lp02आयुष्यात एकदा तरी कैलास मानससरोवर यात्रा करायची असे अनेकांचे स्वप्नं असते. पण उचलली बॅग आणि निघालं असं या यात्रेच्याबाबतीत होत नाही. म्हणूनच या यात्रेचा अनुभव वाचलाच पाहिजे…

वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी मी माझ्या पोटापाण्याच्या व्यवसायाला रामराम ठोकला. थांबलो म्हणजे स्वस्थ नाही बसलो, जे जे करायचं राहून गेलं होतं, जे जे करण्याची हौस होती, त्याच्यामागे लागलो. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे धार्मिक पर्यटन. चारधाम (चार वेळा), अमरनाथ यात्रा (चार वेळा), लेह लडाख(चार वेळा), गिरनार, रामेश्वर, कन्याकुमारी, प्रयाग, नर्मदा परिक्रमा, किनाऱ्यावरची मंदिरं अशी मुक्त भटकंती चालू केली.
वयाचे अर्धशतक पार करताना वेध लागले ते कैलास-मानससरोवर या तीर्थयात्रेचे. लहानपणापासून शंभोशंकराचं निवासस्थान म्हणजे कैलास हे समीकरण डोक्यात पक्कं होतं. ‘उचलली बॅग आणि गेलो कैलासच्या दर्शनाला’ असा ‘मानस’ या यात्रेच्या बाबतीत शक्य नव्हता. म्हणून अनुभवी ट्रेकर मित्राचा सल्ला घेतला. शारीरिक फिटनेस होताच. आहार आणि औषधाबाबत डॉक्टरांच्या सूचना अमलात आणायचे ठरवले. ‘जास्तीत जास्त ऊर्जा मिळेल असे पदार्थ खा. चमचमीत, तळलेले पदार्थ खाऊन ते पचविण्यासाठी ऊर्जा खर्च करू नका. त्याऐवजी चहा, कॉफी, सूप याला विशेष प्राधान्य द्या. भरपेट न जेवता हलका आहार घ्या’ असं डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं. गरम कपडे, शूजची खरेदी झाली. राहता राहिला प्रश्न कागदपत्रांची पूर्तता करण्याचा, तोही सहज सुटला. आपल्या देवाचे दर्शन घेण्यासाठी शेजाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते, हे आपले दुर्दैव या विचाराने बराच वेळ पाठपुरावा सोडला नाही. गुळाच्या पोळय़ांची चळत, चॉकलेट, गोळय़ा आणि अधीरता, असं ‘बालपणच’ बॅगेत भरत महाड-मुंबई-दिल्ली-काठमांडू असा सुखात प्रवास झाला. नंदी कुठे आडवा आला नाही.
काठमांडूला उतरता क्षणी हवेतला बदल जाणवला. हवा गार होती; पण डोक्यात गेली नाही. वाटेत भेटणाऱ्या चेहऱ्यांची बदललेली ठेवण निरखत पाय मोकळे केले. थोडी खाऊची खरेदी केली. आम्ही ज्या ट्रेकतर्फे जाणार होतो, त्यांच्याकडून मिळालेला फरचा कोट, सॅक, डफल बॅग असं साहित्य आणि सूचना घेऊन आल्यावर गादीवर पसरलोच. सगळय़ा नद्या जशा सागराच्या भेटीसाठी धाव घेतात, तशी भारतातील सर्व भागांतून ‘निळकंठ’ दर्शनासाठी आसुसलेली माणसे एकत्र झाली होती. निवांतपणा असल्यामुळे हळूहळू ओळखीचे पूल बांधले गेले.
सकाळी उठून डोक्यावर कॅप, पाठीवर सॅक घेत यात्रेचा श्रीगणेशा केला. पशुपतीनाथाला रुद्राभिषेक करून शेषशाही विष्णूंपुढे नतमस्तक होत यात्रेसाठी आशीर्वाद घेतले. धुळीखेतमार्गे कोदारी (अंतर १२३ कि.मी.) कडे आम्ही प्रस्थान ठेवले. कोशी नदी अल्लडपणे झुळझुळत सोबत करत होती. रस्त्यात पाठीवर स्वत:च्या वजनाच्या दुप्पट ओझे घेऊन तरण्याताठय़ा बायका, मुले, म्हाताऱ्या, लेकुरवाळय़ा जा-ये करताना दिसत होत्या. सभोवतालचा चढउताराचा प्रदेश न्याहाळत आठ हजार फुटांवरील कोदारी गाठले. बर्फाचे सुळके, गोठलेली तळी, एकमेकांच्या गळय़ात गळे घालून विसावलेल्या लहान-मोठय़ा टेकडय़ा, निसर्गाने डोळय़ांना मेजवानीच दिली. पोटपूजा झाल्यावर डोळे अलगद मिटले.
सकाळी जाग आली. पावसाने चांगलाच रुद्रावतार धारण केला होता. ‘ठंडगार हीऽऽ हवा’ असाच माहोल होता. तिच्याशी आणखीन गट्टी करण्यासाठी थंड पाण्यानेच आंघोळ केली. नाश्ता करून फ्रेंडशिप ब्रिजवरून चालत-चालत नेपाळची वेस ओलांडली आणि चीनव्याप्त तिबेटमध्ये दाखल झालो. चेकिंग, पासपोर्ट, व्हिसा, इमिग्रेशन वगैरे सोपस्कार उरकून झानमूला पोटाची मागणी पुरी केली. चिनी वर्चस्वाने मनातून अस्वस्थ होत न्यालमकडे कूच केले. तापमान ३-४ डिग्रीपर्यंत उतरले होते. इथे वर्षांतले नऊ महिने बर्फाचेच साम्राज्य, जेमतेम तीन महिने रस्ते दिसत असतात. प्राणवायूविना प्राण कसा कासावीस होऊ लागतो, याची चुणूक दिसू लागली. दम लागत असल्यामुळे ‘जपून टाक पाऊल जरा’ असे मनाला बजावायला लागलो. तीन तासांनी १२ हजार ४०० फुटांवरील न्यालम गाठले. मातीच्या घरांची छोटी वस्ती, वाडय़ासारखे प्रवेशद्वार आणि आत दहा-बारा मातीच्या खोल्या. बाहेर ढगाळ वातावरण आणि आत मिणमिणते दिवे. मनाने नोंद केली. रोजच्या सूचना आणि त्याप्रमाणे उद्याचे कार्यक्रम हा प्रवासातला प्रमुख भाग आटोपला.
न्यालम उत्तरपूर्वेला असल्यामुळे पहाटे साडेतीनलाच तांबडं फुटलं. वेळेतला अडीच तासांचा फरक लक्षात घेत घडय़ाळे लावली. शरीराला हवेची, उंचसखल चढणीच्या रस्त्याची सवय होण्यासाठी समोरच्या डोंगराला भेटायला निघालो. थंडीची होती नव्हती ती सगळी आयुधं शरीरावर येऊन बसली होती. अंतराळवीराच्या थाटात चढाईला सुरुवात झाली. आधीचा उत्साह, वेग वर-वर जाऊ लागल्यावर ओसरू लागला. पाऊल उचलण्याऐवजी ते खेचावे लागले. दम लागल्यामुळे आपापसातील संवादाला पूर्णविराम मिळाला. तोंडातून शब्द फुटेना. डोंगरमाथ्यावर सरळ कोनच साधावा असा गमतीशीर विचार मनात तरळला. पाच-सहा कि.मी. जाऊन आल्यावर सर्वानी ‘हुश्श’ केलं. कडकडून भूक लागल्यामुळे सगळे जेवणावर तुटून पडले. थोडी विश्रांती घेऊन आसमंतातील नव्याची नवलाई टिपण्यात संध्याकाळ धावतच पुढे जाऊन रात्रीला बिलगली.
सकाळ उजाडली ती न्यूडोंगपाकडे, वाळवंटाकडे जायच्या विचारातच. तसा प्रवासही बराच होता. ३८५ कि.मी. अंतर आणि १४ हजार फूट उंची गाठायची होती. पूर्ण वाळवंटी भाग दिसू लागला. थंडीचे काटे फारच बोचू लागले. ओसाड वाळवंटावर टेकलेलं क्षितिज, मनुष्यवस्तीची जराही नसलेली नामोनिशाणी, अशा गूढ वातावरणात गार वारे धसमुसळेपणाने दंगामस्ती करत अंगाला भोज्जा करत वाहत होते. स्प्रिंगसारखे भोवरे फिरवत वाळूही त्याच्या तालावर भिरभिरत होती. लहरी निसर्गाचा खेळ ‘रंगात’ आला आणि ढगाआडून सूर्यदेवांनी दर्शन देत सोनेरी रंग उधळला. अहाहा! काय बरं वाटलं म्हणून सांगू. ‘भेट तुझी माझी स्मरते’ म्हणत भूतकाळात शिरावं, इतके दिवस त्या तेजोनिधीचं रूप डोळय़ाला दिसलं नव्हतं. आश्चर्य म्हणजे इतक्या दिवसांच्या विरहाचा वचपा काढावा तसं तापमान वाढत वाढत जाऊन २५/२६ डिग्रीपर्यंत पोहोचलं. तीन ते सव्वीस, इतका फरक त्यामुळे सनस्क्रीमच्या बाटलीचे ‘सील’ काढावेच लागले. ऊन-पावसाचा ‘श्रावणी’ खेळ नित्य परिचयाचा होता. मात्र कडाक्याची थंडी आणि भाजणारं उन्हं असा विरोधाभास झेलताना चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. पहाटे चार वाजता उजाडलं आणि रात्री दहा वाजेपर्यंत ‘दिवस’ होता म्हणजे रात्र अवघी सहा तासांची. जरा आणखी थोडा वेळ किरणं रेंगाळली असती तर.. परंतु‘जैसा सूर्य आकाशगतु रश्मिकरी जगाते स्पर्शतु, तरी संग दोषे काय लिंपतु तेथिचेनि’ एवढा चटका देणारी किरणं, पण सूर्याबरोबर लगेच परत फिरली, अगदी एकनिष्ठा दाखवत. त्यामुळे पुन्हा हुडहुडी भरली. पायाखालची वाळू सरकली नाही असा क्षण गेलाच नाही. पराठे बिराठे खाण्याचा मोह टाळून गरमागरम सुपला न्याय दिला. झोप उडण्याचा प्रश्नच आला नाही.
lp03आज ‘मानसदर्शन’ होणार अशी सूचना मिळाल्यामुळे मन अधीर झालं होतं. झटपट जामानिमा उरकून न्यू डोंगपा सोडलं. आंघोळीची गोळी चालूच होती. आता सगळा प्रवास बर्फाच्छादित डोंगरातून जणू वाट फुटेल तसा चालू होता. हनुमान सरोवराच्या दर्शनाने क्षणात लंकेत पोहोचलो. राम-रावण युद्धात लक्ष्मण मूच्र्छित झाला असता हनुमान त्याच्यासाठी औषधी वनौषधी आणण्यासाठी म्हणून इथे आला असताना त्याने या सरोवरात आंघोळ केली असे मानले जाते. म्हणून हे हनुमान सरोवर. अवघा आसमंत जणू गणेशदर्शन घडवत होता. अनिमिष नेत्रांनी हे सौंदर्यपान करत असताना जाणवलं की, ‘उतरला स्वर्ग हा धरेवरी’ पाच-सहा तासांचा तो अविस्मरणीय प्रवास ब्रह्मपुत्रेच्या काठावर येऊन थांबला. भूक शांत झाली. पासपोर्ट तपासणी झाली आणि मानसरोवराजवळ येऊन पोहोचलो. ‘याचसाठी केला अट्टहास’, उतावीळ मनाला बजावले. स्वच्छ, शुद्ध, आल्हाददायक, निर्मळ असा जलाशय असावा असे भगवान विष्णूंच्या मनात होते. ते प्रत्यक्षात मानससरोवराच्या रूपात साकारले, असे मानले जाते. ‘मानसी राजहंस पोहतो’ या काव्यपंक्ती आज माझ्यासाठी सजीव झाल्या होत्या. एकटक बघत राहण्याचा आनंद शब्दापलीकडचा आहे. पाण्यात कधी शिरलो कळलंच नाही. सहजासनामध्ये बसून रामनामाची माळ, महामृत्युंजय जप आणि गणपती अथर्वशीर्ष म्हटले. दोन-तीन डिग्री तापमान, पाणी बर्फासारखे थंड, मन:कामना पूर्ण झाल्याचे समाधान, जणू ध्यानच लागले. तीस मिनिटे मी पाण्यातच, तरी त्या स्पर्शाच्या दिव्य अनुभूतीने पोट भरत नव्हते, मोह आवरत नव्हता. ते बघून सहप्रवाशांच्या अंगावरच काटे आले. संथ, सुंदर नीलकांतीने नटलेला विस्तीर्ण जलाशय, त्यावर नाजूकपणे बागडणाऱ्या अल्लड लाटा, सूर्याच्या किरणांनी हळूच डोकावत टाकलेला सोनसळी वर्ख, डोळ्याचं पातं लवतं न् लवतं तोच बदललेलं नेपथ्य. निळ्या रंगाच्या अगणित छटा अगदी आकाशापासून मानसच्या अंतरंगापर्यंत. जणू आकाशानेच खाली उतरावे असा तो नीलिमा. कॅम्लिनला एखादी रंगछटा हवी असेल तर इथे चक्कर मारायला हरकत नाही. काळोखाच्या सीमारेषेवर चंद्राचा दिवा लागला आणि शुभ्र चंदेरी प्रकाशाने पाणी हिऱ्याप्रमाणे चमकू लागले. डोळ्यांना पर्वणीच होती. तहानभूक हरपून गेली. निसर्गाने त्याच्या सौंदर्याचं सहस्रकरांनी उधळलेलं हे रूप केवळ लाजवाब. सर्वाच्या समाधानासाठी दोन घास खाऊन आडवा झालो, पण लक्ष सगळं या ‘चंदेरी दुनियेकडे’ लागलेलं होतं. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चंद्र अस्ताला गेला, पूर्ण काळोख पसरला. लाटांच्या मंजूळ पाश्र्वसंगीतावर आकाशाच्या काळ्या वस्त्रावर चमचमणाऱ्या तारका, डोळ्यांच्या कॅमेऱ्यात ते दृश्य अगदी साठवून ठेवले.
अशा या मानससरोवराचा परीघ नव्वद कि.मी.चा. तीन बाजूने क्षितिजाला टेकलेल्या मानससरोवरापासून कैलास अवघ्या पंचवीस कि.मी.वर. हवामान स्वच्छ असेल तर ‘या’ आरशात कैलास डोकावतोच. मानसच्या पूर्वेला कैलास पर्वतरांगा आणि ब्रह्मपर्वत. पश्चिमेला राक्षसताल, दक्षिणेला मांधाता (विष्णू पर्वत आणि उत्तर पूर्वेला प्रत्यक्ष कैलास पर्वत. मानससरोवराची उंची सोळा हजार फूट, जगातील सर्वात मोठे आणि उंचावरील गोडय़ा पाण्याचे सरोवर. स्फटिकासारखे स्वच्छ, निर्मळ, आकाशासारखे निळेपांढरे पाणी. मध्यात साधारण तीनशे फूट खोल, सभोवताली आठ गुंफा. मध्यभागी शांत असलेले पाणी किनाऱ्यावर मात्र लाटालाटांनी फेसाळत हलकेच उसळी घेते, जणू फेसाळ शुभ्र फुलांनी येणाऱ्यांचे स्वागत करते. काही पौराणिक संदर्भ मानसशी निगडित आहेत. येथे अनेक देवदेवतांचा वास आहे. भगवान श्रीकृष्णाने राधेसह इथे रासलीला केली. भगवान शंकर हे गोप्पिकेश्वर बनून येथे आले. मांधाता राजाने येथे तप केले आणि विश्वाची उत्पत्ती येथून सुरू झाली. रोज देवदेवता यक्ष, किन्नर, तारेतारका इथे स्नानाला येतात. येथील पाणी प्यायल्यावर सर्व पापे दूर होतात. या सरोवरातून डरकाळ्या, गर्जना, नौबतीसारखे आवाज येतात तर कधी हलक्या सुरावटी निनादतात. गारांचा पाऊस येतो तेव्हा गाराही दगडासारख्या टणक असतात. येथील हवा कायम थंड, वादळी असते. कैलासाच्या चारी बाजूंनी नद्या वाहतात. ईशान्येला सिंहमुखातून सिंधू नदीचा उगम, मयूरमुखातून कर्नाल नदी, सतलज नदी गजमुखातून, ब्रह्मपुत्रा नदी अश्वमुखातून. यातील कर्नाल नदी भारतात शरयू नावाने ओळखली जाते.
शब्द, नाद प्रकाश।
भगवंत दावितसे साक्ष।
मानस लहरीचे दिव्य संगीत।
मती झाली कुंठित।
हेच वर्तमान आहे.
आकाशातील ग्रहताऱ्यांच्या जवळ म्हणजे जणू स्वर्गातच पाऊल ठेवल्याच्या आनंदात सकाळ झाली. विरळ हवा, उंची, शून्याच्या खाली घसरलेला पारा, यामुळे ‘श्वास घेणे’ हे मोठे कामच वाटत होते. त्यात काहींना प्रचंड धाप लागली आणि परिस्थिती गंभीर झाली. काठमांडूच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी हेलिकॉप्टर येईपर्यंत सगळ्यांचीच पाचावर धारण बसली होती. आषाढी एकादशी असल्यामुळे विठुनामाचा गजर करत दारचिनच्या दिशेने पुढे सरकलो. तासाभराची ‘पद’यात्रा करून अष्टपादच्या दिशेने पाऊल वळवले. पवित्र कैलास पर्वत जवळून दिसण्याचे हे ठिकाण. जैनांचे पहिले मुनी वृषभदेव हे आठ पावलांत कैलास चढून स्वर्गात गेले असं म्हणतात. विश्वकम्र्याची प्राचीन, प्रसिद्ध, अप्रतिम कलाकृती म्हणजे स्फटिकासारखा शिवलिंगाच्या आकाराचा कैलास. शंकराचे नेत्र कपाळावरचे गंध, नाकासारखा उंचवटा असं हिमशिल्पच जणू. पावित्र्याच्या अनुभूतीने नतमस्तक झालो. ‘थंडीप्रूफ’ होण्यासाठी जास्तीत जास्त कपडे अंगावर चढवले होते, तरीसुद्धा थंडीचं नाक वरच. ‘डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा शिवजीचे रूप’ म्हणत दारचिन मुक्कामी हजर झालो. (उंची १७५००)
