दारू पिण्याला समाजात अलीकडे फारच प्रतिष्ठा आली आहे. पूर्वी असे नव्हते असे म्हणणाऱ्यांना वेद-पुराणात दारूचे कसे उल्लेख सापडतात, दारूपानाविषयी, दारू कशी असावी, कशी नसावी, कशी विकावी, कशी विकू नये, याविषयी कोणते नियम होते त्याबद्दल काहीच माहिती नसते..

सोमस्तुती करणारा ऋग्वेद ते मद्यपाननिषेध करणारी मनुस्मृती आणि विविध पुराणे येथपर्यंत झालेला सामाजिक प्रवास आणि त्याच वेळी रामायण, महाभारतातील महाजनांचे मद्यसेवनाचे उल्लेख हे सगळे पाहिले की सुजाणांच्या लक्षात यावे की, मद्याबद्दलचा गोंधळ असा मुळातलाच आहे. मनुस्मृतीने भलेही ब्राह्मणांनी अगदी अज्ञानाने जरी दारू प्यायली तरी त्याला उकळती दारू पिण्यासारखे अघोरी प्रायश्चित्त सांगितले असेल, शूद्र वगळता अन्य तिन्ही वर्णाना मनूने मद्य निषिद्ध सांगितले असेल तरी याबाबत त्याला कोणी जुमानत नव्हते असेच दिसते. वैदिक संप्रदायाच्या अगदी विरुद्ध टोकाला असलेल्या शाक्त आणि शैवांच्या तंत्रवादी प्रवाहाने तर पुढे जाऊन मद्याला धर्मसाधनेत मोठे मानाचे स्थान दिल्याचे दिसून येते. तांत्रिकांतील योगिनी कौलमत हा एक प्रख्यात संप्रदाय. त्याचे प्रवर्तन करणारे मच्छंद वा मत्सेंद्रनाथ यांनी कुलार्णवतंत्र या ग्रंथात जी मद्यस्तुती केली आहे ती मुळातून पाहण्यासारखी आहे. कुलार्णवतंत्रात म्हटले आहे, दारू कशी प्यावी तर अशी-
पीत्वा पीत्वा पुन: पीत्वा
यावत् पतती भूतले
उत्थाय च पुन: पीत्वा
पुनर्जन्म न विद्यते
आनन्दात् तृप्यते देवी
मूच्र्छनाद् भैरव: स्वयम्
वमनात् सर्वदेवश्च तस्मात्
त्रिविधमाचरत्
म्हणजे दारू पुन्हा पुन्हा प्यावी. पिता पिता जमिनीवर पडावे. उठल्यावर पुन्हा प्यावी. म्हणजे काय होते, तर जन्माच्या फेऱ्यांतून सुटका होते. दारू पिताना आनंदस्थानी देवी, मूच्र्छास्थानी भैरव आणि वमनस्थानी सर्व देवता संतुष्ट होते. कुलार्णवतंत्र असेही सांगतो की, दारूच्या नुसत्या वासाने पापनाश होतो. स्पर्शाने पुण्य मिळते. कारण हा शिवरस आहे आणि तो आनंदाची अभिव्यक्ती करणारा आहे.
पाचव्या शतकापासून हा तंत्रमार्ग भारतात फोफावला होता. सुमारे सात शतके तो भारतात आपला प्रभाव टिकवून होता. संत तुकोबारायांचे शिष्य कचेश्वरभट्ट यांच्या चरित्रातील एका उल्लेखानुसार त्या काळात तो महाराष्ट्रातही तुरळक कुठे जुन्नरसारख्या ठिकाणी टिकून होता. भक्तिपरंपरेने त्याला आव्हान देऊन उखडून टाकले हा भाग वेगळा. येथे मुद्दा असा की, हिंदूंच्या एका लोकप्रिय परंपरेने धार्मिक विधींसाठी मद्यपान आवश्यक मानले आहे. आजही या संप्रदायांचे अवशेष शिल्लकआहेत. आजही त्यांचा वैचारिक प्रभाव कुठे कुठे दिसतो. ओशो रजनीशांचा संभोगातून समाधीकडे हा विचार मुळातील हाच कौलमत विचार आहे आणि त्यातही मद्य वा अन्य अमली पदार्थाच्या सेवनाच्या नशेला तेवढेच महत्त्व आहे.
