मथितार्थ
‘‘अंतराळावर हक्क सर्वाचाच आहे. ते संपूर्ण मानवजातीच्या मालकीचे आहे. ते कुणा एकाचे किंवा कोणत्याही एका राष्ट्राचे नाही. त्यामुळेच अंतराळात विविध प्रयोग करण्याचा हक्क प्रत्येक राष्ट्राला आहे. त्यामुळेच मानवाच्या विकासासाठी अंतराळ प्रयोगामध्ये अनेक देशांनी एकत्र येऊन काम करायला हवे..’’ हे उद्गार कुणा भारतीयाचे नाहीत तर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे चीनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री हाँग ली यांनी. भारताने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळयानाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले त्यावेळेस चीनमधील पत्रकारांनी हाँग ली यांच्यावर भारत-चीन स्पर्धा, संबंध आणि मंगळयानबाबत प्रश्नांचा भडिमार केला, त्यावेळेस दिलेल्या उत्तरामध्ये ही प्रतिक्रिया व्यक्त झाली. या प्रतिक्रियेमध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग दडलेला आहे. तो म्हणजे मंगळयान यशस्वीरीत्या झेपावल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये ही प्रतिक्रिया पत्रकारांच्या गटासमोर व्यक्त झाली आहे..
भारताच्या अंतराळ संशोधन प्रकल्पांकडे चीनची अतिशय बारीक नजर आहे. पण केवळ तेवढय़ावरच हा प्रकार थांबत नाही. चीनचे भारतावरचे लक्ष म्हणजे केवळ त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष आहे अशातला भाग नाही तर संपूर्ण देशाचेच लक्ष आहे. कारण भारताचे मंगळयान झेपावल्याच्या दुसऱ्या दिवशी चीनमधील सर्व वर्तमानपत्रांच्या अग्रलेखांचा विषय होता भारताचे मंगळयान आणि भारत- चीन यांच्यामध्ये तीव्र होत चाललेली अंतराळ स्पर्धा. चीनमधील सरकारी वृत्तपत्रांनी भारतावर टीकेची झोड उठवणे खूपच साहजिक होते. पण काही खासगी नियतकालिकांनीही टीकाच केली. जवळपास सर्वानीच असे मत व्यक्त केले होते की, भारतामध्ये कोटय़वधी लोक आजही भुकेल्या अवस्थेमध्येच झोपावे लागते. मग या देशाला कशासाठी हवी आहे चीनसोबत अंतराळ स्पर्धा? तर केवळ चीनशी स्पर्धा करण्यासाठीच भारत या अंतराळ स्पर्धेत उतरल्याचे काहींनी म्हटले होते. एक-दोन वर्तमानपत्रांनी तर चीनवरच टीका केली होती. आणि भारतासारखा देश चीनशी ज्या पद्धतीने स्पर्धा करतो आहे त्यातून चीननेच शिकण्यासारखे बरेच आहे, असे म्हटले होते. भारत जर एवढय़ा स्पर्धात्मक पद्धतीने सरावतो आहे तर चीनला भविष्यात अंतराळ कार्यक्रमाचा वेग वाढवावाच लागेल, असा त्याचा अर्थ आहे, असे म्हटले होते. सरकारी वर्तमानपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने तर चीन सरकारने स्वस्तातील अंतराळ मोहीम कशी करतात हे भारत सरकारकडून शिकावे, अशा कानपिचक्या आपल्या अग्रलेखात दिल्या होत्या.
