अपंगत्वावर मात करत दिल्लीची इरा सिंघल भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत देशातून पहिली आली. जिद्द, मेहनत आणि हुशारीमुळे यशस्वी झालेली इरा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

कितीही संकटं आली तरी त्यावर धाडसाने आणि जिद्दीने मात करण्याचे सल्ले अनेकांना पुस्तकी वाटतात. नेहमी सकारात्मक विचार करावा, चांगल्या दृष्टिकोनातूनच जग पाहावं असं तत्त्वज्ञान अनेकांना टाकाऊ वाटतं. पण, असं आयुष्य जगण्याचा किमान प्रयत्न केला तरी जगणं खूप सोपं होतं, संकटं छोटी वाटू लागतात आणि जिद्दीने प्रवास करत राहिलं तर यश नक्कीच मिळतं. हे सिद्ध केलं आहे दिल्लीच्या इरा सिंघल हिने. अपंगत्वावर मात करत केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत तीस वर्षीय इरा देशात पहिली आली आहे.
लोकोमोटोर डिसअ‍ॅबिलिटी (Locomotor disability)  असलेली इरा नेहमी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघते. या प्रकारच्या अपंगत्वाचा परिणाम सांधे, हाडं, स्नायू आणि हातापायांच्या हालचालींवर होतो. प्रचंड प्रमाणात शारीरिक त्रास असूनही इराने परीक्षा देण्याची जिद्द सोडली नाही. आपल्या शारीरिक त्रासावर मात करत परीक्षेला बसली आणि यशस्वीही झाली. २०१० साली तिने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी लढा दिला. भारतीय महसूल सेवेच्या पदासाठी नोकरी करण्यास ती सक्षम असल्याचं तिने सिद्ध केलं. त्यासाठी सेंट्रल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ट्रिब्युनलकडे ‘अपंग असले तरी विशिष्ट नोकरीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सक्षम आहे’ हे सिद्ध करून दाखवण्याची तयारी दर्शवली. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तिला अनेक चाचण्यांनाही सामोरं जावं लागलं. तसंच काही वैद्यकीय प्रमाणपत्रेही द्यावी लागली. पण, मेहनत, काहीतरी करून दाखवण्याची ईर्षां यामुळे तिच्या प्रयत्नांना यश मिळाले. दोन वर्षांच्या संघर्षांच्या काळानंतर ती त्या पदासाठी सक्षम असल्याची अनेकांना खात्री पटली.
अलीकडे सनदी सेवांच्या परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत मोठय़ा पदांवर काम करता येते. त्यासाठी अर्थातच या परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं. उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड मेहनत, चौफेर अभ्यास, जिज्ञासू वृत्ती, तल्लख बुद्धी असणं आवश्यक असतं. या आवश्यक गोष्टी काहींमध्ये असल्या तरी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बराच कालावधी जातो. पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या फार नसते. दोनेक प्रयत्नांनी ज्यांना यश मिळत नाही त्यांचा या परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. ‘दोनदा नापास झालो आता पुन्हा काय तीच परीक्षा द्यायची’ असा नाराजीचा सूर लागायला वेळ लागत नाही. मग नैराश्य येतं. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होतो. तरुणांच्या भाषेत सांगायचं झालं तर विद्यार्थी ‘गिव्ह अप’ करतात. मग पर्याय म्हणून इतर क्षेत्रांमध्ये ती करिअरच्या वाटा निवडतात. असं सगळं चित्र अनेकांच्या बाबतीत बघायला मिळतं. पण, नियमांना अपवाद असतात त्याप्रमाणे अशा विद्यार्थ्यांमध्येही काही अपवाद असतात. आणि या अपवादांपैकीच एक म्हणजे इरा सिंघल.
शारीरिक सक्षम असलेल्यांनाही काही वेळा जे जमू शकत नाही ते इराने करून दाखवलं. परीक्षेसाठी बसण्याबाबत नकार आलेल्या इरानेही जिद्द सोडली नाही. अपंग असले परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विशिष्ट पदासाठीही सक्षम असल्याचा दावा करत अनेक संकटांवर मात करून अखेर इराने केवळ परीक्षा दिली नाही तर त्यात ती देशातून पहिलीसुद्धा आली. इरा सिंघल महसूल सेवेत अधिकारी आहे. मेहनती, जिद्दी असलेल्या इराचा आत्मविश्वासही दांडगा आहे. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची तिला खात्री होती. पण, देशात पहिली येण्याविषयी तिला खात्री नसल्याचं ती सांगते. तिला आयएएस व्हायचंय. अपंग व्यक्ती आणि महिलांसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करायची तिची इच्छा आहे. करिअरच्या वेगळ्या वाटांवरून जाण्याचा निर्णय घेत असाल तर एकाग्रतेने, आत्मविश्वासाने आणि जिद्दीने त्यावरून प्रवास करायला हवा. असं केलंत तर यश हमखास तुमच्याजवळ येतं, हा संदेश इराच्या संपूर्ण संघर्षमय प्रवासातून मिळतो.
‘तुम्ही जसे आहात तसंच स्वत:ला स्वीकारा. कधीही स्वत:बद्दल वाईट वाटून घेऊ नका’, असं ती सांगते. या विचारांमुळेच तिच्या अपंगत्वावर ती सहज मात करू शकली. इरा अपंग आहे म्हणून तिला विशेष वागणूक दिली पाहिजे असं तिच्या घरच्यांना अजिबात वाटत नाही. इरालाही कधीच ती अपंग आहे, म्हणून इतरांपेक्षा वेगळी आहे, आणि म्हणून तिला काही वेगळी वागणूक मिळाली पाहिजे, काही वेगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असं अजिबात वाटत नाही. म्हणूनच ती असं मानते की तिचा संघर्ष हा केवळ एक स्त्री म्हणून होता, अपंग व्यक्ती म्हणून नव्हे. आता सगळीकडे तिच्या यशाचं कौतुक होत असतानाच ती मात्र ‘अपंग म्हणून माझा संघर्ष महत्त्वाचा नसून एक स्त्री म्हणून मी केलेला संघर्ष जास्त महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं.’ असं सांगते. इंजिनीअर आणि एमबीए झालेली इरा इतर सर्व अपंगांसाठीच नव्हे तर धडधाकट लोकांसाठीसुद्धा प्रेरणादायी ठरली आहे.
प्रतिनिधी response.lokprabha@expressindia.com

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
ग्रामविकासाची कहाणी
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”