‘‘कथा-दंतकथा वाटतील अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात येण्याचा आणि अजब-गजब सारे काही एकत्र एकाच वेळेस घडण्याचा काळ म्हणजे निवडणुकांचा कालखंड. हा तोच कालखंड असतो की, त्या वेळेस सामान्य माणूस चक्रावलेल्या अवस्थेत असतो. अनेकदा राजकारणीही चक्रावून जातात, पण या सर्व अजब-गजब राजकारणामागे एक निश्चित असा कार्यकारणभाव असतोच असतो. तो शोधावा लागतो. तो सापडला तर आपल्या विजयाचा मार्ग आपल्याला सहज सापडतो, अन्यथा पराजय ठरलेला असतो.’’ भारतीय जनता पक्षाचे चाणक्य असा परिचय असलेले दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी राज्यात युतीने सत्ताग्रहण केल्यानंतर एका निवांत वेळी काही निवडक पत्रकारांशी संवाद साधताना निवडणुकांच्या बाबतीत हे विधान केले होते. प्रमोद महाजन यांच्या आद्याक्षरांमध्येच पीएम होते, शिवाय तेच भाजपचे भविष्यातील पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार, असे केवळ भाजपमधीलच नव्हे, तर सर्व पक्षांतील राजकारण्यांना वाटत होते; पण काळाची पावले वेगळी होती.. प्रमोद महाजन यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे त्यांनी वर्णन केलेली निवडणूक कालखंडातील अजब-गजब स्थिती सध्या प्रत्यक्षात पाहायला मिळते आहे.
एरवीही निवडणुकांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या विविध राजकीय खेळींमुळे प्रसंगी संमिश्र, कधी एका बाजूला झुकणारे, तर कधी निवडणूक निकाल पूर्णपणे फिरणार की काय असे वाटायला लावणारे बदल वातावरणात घडत असतात. अनेकदा सामान्य माणूस या साऱ्या घटनांमुळे अधिक संभ्रमावस्थेत जातो. त्याला काहीच कळेनासे होते. म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे दैवत म्हणून स्वीकारलेल्या प्रत्येकाला उद्धव ठाकरे राजवर प्रहार करतात तेव्हा वाटते की, राजने हात पुढे करायला काय हरकत होती? तर बाळासाहेबांना अखेरच्या काळात तेलकट बटाटावडा दिला जात होता, मी चिकन सूप पाठवले, असे राज ठाकरे सांगतात तेव्हा सामान्यांना वाटते की, बाळासाहेबांची ही अशी अवस्था..? तर काही बाळासाहेबप्रेमींना वाटते हे घरातले मुद्दे, तेही बाळासाहेबांशी संबंधित त्यामुळे ते असे चव्हाटय़ावर येऊ नयेत; पण हे सारे मुद्दे येतात ते राजकारणाचाच भाग म्हणून. त्यामुळेच मग सामान्यांच्या मनात प्रश्न येतो.. भाऊबंध की..? दुसरीकडे राज ठाकरे सांगताहेत, निवडून येणारे मनसैनिक खासदार पाठिंबा मात्र मोदींनाच देणार, पण मग मनसेच्या उमेदवारांमुळे मतविभाजन होऊन काही उमेदवार पडतील आणि जेवढे पडतील तेवढय़ा संख्येने मोदी सत्तास्थानापासून दूर जातील, त्याचे काय, असा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांच्या डोक्यात भुंग्यासारखा भुणभुणतोय.. भावांमधून न जाऊ शकणारा विस्तवही माहीत आहे आणि वास्तवही.. अशी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची अवस्था आहे. जरा संधी मिळाली की, यातील विस्तव बाहेरही रस्त्यावर पाहायला मिळतो.. कधी तो दक्षिण मुंबईतील रस्त्यावर असतो, तर कधी इतरत्र कुठे तरी!
तिसरीकडे एरवी फारशा टीकाटिप्पणीत न पडणाऱ्या सुप्रिया सुळे यांनीही तेवढय़ात शरसंधान करून घेतले. त्या म्हणाल्या, दादा आणि माझा श्वास जाईल, पण आमच्यात भांडण होणार नाही!.. तिथे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही चक्रावले आहेत, कारण त्यांनाही पक्षातील वास्तवाची जाण अस्वस्थ करते आहे. शरद पवार यांचा राजकीय वारसा हक्क कुणाकडे जातो, अजितदादा की सुप्रियाताई? यावर अद्याप जाहीररीत्या कोणतेही प्रकटीकरण झालेले नसले तरी खासगीत अनेकांना भरपूर गोष्टी ठाऊक आहेत, पण निवडणुकांचा कालखंडच असा असतो की, आपलं ठेवायचं झाकून आणि.. एक अजब-गजब कालखंड.
आता खरे तर लढा निश्चित झालेला आहे. ‘नमो विरुद्ध रागा’- अर्थात नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी. पण सारे काही स्वस्थ असेल तर निवडणुका आहेत हे कळणार कसे? मग कधी तरी कुणी ज्येष्ठ नेता उठतो आणि मग थेट तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सांगितलेली आठवण सांगतो प्रियांकाबद्दलची. प्रियांका हीच खरे तर राजकीय वारसदार असायला हवी होती. राजीवजींनीही तसेच काहीसे सुचवले होते. ही खेळी राहुलविरोधी असावी, अशी अनेकांची शंका आहे. तर ही भाजपने दिलेली फूस होती, असा काही काँग्रेसजनांचा होरा आहे. त्याने काँग्रेसमध्ये फारशी काही हलचल झाली नाही, त्यामुळे काँग्रेसला प्रत्यक्षात काहीच फरक पडणार नाही. पण कुणी तरी दगड मात्र अंदाजासाठी मारून पाहिला, हे निश्चित!
सर्वच पक्षांमध्ये हे सारे सुरू असताना सत्तेसाठी दावेदार असलेला भाजप बाजूला कसा राहील? त्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न त्यांच्याकडूनही सुरू आहेत आणि प्रतिपक्षाकडूनही. म्हणूनच तर राममंदिराचे आंदोलन हा पूर्वनियोजित रचलेला कट होता का, हा प्रश्नही अचानक ऐरणीवर आला आणि मग त्या संदर्भातील फूत्कार ‘कोब्रापोस्ट’वर सुरू झाले. प्रश्न आलाच आहे तर मग त्याचा वापर का करू नये, असे वाटणे साहजिक होते. त्यामुळे मध्यंतरी मोदी आणि पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राममंदिराचा मुद्दा जाहीरनाम्यात असणार नाही, असे वाटत होते, पण बहुधा भाजपला तेच आजही ब्रह्मास्त्र वाटत असावे, त्यामुळे त्याचा वापर जाहीरनाम्यात झालाच.
हाच तोच कालखंड असतो की, जिथे विवेकाला मूठमाती मिळते आणि निवडणूकजिंकणे हेच एकमेव लक्ष्य असते. तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मग कोणताही असो, असेच प्रत्येकाला वाटते. मग कधी एखाद्या पक्षाने थेट नक्षलवाद्यांशी हातमिळवणी करण्याचा आणि त्यांच्याशी तडजोड करण्याचा मार्ग स्वीकारलेला असो किंवा मग पक्षातीलच एखाद्या वादग्रस्त नेत्याने जातीय भावना भडकावण्याचे केलेले भाषण असो. हे सारे मार्ग प्रयोगात्मक पद्धतीने वापरले जातात, गाठ विस्तवाशी आहे हे पक्के ठाऊक असतानाही..
एका बाजूला हे सारे सुरू असताना पलीकडच्या बाजूला असलेले खरेखुरे वास्तव हे अधिक वेदनादायी आणि चटके देणारे असते. गारपिटीनंतर महाराष्ट्रातील गावांमध्ये आता पुन्हा एकदा आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. या गारपिटीने सामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गारपीटग्रस्त भागांतून येणाऱ्या कहाण्या या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. गारपिटीमुळे कंबरडे मोडलेल्या भावाने परत एकदा कर्ज काढून बहिणीच्या साखरपुडय़ाची तयारी केली आणि सारे झाल्यानंतर आपल्याच आयुष्याला फास लावला. कुणा तरुण मुलाने म्हाताऱ्या आई-वडिलांना आता या कंबरडे मोडलेल्या अवस्थेत कसे पोसायचे म्हणून आत्महत्या केली. कुणी घरच्यांची होती तेवढी सोय केली आणि परलोकाचा मार्ग स्वीकारला.. हे सारे याच महाराष्ट्रात घडते आहे. गारपिटीनंतर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येने सत्तरी तर केव्हाच पार केली आहे.. पण वास्तवाचे हे दाहक चटके निवडणुकीमध्ये धुंद असलेल्यांना दिसत नाहीत आणि जाणवतही नाहीत. डोळ्यांवर पट्टी बांधून सध्या सत्तेच्या आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ रंगात आला आहे आणि त्याच निवडणुकीच्या व भविष्यातील सत्ताधुंदीच्या अमलामुळे संवेदनाही नष्टच झाल्यासारखी अवस्था आहे.. प्रमोद महाजन म्हणायचे त्याप्रमाणे आता हा अजब-गजब राजकारणाचा कालखंड सुरू आहे. राजकारणी घडणाऱ्या घटनांचा कार्यकारणभाव शोधत आहेत आणि त्याचा स्वत:च्या राजकारणासाठी वापरही करताहेत.. कार्यकारणभाव नाही तो गारपीटग्रस्तांना. कारण त्यांना वाली कुणीच नाही.. शांतता, सध्या सत्तेची आंधळी कोशिंबीर सुरू आहे!