गोदातीरी होणाऱ्या एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिक परिसर सज्ज झाला आहे. त्यानिमित्ताने कुंभमेळ्याच्या विविध पैलूंचा आढावा-

‘साधू-महंत कुंभमेला के लिए आपकी नगरी मे पधार रहे है..उनका स्वागत करना, सम्मान रखना आपकी जिम्मेदारी है.. हमारा कोई प्रश्न है, तो हम आपको रात में भी बुला सकते हैं..आपको आनाही पडेगा..’
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत जाहीरपणे हे बोल सुनावल्यानंतर सिंहस्थाची जबाबदारी सांभाळणारे पालकमंत्री गिरीश महाजन त्यांच्यासमोर नतमस्तक झाले होते. सिंहस्थ आढावा बैठकीत सर्वासमक्ष घडलेला हा प्रसंग. तेव्हापासून मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी विविध आखाडय़ांच्या महंतांसमोर कोणत्या ना कोणत्या कारणाने नतमस्तक होताना दिसतात. अर्थात, श्रद्धेने नतमस्तक होण्यात काही वावगे नाही. तथापि, काही कारणांनी नाराज अथवा संतापलेल्या महंतांची नाराजी दूर करण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. दुसरीकडे साधू-महंतांच्या परस्परातील वादात दोन्ही बाजू सांभाळण्याचे अग्निद्विव्य पार पाडावे लागत आहे.
कुंभमेळा आणि साधू-महंतांमधील वाद काही नवीन नाही. कुंभमेळ्यात मानापमानावरून नेहमीच वाद रंगतात. कधी साधू-महंत आणि प्रशासन तर कधी साधू-महंतांमध्ये अंतर्गत वाद झाल्याचा इतिहास आहे. यंदाही त्यापेक्षा वेगळे काही घडत नसल्याचे दिसते. देशातील १३ आखाडय़ांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्षपद यंदा प्रारंभीच वादाच्या केंद्रस्थानी आहे. महंत ग्यानदास आणि महंत नरेंद्रगिरी या दोन्ही महाराजांनी आपणच अध्यक्ष असल्याचा दावा केल्यामुळे शासन व प्रशासन कात्रीत सापडले आहे. महंत ग्यानदास हे उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन तर महंत नरेंद्रगिरी महाराज निवडणुकीतील विजयाचा संदर्भ देऊन अध्यक्ष असल्याचे सांगतात. खरे अध्यक्ष कोण, हे कोणालाही माहीत नाही. हा आखाडय़ांचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत प्रशासन उभयतांना समान सन्मान देऊन सिंहस्थ सुखनैव पार पाडण्याची धडपड करत आहे.
आजवरच्या उपलब्ध माहितीनुसार यंदाच्या कुंभमेळ्यावर सर्वाधिक म्हणजे तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचे द्रव्य महाराष्ट्र सरकार आणि नाशिक महापालिकेने खर्च केले आहे. साधू-महंतांच्या सरबराईत कोणतीही तोशिष राहू नये, याची पदोपदी दक्षता घेतली जात आहे. इतके सारे करूनही कुठे काही तरी बिनसते आणि वादाची ठिणगी पडते. त्र्यंबकेश्वरमध्ये शैवपंथीयांचे १० आखाडे आहेत. इतर आखाडय़ांना मुबलक सुविधा देणाऱ्या प्रशासनाने जुना आखाडय़ाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महंत हरिगिरी महाराजांनी थेट कुंभमेळ्यावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये सिंहस्थ कामांचा आढावा घेत होते. खुद्द त्यांना कुंभमेळा साधू-महंतांचा उत्सव असून शासन केवळ व्यवस्थापकाच्या भूमिकेत असल्याचे सांगावे लागले. दुसऱ्या दिवशी लागलीच पालकमंत्र्यांनी नील पर्वतावर धाव घेऊन महाराजांची मनधरणी केली.
