या ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत गोदावरीच्या तीरावर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा शासनाच्या भरघोस अनुदानामुळे पार पडणार आहे. भारतात हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक व उज्जन या ठिकाणी चक्राकार पद्धतीने साधारणत: दर चार वर्षांनी कुंभमेळा हा हिंदूंचा (वैदिकांचा) सोहळा साजरा होत असतो. या कुंभमेळ्याच्या जन्मामागे धर्मग्रंथामध्ये अनेक आख्यायिका असल्या तरी हे कुंभमेळे केवळ विशिष्ट खगोलीय परिस्थितीच्या वेळेसच होतात हे वैज्ञानिक सत्य डोळसपणे समजून घेण्याची गरज आहे. सूर्य, गुरू हे जेव्हा सिंह, कुंभ, वृषभ, मकर किंवा वृश्चिक या राशीत असतात तेव्हाच कुंभमेळ्याचा योग येतो.
निसर्गशास्त्राच्या नियमानुसार असे योग अत्यंत शिस्तीने काही ठरावीक कालावधीनंतर अगदी बरोबर येत असतात. कुंभमेळ्याच्या जन्मामागील धार्मिक आख्यायिकांतील देव-दानवांच्या अमृताकरिता झालेल्या लढाईचा तटस्थपणे व सूक्ष्मपणे अभ्यास केला असता असे लक्षात येते की, या धर्मग्रंथाच्या लेखक संपादकांनी दानवांना अगोदरच खलनायक ठरवून अमृताचा कुंभ मुद्दाम देवांच्या हवाली केला. वास्तविक अमृतमंथनासाठी देव व दानव या दोघांनीही परिश्रम घेतले होते. अनेक धर्मग्रंथात जेव्हा जेव्हा देव व दानवांचा (सूर-असुर) संघर्ष झाला तेव्हा तेव्हा बहुतेक किंवा प्रत्येक वेळी दानवांना मुद्दाम कागदावर पराभूत केल्याचे दिसून येते. कुंभमेळ्याबाबत उपलब्ध लिखाणापैकी सर्वप्रथम प्रवासलेखन चिनी, बौद्ध, भिक्खू, ून साँग (४ंल्ल ळ२ंल्लॅ ६२९-६४५) यांनी अतिशय विस्तृतपणे व रोचकपणे चिनी भाषेत केल्याचे दिसून येते. कुंभमेळ्याचे आयोजन, होणारा प्रचंड खर्च, अनेक विकृत पद्धती याबाबत शेकडो वर्षांपासून वेळोवेळी वादविवाद झालेले आढळून येतात. हे वाद कधी कधी शाहीस्नान प्रथम कुणी करायचे किंवा कुंभमेळा नाशिकचा खरा की त्र्यंबकेश्वरचा खरा, अशा क्षुल्लक वादापासून तर अस्पृश्यांना या कुंभमेळ्यात देण्यात आलेल्या हीन वागणुकीच्या वादासारखे अत्यंत तीव्र झालेले दिसून येतात. शाहीस्नान प्रथम कोणत्या साधूंच्या आखाडय़ाने करावे हा इतिहास तर अक्षरश: रक्तरंजित आहे. अखेर पोलीस प्रशासनाला प्रत्येक वेळी या स्नानाचा क्रम ठरवून द्यावा लागतो. अहंगड व अभिमानामुळे साधूंच्या वेगवेगळ्या गटांमध्ये अनेकदा अतिशय किरकोळ कारणावरून धुमचक्री होते. १९९१ च्या नाशिकच्या कुंभमेळ्यात गगनगिरी महाराजांनी हेलिकॉप्टरमधून रामकुंडावर पुष्पवृष्टी केली. या कारणावरून बराच दीर्घ वादंग निर्माण झाला होता. तसेच रामानंद संप्रदायाचे राम नरेशाचार्य यांना शाहीस्नान करण्यापासून प्रतिबंध करण्याचा फतवाही तेव्हा बारा महंतांच्या शिष्टमंडळाने काढलेला होता. (या नरेशाचार्यानी कुंभमेळयात होणाऱ्या विकृतीवर बोट ठेवले होते हे विशेष.) अशा दांभिक व ढोंगी साधूंवर जगद्गुरू तुकोबांनी मार्मिक हल्ला चढविला आहे.