हे सारे झाले सरकारी पातळीवर. चीन सरकार आणि तेथील पत्रकारांनी भारत आणि त्याच्या अंतराळ मोहिमांवर लक्ष ठेवणे हेही समजण्यासारखे आहे. पण सामान्य चिनी माणूसही भारताच्या या मंगळ मोहिमेवर लगेचच प्रतिक्षिप्तक्रियेप्रमाणे व्यक्त झाल्याचे लक्षात आले. चीनमध्ये सोशल नेटवर्किंगसाठी चिनी कंपन्यांनी विकसित केलेल्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापरच केला जातो. गेल्या वर्षअखेरीस चीनमधील सर्वाधिक चर्चा झालेले विषय आणि काही दिवस अशी आकडेवारी जारी करण्यात आली. त्यात मंगळयान झेपावल्याच्या दिवशी सर्वाधिक चर्चा भारत-चीन संबंध-स्पर्धा यावर झाल्याचे लक्षात आले. त्यातही भारतावर टीकाच अधिक आहे. म्हणजेच सामान्य चिनी माणूसही भारतावर लक्ष ठेवून आहे, असे एक ढोबळ विधान करता येऊ शकेल.
आता या संदर्भात आपल्याकडे काय परिस्थिती आहे, याचा अंदाज घेऊया. गेल्या महिन्याभरात सर्वाचेच लक्ष लागून राहिले होते, ते सरते २०१३ हे वर्ष आणि आलेल्या २०१४ चे जोरदार स्वागत याकडे. या साऱ्या गदारोळात गेल्या वर्षांतील दोन महत्त्वाच्या घटनांकडे आपल्या सर्वाचेच दुर्लक्ष झाले. यातील पहिली घटना होती ती पहिली चिनी महिला अंतराळवीर यशस्वीरीत्या अंतराळात गेल्याची आणि दुसरी घटना ही अगदी अलीकडे म्हणजेच महिन्याभरापूर्वी घडलेली आहे.
चीनने आजवर पाच मानवी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. मानवी मोहिमा यशस्वी करणे हा अंतराळ संशोधनातील अतिशय क्रांतिकारी असा टप्पा असून तुम्ही विकसित केलेले तंत्रज्ञान किती विश्वासार्ह आणि खात्रीशीर आहे याचीच ती पावती असते. हे एकदा नव्हे तर पाच वेळा चीनने केले आहे. त्याही पुढे जाऊन अनेक मोहिमा त्यांना हाती घ्यायच्या आहेत. त्यात त्यांनी स्वत:चे अवकाश स्थानक बांधण्यास घेतले असून चीनच्या मानवी मोहिमांच्या वाऱ्या सध्या या चिनी अवकाश स्थानकाच्या दिशेने सुरू आहेत. तिथे त्यांचे अनेक महत्त्वपूर्ण प्रयोग सुरू आहेत. या खेपेस २०१३ मधील अवकाश मोहिमेमध्ये चिनी अंतराळवीरांनी चीनच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी अंतराळ स्थानकातून थेट संवाद साधला. या मोहिमा पुढे नेण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, त्यांना प्रेरित करण्याचा तो यशस्वी प्रयत्न होता.
त्यातील दुसरी घटना होती ती चीनचे चँगे- थ्री हे यान चंद्राजवळ पोहोचले आणि त्यातून चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने बाहेर पडलेल्या ‘मून प्रोब’ने चांद्रभूमीवर आपला यशस्वी ठसा उमटवला. भारताच्या ‘मून प्रोब’प्रमाणेच त्यावर त्यांचा राष्ट्रध्वज चितारलेला होता आणि त्यानंतर काही काळातच यूतू या त्यांच्या रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. भारताचे ‘मून प्रोब’ हे चांद्रयान- एकमधून आधीच चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले होते, त्यावरही भारताचा तिरंगा होता. पण चीनने आता एकाच दगडात दोन पक्षी मारले आणि भारतापेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. कारण भारताचे चांद्रयान- दोन सध्या सज्जतेच्या स्थितीमध्ये आहे. त्यामध्ये भारतीय रोव्हर असणार आहे. तो पोहोचण्याआधीच चिनी रोव्हरने त्याला नेमून दिलेले काम पूर्ण केलेलेही असेल. अर्थात त्याने आताच आपल्याला काही खूप मोठा फरक पडणार नाही. पण त्यातून मानसिकता- स्पर्धा या बाबी अधोरेखित होतात. चीनचे ‘मून प्रोब’ चंद्रावर उतरणे ही बाब तेथील सोशल नेटवर्किंगवर संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक चर्चा झालेली बाब होती. तुलनाच करायची तर गेल्या वर्षभरातील भारतात सर्वाधिक चर्चा झालेल्या सोशल नेटवर्किंगच्या यादीत भारतीय मंगळयानाचा समावेश पहिल्या दहांमध्ये देखील नाही.
