कमी बजेट असलेले, वेगळ्या विषयावरचे अनेक सिनेमे अलीकडे येत आहेत. पण त्यांना चित्रपटगृह न मिळणं, वितरक न मिळणं, चित्रपटाच्या मार्केटिंगचा खर्च न परवडणं अशा अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेला रितेश बात्रा यांचा ‘लंच बॉक्स’ हा चित्रपट अवघ्या नऊ कोटी रुपयांमध्ये तयार झाला होता. या चित्रपटाने जगभरातून १०० कोटींची कमाई केली. मोठमोठे स्टार घेऊन बनवल्या जाणाऱ्या मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांच्या उत्पन्नाएवढं हे उत्पन्न आहे. त्यामुळे कोणत्याही बडय़ा बॅनरची, स्टुडिओजची प्रॉडक्शन हाऊसची मदत न घेता स्वत:च्या बळावर चित्रपटाची निर्मिती करू इच्छिणाऱ्या निर्मात्यांसाठी लंचबॉक्सचं उदाहरण ही खूषखबर ठरावी. अर्थात लंच बॉक्सचं हे उदाहरण ही दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट झाली. एरवी या स्वतंत्रपणे चित्रपट निर्मिती करू इच्छिणाऱ्या निर्मात्यांना मुळात पैसा उभा करण्यासाठीच खूप संघर्ष करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढे पैसे चित्रपटासाठी लागतात त्याच्या चौपट पैसे चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी लागतात.
याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे, गेल्याच आठवडय़ात प्रदर्शित झालेला ‘आँखो देखी’ हा चित्रपट. पहिल्याच आठवडय़ात हा चित्रपट एक कोटीची कमाईही करू शकला नाही. त्याच्या निर्मितीला साडेचार कोटी रुपये खर्च झाला. तितकाच खर्च चित्रपटाच्या मार्केटिंगसाठीही झाला. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्याच आठवडय़ात किमान १२ कोटींची कमाई करण्याची गरज होती. मात्र तसे होऊ शकले नाही.
स्वतंत्रपणे चित्रपट निर्मिती करू इच्छिणाऱ्या निर्मात्यांच्या मार्गात अनेक अडथळे असतात. रजत कपूर यांनी जवळजवळ दीड वर्ष खटपट केल्यानंतर त्यांना ‘आँखो देखी’साठी निर्माता मिळाला. संजय मिश्रा या अभिनेत्याने या चित्रपटात बाऊजी नावाच्या कोणतीही गोष्ट स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेवायला नकार देणाऱ्या माणसाची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटाची समीक्षकांनी तोंडभरून प्रशंसा केली. मात्र या उत्तम कलाकृतीला चित्रपटगृहांच्या मालकांनी जी वागणूक दिली, त्याबद्दल रजत कपूर यांच्या मनात नाराजी आहे. ‘‘या चित्रपटकडे चित्रपटगृहाच्या मालकांनी दुर्लक्ष केले. केवळ मुंबईमध्येच थिएटरमध्ये संध्याकाळीही या चित्रपटाचे खेळ दाखवण्यात आले. मात्र दिल्ली आणि उत्तर भारतात हा चित्रपट केवळ सकाळीच दाखवण्यात आला. मग हा चित्रपट चांगली कमाई कसा करू शकेल? मी तक्रार करत नाही. मात्र गेल्या १५ वर्षांपासून स्वतंत्र चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागतोय, ’’ जत कपूर सांगतात. त्यांनी दहा वर्षांपूर्वी ८० लाख रुपये खर्चून ‘रघु रोमिओ’ नावाचा चित्रपट तयार केला होता, त्यालाही फारसे यश मिळाले नाही, असेही ते सांगतात.