अंतरी पापाची कोठी,
वरि वरि बोडी डोई दाढी!
बोडिले ते निघाले!
काय पालटले सांग पहिले!
कुंभमेळयानिमित्त शेकडोंच्या संख्येने असे साधूंचे आखाडे दोन महिन्यांच्या मुक्कामाकरिता संपूर्ण लवाजम्यासह मुक्कामी असतात. प्रत्येक आखाडय़ाची कार्यपद्धती व जीवनपद्धती वेगवेगळी असते. प्रत्येक आखाडय़ाला त्यांचा एक स्वत:चा इतिहास आहे. मात्र गांजा, चरस, अफीम या प्रतिबंधित वस्तूंचा प्रचंड सुळसुळाट सर्वसाधारणपणे सर्व आखाडय़ात असण्याची मात्र एक सामायिक गोष्ट प्रकर्षांने आढळून येते. अध्यात्माचा व परमेश्वराचा शोध घेण्याकरिता आवश्यक एकचित्तता व एकाग्रता या गांजा, अफूच्या सेवनाने लाभते, असे बेगडी पुरावेही या कृतीच्या समर्थनार्थ दिल्या जातात. मागील काही कुंभमेळ्यांमध्ये अनेक आक्षेपार्ह तसेच अनेक हास्यास्पद घटना झाल्याचे आपण इतिहासाच्या पृष्ठांमधून सहज वाचू शकतो. १९५६ च्या कुंभमेळ्यात एका दलित व्यक्तीने साधूंना केलेले अन्नदान नाकारणाऱ्या या धर्ममरतडांनी १९५१ च्या कुंभमेळ्यात मात्र एक महंताचा त्याच्या कुत्र्यासोबत शाहीस्नान करण्याचा दूराग्रह पूर्ण केला होता. अशा प्रकारचे अनेक विरोधाभास या कुंभमेळयांमधून हमखास आढळतात. महिलांच्या वस्त्र परिधानाच्या प्रकारावर ‘तोकडे’ या चाळणीतून सेन्सॉर लावणाऱ्या अनेक धर्ममरतडांनीच १८७२ मध्ये ब्रिटिशांनी कुंभमेळ्यामध्ये नग्न साधूंवर लावलेल्या बंदीविरुद्ध प्रचंड संघर्ष केला होता. त्यातूनच दंगलसुद्धा उसळली होती. तसेच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश सरकारने २०१३ च्या इलाहाबाद येथील कुंभमेळ्याकरिता आणलेल्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित शौचालयांनासुद्धा अनेक साधूंनी विरोध केल्याचे आढळून येते.