भारतीय मंगळयानाचे यशस्वी उड्डाण आणि जीएसएलव्हीच्या निमित्ताने झालेली क्रायोजनिक इंजिनची चाचणी या भारताच्या दृष्टीने दोन अतिशय महत्त्वपूर्ण अशा घटना होत्या. यांचे व्हिडीओज यूटय़ूबवर सहज उपलब्ध आहेत. पण त्यांचा समावेश गेल्या वर्षांत सर्वाधिक शेअर झालेल्या शंभर व्हिडीओंमध्येही नाही. त्या तुलनेत चीनमध्ये मात्र चँगे-थ्रीमधून निघालेले मून प्रोब चांद्रभूमीवर आदळण्याच्या व्हिडीओचे शेअिरग सर्वाधिक झाले होते. सोशल नेटवर्किंगचा दाखला एवढय़ासाठीच दिला आहे, कारण सोशल नेटवर्किंग सध्याच्या तरुणाईमध्ये सर्वाधिक चर्चा कशाची सुरू आहे, ते पुरते स्पष्ट करणारे असते. आपल्याकडे तरुणाईची सर्वाधिक चर्चा झालेले विषय आहेत सलमान खान, कतरिना कैफ, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, सचिन तेंडुलकर आणि सनी लिओनी ! यात इस्रो किंवा मंगळयान अथवा जीएसएलव्ही याचा कुठेही समावेश नाही. आपले लक्ष आहे तरी कुठे?
जग सध्या खूप पुढे चालले आहे. केवळ चीनच नव्हे तर जपानही आता चंद्राच्या बाबतीत वेगळा विचार करतो आहे. जपानला बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्य़ानंतर जपानने अनेक बाबींचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली असून त्यात तंत्रज्ञानाची मदत महत्त्वाची आहे. जपानमधील शिमिझू कॉर्पोरेशनने तर आता थेट चंद्रावरून वीज आयात करण्याचा नवा उपाय शोधला आहे. त्यासाठी त्यांचे संशोधक कामालाही लागले आहे. सामान्य माणसाला याबाबत अनेक प्रश्न मनात येणे खूपच साहजिक आहे. पण संशोधकांना मात्र यात काहीच अडचण वाटत नाही. हे सहज शक्य नाही पण अशक्यही नाही, अशी प्रतिक्रिया जगभरातील सर्व संशोधकांनी या प्रकल्पाबाबत व्यक्त केली आहे. संशोधकांची एक मोठी फळी त्यासाठी कामालाही लागली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये चंद्राच्या विषुववृत्ताच्या भागामध्ये म्हणजेच तब्बल ११ हजार किलोमीटर्स लांब अशा गोलाकारात सौरऊर्जेसाठी पॅनल्स बसविण्यात येणार आहेत आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा पृथ्वीवर पाठविली जाणार आहे. त्याच्या उभारणीचे काम चंद्राच्या विषम वातावरणात करण्यासाठी रोबो तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. २०३५ पर्यंत हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
एकूण काय तर मानवाचे भविष्य हे  अंतराळात दडलेले आहे. आणि आपले पृथ्वीवरील भवितव्य म्हणजे कोण श्रेष्ठ किंवा कोण महासत्ता हेही अंतराळातच ठरणार आहे! त्यामुळे अंतराळातील घडामोडींकडेही आपले लक्ष असायलाच हवे. एखाद दिवस सलमान खान किंवा कतरिनाला नाही पाहिले तरीही फारसे काही बिघडणार नाही, पण आपल्या देशाच्या अंतराळ मोहिमांकडे दुर्लक्ष करणे हे महासत्ता व्हायचे असेल तर परवडणारे नाही, एवढे निश्चित.