सव्वा दोनशे वर्षांपूर्वी अशाच वादातून वैष्णव पंथीयांनी नाशिक येथे तर शैव पंथीयांनी त्र्यंबकेश्वर येथे स्नान करावे असा निर्णय झाला होता, तेव्हापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो. मात्र, उभयतांमध्ये असणारे वाद आजही कायम आहेत. सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक सभोवतालच्या सर्व महामार्गावर महंत ग्यानदास महाराज यांचे छायाचित्र असणारे अनेक फलक उभारण्यात आले आहेत. त्यावर नाशिकच्या सिंहस्थाला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंहस्थाचे मूळ स्थान असणाऱ्या त्र्यंबकेश्वरला वगळून या फलकांवर केवळ नाशिकचा उल्लेख केला गेला असून महंत ग्यानदास महाराज हे अध्यक्ष असल्याचा अपप्रचार करण्यात आल्याची तक्रार शैवपंथीय आखाडय़ांनी केली आहे. हे वादग्रस्त फलक प्रशासनाने हटवावेत अन्यथा नागा साधू ते उखडून टाकतील, असा इशारा संबंधितांनी दिल्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली. नाशिकमध्ये गंगा-गोदावरी पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्याशी आखाडय़ांचा संबंध नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी, आखाडे व पुरोहित संघ यांच्यातही बिनसले आहे. कुंभमेळ्याला सुरुवात होण्याआधीच वाद-विवादांचे नाटय़ रंगले आहे. वर्षभर चालणाऱ्या सिंहस्थात शाही पर्वण्यांना विशेष महत्त्व असते. जसजसे ते दिवस जवळ येतील, तसतसे वाद अधिक धारधार बनतील अशीच चिन्हे आहेत.
या पाश्र्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता खऱ्या अर्थाने अंतिम चरणात आली आहे. हिंदू धर्मात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि वर्षभर चालणाऱ्या या महोत्सवात एक कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. यामुळे सिंहस्थाचे नियोजन आणि तयारीत थोडे थोडके नव्हे तर, तब्बल २५०० कोटींचे द्रव्य खर्ची पडले आहे. साधू-महंतांचा प्रकोप टाळण्यासाठी शासन-प्रशासन त्यांच्या कलाने पावले टाकत आहे. यंदाच्या नियोजनाचा पसारा इतका अफाट आहे की, महोत्सवाच्या प्रयोगाचा पडदा उघडला जाईपर्यंत आणि पश्चात देखील काही कामे सुरू राहतील. मागील सिंहस्थात शाही मिरवणुकी वेळी चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ३३ भाविकांना प्राण गमवावे लागले होते. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासह अनेक मुद्दय़ांचा विचार करून यंदा नियोजन झाले खरे, परंतु, कागदोपत्री झालेल्या तयारीची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होईल, यावर यंदाच्या कुंभमेळ्याची भिस्त राहणार आहे.
देशात अलाहाबाद (प्रयाग), हरिद्वार, उज्जन व नाशिक-त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी २,३७८ कोटींचा सिंहस्थ आराखडा मंजूर केला होता. या सोहळ्याचे नेटके नियोजन व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीपासून ते स्थानिक पातळीवर दैनंदिन आढाव्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कार्यकारी समितीपर्यंत अशा वेगवेगळ्या सहा समित्या कार्यान्वित करण्यात आल्या. मंजूर झालेल्या सिंहस्थ आराखडय़ाचा आकार साधू-महंतांच्या मागण्या आणि अकस्मात पुढे आलेल्या कामांनी फुगत जावून अडीच हजार कोटींच्या घरात पोहोचला. अवघ्या दीड वर्षांत एखाद्या धार्मिक उत्सवासाठी इतका प्रचंड निधी उपलब्ध व खर्च होणारे हे एकमेव उदाहरण असावे. प्रारंभी, निधीअभावी रखडलेल्या सिंहस्थ कामांनी राज्य शासनाने आपली तिजोरी खुली केल्यानंतर वेग घेतला. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे कामे पूर्ण करण्याचे वेळापत्रक जूनपर्यंत लांबले. या तयारीत नाशिक महापालिका व जिल्हा प्रशासनासह एकूण २२ शासकीय विभाग गुंतले आहेत. गोदावरी प्रदूषण, वृक्षतोड अशा काही मुद्दय़ांवरून काही कामांचे भवितव्य अधांतरी बनले. यंदाच्या कुंभात नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या दोन तिथी एकाच दिवशी येत असल्याने उपरोक्त दिवशी लाखो भाविक दोन्ही ठिकाणी स्नानाचा अपूर्व योग साधण्याचा प्रयत्न करतील. यामुळे उपरोक्त दिवशी ये-जा करणाऱ्या जनसागराचे व्यवस्थापन आणि जागेची मर्यादा, हे प्रशासनासमोर मुख्य आव्हान आहे.
सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, नाशिकमध्ये येणारे बहुतांश मार्ग प्रशस्त झाले. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे नियोजन भाविकांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे चौपदरीकरणही दृष्टिपथास आले. शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्ते चकाचक झाले आहेत. गोदावरी नदीवर पाच नवीन पूल साकारण्यात आले. एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे मार्गस्थ होण्यासाठी खास गोलाकार रस्ते सभोवताली तयार झाले. महापालिकेने शहरात १०५ किलोमीटरच्या रस्त्यांची बांधणी केली. काही रस्त्यांची कामे न्यायालयाने वृक्षतोडीवर र्निबध घातल्याने पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत, हा भाग वेगळा. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ६०० किलोमीटरच्या रस्त्यांचे विस्तारीकरण आणि २८ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण केले. त्या अंतर्गत वेगवेगळ्या मार्गावर लहान-मोठे ७६ पूल बांधण्यात आले.
मागील सिंहस्थात शाही मिरवणुकीच्या मार्गावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून भाविकांना प्राण गमवावे लागले होते. काहीशा उताराच्या व अरुंद पारंपरिक शाही मार्गावर ही घटना घडली होती. त्याची चौकशी करणाऱ्या रमणी आयोगाने शाही मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचे सूचित केले होते. हाच संदर्भ घेऊन यंदा शासनाने पारंपरिक मार्गाऐवजी पर्यायी नव्या मार्गावरून शाही मिरवणूक काढण्यास अखिल भारतीय आखाडा परिषदेला कसेबसे तयार केले आहे. यामुळे गत वेळी तयार असूनही वापरल्या न गेलेल्या नव्या मार्गाच्या वापरास यंदाच्या सिंहस्थाचा मुहूर्त सापडला. तसेच मध्यवस्तीतील रामकुंड व लगतच्या गोदावरी काठावर भाविकांची स्नानासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी गोदावरी काठावर खालील भागात नव्याने सात घाट बांधण्यात आले आहेत. बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना स्नानासाठी थेट या नवीन घाटांकडे नेण्याची व्यवस्था केली जाईल. तशीच व्यवस्था त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी काठावर नव्याने ९५० मीटरच्या घाट बांधणीद्वारे करण्यात आली आहे. पर्वणी काळात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे खासगी वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. भाविकांना त्यांची वाहने शहराबाहेर उभारलेल्या वाहनतळांवर उभी करावी लागतील. तेथून शहरात येण्यासाठी एसटी बसची व्यवस्था आहे. एसटी महामंडळ भाविकांच्या वाहतुकीसाठी तीन हजार बसेसचा ताफा सज्ज ठेवणार आहे. देशभरातील भाविकांना सिंहस्थात सहभागी होता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने वीस जादा गाडय़ा सोडण्याचे नियोजन केले आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, सिंहस्थ विशेष गाडय़ांसाठी एक फलाट राखीव आदी तजवीज केली आहे.
ज्या गोदावरीत लाखो भाविक स्नानाचा योग साधणार आहेत, त्या नदीच्या प्रदूषणावर प्रशासन अखेपर्यंत कायमस्वरूपी तोडगा काढू शकले नाही. प्रदूषण मुक्तीची भिस्त केवळ गंगापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्यासाठी महापालिकेने मलनिस्सारण केंद्रांची कामे हाती घेतली होती. पण, त्यातील दोन केंद्रांचे काम भूसंपादन आणि वृक्षतोडीवरील र्निबध यामुळे रखडले. नदीतील पाण्याचा ‘बीओडी’ कमी करण्यासाठी धरणातून पाणी सोडून गोदावरी प्रवाही करण्याची शक्कल प्रशासनाने लढविली आहे. गोदा प्रदूषणाच्या मुद्दय़ावरून उच्च न्यायालयाने पालिका व प्रशासनाला अनेकदा फटकारले. न्यायालयाच्या निर्देशानुसार नदीपात्रात कचरा टाकला जाऊ नये म्हणून खबरदारी घेण्याबरोबर नदीपात्रात कपडे व वाहने धुणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईस सुरुवात झाली. सिंहस्थात पूजा-विधीनंतर निर्माल्य पात्रात सोडले जाऊ नये म्हणून गोदाकाठावर ठिकठिकाणी कलश ठेवण्यात येणार आहेत. या सिंहस्थाला पर्यावरणपूरक स्वरूप देण्याकरिता प्रशासनाने ‘हरित कुंभ’ संकल्पना मांडली. या माध्यमातून सामाजिक संस्था, शालेय विद्यार्थी यांच्या मदतीने गोदावरी स्वच्छता मोहीम, प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी लाखो कापडी पिशव्यांची निर्मिती आदी उपक्रम राबविले जात आहेत.
