अमेरिकेचा उत्तर-पूर्व किनारा पर्यटकांसाठी उत्तमच आहे. अमेरिकेतील उत्तरेकडील भाग व कॅनडाचा दक्षिणेकडील भाग यामधून ‘सेंट लॉरेन्स’ नदी वाहते. उत्तर-पूर्व अमेरिकेचा भाग पर्यटकांसाठी प्रामुख्याने दाखविला जातो. ‘नायगारा फॉल्स’प्रमाणेच आणखी पूर्वेकडे गेल्यावर सुमारे बसने अडीच ते तीन तास सेंट लॉरेन्स नदी पर्यटकांना वेगळय़ा रीतीने खूश करीत असते. पर्यटकांना ते वेगळे आकर्षण ठरत असते. अलेक्झांड्रिया गावाजवळ (धक्का) बसने सर्व पर्यटकांना उतरविले जाते व तेथून ‘अंकल सॅम टूर बोटीने’ (Uncle sam Tour Boat) लॉरेन्स नदीच्या प्रवाहांतून पर्यटकाला जवळजवळ तास ते सव्वा तास फिरवले जाते. निसर्गाचा चमत्कार या प्रवाहातच पर्यटकाला स्पष्टपणे जाणवतो. लॉरेन्स नदीच्या प्रवाहात एकूण सुमारे हजारच्या संख्येत छोटी मोठी बेटे तयार झाली आहेत. नदीच्या पात्रांतून काही ठिकाणी मध्येच जमिनीचा भाग वर आल्याने ही बेटे बनली आहेत. बेटांचा आकार लहान मोठय़ा स्वरुपांतील असतो. यामधील काही बेटे कॅनडाच्या हद्दीत तर काही बेटे अमेरिकेच्या (वर)च्या ‘जल’ आंतरराष्ट्रीय हद्दीत येतात. या बेटांमध्ये एक बेट तर इतके लहान आहे की त्यावर फक्त एकच झाड आहे. मोठय़ा बेटांवर अन्य बांधकामे करून पर्यटकांसाठी सर्व सोईनी युक्त अशी हॉटेल्स व राहण्याच्या खाजगी वास्तू (बंगले) बांधले गेले आहेत, अर्थातच ही बेटे पूर्ण विकसित केली असल्याने पर्यटकांना ती पर्वणीच लाभते. अर्थात सामान्यांसाठी फक्त ते नेत्रसुखच ठरते.

लॉरेन्स नदीवर अमेरिका व कॅनडा या देशांना जोडणारा पूल तयार केला आहे. या पुलावरून जाताना पासपोर्ट- व्हिसाची गरज लागत नाही. नायगाऱ्याला अमेरिका व कॅनडा भूभागांना जाण्यासाठी ‘रेनबो’ पूल असून तेथे मात्र सारी कायदेशीर कागदपत्रे दाखविणे आवश्यक असते.
अमेरिकेच्या बोटीवर व कॅनडाच्या बोटींवर त्या त्या देशांचे राष्ट्रध्वज असल्याने सहजी ओळखता येतात.
या नदीच्या प्रवासांत पर्यटकांना थोडय़ा वेळासाठी चहा-कॉफी व अल्पोपाहारासाठी पाण्यांतील रेस्टॉरेंटमध्ये उतरविले जाते. ते कॅनडाच्या हद्दीत असल्याने कोणत्याही वेगळय़ा कागदपत्रांशिवाय कॅनडाच्या जल हद्दीत उतरल्याचे मानसिक मोठे समाधान पर्यटकाला नक्कीच मिळते. नायगाऱ्याला मात्र तशी सोय नसते. समोरचा किनारा टोरंटो (कॅनडाचा) आपल्याला दिसत असला तरी आपल्याला पाण्यातून प्रवास करावा लागतो. जमिनीवर उतरता येत नाही. रात्रीच्या वेळी या बेटांवर उत्तम प्रकारची रोषणाई केली जाते. ती भव्यता पाहून स्वर्गच भूतलावर उतरल्याचा आनंद पर्यटकास लाभतो. अर्थातच रात्रीच्या वेळी ही रोषणाई पाहायची असल्याने कॅसिनो, रेस्टॉरंट, शॉपिंगमध्ये वेळ घालविण्याची सोय आहे. ही बेटे इ.स. १८१२च्या सुमारास वसली गेल्याचे समजते.
न्यूयॉर्क (अमेरिका)हून दोन रात्री व तीन दिवस अशी पर्यटकांसाठी सफर आहे. त्यामध्ये पेन्सिल्व्हानिया, हर्षेसची, लिबर्टी, फिलाडेल्फिया, चॉकलेट फॅक्टरी, वॉशिंग्टन, नासा, नायगारा, थाऊजंड आयलंड दाखवून तिसऱ्या दिवशी रात्री सफर संपते. अमेरिका पाहाण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी (खाजगी व कंपनीमार्फत) ही सफर अवश्य करावी. एकेक ठिकाण पाहताना अक्षरश: डोळय़ाचे पारणे फिटते. अमेरिकेतील अंत:र्गत सफरीचा आगळावेगळा अनुभव पर्यटकास मिळतो.
रामकृष्ण अभ्यंकर