किशोरवयातल्या हळुवार भावना, त्यातून कधी कधी येणारा एकाकीपणा, त्यातच अल्लड आणि अवखळ मनमुराद मनस्वी बागडण्याची ओढ, सर्वानाच हवीहवीशी वाटणारी अशी खोडकर काहीशी वात्रट झालर, परिस्थितीच्या रेटय़ाने निर्माण झालेला आई मुलाच्या नात्यातला दुरावा – ताणतणाव आणि हे सारे उलगडण्यासाठी वापरलेला सागराचा नि:शब्द अथांगपणा, तर कधी उसळलेल्या लाटांचं अंगावर येणं, सोबतीला निसर्गाचा उत्फुल्ल असा भव्यतेचा बॅकड्रॉप.
फोटो गॅलरीः राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘किल्ला’
विलोभनीय चित्रप्रतिमांआधारे गुंफलेला एक सहजसुंदर आणि बहारदार चित्रपट असं एका वाक्यात वर्णन करावं असाच. चित्रपट हे दृश्यप्रतिमांची भाषा आणि दिग्दर्शकाचं माध्यम आहे, हे ठामपणे थेट पोहोचवणारा चित्रपट म्हणजे किल्ला.
दृश्यबंबाळतेला अजिबात थारा न देता दृश्यप्रतिमांनी अबोल भावनांचा कल्लोळ मांडणारा चित्रपट म्हणजे किल्ला. संगीत, संवाद, संकलन, दिग्दर्शन, कथा अशा एकूण एक घटकांचा मेळ साधत साकारलेला मास्टर पीस म्हणावा लागेल.
विधवा आई, किशोरवयीन मुलगा, त्याचे शाळूसोबती आणि त्यांचा भवताल याभोवती किल्लाचं कथानक गुंफलेलं आहे. आईच्या सरकारी नोकरीतील बदलीमुळे चिन्मय आईसोबत गुहागरसारख्या कोकणातल्या नयनरम्य गावी येतो. सततच्या बदलीमुळे आईची ओढाताण तर होत असतेच पण चिन्मयला देखील प्रत्येक वेळी नवी शाळा, नवे सोबती, नवं वातावरण यांच्याशी जुळवून घेताना कठीण जात असते. एकीकडे आईचा सरकारी नोकरीतल्या परिस्थितीशी जुळवून घेताना होणारा संघर्ष दुसरीकडे तिचं एकटेपण, वडिलांविना मुलाला सांभाळताना होणारी ओढाताण आणि त्यातूनच आई-मुलामध्ये निर्माण झालेला दुरावा असा हा तिढा वाढत जातो. चिन्मय गुहागरमधल्या शाळेत हळूहळू रमू लागतो. बंडय़ा, युवराज अशा काहीशा खोडकर मित्रांबरोबर त्याचे सूर जुळतात आणि एकटेपणाची भावना कमी होऊ लागते. मात्र घरातला तिढा तसाच असतो. त्याच वेळी मित्रांबरोबर सायकल रेस लावीत किल्ल्यावर गेल्यानंतर चिन्मय एकटाच मागे राहतो. मुसळधार वादळी पाऊस, भयाण असा अवाढव्य किल्ला आणि आजवरच्या परिस्थितीने अत्यंत नाजूक झालेली चिन्मयची मन:स्थिती. मन:स्वास्थ्य प्रचंड दोलायमान करणाऱ्या प्रसंगाने चिन्मय पुन्हा एकटा एकटा राहू लागतो. आणखीनच स्वत:मध्ये गुरफटत जातो, पण अथांग सागराच्या सोबतीने पुन्हा एकदा मूळ पदावर येतो. परिस्थितीला थेट सामोरे जातो. चित्रपटाच्या सुरुवातीस ही बदली नको, हे गाव नको, येथे माझी काळजी कोणालाच नाही म्हणणारा चिन्मय पुढच्या तीन-चार महिन्यांत हे सारं आपलंसं तर करतोच, पण पुन्हा बदली झाल्यावर ते वास्तवदेखील स्वीकारत आईबरोबर पुढच्या प्रवासाला जातो.
चित्रपटाचं कथानक म्हटलं तर ऑफबिट सदरात मोडणारं, पण त्याच वेळी अगदी सहजपणे भोवतालच्या समाजावर भाष्य करणारं, तुम्हा-आम्हा सर्वाच्याच आयुष्यात डोकावणारं आहे. विधवा आई हा चित्रपटीय भाग सोडला तर किशोरवयीन मुलांच्या आयुष्यातले सारे प्रसंग सहजपण टिपले आहेत. आईच्या नोकरीच्या माध्यमातून सरकारी कामकाजावर थेट भाष्य केलं आहे. कुटुंबातले ताण-तणाव अलगदपणे मांडत आलेल्या परिस्थितीला स्वीकारण्याची वस्तुस्थिती मांडली आहे.
killa01
सर्वागाने सुंदर अशी ही कलाकृती असली तरी या सिनेमॅटोग्राफी हे बलस्थान आहे. चित्रपट हे दृश्यप्रतिमांचं माध्यम आहे हे किल्ला अगदी थेटपणे जाणवून देतो. कोकणातल्या नितांतसुंदर लोकेशन्समुळे या चित्रप्रतिमांना वेगळीच उंची लाभली आहे. कोकण किती विस्मयकारी आणि सुंदर आहे हे प्रथमच इतक्या प्रभावीपणे या चित्रपटामुळे पडद्यावर जाणवते. चिन्मयचं घर, शाळा, शाळेचा रोजचा रस्ता, समुद्रकिनारा, समुद्र, किल्ला, दीपगृह अशा मोजक्याच स्थळांच्या माध्यमातून कथानकाचे सारे कंगोरे अफलातून पकडले आहे. त्यामुळे प्रत्येक फ्रेम बोलकी होते. प्रसंगाची लांबी-रुंदी खोली आणि महत्त्व या फ्रेममधूनच उलगडत.
चिनूची मच्छीमार बोटीतली सागर सफर हा चित्रपटाचा टर्निग पॉइंट. अत्यंत दोलायमान मानसिक अवस्थेतला चिन्मय जेव्हा एका कोळ्याबरोबर मच्छीमार होडीतून जातो, तेव्हा अथांग सागराच्या पाश्र्वभूमीवर त्याच्या मनाच्या कवाडांना पडलेली सारी बंधनं गळून पडतात. त्याचं ते कुढणं, वैतागणं सार काही त्या अथांगतेच्या पुढे नाहीसं होतं. स्वत:स विसरून जावं आणि सर्वात मिसळून जावं असंच काहीसं सुचविणारा हा प्रसंग खूप काही सांगून जातो.
शांततेलादेखील आवाज असतो, हे या चित्रपटात कळते. संगीताची केवळ एखादी नाजूक लकेरदेखील असंख्य भावभावनांना उलगडू शकते, दृश्य प्रभावी करू शकते हे येथे स्पष्टपणे दिसते. केवळ वातावरणनिर्मितीसाठी अनेक साऊंड इफेक्टस् वापरण्याच्या आजच्या काळात असं काही करणं जरा धाडसाचं म्हणावं लागेल. पक्का गृहपाठ हे चित्रपटाचे आणखी एक बलस्थान म्हणावं लागेल. निर्मितीमागच्या प्रत्येक घटकाला आपलं काम अगदी व्यवस्थित कळले असेल तर एकसमुच्चय असा जो काही परिणाम असतो तो अत्यंत प्रभावशाली असतो. तेच या चित्रपटातून दिसून येतो.
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादा चित्रपट कोणत्या काळाला सूट होतो, असा एक अनेक चिंतातुर जंतूचा प्रश्न असतो, पण येथेच एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की चित्रपटाच्या कथानकातील केवळ काही भौतिक परिमाणं सोडली तर ठरावीक एका काळाचं बंधन येत नाही. भावनांचा, वर्तणुकीचा आधार घेत मांडलेलं हे कथानक संदर्भ बदललेले तरी मूळ गाभ्याला कसलाच धक्का न लागणारं आहे.
अर्थातच दिग्दर्शकाच्या मेहनतीचं सर्वच कलाकारांनी सोनं केलंय. मध्यमवर्गीय कुटुंबातली मध्यमवयीन आईच्या भूमिकेत अमृता सुभाष अगदी चपखल बसली आहे. चिन्मय या किशोरवयीन मुलाच कुढणं, खुलणं, वैतागणं हे सारं अर्चित देवधरने तंतोतंत साकारलं आहे.  ‘ए शिष्यवृत्ती..’ अशी एकदम खटय़ाळ हाक मारणाऱ्या पार्थ भालेरावनं संपूर्ण चित्रपटात धम्माल केली आहे. एकदम बेफिकीर तरीही प्रेमळ अशा बंडय़ाची ही भूमिका करताना पार्थमधला कलाकार आणखीच खुलला आहे. गौरीश गावडे, स्वानंद रायकर, अथर्व उपासनी या बच्चेकंपनीने आणि इतर सहकलाकारांनी उत्तम साथ दिली आहे.
एखादी कलाकृती पाहताक्षणी मनाला भावते, एखादी थेट अंगावर येते. तर एखाद्या कलाकृतीची अनुभूती हळूहळू भिनत जाते. मंदगतीने द्रुतगतीतला ताल पकडावा, मध्येच पुन्हा हळुवार व्हावं आणि हळूहळू तुमचा ताबा घ्यावा तसं. मग तुम्ही त्या कलाकृतीचा भाग होता, स्वत:लादेखील शोधता आणि मग त्या कलाकृतीची झिंग चढते. किल्ला हा या प्रकारातली कलाकृती आहे.

निर्मिती  – एमआर फिल्मवर्क्‍स, जार पिक्चर्स आणि एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन
कथा, छायाचित्रण, दिग्दर्शन – अविनाश अरुण
पटकथा – तुषार परांजपे
संवाद – उपेंद्र शिधये
संगीतकार – नरेन चंदावरकर, बेनेडिक्ट टेलर
संकलन – चारुश्री रॉय
कला दिग्दर्शन – प्रशांत बिडकर
कलाकार – अर्चित देवधर, अमृता सुभाष, पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर, अथर्व उपासनी आणि इतर.

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…