कुंभमेळा व चेंगराचेंगरी या दोन गोष्टी तर अगदी हातात हात घालून चालतात की काय अशी वस्तुस्थिती प्रत्येक कुंभमेळ्यात आढळून येते. १९५४ च्या अलाहाबाद येथील कुंभमेळ्यादरम्यान एकाच चेंगराचेंगरीत जवळपास ८०० भाविक मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना झालेली आहे. २००३, २०१०, २०१३ च्या कुंभमेळ्यातही अशा चेंगराचेंगरीच्या घटनांमध्ये अनेक श्रद्धाळूंना आपला जीव गमवावा लागला. काही साधूंनी गर्दीमध्ये फेकलेली नाणी जमा करण्याकरिता झालेल्या चेंगराचेंगरीत २००३ च्या नाशिक कुंभमेळ्यात ३९ भाविकांना जीव गमवावा लागला. दोन-पाच रुपयांची चिल्लर नाणी वेचण्यामध्ये स्वत: मृत्यू पत्करावा इतका आपला जीव चिल्लर झाला की काय, याबाबत ठळकपणे चर्चा होणे गरजेचे आहे. या सर्व वादांच्या पाश्र्वभूमीवर शासनाने अशा कुंभमेळ्यांना भरघोस आर्थिक मदत देणे ही बाब न्ििाश्चतच चिंताजनक आहे. या वर्षीच्या नाशिक २०१५ च्या कुंभमेळ्याकरिता महाराष्ट्र शासनाने २३४० कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय निधी उपलब्ध करून दिलेला आहे. नाशिक येथील कुंभमेळ्यास एक कोटी हौशा-नवशा-गवशा भक्तांची मांदियाळी भेट देणार आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनामुळे गोदावरी नदीमध्ये तसेच नाशिक शहरामध्ये होणारे प्रदूषण या शहराच्या वातावरणास नक्कीच हानीकारक ठरणार आहे.
गेल्या अनेक दशकांपासून अशा कुंभमेळ्यांना प्रशासनातर्फे आर्थिक मदत दिली जाते. परंतु या वर्षी पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यामार्फत या कुंभमेळ्याची व्यापक प्रमाणात होत असलेली जाहिरात अनाकलनीय आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून निर्विघ्नपणे पार पडत असलेल्या दरवर्षीच्या पंढरपूर येथील आषाढी-कार्तिक समारोहाकरिता अशा प्रकारच्या जाहिराती शासनाने केल्याचे दिसत नाही. जगद्गुरू तुकारामांचा ४०० वा जन्म महोत्सव, जिजाऊंचा ४०० वा जन्म महोत्सव, छत्रपती शाहू महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव, गाडगेबाबांचा जन्मशताब्दी महोत्सव, तुकडोजी महाराज जन्मशताब्दी महोत्सव इत्यादी महत्त्वाच्या व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हृदयासोबत जुळलेल्या घटनांबाबत महाराष्ट्र शासनाला अशा प्रकारे कार्यक्रमांचे महाआयोजन व त्याबाबत व्यापक प्रसिद्धी करता आलेली नाही, ही बाब कुणालाही खटकण्याजोगीच आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत या कुंभमेळ्याचा किती सहभाग आहे ही बाब काही क्षणांकरिता जरी बाजूला राहू दिली तरी तुकोबा, जिजाऊ, शाहू महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या महामानवांचे या महाराष्ट्रावर कधीही फेडू न शकण्याजोगे उपकार आहेत, ही बाब नक्कीच विसरण्याजोगी नाही. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची मोठी देणगी आहे व ही पुरोगामी श्रृंखला महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्दपूर्ण वातावरणाकरिता विशेषत: कारणीभूत आहे. या कुंभमेळयासारख्या महाआयोजनामागे भिक्षुकांचे व पुरोहितांचेच फक्त लालनपोषण होणार आहे हे या कुंभमेळ्यातील विविध धार्मिक कर्मकांडावरून लक्षात येते. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात श्राद्ध करण्याबाबत येथील भोळ्या व श्रद्धाळू जनतेवर मोठा पगडा आहे. सिंहस्थ काळात अठ्ठावीस प्रकारची दाने करावीत अशा प्रकारचे सल्ले येथील पुरोहित मंडळी भाविकांना देऊन भिक्षुकांची रोजगार हमी योजना आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करत असतात. विविध पूजा, महापूजा, श्राद्ध, अभिषेक, यज्ञ, शांती, नारायण नागबळी इत्यादी धार्मिक अधिष्ठान म्हणजे पुरोहितांची पर्वणीच असते.