lp04आता सगळी भिस्त पावलांवर होती. आपण कैलासदर्शन घेतलं, या पराक्रमानेही हुरूप वाटत होता. चार कि.मी.वरील यमद्वारात थडकलो. तीन प्रदक्षिणा घेतल्या. पुराणकाळातील एका कथेनुसार, जे यमद्वार पार करून जातात, त्यांना मृत्यूसमयी यम नेत नाही. त्यांना प्रत्यक्ष शिवाकडून मृत्यू येतो, ‘शिव-कृपा’ होते. यमाने कैलासावर तप केले असता शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सांगितले की ‘जे कोणी कैलासमानस परिक्रमा पूर्ण करतील, त्यांना तू तुझ्या संयमनी नगरीकडे न्यावयाचे नाही. फक्त येथे येणाऱ्यांची नोंद घे.’ मनावर या कथेचे गारूड केले होते आणि ‘शेवट गोड व्हावा’ हीच मनोकामना होती. त्यामुळे यमद्वारातून प्रत्यक्ष परिक्रमेला सुरुवात करताना मन भरून आलं होतं. कैलास २९५०० फूट उंचावर आहे. दोन्ही बाजूला डोंगररांगा, मधून मस्तीत आपल्याच नादात वाहणारी नदी आणि उजव्या बाजूला कैलास पर्वत अशी आमची पदयात्रा चालू झाली. दगडगोटय़ांचा रस्ता, पावलोपावली कसरत करायला लावणारा, पुन:पुन्हा कैलास शिखराकडे ओढ घेणारी नजर, त्या नजरेला जबरदस्तीने पायात घुटमळत ठेवण्याचे दिव्य पार पाडावे लागत होते. सहा तासांची दमछाक झाल्यावर डेरापूक गाठले. (१८०००फूट) कैलास ध्यानस्थ होऊन समोर उभा होता. शीतल चंद्रप्रकाशात तो न्हाहून निघाला होता. इतके विहंगम, रमणीय दृश्य पाहून डोळय़ांचे पारणे फिटले. प्रचंड, दमणूक झाली असली तरीसुद्धा ‘बघत राहू दे तुझ्याकडे’ असाच मनाचा हट्ट होता आणि तो पुरवलाही.
पुढचा प्रवास आणखी दुर्गम असल्यामुळे पहाटे चारलाच श्रीगणेशा केला. मधे-मधे भेटणारा पाऊस, हाडे गोठवणारी थंडी, कानांशी घोंगावणारे, मागे ढकलणारे जोरकस वारे या सर्वाना तोंड देत निग्रहाने, ध्यासाने पुढे जात राहिलो. प्रत्येक दहा पावलांवर विश्रांती घ्यावी लागे. पाच तासांचा अथक प्रवास करून १९ हजार ६०० फुटांवर डोलमा पास या सर्वात उंच स्थानी पोहोचेपर्यंत प्राण अगदी कंठाशी आले. इतका दम लागत होता की ‘आता आले का?’ हा सततचा प्रश्नसुद्धा तोंडातून बाहेर पडत नव्हता. डोलमा हिला देवीचा अवतार मानतात. ‘अखेर जमले बुवा?’ या विचाराने ‘आनंद मनी मायेना’ अशी स्थिती झाली. वाटेत बुद्धाचे शांतिस्तूप दिसले. पंचमहाभूतांवर विश्वास ठेवणारे तिबेटियन छोटय़ा गोल दगडांवर ‘ॐ मणि पद्मे हुम’ हा मंत्र कोरून ते दगड एकमेकांवर रचून ठेवतात. अशा मणिपत्थरांवर रंगीबेरंगी कापडी ध्वजांच्या पताका बांधतात. वाऱ्याबरोबर या पताका फडफडतात आणि शांतीचा संदेश सगळीकडे पसरवला जातो, ही त्यामागची भूमिका आहे, असं म्हणतात. ‘अवघड वळण, धोका’ असा काळजीवाहू इशारा देणारे हे फलकच जणू. सुखद कैलासदर्शन घेऊन ‘अतिउंचावर जास्त वेळ थांबू नये’ ही पूर्वसूचना कृतीत आणून झपाझप उतारावर चालू लागलो. काही अंतरावर गौरीकुंड दिसले. दंतकथेनुसार जगन्माता पार्वती तिच्या सख्यांसह इथे स्नान करून कैलासला भेट देत असे, म्हणे.