साधू-महंतांच्या सिंहस्थ काळातील वास्तव्यासाठी साधुग्राम ही खास स्वतंत्र नगरी वसविण्यात आली आहे. गतवेळी साधारणत: पावणे दोन लाख साधूंनी हजेरी लावली होती. यंदा त्यांची संख्या कमालीची वाढणार असल्याचे सांगितले जाते. नाशिक येथे २८३ एकर क्षेत्रावर हे साधुग्राम उभारण्यात आले आहे. मागील सिंहस्थात साधुग्राममधील भूखंडांची ७८१ असणारी संख्या यंदा १९२७ नेण्यात आली. गत वेळच्या तुलनेत पाच पट अधिक तात्पुरती शौचालये तर बारा पट अधिक प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत. तसेच साधुग्राममध्ये पथदीप बसविणे आणि अंतर्गत विद्युत व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्र्यंबकेश्वर येथे १० आखाडे असून बहुतेकांच्या स्व मालकीच्या जागा आहेत. त्यात सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. जागा नसलेले आखाडे तसेच इतर धार्मिक संस्थांसाठी १५ एकर जागेत साधुग्राम वसविण्यात येत आहे. भाविकांसाठी तात्पुरती निवारागृहे, पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये व प्रसाधनगृहांची स्वतंत्र्य व्यवस्था केली जात आहे. अर्धवट अवस्थेतील कामांत पावसामुळे मध्यंतरी अवरोध आले. अगदीच झपाझप होणाऱ्या कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिकच आहे.
कोटय़वधींचा सहभाग असणाऱ्या कुंभमेळ्यातील सुरक्षा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा घटक. संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नाशिकमध्ये ३४८ तर त्र्यंबकेश्वर येथे २०५ सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. रामकुंड व सभोवताली जाणाऱ्या लहान-मोठय़ा मार्गावरील गर्दी रोखण्यासाठी काही मोकळी जागा असणारी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. रस्ते बंद करण्यासाठी लोखंडी जाळ्या, टेहेळणी मनोरे, सार्वजनिक सूचना देणारी यंत्रणा, अतिरिक्त बॉम्ब शोधक व नाशक पथक, बिनतारी संदेश यंत्रणा अद्ययावतीकरण आदींची तयारी करण्यात आली आहे. जवळपास १४ हजार पोलीस lp14अधिकारी व कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेची भिस्त सांभाळतील. गर्दीचे योग्य पद्धतीने नियंत्रण करण्याकडे यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. ओझरच्या विमानतळावर या काळात अनेक विमाने येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल. सिंहस्थासाठी पोलीस यंत्रणेसह इतर शासकीय विभागांचे तब्बल ५० हजार अधिकारी व कर्मचारी डेरेदाखल होणार आहेत. त्यांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न सोडविला जात आहे. संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी पोलिसांसह इतर शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग पार पडले आहेत. कोणत्याही दुर्घटने वेळी शीघ्र प्रतिसाद कसा देता येईल याची रंगीत तालीम सध्या सुरू आहे. पण, त्यात पोलीस यंत्रणा वगळता इतर विभागांना गांभीर्य दिसत नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची कार्यशैली त्याच धाटणीची आहे. पालिका रामकुंड परिसर, कपिला संगम, तपोवन, दसक घाट परिसर, अंतर्गत व बा वाहनतळे या ठिकाणी २२ तात्पुरती अग्निशमन केंद्र कार्यान्वित करणार आहे.
मागील सिंहस्थ पर्वणी काळात ४० दिवसांत दीड लाखांहून अधिक भाविकांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या आरोग्य विभागाने यंदा जिल्हा रुग्णालयाच्या आवारात २०० खाटांचा अतिरिक्त कक्ष, मुख्य इमारतीचे नूतनीकरण, त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त ४० खाटांची व्यवस्था, २० हून अधिक फिरते रुग्णालये, साधुग्राममध्ये तात्पुरते रुग्णालय, ४७ रुग्णवाहिका आदींची तयारी केली आहे. पालिकेच्या रुग्णालयांसह गरज भासल्यास खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येईल. सिंहस्थ नियोजनाचा एकंदर आवाका पाहिल्यास तो अतिशय व्यापक असल्याचे लक्षात येते. कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय महत्त्वाचा घटक आहे. कामांचा दर्जा, नियोजनातील त्रुटी यावर आधीपासून ओरड होत आहे. कुंभमेळ्याचे शिवधनुष्य पेलणे यंत्रणेसाठी आव्हान ठरले आहे.
(सर्व छायाचित्रे : दीपक जोशी)
अनिकेत साठे – response.lokprabha@expressindia.com