रोहिदास गुरुजी. स्वातंत्र्यसैनिक. वय वर्षे ८४. एका बँक अधिकाऱ्याच्या कक्षात त्यांची भेट झाली. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:ला झोकून देणाऱ्या या सैनिकाचा या वयातला उत्साह आम्हा सर्वाना लाजवून गेला. ‘मी माझ्या मायभूमीसाठी लढलो आहे’ ही भावना काय असते याचा प्रत्यय आला. सर्वाचा निरोप घेऊन ते निघून गेल्यानंतर बँक अधिकारी म्हणाले, ‘‘देशमाने साहेब, रोहिदास गुरुजींना एक मुलगा आणि तीन मुली. शिक्षकी पेशा आणि वडिलोपार्जित चर्मकारी करून त्यांनी मुला-मुलींना वाढवले, शिकवले. मुलगा मोठय़ा पदावर नोकरी करत आहे. मुली आपापल्या संसारात सुखी-समाधानी आहेत. नवरा-बायको दोघेच गावी राहतात. अधूनमधून मी फोन करून त्यांची ख्यालीखुशाली विचारत असतो. तरीही ते माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी बँकेत येतच असतात. त्यालाही कारण आहे. वीसेक वर्षांपूर्वी गुरुजींना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून घ्यायला सांगितले होते. त्यासाठी मोठी रक्कम लागणार होती. गुरुजी मुलामुलींकडेच नव्हे तर कुणाकडेही हात पसरायला तयार नव्हते. कर्ज मिळेल का? याची चौकशी करण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. कर्ज देण्यात काही अडचण नव्हती, परंतु कुणीतरी हमी घेणे गरजेचे होते. त्यांचा मुलगा विभागीय अधिकारी होता. त्याला घेऊन गुरुजी एके दिवशी बँकेत आले. कर्जाची कार्यपद्धती त्याला समजावून सांगितल्यानंतर तो गुरुजींना म्हणाला, ‘‘बाबा, मी साहेबांशी बोलतो. तुम्ही जरा बाहेर थांबा.’’ गुरुजी बाहेर गेल्यानंतर मुलगा मला म्हणाला, ‘‘साहेब, तुम्ही कशाला या भानगडीत पडताय? म्हाताऱ्याची साठी उलटून गेली आहे. आज नाही तर उद्या तो मरणारच आहे. स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळू शकणारी पेन्शन यांनी नाकारली. म्हणाले, मी निवृत्तिवेतनासाठी लढलो नाही. रिटायर झाल्यानंतर मिळालेला फंड यांनी शाळेलाच देणगी म्हणून देऊन टाकला. यांच्या आदर्श तत्त्वांचे चटके आम्ही खूप सोसले आहेत. यांच्याच शाळेत मी एकदा नापास झालो होतो, परंतु माझ्या बापाने मला पास केले नाही. काळाप्रमाणे यांनी बदलायला नको का? शिवाय मला माझा संसार, मुलंबाळं आहेतच की. मी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. सबब मी माझ्या बापाच्या कर्जाची हमी घेणार नाही..’’ आपली लेकरं अंगठेबहाद्दर राहू नयेत म्हणून गावभरच्या चपलांचे अंगठे जोडणाऱ्या गुरुजींना त्यांच्याच दिवटय़ाने अंगठा दाखवला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या संसारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या गुरुजींना चिरंजीवाने स्वत:च्या संसाराचे निमित्त सांगून वाऱ्यावर सोडले होते. माझे हात नियमाने बांधलेले होते. चार दिवसांनंतर गुरुजी पुन्हा बँकेत आले. मी त्यांना त्यांच्या मुलींविषयी, जावयांविषयी विचारले. धाकटी मुलगी आणि जावई फार सज्जन होते. गुरुजींवर त्यांचा फार जीव होता. त्यांना मी बोलावून घेतले. मुलगी म्हणाली, ‘‘साहेब, आम्ही बाबांसाठी कितीही पैसे खर्च करायला तयार आहोत, परंतु बाबा आमच्याकडून पैसे घ्यायला तयार नाहीत. तुम्हीच जरा समजावून सांगा त्यांना.’’ तिच्या नवऱ्यानेही दुजोरा दिला. गुरुजींच्या समाधानासाठी कर्जप्रकरण तयार केले गेले. मुलगी व जावयाचे हमीपत्र घेतले. गुरुजींच्या शस्त्रक्रियेचा सारा खर्च त्यांनीच केला. कर्ज उचललेच नाही. गुरुजींना मात्र आजतागायत याची कल्पना नाही. प्रत्येक महिन्याला कर्जाचा हप्ता घेऊन ते माझ्याकडे यायचे. ते गेल्यानंतर मी तो त्यांच्या मुलीकडे पोहोचता करायचो. मुद्दल फिटल्यानंतर उर्वरित कर्ज बँकेने माफ केल्याचे मी गुरुजींना खोटेच सांगितले. त्यांची मुलगी मुद्दलच परत घ्यायला तयार नव्हती तिथे व्याज मी कुठे जमा करणार होतो? तेव्हापासून गेली वीस वर्षे गुरुजी माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी बँकेत येतात, परंतु मलाच अवघडल्यासारखे होते.. तत्त्वनिष्ठ स्वातंत्र्यसैनिकाला, मानवतावादी दृष्टिकोन असणाऱ्या त्या बँक अधिकाऱ्याला मनोमन प्रणाम करून मी त्यांच्या कक्षातून बाहेर पडलो. सकारात्मक विचारशैलीमुळे शारीरिक प्रकृतीही उत्तम राहते. मानसिक विकृती जडली की शरीरही विकृतीला बळी पडते. ‘मी माझ्या तत्त्वांना मुरड घालत नाही’ यासारखे दुसरे टॉनिक नाही. आपल्याला मुलगा असो वा नसो, एक तरी मुलगी हवीच हवी.

-सोमनाथ देविदास देशमाने