मराठी चित्रपटांना विनोदाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. किंबहुना, विनोदी चित्रपटांची लाट मराठीच्या रुपेरी पडद्यावर बराच काळ होती असे म्हटले तरी वावगे ठरू नये. 

विनोदाचे विविध प्रकार अनेक दिग्गज कलावंतांनी, लेखकांनी, पटकथाकारांनी अनेक मराठी चित्रपटांमधून हाताळले आहेत. शाब्दिक कोटय़ांच्या विनोदापासून फार्सिकल, स्लॅपस्टिक विनोद, उपहासात्मक विनोद असे हे प्रकार आहेत. प्रसंगनिष्ठ विनोद म्हणजेच सिच्युएशनल कॉमेडी हा प्रकार आपल्याकडे मराठीत चांगलाच रुजला. विनोदी चित्रपटांच्या लाटेमुळे विनोदी अभिनेते अशी स्वतंत्र प्रतिमा कलावंतांना मराठी चित्रपटांनी दिली. एवढेच नव्हे तर हिंदी सिनेमात विनोदी पात्र म्हणजे नायकाचा मित्र सर्वसाधारणपणे असायचा. मराठीत मात्र विनोदी अभिनेते हेच प्रामुख्याने नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. ‘वाट विनोदाची चाल हसण्याची’ या परंपरेत मराठी चित्रपटांची संख्या खूप आहे.
आता दूरचित्रवाहिन्यांवर हिंदीपासून मराठीपर्यंत सर्वत्र विनोदी स्किट्स, स्टॅण्डअप कॉमेडीचे भरपूर शोज् आहेत, परंतु यापलीकडे जाऊन प्रसंगनिष्ठ विनोदनिर्मितीचा प्रयत्न आगामी ‘साटंलोटं सगळंच खोटं’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
‘सरकारनामा’, ‘लपंडाव’, ‘लेकरू’ यांसारख्या मराठी आणि ‘सिलसिला है प्यार का’ या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन केल्यानंतर श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केलेला ‘साटंलोटं..पण सगळंच खोटं’ हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होतोय.
यासंदर्भात श्रावणी देवधर म्हणाल्या की, खूप वर्षांपूर्वी कथा लिहिली तेव्हा स्वर्गीय देबू देवधर यांनी वाचली होती. तेव्हा या विनोदी कथेवर मस्त ‘मॅड फिल्म’ करूया असे ते म्हणाले होते, परंतु त्यांच्या निधनानंतर आता बऱ्याच वर्षांनी या गोष्टीवर सिनेमा करायचे मनात आले. सई देवधरनेही ही कथा वाचली होती आणि देबूजींना यावर चित्रपट करायचा होता म्हणूनही तिच्या मदतीने मिळून ‘साटंलोटं..’ हा सिनेमा मी दिग्दर्शित केला आहे. अश्लीलता विरहित निखळ विनोदी, निरागस विनोदी असा हा चित्रपट आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे एकेक वैशिष्टय़ आहे, एखादी खोड आहे, लकब आहे, बोलण्याची पद्धत आहे. ‘यंग अ‍ॅण्ड फ्रेश’ असा सिनेमाचा लुक देत आम्ही ‘यूथफुल’ सिनेमा केला आहे.
प्रसंगनिष्ठ विनोद हाच या सिनेमाचा ‘यूएसपी’ आहे, असेही श्रावणी देवधर यांनी सांगितले. आणखी एक महत्त्वाचे बलस्थान म्हणजे मकरंद अनासपुरे, पुष्कर श्रोत्री यांच्यासारख्या अस्सल विनोदी कलावंतांना घेऊन केलेला हा सिनेमा आहे. त्याचबरोबर आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत, सिद्धार्थ चांदेकर या आजच्या आघाडीच्या तरुणाईला घेऊन विनोदी चित्रपट केल्याचे त्या म्हणाल्या.
नीतीन आहुजा, अशोक भूषण यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची पटकथा-संवाद लेखन शिरीष लाटकर यांनी केले आहे. छायालेखक देबू देवधर यांच्याबरोबरच आपण सर्व चित्रपट केले, परंतु आता प्रथमच राहुल जाधव या छायालेखकासोबत ‘साटंलोटं..’ हा पहिला चित्रपट केला आहे.
टीव्हीवरच्या शोंमध्ये अनेकदा ‘लाफ्टर’ टाकला जातो. तसा प्रकार या सिनेमात नाही. मुद्दाम गुदगुल्या करायला लावून हसविणे हे टाळून तसेच स्टॅण्डअप कॉमेडी वगळून निखळ कौटुंबिक विनोदी असा हा चित्रपट असल्याचे श्रावणी देवधरांनी नमूद केले.
मराठी चित्रपटांना असलेल्या विनोदी परंपरेत बसणारा आणि टीव्हीवर सध्या जोरदार गाजत असलेल्या स्टॅण्डअप कॉमेडीला छेद देतो का ‘साटंलोटं.. पण सगळंच खोटं’ हा चित्रपट पाहिल्यावरच समजेल.