इतर वेळेस दहा रुपयांच्या भाजी खरेदीच्या वेळेस घासाघीस करणारा अस्सल महाराष्ट्रीय मराठी माणूस या कुंभमेळ्यानिमित्त पाच-दहा हजारांची दक्षिणा बिनदिक्कत पुरोहितांना देतो हा विरोधाभास मराठी माणसाला खरेच उत्कर्षांकडे नेणार काय, हा प्रश्न यानिमित्ताने महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाबाबत विचारला जात आहे. लोकहितवादींनीही ‘भिक्षुक वृत्तीसारखी नीच वृत्ती दुसरी कोणतीही नाही’ असे निक्षून सांगितलेले आहे. कुंभमेळयामुळे विशिष्ट प्रवर्ग कसा गलेलठ्ठ होतो हे तुकोबांनी ‘आली सिंहस्थपर्वणी, न्हाव्या भाटा झाली धणी’ या अभंगातून अत्यंत मार्मिकपणे मांडलेले आहे.
पुरोहितशाहीच्या अशा स्वार्थी भूमिकेप्रमाणेच या कुंभमेळ्याच्या आयोजनामागे शासनाचेसुद्धा स्वार्थी त्रराशिक आहे की काय, अशी शंका घेण्यासही बराच वाव आहे. अलाहाबाद येथील मागील एका कुंभमेळ्याला शासनाने १५०० कोटी निधी देऊन ११ हजार ५०० कोटींचे उत्पन्न विविध मार्गानी मिळविले अशाही बातम्या मध्यंतरी प्रसारमाध्यमातून प्रकाशित होत होत्या. त्यामुळे या कुंभमेळ्यामागील शासनाची भूमिका श्रद्धाळू, राजकारणी की जनकल्याणकारी यापैकी नेमकी काय, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम पसरलेला आहे. परंतु या सर्व मते-मतांतरामध्ये सर्वसामान्य माणसाचे मात्र हमखास नुकसान होते. कुंभमेळ्यातील या असंख्य करामतींबाबत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी त्यांच्या ‘प्रवास पक्षी’ या लेखन संग्रहातील ‘पर्वणी’ या काव्यातून अतिशय मार्मिक मांडणी केलेली आहे.

व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर
संताचे पुकार वांझ झाले॥
रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग तुडुंबला ॥
बँड वाजवीती सैंयापिया धून
गजाचे आसन महंतासी ॥
भाले खड्ग हाती नाचती गोसावी
वाट या पुसावी अध्यात्माची ॥
कोणी एक उभा एका पायावरी
कोणासी पथारी कंटकांची ॥
असे जपीतपी प्रेक्षकांची आस
रुपयांची रास पडे पुढे ॥
जटा कौपिनांची क्रीडा साहे जळ
त्यात हो तुंबळ भाविकांची ॥
क्रमांकात होता गफलत काही
जुंपते लढाई गोसाव्यांची ॥
साधू नाहतात साधू जेवतात
साधू विष्ठतात रस्त्यावरी ॥
येथे येती ट्रक तूपसाखरेचे
टँकर दुधाचे रिक्त येथे ॥
याच्या लंगोटीला झालर मोत्यांची
चिलीम सोन्याची त्याच्यापाशी॥
येथे शंभराला लाभतो प्रवेश
तेथे लक्षाधीश फक्त जातो ॥
अशी झाली सारी कौतुकाची मात
गांजाची आयात टनावारी ॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद
त्यापाशी गोविंद नाही नाही ॥
सचिन चौधरी – response.lokprabha@expressindia.com

nashik lok sabh seat, Shiv Sena, Ajay Boraste, Emerges as Potential Contender, Amidst maha yuti Conflict, ajay boraste visits thane, ajay boraste, eknath shinde shivsena, bjp
नाशिकच्या जागेचा तिढा अन् अजय बोरस्ते यांची ठाणेवारी
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Murder in Kolhapur 8 Suspects accused jailed within 24 hours
कोल्हापुरात खून; संशयित ८ आरोपी २४ तासात जेरबंद
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान