lp27डावखुऱ्या माणसाला नेहमी इतरांच्या हेटाळणीला तोंड द्यावे लागते. पण माणसं अशी डावखुरी का असतात, काय असतात त्यामागची कारणं? नुकत्याच १३ ऑगस्टला झालेल्या ‘लेफ्ट हॅण्डर्स डे’च्या निमित्ताने..

नुकताच १३ ऑगस्ट रोजी साजऱ्या झालेल्या ‘इंटरनॅशनल लेफ्ट हॅण्डर्स डे’ च्या शुभेच्छा.
लहानपणी शाळेच्या बाकावर, शेजारी बसलेल्या विद्यार्थ्यांला, लिहिताना आपल्या हाताचा सतत धक्का लागून होणाऱ्या त्रासापासून ते अगदी ‘पैसे उजव्या हाताने द्या ना बाई, बोहोनीची वेळ आहे’ हे भाजीवाल्याकडून ऐकून काहीसे ओशाळून पैसे उजव्या हाताने देताना, आपण वेगळे असल्याची जाणीव नेहमीच होते. आणि ‘एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख’मधील पिल्लाची आठवण होते.
‘तू डावरा/डावरी आहेस?’ या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देणाऱ्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीकडून मिळणारा प्रतिसाद हा नेहमीच काहीसा नाराजीचा, हेटाळणीचा असतो. मग कोणता हात, कोणत्या गोष्टीसाठी वापरतो, हा नेहमीचा प्रश्न विचारून त्याची काहीशी टर उडवली जाते. आणि समजा हे काहीच घडले नाही तरी, डावखुऱ्या व्यक्तीला ‘अरे, वा!, तू डावरा आहेस?’ असे कोणी म्हणताना आढळणार नाही. याची दोन कारणे आहेत. एक तर उजव्यांच्या जगात जगताना डाव्यांना किती प्रयास करावे लागतात याची कल्पना उजव्यांना नसते.
जगाच्या लोकसंख्येच्या केवळ १० ते १२ टक्के लोक डावखुरे असतात. त्यामुळे दैनंदिन जीवनात गरजेच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची रचना ही उजव्या हाताच्या लोकांच्या सोयीने केलेली असते. इमारतीचा किंवा बसचा जिना चढता उतरताना आधारासाठी असणारा कठडा (रेलिंग) उजव्या बाजूला असतो. शिलाई मशीन, दरवाजाची हॅन्डल्स, गिटारच्या तारा, कॉम्प्युटरचा की बोर्ड, ते अगदी हॉटेलमधील टेबलवर ठेवलेले काटे चमचे हे सर्व उजव्या हाताला सोयीस्कर असे असते. अगदी नेहमीचे पुस्तकाचे, वर्तमानपत्राचे पान उलटणे, कातरीने कापणे उजव्या हाताला सोयीचे. शाळेच्या बाकावर पूर्वी शाईची दौत ठेवण्याची जागाही उजव्या हाताला सोयीची अशीच असायची. डाव्या हाताने लिहिताना लिहिलेल्या अक्षरावर लिहिणारा हात येऊन अक्षर पुसले जाणे हा अनुभवही नेहमीचाच असे.
समाजाची डाव्या हाताकडे बघण्याची नजर काहीशी नाराजीची असण्याचे दुसरे कारण मुळात ‘लेफ्ट’ हा इंग्रजी शब्दाशी संबंधित आहे. लेफ्ट या शब्दाचा अर्थच ‘बिघडलेले’, ‘गुंतागुंतीचे’ असा आहे. लेफ्ट ओव्हर, लेफ्ट आऊट, लेफ्ट हॅण्डेड कॉमेंट्स हे सर्व वाक्प्रचार ही नाराजीची भावनाच दर्शवतात. ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असलेल्या समाजात डाव्या हाताचा संबंध परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टींशी जोडला गेला आहे. परमेश्वराशी जवळीक साधण्यासाठी, उजव्या हाताचा वापर करणेच योग्य मानले जाते. आपल्या भारतीय समाजातही आपण देवाचा प्रसाद देण्या-घेण्यासाठी, पैसे देण्या-घेण्यासाठी, जेवण वाढण्यासाठी उजवा हातच वापरतो. कोणत्याही अपरिचित आणि अप्रचलित गोष्टींकडे समाज प्रथमत: विचित्र नजरेने बघतो. असाच काहीसा अनुभव डावखुऱ्या लोकांनाही समाजात वावरताना येतो. डावे म्हणजे वाईट, चुकीचे गृहीतच धरले गेले आहे. ‘वाममार्गाला लागणे, उजवे-डावे करणे’ हे आणि यासारखे वाक्प्रचार, समाजातील पुरुषी वर्चस्वामुळे पत्नीला ‘वामांगी’ म्हणून संबोधणे, ते अगदी जमा-खर्चात डावी बाजू खर्चाची असणे हे सर्व डाव्याबद्दलच्या नाराजीतूनच आले आहेत.
जगाच्या लोकसंख्येच्या १० ते १२ टक्के लोक डावखुरी का बरे असावीत? यावर वर्षांनुवर्षे विचारमंथन होऊनही काही ठोस कारणे मिळालेली नाहीत. A left handed turn around the world या पुस्तकाचे लेखक डेव्हिड वुलमन यांनी डावरेपणाचे कारण शोधण्यासाठी जगभर प्रवास केला. स्वत: डावखुरा असणाऱ्या आणि त्याचा अभिमान असणाऱ्या या लेखकाने डावरेपणाचे रहस्य शोधण्यासाठी इतिहास, विज्ञान, मानसशास्त्र या सर्व शाखांचा आधार घेतला. गेल्या २०० वर्षांपासूनची काही आत्मचरित्र व मनोविश्लेषणात्मक पुस्तकं वाचून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यासाठी पॅरिसच्या सायन्स म्युझियम येथील डॉ. ब्रोका यांच्या मेंदूच्या संग्रहालयापासून, बर्कले येथील न्यूरोसायन्स लॅबपर्यंतच्या प्रवासातील अनुभवावरून त्यांनी काही निष्कर्ष काढलेले या अभ्यासात त्यांना त्यांच्यासारखे डावखुरे लोक भेटले ज्यांना डावखुरे असल्यामुळे या संशोधनाबद्दल आत्मीयता वाटली आणि त्यांनी या कामात त्यांना मदत केली. हे आणि असे अनेक संदर्भ एक गोष्ट स्पष्ट करतात, की डावरेपण हे उपजत असते.
पालकांनी मुलांना शिक्षा करून, दटावून ते बदलत नाही. पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण १९७० च्या काळात व्यक्ती डावरी आहे की नाही हे ठरवण्यासाठी Edinburgh Handedness Inventory (एडिनबर्ग हॅण्डेडनेस इन्व्हेनटरी) हा तक्ता उपयोगात आणत असत. यात लिहिणे, फेकणे, कात्रीने कापणे, टूथब्रश वापरणे, केरसुणी वापरणे, काडी पेटविणे, डबा उघडणे इत्यादी गोष्टींची यादी होती व या क्रिया डाव्या हाताने केल्या जातात की उजव्या हाताने केल्या जातात की दोन्ही हातांचा आलटून पालटून वापर केला जातो यांच्या खऱ्या उत्तरावरून लेफ्टी की रायटी हे ठरविता येत असे.
डावखुऱ्या लोकांचे प्रश्न जाणून घेणे, त्याच्यावर चर्चा करणे, त्यांना उत्तेजन देणे अशा उद्देशाने जगभर आणि भारतातसुद्धा संस्था कार्यरत आहेत. लंडनमध्ये डावखुऱ्या लोकांना उपयुक्त वस्तू उपलब्ध करून देणारे, ‘एनिथिंग लेफ्ट हॅण्डेड’ खास दुकान आहे. ऑनलाइनही अशा प्रकारच्या वस्तू मिळू शकतात. आपल्याकडेही ‘इंडियन लेफ्ट हॅण्डर्स क्लब’सारख्या संस्था अशा दृष्टीने प्रयत्न करत आहेत. (indianlefthandersclub.com)
नेपोलिअन बोनापार्ट, मेरी क्युरी, हेन्री फोर्ड, नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, अजित वाडेकर, बराक ओबामा, रतन टाटा, बिल गेटस, चार्ली चॅपलीन, बिल क्लिंटन, टॉम क्रूझ अशा अनेक मान्यवर डावखुऱ्या व्यक्तींची नावे घेता येतील. डावखुरे लोक हे कला-क्रीडा प्रांतात रमणारे, बुद्धिमान, भावनाप्रधान असतात ही आणि अशी वाचनात आलेली विधाने खरी असावीत असा विश्वास वरील नावे देतात. आपापल्या क्षेत्रात गरुडभरारी घेताना, त्यांची बुद्धी, कलागुण, त्यांची निपुणता या कशामध्येच त्यांचे ‘डावेपण’ आले नाही हे वास्तव डावरेपणाबद्दलचा न्यूनगंड असेलच तर तो किती चुकीचा आहे हे दाखवून देण्यास पुरेसा आहे. ‘एका तळ्यात होती’मधल्या बदकाचे, ‘भय वेड जसे पार वाऱ्यासवे उडाले अन् त्याचेच त्या कळाले..’ तसे वाटायला लावणारी ही उदाहरणे आहेत. हे सगळे लक्षात घेता,
१३ ऑगस्ट हा जागतिक लेफ्ट हॅण्डेड डे, ‘डाव्यांच्या’ समस्यांची जाणीव इतरांना करून देण्यापेक्षा देवाने दिलेले हे ‘खास’ वैशिष्टय़ अभिमानाने साजरे करण्याचा दिवस म्हणून बघितला जावा. जगातील लोकसंख्येच्या केवळ १०% भाग असणाऱ्या डावखुऱ्या लोकांसाठी खास जागतिक दिवस असणे ही बाबच विशेष महत्त्वाची आहे.
माधुरी देव ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com