने अप्रतिम गोलरक्षण केले. मात्र शेवटचे ४० सेकंद बाकी असताना जर्मनीची चाल रोखण्यासाठी तो पुढे आला. दुर्दैवाने त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी गोल झाकण्याबाबत तत्परता दाखविली नाही, परिणामी भारतावर गोल नोंदविला गेला. हाच गोल भारताच्या पराभवासाठी पुरेसा होता. पाठोपाठ दुसऱ्या सामन्यात अर्जेन्टिना संघानेही भारताला दोन गोलांच्या फरकाने हरविले. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी जरी तुल्यबळ असले तरी त्यांच्याविरुद्ध भारतास विजय मिळविणे शक्य होते. तथापि सांघिक चालीतील विस्कळीतपणा, पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याबाबत असलेल्या अचूकतेचा व कल्पकतेचा अभाव, बचाव फळीतील ढिलाई या चुका भारतीय खेळाडूंकडून पुन्हा पुन्हा केल्या जातात. सराव शिबिरात अनेक वेळा या गोष्टींवर भर दिला जात असला तरी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या तत्त्वाप्रमाणेच भारतीय खेळाडूंकडून वारंवार अशा चुका होतात. प्रशिक्षक बदलले तरी त्यांच्या या वृत्तीत बदल होत नाही.
साखळी गटातील तिसऱ्या सामन्यात भारताने विश्वचषक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या नेदरलँड्सला पराभूत केले. या सामन्यातही भारतीय खेळाडूंनी थोडय़ाशा चुका केल्या. पण त्याहीपेक्षा डच खेळाडूंनी केलेल्या चुकांचा भारतास जास्त फायदा मिळाला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेला आक्रमक खेळ खूपच चांगला होता. उपांत्यपूर्व फेरीत भारताने बेल्जियमवर मात केली. या सामन्यातही भारताने आक्रमक चालींमध्ये चांगले कौशल्य दाखविले. तरीही पेनल्टी कॉर्नरबाबत भारताची बाजू कायमच कमकुवत राहिली आहे हे प्रकर्षांने दिसून आले.
उपांत्य फेरीत भारतापुढे पाकिस्तानचे आव्हान होते. भारत व पाकिस्तान यांच्यातील कोणतेही सामने मैदानावर व मैदानाबाहेरही नेहमीच गाजत असतात. हा सामनाही त्यास अपवाद नव्हता. या लढतीपूर्वी पाकिस्तानचे प्रशिक्षक शहनाझ शेख यांनी आम्ही भारताविरुद्ध ९/११ चे तंत्र वापरणार असल्याचे विधान केले होते. २००१ मध्ये ११ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावरील दहशतवादी अतिरेक्यांनी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन्ही इमारती उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर ९/११ हा शब्द कायमच अतिरेकी कारवायांबाबत ओळखला जात आहे. त्यामुळेच शेख यांनी केलेल्या विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली. शेख यांना त्याचा अर्थ उमगल्यानंतर त्यांनी खुलासा केला की ९/११ म्हणजे आमचे नऊ खेळाडू आक्रमक फळीत कार्यरत असतील व दोनच खेळाडू बचावाचे काम करतील. त्यांनी जरी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांची आक्रमक वृत्ती लपू शकली नाही. जसा राजा तशी प्रजा याप्रमाणेच त्यांच्या खेळाडूंनीही मैदानावर बेशिस्त वर्तनाचा प्रत्यय घडविला. पाकिस्तानने साखळी गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व बेल्जियम या तीनही संघांविरुद्ध पराभव स्वीकारला तरीही त्यांनी बाद फेरीत केलेला खेळ खूपच कौतुकास्पद होता. भारताविरुद्ध त्यांच्या खेळाडूंनी केलेला आक्रमक खेळ खरोखरीच अतुलनीय होता. भारताकडून गोल झाला तरीही त्याचे दडपण न घेता त्यांनी सतत धारदार चाली केल्या. त्यांच्या चालींमध्ये प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर दडपण आणण्याची ताकद व भेदकता होती. त्यांच्या या सर्व कामगिरीवर त्यांच्या बेशिस्तपणामुळे पाणी फिरले गेले. भारतावर मात केल्यानंतर महंमद तौसिफ, अली अमजद व शफाकत रसूल यांनी मैदानावर अंगातील कपडे काढून धिंगाणा केला. त्यांच्या या वर्तनाबद्दल सारेच संघटक अवाक झाले. भारतीय हॉकी संघटकांनी त्याबद्दल आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडे तक्रार केली. महासंघाने तत्परतेने निर्णय घेत तौसिफ व अमजद यांना एका सामन्यासाठी बंदी घातली तर रसूल याला तंबी देत सोडून दिले. हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र बात्रा यांनी ही कारवाई अतिशय सौम्य असल्याचे सांगून पाकिस्तान हॉकीशी संबंध तोडल्याचे जाहीर केले. बात्रा हे स्वत: आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघावर असल्यामुळे त्यांच्या या विधानास अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानेही भारतात आता स्पर्धा घेऊ नयेत असेही विधान त्यांनी केले आहे. मात्र हे विधान भारतीय हॉकीच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही. जर महासंघाशी वैर घेतले तर भारतीय हॉकीच्या प्रगतीसही त्याचा अडथळा होऊ शकतो. यापूर्वी अनेक वेळा भारतीय हॉकीतील अंतर्गत कलहामुळे भारतावर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या मान्यतेची सतत बंदीची टांगती तलवार राहिली आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता बात्रा यांच्या विधानामुळे त्यांनी महासंघाशी विनाकारण शत्रुत्व ओढवून घेतले आहे. अनेक वेळा बात्रा यांच्या एकाधिकारशाहीचा फटका भारतीय हॉकीस बसला आहे.
ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ व श्रेष्ठ ऑलिम्पिकपटू टेरी वॉल्श यांच्याकडे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे असताना भारतीय संघाच्या कामगिरीत खूप सुधारणा झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य व आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आणखीही काही वर्षे काम करण्याची त्यांची इच्छा होती. ते अमेरिकन हॉकी संघाचे उच्च कामगिरी संचालक म्हणून काम करीत असताना त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठेवण्यात आले व त्यांना हे पद सोडावे लागले होते. हे कारण पुढे करीत बात्रा यांनी वॉल्श यांच्याशी पुन्हा करार करण्यास तीव्र विरोध केला. खरं तर वॉल्श यांना दरमहा वेतन दिले गेले तर त्यांच्याकडून भारतात आर्थिक गैरव्यवहार केला जाण्याची शक्यता नाही. केवळ काही वैयक्तिक कारणास्तव हॉकी इंडियाने वॉल्श यांच्याशी फारकत घेतली. ही फारकत घेताना त्यांनी भारतीय संघाचा विचार केला नाही. जूनमध्ये प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वॉल्श यांनी भारतीय संघाची चांगली बांधणी केली होती. त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे भारताने आशियाई सुवर्णपदक जिंकून रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला होता. भारतीय संघाच्या दृष्टीने ही खूप मोठी कामगिरी आहे. असे असताना केवळ वैयक्तिक हेवेदावे समोर ठेवीत त्यांना दूर करणे भारतीय हॉकीसाठी मारकच ठरले आहे. वॉल्श यांच्याबद्दल संघातील प्रत्येक खेळाडूने कौतुकास्पद उद्गार व्यक्त केले होते. वॉल्श यांना दूर केल्यानंतर भारतीय हॉकी संघावर काय अनिष्ट परिणाम होऊ शकतो याचा प्रत्यय लगेचच चॅम्पियन्स स्पर्धेत दिसून आला. रिओ ऑलिम्पिक स्पर्धा होईपर्यंत त्यांना प्रशिक्षकपदी ठेवण्याची आवश्यकता होती. धरसोड वृत्ती ही भारतीय हॉकी संघटकांची जुनी खोड आहे. यापूर्वी अनेक वेळा परदेशी प्रशिक्षकांबाबत भारतीय हॉकी संघटकांनी असा अनुभव घालून दिला आहे. संघाचे व देशाचे काहीही होवो आम्ही मात्र आमच्या मर्जीप्रमाणेच वागणार हीच वृत्ती राष्ट्रीय स्तरावरील हॉकी संघटकांमध्ये दिसून येते. काहीही झाले तरी शेपूट वाकडेच राहते, तद्वत भारतीय हॉकी संघटकांच्या हटवादी वृत्तीत कधीच फरक पडत नाही. हीच भारतीय हॉकीची शोकांतिका आहे.