समलिंगींच्या विश्वावर प्रकाश टाकणारा ‘कशिश’ हा पाचवा मुंबई इंटरनॅशनल क्वीअर फिल्म फेस्टिव्हल २१ मे ते २५ मेदरम्यान संपन्न झाला. शारीरिक आकर्षणाच्या पलीकडे असणारं समलिंगी व्यक्तींचं आयुष्य, जीवन जगण्याची ओढ, त्यांच्या भावभावनांची मांडणी फेस्टिव्हलमधील चित्रपटांनी केली. दक्षिण आशियातील सर्वात मोठय़ा क्वीअर फिल्म फेस्टिव्हलचा आढावा…

प्रेमकथा हा बॉलीवूडी चित्रपटांचा हक्काचा यशस्वी फॉम्र्युला. दरदिवशी एक नवा नायक आणि एक नवी नायिका घेऊन त्याच त्याच घासूनघासून गुळगुळीत झालेल्या कथांचं दळण आपल्याला नवीन नाही. एखादा तरल मनाचा संवेदनशील कथाकार आणि दिग्दर्शक असला तर कधी तरी काहीतरी चाकोरीबाहेरचं पाहायला मिळतं. अर्थात तेदेखील प्रस्थापित समाजाच्या आखलेल्या चौकटीतलंच असतं. मात्र या सगळ्या चौकटी आणि चाकोरीबाहेरच्या विश्वात एक आणखीनच वेगळी प्रेमकथा साकार होत असते, आणि ती चित्रपटांच्या माध्यमातून मांडलीदेखील जाते. ती असते समिलगींच्या भावना मांडणारी. अर्थात हे चित्रपट पाहायला तर कमीच मिळतात, पण कधी कधी तर त्यांच्याकडे ‘तसले’ चित्रपट म्हणून पाहणारेदेखील समाजात काही कमी नाहीत. अर्थात ते आणि आपण अशी एक सोयीस्कर विभागणी आपण केली असल्यामुळे नेमकं त्यांच्या चित्रपटातून काय मांडलं जातंय, सांगितलं जातंय हेदेखील बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतं. किंबहुना त्यांचे चित्रपट आपण कशाला पाहायचे हादेखील एक शहाजोगी दृष्टिकोन असतो. असे जरी असले तरी समलिंगींच्या आयुष्यावर जगात आणि भारतातदेखील अनेक चित्रपट बनविले जातात आणि अशाच तब्बल १५४ चित्रपटांचा ‘कशिश’ हा पाचवा मुंबई इंटरनॅशनल क्वीअर फिल्म फेस्टिव्हल नुकताच अगदी उत्साहात पार पडला. देशविदेशातील तब्बल ३५० चित्रपट, नॅरेटिव्ह, लघुपट, माहितीपट, अ‍ॅनिमेशनपट इ. यासाठी आले होते. त्यातून निवडक अशा १५४ चित्रपटांची एक झकास मेजवानीच समलिंगींना यातून मिळाली आहे असंचं म्हणावं लागेल.
फेस्टिव्हल उत्साहात झाला म्हणायचं कारण असं की, डिसेंबर २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंध बेकायदेशीर ठरविल्यानंतर समलिंगींना थेट गुन्हेगारांच्याच पंक्तीला बसवले गेले आहे. भावना व्यक्त करणं तर सोडाच, पण आपली ओळख सांगणंदेखील अवघड होतंय की काय, अशा वातावरणात पाचव्या क्वीअर फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. तरीदेखील पाच दिवस सुरू असणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये सुमारे १५०० प्रेक्षकांची उपस्थिती या वर्गाचा उत्साह, जीवनेच्छाच दर्शविते. या पाश्र्वभूमीवरच ‘डेअर टू ड्रीम’ ही या वेळच्या फेस्टिव्हलची संकल्पना ठेवण्यात आली होती. खचाखच भरलेल्या लिबर्टी थिएटरमध्ये पार पडलेल्या या फेस्टिव्हलनं स्वप्नं पाहण्याचं धाडस, भावना व्यक्त करण्याचं साहस, शारीरिक आकर्षणाच्या पलीकडे जाऊन भावभावना काय असतात हे मांडायचा प्रयत्न केला आहे. आम्ही समलिंगी आमच्या भावना समाजासमोर मांडू शकतो आणि आमच्या आयुष्याची स्वप्नं पाहू शकतो, तेवढे धाडस आमच्यात नक्कीच आहे हे या फेस्टिव्हलनं दाखवून दिलं आहे, असं म्हणायला हवं.
फेस्टिव्हलच्या उद्घाटनाचा चित्रपट हाच मुळी या सर्वाचे सार सांगणारा होता. ‘आऊट इन द डार्क’ या उद्घाटनाच्या चित्रपटाने फेस्टिव्हलची उत्सुकता, अपेक्षा वाढविली. मुळातच सनातनी पारंपरिक शत्रुत्वाचा तिढा असणाऱ्या दोन देशांमधील गे जोडप्याच्या कथेवर बेतलेला हा चित्रपट पाहताना समलिंगींच्या अडचणी काय असू शकतात हे थेटपणे जाणवले. शिक्षणासाठी आलेला पॅलेस्टिनी तरुण आणि इस्रायली वकील एकमेकांच्या प्रेमात पडतात. या गे जोडप्यातील प्रेम आणि या दोन देशातील संघर्षांची सनातन विचारांची पाश्र्वभूमी, राजकीय दबाव, सामाजिक तेढ, कौटुंबिक रूढी-परंपरांचे जोखड अशा असंख्य ताणतणावात हा दीड तासाचा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. पॅलेस्टीन तरुणाचा सांभाळ करणाऱ्या भावाचे कट्टरपंथीयांशी असणारे संबंध, त्याच कट्टरपंथीयांकडून त्याच्या मित्राचा झालेला खून, पॅलेस्टाइन तरुणाची वाढती गुंतागुंत, त्याचा शिक्षणाचा परवाना रद्द होणं, कट्टरपंथीय भावालाच त्याचा खून करायची सुपारी मिळणं, त्यातून सुटून इस्रायली जोडीदाराकडे पळून येणं असा एक वेगवान बदल घेत हा चित्रपट जातो. इस्रायली जोडीदाराला पॅलेस्टिनी तरुणाने आपली कौटुंबिक पाश्र्वभूमी न सांगणे खूप खटकते, त्यातून वादविवाद होत ते काही काळ दुरावतात. पण इस्रायली तरुणाचं प्रेम पॅलेस्टिनी तरुणाला या सर्वातून सोडवून देशाबाहेर जाण्यास मदत करतं आणि हे करताना तो स्वत: मात्र कायद्याच्या कचाटय़ात सापडतो. ही सारी प्रेमकथा मांडताना प्रेमातील त्याग, जोडीदाराची काळजी, भांडणं, मतभेद हे सारं काही इतक्या परिणाकारकरीत्या मांडलं आहे की जणू काही तुमच्याआमच्या प्रेमाची गोष्ट असावी.

फेस्टिव्हलमध्ये स्पेन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका असे देश-विदेशातील तब्बल १५४ चित्रपट असल्यामुळे निवड समितीने पाहिलेच पाहिजेत असे दहा चित्रपट नोंदविले होते. पण त्याशिवायदेखील काही फिल्म्स इतक्या उत्कृष्ट होत्या की त्यांची नोंद का केली नाही, असा प्रश्न पडतो. त्यापैकीच एक म्हणजे रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेली ‘मित्रा’. विजय तेंडुलकरांच्या ‘मित्राची गोष्ट’ या नाटकावर आधारित ही फिल्म थेट स्वातंत्र्यपूर्व काळातील समलिंगींच्या जीवनाचा वेगळाच पट उलगडून दाखविणारी आहे. कृष्णधवल चित्रीकरणातील केवळ ३० मिनिटांच्या या फिल्ममधून अत्यंत परिणामकारकपणे विषयाची मांडणी केली आहे. ज्या काळात संवादाची साधनं नव्हती, सांगायचं तर कोणाला, हाच मोठा प्रश्न असायचा, समलिंगी संबंध म्हणजे पाप अशा भूमिका असायची, त्यात परत स्वातंत्र्य चळवळीचे देशभर असणारे वारे या बॅकड्रॉपवर चित्रपट चितारला आहे. एका ब्राह्मण मुलीला जाणवतं की आपण चारचौघींसारख्या नाही आहोत. आपल्याला पुरुषाचे आकर्षण नाही. वयाच्या दहाव्या वर्षी झालेल्या या जाणिवेला घरातून अर्थातच विरोध होतो. मात्र ती वसतिगृहात राहायला आल्यावर तेथील लाजऱ्याबुजऱ्या मुलींवर तिला सत्ता गाजवायला आवडते. त्यातच तिला जोडीदार भेटते, पण आपली घालमेल सांगायला तिला कोणीच नसते. सांगितलं तर समाज कसा काय स्वीकारणार, हा प्रश्न असतोच. तर दुसरीकडे तिच्या लहानपणीच्या मित्राला ती आवडत असते. ती त्याला आपली परिस्थिती सांगते, सुमित्राची मित्रा होते आणि तीच मित्राची गोष्ट होते.
परिणामकारक छायाचित्रण आणि मोजकेच पण प्रभावी संवाद, चपखल सेट आणि रवी जाधव यांचं उत्कृष्ट दिग्दर्शन यातून विषय थेट पोहोचतो. जेव्हा संवादाची साधनं कमी होती तेव्हा समलिंगी समाज कसा काय भावना व्यक्त करत असेल, त्याला योग्य जोडीदार मिळत असतील का, सारा कोंडमारा सहन करत तो कसा जगत असेल, असे प्रश्न प्रेक्षागृहातून नव्या पिढीकडून व्यक्त होणे हेच या चित्रपटाचे यश म्हणावे लागेल. रवी जाधव यांनी एकही फ्रेम वाया न घालवता, अगदी नेटकेपणाने थेट मुद्दय़ाला हात घातला आहे. खरंतर समलिंगींवर मराठीत फारसं साहित्य नाही, जे आहे ते बरेचसे मार्गदर्शनपर, माहितीपर या स्वरूपातील. चित्रपट वगैरे तर अगदीच कमी. त्या पाश्र्वभूमीवर मराठीत हा विषय मांडणं हे काहीसं धाडसच होतं, पण ते स्वीकारून रवी जाधव यांनी विषयाला योग्य वाव दिला आहे.
फेस्टिव्हलमध्ये अगदी दीड-दोन मिनिटापासून ते ९० मिनिटांपर्यंतच्या फिल्मचा समावेश होता. त्यात नॅरेटिव्ह फिल्म होत्याच, तसेच माहितीपटदेखील होते. विशेष म्हणजे भारतीय पाश्र्वभूमीवर चित्रित करण्यात आलेले माहितीपट चित्रपटदेखील तुलनेने अधिक होते. यामध्ये आवर्जून उल्लेख करायचा तो ‘पर्पल स्काय’ आणि ‘शिवानंद खान ए लाइफ’ या दोन माहितीपटांचा. देशातील समलिंगींच्या समाजाचे वास्तव दाखविणारे आणि कार्यकर्त्यांच्या आयुष्यावर मांडलेले हे दोन्ही माहितीपट प्रबोधनपर आणि अभ्यासपूर्ण होते. नाझ फांउडेशनचे शिवानंद खान यांच्या निधनानंतर देशभरातील, जगभरातील कार्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला वाहिलेली ही अनोखी श्रद्धांजलीच म्हणावी लागेल. तर श्रीधर रंगायन यांनी दिग्दर्शित केलेला ‘पर्पल स्काय’ हा माहितीपट हा देशातील लेस्बियन, ट्रान्सजेंडर, बायसेक्सुअल यांच्यावर आधारित होता. समाजातील हा वर्ग नेमका कसा आहे, त्यांची भूमिका काय आहे, अपेक्षा काय आहेत, ते कसे जगताहेत, त्यांचे कुटुंबीय या सगळ्याकडे कसे पाहत आहेत, अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा यामध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सगळं प्रत्यक्ष समलिंगींनीच मांडलं असल्यामुळे त्याला एक वेगळीच धार प्राप्त झाली आहे. खरंतर हे दोन्ही माहितीपट सर्वानीच आवर्जून पाहायला हवेत. जेणेकरून समाजातील हा वर्ग नेमका कसा जगतोय हे कळू शकेल.
समलिंगींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनण्याचं प्रमाण काही प्रमाणात आपल्याकडे हळूहळू वाढत असलं तरी कॅनडा, जर्मन, फ्रान्स या देशांत मुख्य धारेतील चित्रपटांच्या जोडीनेच असे चित्रपट तयार होताना दिसतात. उत्कृष्ट तंत्रज्ञान, कसदार कथा या जोरावर कल्पकतेने दिग्दर्शित केलेले काही चित्रपट फेस्टिव्हलमध्ये पाहता आले. उत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळालेला ‘ट्र लव्ह’ हा त्यापैकीच एक. करिअरमध्ये अत्यंत व्यस्त असणाऱ्या मुलीच्या घरी तिची आई नवऱ्याच्या निधनानंतर राहायला येते. मुलीच्या व्यस्ततेमुळे तिची मैत्रीण ट्र हीच आईची खातिरदारी करते. तिच्याबरोबर हिंडते, गप्पा मारते, तिला तिच्या विश्वात कुढण्यापासून परावृत्त करते, त्यातूनच दोघींमध्ये एक अव्यक्त नातं तयार होतं. मुलगी मात्र तिच्या मैत्रिणीबाबत पझेसिव्ह असते. मैत्रीण लेस्बियन आहे, ती जाळ्यात ओढेल, म्हणून आईला दूर ठेवायचा प्रयत्न करते. दोनचार दिवसांच्या दुराव्यानंतर आई आणि मैत्रीण भेटल्यावर आईला कळते की तिची स्वत:ची मुलगी लेस्बियन असून जोडीदार मैत्रीण दुरावेल, आपले गुपित आईला कळेल म्हणून मुलीचे प्रयत्न सुरू आहेत. हे कळल्यानंतर कथा एकदम फिरते. आईचे मुलीला समजून घेणं, त्यातच स्वत:ची घालमेल होणं, कारण तीदेखील नकळत ट्रमध्ये गुंतलेली असते, हे सारे खूपच हळुवारपणे पण परिणामकारकरीत्या मांडले आहे. केवळ तीन पात्रांवर आधारित हा चित्रपट समलिंगींच्या आयुष्यातील सारी घालमेल, बदल अगदी नेमकेपणाने टिपतो.

मुख्य धारेतील परदेशी चित्रपटांबरोबरच समलिंगी व्यक्तींच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे काही परदेशी माहितीपटदेखील होते. वयस्क समलिंगींचं आयुष्य मांडणारा ‘बिफोर यू नो इट’ चित्रपट त्यापैकीच एक होय. अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या तीन गे व्यक्तींच्या उत्तर आयुष्यावर एक वेगळाच प्रकाश या माहितीपटातून टाकण्यात आला आहे. तर ‘टाबोलं’ या केवळ चार मिनिटांच्या लघुपटातून सर्वसामान्यांच्या वैवाहिक आयुष्यातील वादविवाद समलिंगींच्या आयुष्यातदेखील कसे असतात हे मांडले आहे. आपल्या जोडीदाराची सर्व गुपित माहिती (ईमेल पासवर्ड, कोड नंबर्स इ.) आपल्याला हवी असे एका गे जोडीदाराला वाटते; तर दुसरा त्यासाठी राजी नसतो. त्यातून निर्माण होणारं भांडण आणि नवरा-बायकोतील भांडण यात काहीच फरक नाही हेच यातून मांडले आहे.

‘टू मदर्स’ या जर्मन चित्रपटातून मूल हवं असणाऱ्या लेस्बियन जोडप्याची कथा मांडली आहे. जर्मनीसारख्या विकसित देशात राहूनदेखील त्यांना मूल होण्यासाठी योग्य ती मदत मिळण्यात येणाऱ्या अडचणी, मात्र एका जोडीदाराने मूल होण्यासाठी करत असणारा आटापिटा आणि त्याचा दुसऱ्या जोडीदारावर होत असणारा परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. शेजारच्याच श्रीलंकेतील गे जोडप्याची प्रेमकथा ‘फ्रांगिपनी’ या चित्रपटात पाहायला मिळते. उपवर मुलीने लग्नासाठी इच्छा व्यक्त करणे, पण आपण गे आहोत हे न सांगता मुलाने ती नाकारणे आणि त्याच वेळी दुसऱ्या जोडीदाराने घर, दुकानाची जागा या मोहापोटी तिच्याशी लग्न करणे, त्यामुळे पहिल्या जोडीदारास होणारा त्रास, आपला नवरा गे आहे हे कळल्यावर मुलीला होणारा त्रास आणि या तिघांची फरफट मांडली आहे. या चित्रपटात केलेल्या तडजोडी मात्र तात्त्विकतेच्या कसोटीवर उतरत नाहीत.
फेस्टिव्हलमधील उत्कृष्ट माहितीपटाचे पारितोषिक मिळवलेला ‘ब्राइडग्रूम’ हा चित्रपट मात्र काहीसा लांबलचक होता. माहितीपटाला आवश्यक अभ्यास, विचार त्यात होता. पण गे जोडप्यांशी संबंधित व्यक्तींच्या सततच्या वक्तव्यांमुळे काहीसा कंटाळवाणादेखील झाला. उत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळवला तो ‘फॅमिलीज आर फॉरेव्हर’ने. कर्मठ सनातनी परंपरा पाळणाऱ्या मर्मन घरातील दोन तरुण प्रिस्ट एकमेकांच्या प्रेमात पडतात. सनातन धार्मिक आदेश पाळायचा की मुलांचं हित पाहायचं असा सनातन प्रश्न दोन्ही कुटुंबांना पडतो. मात्र शेवटी धर्मावर मात करत कुटुंबीय मुलांचं हित पाहतात. भारतीय चित्रपटांमध्येदेखील कर्मठ पण उच्चभ्रू मुस्लीम कुटुंबातील प्रसंग ‘बिटविन ड्रीम्स अ‍ॅण्ड वेकिंग’ या लघुपटात मांडण्यात आला आहे. मुस्लीम कुटुंबाच्या मित्राची मुलगी शिक्षणासाठी त्यांच्या घरी असताना मुस्लीम कुटुंबातील मुलगी तिच्या प्रेमात पडते. मुस्लीम पिता उच्चशिक्षित मात्र धार्मिक पगडा असणारा असतो, त्याला हे मान्य न होऊन चक्क स्वत:च्या मुलीला पेटवायला निघतो. तरीदेखील मुलगी ऐकत नाही. अखेरीस आईच पुढाकार घेऊन मुलीला जे हवं ते करु देते.
भारतातील समलिंगीच्या माहितीपटाबरोबरच काही मुख्य धारेतील चित्रपटदेखील बरेच आले आहेत. अर्थात त्यात बंगाली चित्रपटांची आघाडी आहे. ॠतुपर्णो घोष यांची भूमिका असणारा ‘मेमरीज इन मार्च’ हा बंगाली-हिंदूी-इंग्रजी असा मिश्र आणि पूर्णपणे वेगळ्या वाटेने जाणारा असा चित्रपट आहे. २८ वर्षांचा एक युवक नोकरीसाठी शहरात येतो, यशाचा मार्ग चढत जातो आणि एके दिवशी अपघातात मृत्यू पावतो. त्याची आई त्याच्या पुढील कार्यासाठी कंपनीत येते त्या तीन दिवसांत मुलाविषयी तिला वेगळीच माहिती मिळते. तिला समजावण्याचे आणि परिस्थितीचे भान देण्याचे काम मुलाचा बॉस आणि गे जोडीदार असणारे ॠतुपर्णो करतात. मानवी स्वभावाचे अनेकविध कंगोरे उलगडत एका वेगळ्याच उंचीवर हा चित्रपट घेऊन जातो. विशेष म्हणजे एक प्रयोगशील, संवेदनशील आणि अत्यंत क्रिएटीव्ह असे दिग्दर्शक असतानादेखील दुसऱ्या दिग्दर्शकाकडे त्यांनी सहजपणे आणि हातचे न राखता काम केले आहे. भारतीय भाषांत मराठी, गुजराती आणि तामिळ चित्रपट, माहितीपटांची हजेरी होती. मात्र इतर भाषांकडून उदासीनताच जाणवली.
फेस्टिव्हलच्या निमित्ताने समलिंगींचे चित्रपट, वास्तवदर्शी माहितीपट, समलिंगीच्या भारतातील समस्या, अशा चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या. समलिंगींवरील चित्रपटातून कायम संदेशच न देता त्यापलीकडे जाऊन कथा असणारा चित्रपट निर्माण व्हावा अशी अपेक्षा नोंदविण्यात आली. जर या चित्रपटातून केवळ समलिंगींच्या अडचणी, समाजाला संदेश देणं इतकंच होत राहिलं तर हे चित्रपट पाहण्यास समलिंगींव्यतिरिक्त अन्य प्रेक्षक कसे लाभणार. समलिंगींचे चित्रीकरण करताना असणारा ठोकळेबाज दृष्टिकोन (बायकीपणा, गुलाबी कपडे इ.) असे अनेकांना वाटत होते. गेली चार वर्षे ‘कशिश’ला नियमित हजेरी लावणाऱ्या सौरभ बोंद्रे याची प्रतिक्रियादेखील काहीशी अशीच होती. समस्या तर मांडल्या जात आहेतच, पण आमच्या आयुष्यातदेखील अनेक घडामोडी आहेत. मुख्य धारेतील चित्रपटाप्रमाणे चित्रपट बनविताना त्यामध्ये समलिंगींचा विषय मांडावा असे ते सांगतात. असे प्रयोग परदेशातील अनेक चित्रपटांत झाल्याचे ते नमूद करतात. फेस्टिव्हलमधील सर्वात प्रभाव पाडणारा चित्रपट म्हणून ते ‘आऊट इन द डार्क’ चा उल्लेख करतात. चित्रपटातील पॅलेस्टीन, इस्रायलमधील परिस्थिती आणि भारतातील परिस्थितीची ते तुलना करतात. सौरभ सांगतात की, ‘‘आम्ही त्यांच्यापेक्षा खूपच नशीबवान आहोत. आपल्याकडे समाजाला आता समलिंगींबद्दल माहिती होऊ लागली आहे, पण धार्मिक, सनातनी प्रभावाखाली समलिंगींचं काय होत असेल हे त्यातून जाणवलं.’’ दरवर्षी नियमित फेस्टीव्हलला हजेरी लावणारे आनंद पेंढारकर सांगतात यावर्षी प्रशस्त चित्रपटगृहामध्ये फेस्टीव्हल असल्यामुळे प्रतिसाद चांगला होता, पण अजूनही समाज त्यांचा आणि आपला अशी विभागणी करतो. आज समलिंगीच प्रमाण मोठय़ा प्रमाणात आहे आणि सर्वच स्तरात आहे. असे असताना या चित्रपटाकडे केवळ त्यांचा चित्रपट म्हणून पाहू नये अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
फेस्टिव्हलचे सहसंयोजक असणाऱ्या हमसफर ट्रस्टचे पल्लव पाटणकर सांगतात की, ‘‘या वर्षी भारतीय चित्रपटांचा सहभाग बराच वाढला आहे. इतकेच नाही तर त्यांची परिपक्वतादेखील वाढली आहे. समलिंगींव्यतिरिक्त अनेकजण फेस्टिव्हलमध्ये आले होते. ‘कशिश’मुळे अनेक दिग्दर्शक कलाकार आणि मुख्य म्हणजे समलिंगी वर्गाला परदेशातील व्यासपीठावर ओळख मिळत आहे.’’ सुरुवातीस ‘कशिश’मध्ये बाहेरून फिल्म्स येण्याचं प्रमाण कमी होतं, पण गेल्या एक-दोन वर्षांत ते वाढले आहे. पण भारतीय चित्रपट अजून कथा म्हणून फारसा पुढे येत नाही. बाहेरच्या देशात यासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे, त्यामुळे तिकडे मुख्य प्रवाहातदेखील या चित्रपटांना स्थान आहे. ‘कशिश’मुळे भारतात अशी बाजारपेठ तयार होईल. या वर्षी तर अनेक प्रायोजकांनी सीएसआर म्हणून नाही तर थेट व्यावसायिक प्रायोजक बनून पाठिंबा दिला आहे हे त्याचेच द्योतक असल्याचे ते सांगतात.
२०१० साली सुरू झालेल्या ‘कशिश’ने आता चांगलीच भरारी घेतली आहे. यापूर्वी छोटय़ाशा थिएटरमध्ये होणारा हा फेस्टिव्हल यंदा थेट लिबर्टी सिनेमागृहात आणि अलायन्स फ्रान्सिस ऑडिटोरिअम येथे भरविला होता. यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं सावट होतं. त्यातच आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण होण्यासाठी फेस्टिव्हलला सशुल्क प्रवेश ठेवण्यात आला होता. तरीदेखील १५०० प्रेक्षकांनी फेस्टिव्हलला दिलेली भेट हेच सांगते की हा वर्ग खचलेला नाही. कायदेशीर बंधनं असली तरी स्वप्न पाहायचं धाडस ते करतच आहेत आणि यापुढेही करत राहतील.
१ी२स्र्ल्ल२ी.’‘स्र्१ुंँं@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे

पुरस्कार
बेस्ट नॅरेटिव्ह फीचर फिल्म – ट्र लव्ह
बेस्ट अ‍ॅक्टर (प्रमुख भूमिका) – केट ट्रोटर
बेस्ट इंडियन नॅरेटिव्ह शॉर्टफिल्म – मित्रा (दिग्दर्शक- रवी जाधव)
रियाद वाडिया बेस्ट इमर्जिग इंडियन डिरेक्टर – शेरॉन फ्लायन्न
बेस्ट डॉक्युमेंट्री (फीचर) – ब्राइडग्रूम
बेस्ट डॉक्युमेंट्री (शॉर्ट फिल्म) – फॅमिलीज आर फॉरेवर
बेस्ट इंटरनॅशनल नॅरेटिव्ह (शॉर्टफिल्म) – नेकेड
स्पेशल मेंन्शन – पी. डी. ए.
३१ देशांतून आलेले एकूण १५४ चित्रपट या फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आले. त्यापैकी ११ चित्रपटांचा वर्ल्ड प्रीमिअर,१७ चित्रपटांचा इंटरनॅशनल प्रीमिअर आणि ३९ चित्रपटांचा एशिअन प्रीमिअर होता.