गौरीकुंडापाशी थोडा वेळ थांबून पुन्हा अवघड उतरंडीला सामोरा गेलो. वाऱ्याने ढकलण्याची नामी संधी साधली. सपाटीवर आलो आणि खाऊची पिशवी थोडी हलकी केली. पुन्हा चौदा किलोमीटर अंतर पार करण्याचं दडपण होतं. पाच तासांत ते पूर्ण झालं. सर्वात कष्टप्रद, निसर्गाच्या रौद्र स्वरूपाशी टक्कर देत केलेला हा प्रवास अत्यंत मनोहर, ‘या सम हा’ असाच होता. परिक्रमा पूर्ण झाल्याचा आनंद स्वत: अनुभवल्याखेरीज कळणार नाही. हे तो प्रचीतीचे बोलणे।
आता परिक्रमेमुळे शेवटचा आठ कि.मी.चा टप्पा पूर्ण करायचा होता. विजयी वीरांप्रमाणे उत्साहात चालल्यामुळे दोन-तीन दिवसांच्या मानाने कष्ट जाणवले नाहीत. पापक्षालन होऊन पुनर्जन्म व्हावा तसा टवटवीत, ताजातवाना झालो होतो. हिमालयात भ्रमंती करून येणं, याच्यासारखं टॉनिक नाही, हे मित्राचे शब्द कानांत घुमत होते. आम्हा बहात्तर जणांमधून गळती लागत एकोणचाळीस जणांनी परिक्रमा केली. त्यातील सव्वीस जणांनी घोडय़ावर बसून केली. आम्ही तेरा जणांनी मात्र चालत परिक्रमेचा संकल्प पुरा केला. तिबेटियन लोक चालत तर करतातच, पण दर तिसऱ्या पावलाला ते साष्टांग नमस्कार घालतात. निसर्गाचं लहरी रूप आणि खाचखळग्यांचा रस्ता असूनही साष्टांग नमस्काराचा नेम करणं हे अतिशय कठीण. त्यांच्या श्रद्धेला शतश: प्रणाम.
मानससरोवराजवळ पोहोचलो. गुरूपौर्णिमेचा दिवस आणि मानसमध्ये स्नान, एक अपूर्व योग जुळून आला. पौर्णिमेच्या चांदण्यात चमचमणारा मानस पुन्हा बघावासा वाटत होता, परंतु पावसाळी ढगांच्या मागे चंद्र लपून बसला. कदाचित आम्ही परत जाणार म्हणून तो नाराज झाला असावा. शेवटी ‘त्याची’ मर्जी. ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं’ मनाने निर्णय दिला आणि त्या आनंदात झोप लागली. परतीच्या प्रवासात पावलांना गती येतेच. काठमांडू, दिल्ली, मुंबई, महड करीत स्वगृही परतलो. फुलांच्या पायघडय़ांनी आमचे स्वागत झाले.
असं म्हणतात की, ‘जपानमधील ‘निक्को’ हे सर्वात सुंदर शहर आहे. सौंदर्याच्या बाबतीत शेवटचा शब्द म्हणजे ‘निक्को शहर’. म्हणून येथे म्हण पडली आहे की, ‘निक्को’ पाहिल्याशिवाय ‘केक्को’ (सुंदर) म्हणू नये. पण जपान्यांनी जर कैलास मानस परिक्रमा केली तर ‘निक्कोला’, ‘केक्को’ म्हणायचं धाडस ते कदापि करणार नाहीत.
शब्दांकन- सुचित्रा साठे
शरद गांगल

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री