एकंदर अशा परिस्थितीत मद्यपानाला धर्माचा धाक नव्हता हे स्पष्टच दिसते. एकीकडे मनू मद्यपानाचा निषेध करीत आहे. वैदिकांच्या विरोधात उभा ठाकलेला बौद्ध धर्मसुद्धा पुन्हा संसार असार असल्याचे सांगत आहे. आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून अगदी बौद्धमतामध्येही तंत्रवादाचा शिरकाव झालेला आहे. समाज भौतिक सुखांत रममाण झालेला आहे. वात्स्यायनाच्या कामसूत्रात या समाजाचे सुस्पष्ट प्रतिबिंब दिसते. वात्स्यायन इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातला मानला जातो. हा गुप्तांचा काळ. कालिदास, आर्यभट्ट, वराहमिहिर आणि कौटिल्याचा काळ. तेव्हाच्या समाजात मद्यपानाची स्थिती काय होती?
सर्वात प्रथम येथे हे सांगितले पाहिजे की, वात्स्यायनाचा कामसूत्र हा ग्रंथ केवळ लैंगिकतेशी संबंधित नाही. त्यात नागरिकशास्त्रही आहे आणि ते महत्त्वाचे आहे. वात्स्यायन आपल्या ग्रंथातून चांगल्या नागरिकांनी कसे वागावे, कसे राहावे, उत्तम जीवन कसे जगावे, याचे धडे देतो. त्याच्या त्या उपदेशामध्ये त्याने मद्यपानालाही स्थान दिले आहे. कोणती दारू प्यावी, कधी प्यावी, कशी प्यावी हे सारे तो तपशिलाने सांगतो.
कामसूत्रानुसार त्या काळात राजभवनात नेहमी आपानकोत्सव किंवा पानगोष्ठींचे आयोजन केले जात असे. नागरिकही अधूनमधून मनोरंजनार्थ असे प्रकार करीत असत. वात्स्यायनाने मनोरंजनाचे ‘घटानिबंधनम्, गोष्ठिसमवाय:, समापानकम्, उद्यनगमनम्, समस्या क्रीडाश्च प्रवर्तयेत्’ असे पाच प्रकार वर्णिले आहेत. यातील समापानकम् म्हणजे मित्रमंडळींनी एकत्र यायचे आणि यथेच्छ दारू प्यायची. हे मनोरंजन वर्षांतून सहसा एखाद्याच वेळी व्हायचे. (बहुधा तेव्हाचा एखादा थर्टी फर्स्टचा मुहूर्त पाहिला जात असावा.) या वेळी श्वेतसुरा, आसव, मेदक आणि प्रसन्ना नामक मद्याचेच प्राशन केले जाई आणि सरकारी परवानगीने ही मद्ये घरीच तयार केली जात. वात्स्यायनाने गृहिणीच्या कामात हे मद्यनिर्मितीचेही काम सांगितले आहे, हे लक्षणीय.
गोष्ठीसमवाय म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे तर साहित्य वा कलासंमेलन. मित्रमंडळी, सहकारी आदींनी एखाद्या गणिकेच्या घरी वा मैफलीस एकत्र यायचे. काव्यशास्त्रविनोद करायचा. मग ‘परस्परभवनेशु चापानकानि’ म्हणजे एकमेकांच्या घरी जाऊन सुरापान, मैरेय वा मधु या मद्यांचे सेवन करायचे. कामसूत्रात सुरा, रसोत्तर, सहकार आणि सम्भारकी असे सुरेचे चार प्रकारही अगदी खुलासेवार सांगितले आहेत. अशा प्रकारे सार्वजनिक सभा-समारंभांत, उत्सवांत, घरी मद्यपान करणारा समाज हा खचितच दारूला निषिद्ध मानणारा समाज नाही.
पण दारू वाईट करू शकते हे त्यालाही माहीत आहे. म्हणूनच त्याने दारू कोणी, किती, कशी आणि कुठे प्यावी याचे काही नियम केले आहेत. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सुराध्यक्ष या सरकारी अधिकाऱ्याचा उल्लेख येतो. (अध्याय २५, प्रकरण ४२) राजाने सुराध्यक्ष नेमावा असे कौटिल्य सांगतो याचा अर्थ स्पष्ट आहे. त्या काळात मद्य्निर्मिती व विक्री हा व्यवसाय चांगलाच आकाराला आलेला होता. तो राज्याच्या महसुलाचा एक मार्ग बनला होता. कौटिल्य सुराध्यक्षाची जी कामे सांगतो त्यातील सर्वात पहिल्या श्लोकात त्याने असे म्हटले आहे की, मद्यनिर्मिती आणि तिचा व्यापार यांची चांगली माहिती असलेल्या लोकांनाच त्याची परवानगी द्यावी. त्यांच्याव्यतिरिक्त अन्यत्र कोणी कुठे मद्यनिर्मिती केली तर त्याला दंड करावा. कौटिल्याने दारूविक्रीवर कडक र्निबध घातले आहेत. अर्थशास्त्र सांगते, कोणीही गावाबाहेर दारू नेता कामा नये. दारूची दुकाने एकमेकांजवळ नसावीत. जी दुकाने असतील ती मात्र मद्यप्याचे मन प्रसन्न करणारी असावीत. तेथे अनेक कक्ष असावेत. बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी खोल्या असाव्यात. तेथे सुगंधी फुलांचे हार असावेत. सुवासिक जल असावे. प्रत्येक ऋतूत त्या सुखकर असतील अशा प्रकारे सजविलेल्या असाव्यात. तेथे येणाऱ्या ग्राहकांची नीट काळजी घेतली जावी. त्यांची एखादी वस्तू तेथे गहाळ झाली तर पेयपानगृहाच्या चालकाने त्याची भरपाई तर करावीच, पण तेवढय़ाच किमतीचा दंडही भरावा. तेथे चांगल्या प्रकारचीच दारू विकली जावी. दुय्यम दर्जाची दारू अन्यत्र विकली जावी किंवा ती दासांना किंवा कर्मचाऱ्यांना वेतनरूपात दिली जावी. कौटिल्य मद्यपान करणारांची किती काळजी घेत आहे हे येथे पाहण्यासारखे आहे. मात्र त्याचबरोबर मद्यपान कोणी करावे याबद्दलही त्याने काही दंडक घालून दिले आहेत. एकदा दारूची नशा चढली की कर्मचारी काम करणार नाहीत, आर्य पुरुष आपल्या मर्यादांचा भंग करणार, दांडगट पुरुष, सैनिक ही मंडळी हाणामाऱ्या करणार. तेव्हा दारू पिऊन मत्त झालेल्यांना गावाबाहेर, एका घरातून दुसऱ्या घरात वा गर्दीच्या ठिकाणी जाऊच देता कामा नये. मुळात चांगले चारित्र्य असलेल्या सभ्य लोकांनाच दारू द्यावी आणि पेयपानगृहाबाहेर दारू नेण्याची परवानगीही अशाच लोकांना द्यावी, असे कौटिल्य सांगतो.
अर्थशास्त्रातील हे प्रकरण पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, की येथे कौटिल्याचे धोरण दारूवर बंदी घालण्याचे नाही, तर लोकांना चांगली दारू चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावी असे आहे. राज्य दारूविक्रीतून महसूल जमा करणार असेल, तर राज्याने ही काळजीही घेतली पाहिजे. पुढे मात्र हा धोरणीपणा कमी झालेला दिसतो. पाचव्या शतकात हिंदुस्थानात आलेला चिनी विद्वान फा हिआन याने येथील बाजारपेठांत कोठेही दारूचे दुकान दिसले नसल्याची नोंद केली आहे. याचा अर्थ तेव्हा दारूची दुकाने नसत असे नव्हे. पण आता मद्यपानही चोरून करण्याची कृती बनली होती. एकीकडे राज्यसत्ता दारू तयार करण्यास, विकण्यास परवाने देत होती आणि दुसरीकडे पिण्यावर र्निबध घालत होती. महाराष्ट्रात तर आजतागायत हे चाललेले आहे. मराठेशाहीमध्येही हेच सुरू होते. डॉ. वि. गो. खोबरेकर यांनी लिहिलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासातून (मराठा कालखंड, भाग २) याविषयी मोठी रंजक माहिती मिळते. ते सांगतात, शिवकालात द्राक्षाची किंवा मोहाची दारू प्यायली जात असे. खाटीक किंवा तत्सम लोक दारूच्या भट्टय़ा लावत आणि कलाल विक्रीचा व्यवसाय करीत. अर्थात हे काम सरकारी परवान्याने चाले. मात्र दारूची दुकाने तुरळक असत. चार गावांत एक असे दुकान असे आणि त्यांवरही कोतवाल वा अन्य सरकारी अधिकाऱ्यांची करडी नजर असे. कोणी दारू पिऊन झिंगलेले रस्त्यात दिसले तर त्यास शासन केले जात असे. सैनिकांना तर दारू पिण्याची बंदी होती.
पेशवाईत न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या सांगण्यावरून थोरल्या माधवराव पेशव्यांनी दारूविषयी तपशीलवार नियम करून ठेवले होते. त्यातला एक नियम होता, की पेशव्यांचे सरदार आणि जहागीरदार यांनी आपल्या अंकित प्रदेशांतील शहरांत दारू विकू नये!
पेशवाईत दारू गाळपाचे परवाने मात्र दिले जात असत. १७७८ मध्ये जेजुरीस दारूची भट्टी चालविण्यासाठी एका खाटकास परवाना दिलेला आढळतो. पण लोक दारू पिण्याचा गुन्हा करू लागल्यावर सरकारने दारू विकणाऱ्या कलालांना दारू विकण्यास बंदी घातली. त्यामुळे राज्याचे दारूचे उत्पन्न बंद झाले. पण दारू पिणे काही थांबले नाही. लोक चोरून दारू पीत असत. तेव्हा असे साठे आणि चोरटी दुकाने हुडकून काढण्यासाठी नाना फडणवीस यांनी फिरस्ते प्यादे ठेवले. अशा एका पथकाला १७७६ मध्ये पुण्यातील नारायण पेठेत एका वृद्ध द्रविड ब्राह्मण स्त्रीच्या घरात दारूने भरलेले २०-२५ शिसे आणि त्यासोबत खाण्यासाठी शिजविलेले मांस सापडले. (पेशवे दप्तर ४३, ले. १४४). पेशवाईत दारू पिणाऱ्या ब्राह्मणांना कैद करून किल्ल्यावर पाठवत असत, असेही उल्लेख आहेत. सवाई माधवराव पेशव्यांच्या रोजनिशीतील एक हकिकत आहे. नाशिकमधील ब्रह्मवृंद मद्यपान करतात आणि त्यात त्यांचा धर्माधिकारीही सामील आहे अशी माहिती सवाई माधवरावांना समजली. त्यावर त्यांनी त्याची चौकशी करविली आणि त्या दोषी ब्राह्मणांना अटक करून पक्क्या बंदोबस्तात घोडप, पटा व मुल्हेर या किल्ल्यांवर अटकेत ठेवण्यासाठी पाठविले.
यातून दिसते ते हेच, की या धोरणाने चोरटेपणाच वाढला. लोक दारू पिणार हे लक्षात घेऊन त्यांना चांगली दारू उपलब्ध व्हावी हे पाहतानाच दारू पिण्यावर र्निबध घालावेत हे कौटिल्याचे धोरण. ते नामशेष झाले. समाजानेच नव्हे, तर राज्ययंत्रणेनेही दारूबाबत ढोंग पांघरले. परिणाम समोर आहेतच.
रवि आमले – response.lokprabha@expressindia.com

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा