avinashयशस्वी यकृत प्रत्यारोपणानंतर रुग्ण खूप चांगले जीवन जगू शकतो. आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे २७ वर्षेही यकृत प्रत्यारोपणानंतर जगलेला रुग्ण आहे. पण डॉक्टर प्रत्येकाला अशी खात्री देऊ शकत नाही.

आपल्या शरीरामध्ये हृदय, मेंदू, फुप्फुसे याबरोबरच यकृत हादेखील एक महत्त्वाचा अवयव असतो. यकृत चयापचयाच्या क्रियेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका करते. यकृत पूर्णत: निकामी होते तेव्हा यकृत प्रत्यारोपण हीच एक संजीवनी असते.
यकृताची रचना व कार्ये
यकृत हा पोटातील सर्वात मोठा अवयव आहे. ६० ते ७० किलो वजन असणाऱ्या सामान्य व्यक्तीच्या शरीरातील यकृताचे वजन १२०० ते १५०० ग्रॅम म्हणजेच एकूण वजनाच्या दोन टक्के एवढे असते. ढोबळ मानाने उजवा अर्धा आणि डावा अर्धा असे यकृताचे दोन विभाग असतात. यकृतामध्ये पित्त तयार होते. यकृताचा एक भाग काढून टाकल्यास उर्वरित भागाची, त्यातील पेशींची वाढ होऊ शकते. यकृताच्या या खास वैशिष्टय़ामुळे प्रत्यारोपणासाठी आपण यकृत वापरू शकतो.
यकृत प्रत्यारोपण म्हणजे काय?
ज्या रुग्णाचे यकृत पूर्णत: निकामी झाले आहे, त्याचे निकामी यकृत काढून टाकून त्या जागी दुसरे यकृत बसविणे म्हणजे यकृत प्रत्यारोपण होय. यासाठी एखाद्या जिवंत, निरोगी व्यक्तीच्या शरीरातील अंशत: काढलेले किंवा मृत व्यक्तीच्या शरीरातून पूर्णत: काढलेले यकृत वापरले जाते. यकृत प्रत्यारोपण ही एक खूप गुंतागुंतीची, किचकट आणि म्हणूनच महागडी शस्त्रक्रिया आहे.
यकृत प्रत्यारोपणाचे प्रकार
१. लिव्हर डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट (Liver Donor Liver Transplant: LDLT)
अर्थात जिवंत दात्याकडून यकृत घेऊन प्रत्यारोपण करणे.
२. डिसिज्ड/ कॅडॅव्हेरिक डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट (Deceased / Cadaveric Donor Liver Transplant DDLT / CDLT)
एखाद्या नुकत्याच मृत झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून त्वरित यकृत काढून घेऊन ते वापरून प्रत्यारोपण करणे.
जिवंत असणारा दाता
रुग्णाच्या नातलगांपैकी एखादा त्याच्या यकृताचा एक भाग रुग्णासाठी दान करू शकतो. शस्त्रक्रियेचा धोका असला तरीही दात्यासाठी हे जवळजवळ सुरक्षित असते. यकृताच्या पेशींमध्ये पुनर्जननाची क्षमता असल्यामुळे आपण त्या व्यक्तीच्या यकृताचा एक भाग काढून घेतला तरी उर्वरित भाग यकृताचे पूर्ण कार्य सांभाळू शकतो. इतर शस्त्रक्रियांसारख्याच काही समस्या मात्र दात्यांनाही त्रासदायक ठरू शकतात. फारच क्वचित प्रसंगी (०.०२ ते ०.०५ टक्के वेळा) हा निरोगी दाता दगावण्याचाही संभव असतो.
नुकताच मरण पावलेला दाता : (ब्रेन डेड रुग्ण/ कॅडेव्हर)
ब्रेन डेड रुग्णाचे मेंदूचे कार्य कायमस्वरूपी पूर्णत: बंद पडलेले असते. मात्र त्याचे हृदय, कृत्रिमरीत्या कार्यरत असणारी फुप्फुसे यांचे कार्य काही काळ चालू असते. उदाहरणार्थ, वाहतूक अपघातातील बळी. लहान मेंदूला जबर मार लागून कृत्रिम श्वासोच्छ्वासावर (व्हेंटिलेटरवर) ठेवलेला रुग्ण अवयव दानासाठी एकदम योग्य ठरतो. हा रुग्ण या परिस्थितीमध्ये वैद्यकीय, कायदेशीर, नैतिक, आध्यात्मिक सर्वच दृष्टय़ा मृत असतो. या वेळी त्याच्या हृदय आणि फुप्फुसांचा रक्तपुरवठा तात्पुरता कृत्रिमरीत्या चालू ठेवून त्याच्या शरीरातील अवयव प्रत्यारोपणासाठी काढून घेता येतात.
अगदी शेवटच्या अवस्थेतील यकृत बिघाड (End stage liver disease) म्हणजे काय?
एखाद्या आजारामुळे जेव्हा यकृताचा बहुतांशी (७५ ते ८० टक्क्यांहून अधिक भाग) खराब होऊन निकामी होतो तेव्हा त्याला शेवटच्या अवस्थेतील यकृत बिघाड म्हणतात. कोणत्याही औषधांचा या वेळी फारसा उपयोग होत नाही. परंतु स्वत:च्या उतींचे पुनर्जनन व वृद्धी करण्याचे जे खास वैशिष्टय़ यकृताकडे असते, ते मात्र शिल्लक राहते.
या आजारांमध्ये यकृत निकामी झाले असेल तर यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते.
१. हिपॅटायिटस (यकृताचा दाह)
२. दारू पिण्यामुळे होणारा यकृत बिघाड (Cirrhosis)
३. चयापचयाच्या क्रियेतील जन्मजात दोष
ड्ट विल्सन्स डिसीज (अति तांबे निर्मिती आणि संचय) व इतर
४. पित्त साचून होणारे आजार

wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

यकृत प्रत्यारोपणाची गरज
यकृताच्या आजारामुळे जेव्हा जगणे असह्य़ होते, वैद्यकीयदृष्टय़ा रुग्णाचे शिल्लक असणारे उर्वरित आयुष्यमान काही थोडे महिनेच अपेक्षित ठरते, तेव्हा यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते. अशा वेळी यशस्वी प्रत्यारोपणानंतर रुग्णाला सर्वच दृष्टीने एक नवीन आयुष्य मिळू शकते. यासाठी योग्य रुग्णाला योग्य त्या वेळी यकृत प्रत्यारोपण केले गेले पाहिजे.
आजही संपूर्ण भारतात काही मोजक्या ठिकाणीच यकृत प्रत्यारोपण होत आहे. नुकत्याच मृत झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील यकृत वापरणे हा चांगला पर्याय आहे; परंतु एकूणच समाजामध्ये याबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. त्यातच जवळची व्यक्ती मरण पावल्यानंतरच्या कौटुंबिक प्रतिक्रिया, अवयवदानाबद्दल नातेवाईकांची उदासीनता आणि निरीच्छा, सामाजिक रितिरिवाज यांमुळे प्रत्यारोपणासाठी यकृत मिळण्यामध्ये खूप अडचणी येतात. म्हणूनच रुग्णांच्या जिवंत नातेवाईकांकडूनच यकृत मिळविण्याचा पर्याय स्वीकारावा लागतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जिवंत निरोगी दात्याच्या शरीरातून यकृताचा एक भाग सुरक्षित काढता येतो.

रुग्णतपासणी
यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णाला त्याच्या आजाराबद्दलची पूर्ण वस्तुस्थिती समजावून सांगितली जाते. त्यानंतर मग सध्या उपलब्ध असणाऱ्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबद्दल, त्याच्या फायद्यांबद्दल माहिती दिली जाते. त्याचबरोबर या शस्त्रक्रियेचा मोठा खर्च, शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर उद्भवून शकणाऱ्या समस्या, आयुष्यभर घ्यावी लागणारी औषधे आणि त्यांचा खर्च या सर्व गोष्टींचीही कल्पना दिली जाते. या सगळ्यामध्ये रुग्णाच्या घरच्या नातेवाईकांचीही मोठी साथ असावी लागते.
यानंतर रुग्णाची एकूण अवस्था, इतर आजार, रक्तगट, वजन इ. पाहिले जाते. विविध तपासण्यांद्वारे यकृताची स्थिती, रचना, रक्तवाहिन्या यांचा पूर्ण अभ्यास केला जातो. यकृततज्ज्ञ, क्ष किरण तज्ज्ञ या सर्वाचीही यासाठी मदत होते. यामध्ये रक्तगट जुळणे आवश्यक आहे. ‘Rh ’ फॅक्टर +/- जुळणे अत्यावशक नाही. मात्र प्राथमिक रक्तगट जुळलाच पाहिजे अन्यथा प्रत्यारोपण अयशस्वी ठरू शकते.

पूर्ण माहिती, मानसिक धोके.
यकृत दान करणे ही जिवंत दात्यासाठी एक खूप मोठी, महत्त्वाची प्रदीर्घ शस्त्रक्रिया असते. त्यामुळेच शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना, संसर्ग, रक्तस्राव, भुलीच्या औषधांचे दुष्परिणाम, न्युमोनिया या सर्व समस्या तर उद्भवू शकतातच. शिवाय क्वचितच प्रसंगी जीवितालाही धोका नाकारता येत नाही. प्रत्यारोपणासाठी यकृत काढल्यानंतर त्याच्या किंवा मूत्रपिंड, फुप्फुसे, यांसारख्या अवयवांच्या कार्यात बिघाड होणे असे काही धोके निर्माण होऊ शकतात. या सर्वामुळे मानसिक धक्का बसण्याचीही संभव असतो. चुकून हे यकृत प्रत्यारोपणानंतर रुग्णाच्या शरीरात यशस्वी ठरले नाही तर दोघांनाही प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या वेळी खूप खचून जाणे, प्रचंड निराश होणे या गोष्टीही दिसून येतात. या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी कुटुंबीयांची साथही खूप मोलाची असते.

पूर्ण माहितीअंती निर्णय घेणे.
प्रत्यारोपण संघामधील डॉक्टरांकडून संपूर्ण माहिती करून घ्यावी. त्यांना तुम्ही शंकाही विचारू शकता. दात्याला शस्त्रक्रियेची, अवयवदानाची सर्व माहिती असली पाहिजे. त्याने त्याच्या भावना, काळजी, भीती डॉक्टरांकडे नि:संकोचपणे व्यक्त कराव्यात. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नये. निर्णय घेतल्यानंतरही कोणत्याही क्षणी दान करण्याच्या निर्णयापासून दाता माघार घेऊ शकतो. स्वत:ची शारीरिक, भावनिक, आर्थिक सद्य:स्थिती आणि भविष्यातील स्थिती या सर्वाचा विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा.
सकारात्मक बाजू
एका व्यक्तीने रुग्णाला दिलेले हे तर प्रत्यक्ष जीवनदानच आहे. थोडय़ाच दिवसांत रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाऊ शकतो. घरातील, बाहेरील सर्व कामे, अर्थार्जन या सर्वासह रुग्ण पूर्ववत आयुष्य जगू शकतो. जिवंत दात्याकडून यकृत घेऊन केलेल्या प्रत्यारोपणाचा परिणाम अधिक चांगला असतो. अशा प्रकारचे प्रत्यारोपण पूर्वनियोजित आणि पूर्ण तयारीनिशी करता येते. त्यामुळेच यकृत फेटाळले जाण्याचे प्रमाणही खूपच कमी दिसते. अवयवदानाच्या शस्त्रक्रियेनंतर दात्याला सर्वसाधारणपणे दहा दिवस रुग्णालयात राहावे लागते. मात्र अधिक काळही लागू शकतो. उर्वरित यकृताचे पुनर्जनन आणि वृद्धी पूर्ण होण्यास साधारण दोन महिने लागतात. तीन महिन्यांत दाता सर्व दृष्टय़ा पूर्ववत होतो. ठरावीक वेळा रुग्णालयात येऊन जाणे, रक्त तपासणी करणे या गोष्टी सहा महिने कराव्या लागतात.

प्रत्यारोपणानंतरचे जीवन
यशस्वी यकृत प्रत्यारोपणानंतर रुग्ण खूप चांगले जीवन जगू शकतो. त्याचे अपेक्षित आयुष्यमानही वाढते. साधारणत: ८५ ते ९० टक्के रुग्ण एक वर्षांनंतरदेखील हयात राहतात. प्रथम तीन महिने दर आठवडय़ाला आणि नंतर दर महिन्याला रुग्णाला तपासणीसाठी यावे लागते. रुग्णाचा प्राथमिक यकृताचा आजार, रुग्णाची एकूण स्थिती या गोष्टींवर त्याचे एकूण आयुष्यमान अवलंबून राहते. आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे २७ वर्षेही यकृत प्रत्यारोपणानंतर जगलेला रुग्ण आहे. पण डॉक्टर प्रत्येकाला अशी खात्री देऊ शकत नाही. बऱ्याच गोष्टी रुग्णावरच अवलंबून असतात.
परोपकाराय फलन्ति वृक्षा: क परोपकाराय वहन्ति नद्य: कक
परोपकाराय दुहन्ति गाव: क परोपकारार्थमिदम शरीरम् कक
डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com