बलात्कारासारख्या घटनांवर आधारित ‘डब्ल्यू’ या चित्रपटांची निर्मिती तरुण मदन चोप्रा यांनी केली. हा चित्रपट पंधरवडय़ापूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत चोप्रा म्हणतात, ‘‘या चित्रपटाचा खेळ काही मॉलमध्ये सकाळी ९.४५ वाजता ठेवण्यात आला, हे मला समजल्यावर धक्काच बसला. दहा वाजता उघडल्या जाणाऱ्या मॉलमध्ये उघडण्यापूर्वी १५ मिनिटांपूर्वी हा खेळ ठेवल्यावर त्याला प्रेक्षक तरी कसे येणार? या चित्रपटाचे तिकीटही साडेचारशे रुपये ठेवण्यात आले होते. त्यामुळे हा चित्रपट यश मिळवू शकला नाही.’’
एका पोनरेग्राफिक लेखकाच्या जीवनावर आधारित ‘मस्तराम’ या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सुनील बोहरा यांची खंत मात्र वेगळी आहे. ते म्हणतात, ‘‘चित्रपटाच्या निर्मितीसाठी निधी उभा करणे हा फारसा मोठा अडथळा नाही. आपला आपण चित्रपट बनवायला फारसा खर्च येत नाही. ‘मस्तराम’ या चित्रपटासाठी केवळ दीड कोटी रुपये खर्च झाले. मात्र चित्रपटाचे मार्केटिंग करण्यासाठी, प्रदर्शन करण्यासाठी आठ कोटींपेक्षा अधिक खर्च करावा लागला. चित्रपटाचे वितरण हाही मोठा अडथळा नसतो. वितरक अशा प्रकारच्या चित्रपटाचे वितरण करण्यास तयार असतात.’’ मात्र प्रदर्शन आणि जाहिरात यासाठी खूपच खर्च होतो. हेच स्वतंत्र निर्मात्यांसाठी खूपच मोठे अडथळे आहेत. छोटय़ा पडद्याद्वारेही या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठीही खूप खर्च येतो.’’
स्वतंत्र निर्मिती असलेल्या चित्रपटांचे विषय खूपच वेगळे, अपरिचित असतात. वेगळय़ा धाटणीचे हे चित्रपट प्रेक्षकांच्या परंपरागत मानसिकतेला छेद देतात. या चित्रपटांमध्ये बडे कलाकार, स्टार मंडळीही नसल्याने चित्रपटगृहांचे मालक या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यास राजी नसतात.
‘लंचबॉक्स’ या चित्रपटात इरफान खानसारखा बडा स्टार असल्याने तो प्रदर्शित करण्यास अडथळा आला नाही. मात्र ‘आँखो देखी’ या चित्रपटात कुणी बडा कलावंत नसल्याने चित्रपट प्रदर्शन करण्यास मोठा अडथळा आला, असे रजत कपूर सांगतात. ‘मी अनेक स्टुडिओंमध्ये हा चित्रपट घेऊन गेलो, तिथे मला विचारण्यात आले, चित्रपटाचा नायक कोण आहे? संजय मिश्रा हा जरी गुणी कलावंत असला, तरी त्यांना तो भावला नाही,’ असे कपूर सांगतात.
‘बीए पास’ या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अजय बात्रा यांनी घरातून दोन कोटी रुपये उभे करून मार्केटिंगचा खर्च भागवला. त्यांनीही तारखा मिळवण्यासाठी स्टुडिओचे उंबरठे झिजवले. पण स्टुडिओवाल्यांना हा विषय फारसा अपील झाला नाही. ‘चित्रपट पाहताना एका मोठय़ा कंपनीच्या दोन महिला अधिकारी उठून निघून गेल्या कारण त्यांना त्यातला आशय खूप अस्वस्थ करणारा वाटला. पण तो त्यांचा दोष नाही. मुळात आपल्या प्रेक्षकांना ‘फील गुड’वाले चित्रपट हवे असतात. बहल सांगतात. त्यांना भरत शहांसारखा वितरक मिळाला आणि या चित्रपटाने १५ कोटींचा व्यवसाय केला. अजूनही तो राजस्थानात वगैरे चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. अजून सॅटेलाइट हक्क विकले जायचे आहेत.
बहल यांचं मतही बात्रांप्रमाणेच आहे. वितरकापेक्षा मार्केटिंग हाच मोठा अडथळा असल्याचं ते सांगतात. ‘देशभरात सर्व माध्यमांमधून चित्रपटाचं प्रमोशन होणं आवश्यक असतं. त्यासाठी भरपूर पैसे लागतात. तुम्ही ५० लाखात चित्रपट बनवू शकता पण तिच्या जाहिरातीसाठी त्याच्या चौपट पैसे लागतात.’ असं त्यांचं म्हणणं आहे.

स्वतंत्र निर्मिती असलेल्या चित्रपटांचे विषय खूपच वेगळे, अपरिचित असतात. वेगळय़ा धाटणीचे हे चित्रपट प्रेक्षकांच्या परंपरागत मानसिकतेला छेद देतात.

जाहिराती तसंच टीव्हीवरील कार्यक्रमांचे दिग्दर्शक चोप्रा यांनी डब्ल्यू चित्रपटाची निर्मिती केली. त्यासाठी त्यांना अडीच कोटी लागले. आणि दीड कोटी रुपये मार्केटिंगसाठी लागले. ते सांगतात, स्वतंत्रपणे चित्रपट निर्मिती करणं अवघड नाही, अशक्य आहे. ‘सगळ्या गोष्टी निर्मात्याला स्वत:लाच कराव्या लागतात. चित्रपट बनवल्यानंतर आम्ही खेटे घालत होतो, पण कुणीही तो बघण्याचीही तसदी घ्यायला तयार नव्हतं. मग आम्ही डब्ल्यू आमचा आम्हीच प्रदर्शित केला. पण त्याची फारशी कुठेच चर्चा न झाल्याने प्रतिसादही फारसा मिळाला नाही. तो मुंबईत तर फक्त एक आठवडाभरच चालला.’
स्वतंत्र चित्रपटांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काय करता येईल, याबाबत ‘लंचबॉक्स’चे निर्माते रितेश बात्रा सांगतात, ‘‘सरकारी चित्रपट यंत्रणांनी अशा प्रकारच्या चित्रपटांना पाठिंबा दिला पाहिजे. या संघटनांनी या चित्रपटांना निधी मिळवून देण्यासाठी आणि चित्रपटगृहे मिळवून देण्यासाठी मदत केली पाहिजे. त्यामुळे स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट यशस्वी करण्यासाठी मदत होईल. जर करण जोहर यांनी माझ्या चित्रपटाला पाठबळ दिले नसते आणि गुनीत मोंगा यांनी मार्केटिंगची जबाबदारी घेतली नसती, तर या चित्रपटाला इतके घवघवीत यश मिळाले नसते,’’ असे बात्रा सांगतात. मात्र भारतात या चित्रपटाला तेवढे यश मिळाले नाही, जेवढे परदेशात मिळाले, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला गौरवण्यात आले, मात्र भारतात प्रेक्षक मिळवून देण्यासाठी हे यश पुरेसे नव्हते, असे बात्रा यांचे म्हणणे होते.
‘ये है बकरापूर’च्या निर्मात्या दिग्दर्शक जानकी विश्वनाथन बात्रांशी सहमत आहेत. त्यांना या पूर्वी कुट्टी नावाच्या तमीळ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी ‘यह है बकरापूर’साठी बँका, मित्रमंडळी यांच्या माध्यमातून चार कोटी रुपये उभे केले. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलं गेलंय पण देशात त्याची दखलच घेतली जात नाही, ही त्यांची खंत आहे.
काही निर्मात्यांना वितरकांबरोबर भागीदारी करण्यापेक्षा स्वतंत्र निर्मिती करणं आवडतं कारण त्यांना कलात्मक अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळत असतं. लंचबॉक्स सारख्या चित्रपटाची निर्मिती करणारे सिखिया एन्टरटेनमेंटचे गुनीत मोंगा सांगतात, ‘लोकांना चांगले सिनेमे बघायचे असतात. पण ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा चित्रपटांमध्ये जास्त पैसा घालण्याची गरज आहे. स्वतंत्रपणे काम करू इच्छिणाऱ्या निर्मात्यांसाठी इथे वातावरणनिर्मिती व्हायला लागली आहे, पण त्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.