हनुमान हा वानर असल्याची गोष्ट लहानपणापासूनच रंगवून सांगितली जाते. प्रत्यक्षात हनुमान हा वानर नव्हता, उलट तो एक उच्च कोटीचा राजनीतिज्ञ होता याचेच दाखले रामायणातून मिळतात..

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती।
वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना॥
समर्थ रामदासांनी या स्तोत्रात हनुमानाच्या मातेला ‘वनारी’ असे म्हटले आहे. वनारी म्हणजे वनात राहणारी. या अंजनीस ‘वानरी’ संबोधून तिच्या पुत्रास ‘वानर’ कुणी केले याचा शोध घेणे कठीण आहे.
आता आपण हनुमान हा वानर नव्हता हे सिद्ध करण्याच्या दिशेने क्रमाक्रमाने पुढे जाऊ.
वानर या प्रजातीतील नर व मादी या दोघांचेही मुख तांबूस रंगाचे असते. (काळ्या रंगाचे असते ते ‘माकड’) व मुख वगळता सर्व शरीरावर भुरकट रंगाचे केस असतात. ही दोन्ही गुणवैशिष्टय़े अंजनी व हनुमानास लागू होत नाहीत.
वानरात नर आणि मादी दोघांनाही शेपटी असते. इथे अंजनीस शेपटी नाही. (या संदर्भात ‘मारुतीला शेपटी कुणी लावली’ हा, आनंद साधले यांचा लेख जिज्ञासूंनी अवश्य वाचावा.)
वानर हा प्राणी रामायणकाळापासून आजतागायत मागील दोन पायांवर ताठ उभा राहून चालू अथवा धावू शकत नाही. तो समोरचे दोन्ही हात जमिनीवर टेकवून चतुष्पाद जनावरासारखा पळतो. हनुमान, वाली, सुग्रीव, नल, नील, आदी वन्य जमात दोन्ही हातांचा उपयोग पायांसारखा कधीच करीत नव्हती.
वानर ही जमात आजतागायत जमिनीवर वसाहत करून कधीच राहिली नाही. वृक्ष हेच त्यांचे वसतिस्थान, म्हणून त्यांना ‘शाखामृग’ असेही म्हणतात. वाली, सुग्रीव व हनुमान व इतर सर्व जमिनीवर अथवा गुहेत राहत होते.
वानरांच्या घशाची रचना अशी असते की ते माणसांप्रमाणे कधीच बोलू शकणार नाहीत. इथं आपला हनुमान तर राम, रावण, बिभीषण यांच्याशी संवाद साधतो म्हणजे या सर्वाची भाषा एकमेकांना समजत होती. रामायणानुसार ती संस्कृत होती.
अंजनी कोण होती हे आपण आता पाहू.
कैकेयीची एक दासी मंथरा ही सुपरिचित आहे. पण कैकेयीबरोबर तिच्या अनेक दासी व सख्या अयोध्येत आल्या होत्या. त्यात तिची एक अत्यंत प्रिय दासी/सखी ‘अंजनी’ हीपण होती. पुत्रकामेष्टी यज्ञात प्राप्त झालेल्या पायसाचे तीन भाग करून दशरथाने आपल्या तिन्ही राण्यांना दिले. कैकेयीने आपल्या वाटय़ातला काही भाग अंजनीस दिला.
किष्किंधा, पंपासरोवर या दक्षिण प्रदेश परिसरातील हा मानवसमूह वन्यजीवाशी समरसता साधण्यासाठी वानराचा मुखवटा वापरत असावा. अशी आणखी उदाहरणे पुराणकथात आहेत. जसे जटायू (पक्षीवेश), जांबुवान (अस्वल) इत्यादी.
भारताच्या अतिउत्तर भागातील कैकेय (आजचे इराण) या राज्यातील कैकेयी हिचा दशरथाशी विवाह झाल्यानंतर प्रचलित प्रथेप्रमाणे तिच्याबरोबर अनेक दासी व सख्या अयोध्येस आल्या. (आपल्याकडे विवाहित लेकीबरोबर तिची धाकटी बहीण पाठराखीण म्हणून जाण्याची प्रथा होती.) कैकेयीच्या दासींपैकी केवळ ‘मंथरा’ ही एकच आपल्याला माहीत आहे. अंजनी हीपण कैकेयीची अत्यंत प्रिय अशी सखी/दासी होती.
दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञ केला. या यज्ञाची सफल सांगता होऊन दशरथाला ‘पायस’ प्रसाद प्राप्त झाला. त्याचे तीन वाटे करून त्याने कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांना एक एक वाटा दिला. कौसल्या, सुमित्रा यांनी आपला वाटा भक्षण केला. कैकेयीने मात्र आपल्या वाटय़ाचा आणखी एक भाग करून तो सखी अंजनीस दिला. काही दिवसांनंतर तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. त्याचबरोबर अंजनीपण गर्भवती असल्याचे कैकेयीच्या लक्षात आले. तेव्हा तिने अंजनीस अयोध्या सोडून दूर दक्षिणेत किष्किंधा या प्रदेशात जाण्यास सांगितले व तशी व्यवस्था केली.
पुढे नऊ मासांनी कौसल्येस पुत्र झाला तो राम. तिकडे पाच दिवसांनी चैत्रपौर्णिमेस अंजनीपोटी हनुमानाचा जन्म झाला. नंतर सुमित्रेस लक्ष्मण व कैकेयीस भरत व शत्रुघ्न हे जुळे झाले. या कथेनुसार हनुमान रामाचा धाकटा बंधू ठरतो, मग तो वानर कसा?
वनवासातील अखेरच्या पर्वात सीतेचे हरण दंडकारण्यातून होते. राम-लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ दक्षिण दिशेने निघाले. त्यांची भेट प्रथम ‘जटायू’ या पक्षीवेशधारी मानवाशी होते. सीतेला रावण आपल्या रथातून वायूवेगाने दक्षिण दिशेला घेऊन गेल्याचे मृत्युशय्येवर असताना तो सांगतो. आता सीतेच्या शोधार्थ राम-लक्ष्मण दक्षिण दिशेने पुढे जातात, तेव्हा कि ष्किंधा, पंपा या भागात त्यांची भेट हनुमानाशी होते. त्यांच्यातील संवाद अर्थातच एकमेकांना समजेल अशा भाषेत होतो. रामायणानुसार त्यांची भाषा संस्कृतच असावी. या वानरवेशधारी समूहाचा राजा सुग्रीव या राजाचे राज्य त्याचा बंधू वाली याने बळकावून त्याला देशोधडीला लावले. रामाने हे राज्य परत सुग्रीवास मिळवून देण्यास साहाय्य करावे. तसे केल्यास सुग्रीव, हनुमान आपल्या वानर सैन्यासह सीतेचा शोध घेऊन तिला परत आणण्यास रामाला साहाय्य करतील, असा करार झाला. याप्रमाणे राम वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य परत मिळवून देतो. करारानुसार हनुमान, नल, नील आदी सैन्यासह सीतेच्या शोधार्थ दक्षिण दिशेला जातात. पुढे रामेश्वरला आल्यावर हनुमान एकटा लंकेत जातो. सीतेला रामाचे कुशल सांगतो आणि लवकरच तिला या बंदिवासातून मुक्त करण्यास आपण राम लक्ष्मणासह येत असल्याचे आश्वासन देतो.
यापुढील कथाभाग हनुमान हा कसा राजनीतिज्ञ होता हे सिद्ध करणारा आहे. पुढे हनुमान हा रामाचा दूत म्हणून रावणास भेटतो व सीतेस बंदिवासातून मुक्त करून रामाशी स्नेहबंधन करण्याची विनंती करतो. रावण ती धुडकावून लावतो. तो बिभीषणाला भेटून जे बोलतो ते हनुमान हा किती उच्च कोटीचा कुटिल राजनीतिज्ञ होता याचा परिचय करून देणारे आहे.
रावण जिवंत असेपर्यंत आपण प्रधानमंत्रीच राहणार. लंकाधिपती होण्याचे बिभीषणाचे स्वप्न कधीच साकार होणारे नव्हते. त्याच्या या स्वप्नाला त्याची पत्नी शामा ही भरपूर खतपाणी घालून त्याचा तेजोभंग करीत असे. लंकाधिपती होण्याचे त्याचे स्वप्न साकार होण्याची संधी रामाच्या रूपाने साध्य होण्याची शक्यता निर्माण होते.
बिभीषणाची ही मनोभूमिका हेरून बिभीषणाने युद्धात रामास साहाय्य करावे. त्याच्या बदल्यात रावणवधानंतर बिभीषणास लंकेचे राज्यपद देण्याचे वचन रामाच्या वतीने हनुमान देतो. राम-रावण युद्ध होण्यापूर्वीच बिभीषण आपल्या सैन्यासह रामाच्या गोटात सामील होतो.
लंकेहून परतण्यापूर्वी बिभीषण हनुमानला लंकेतील गुप्तमार्ग, सैन्याची क्षमता एवढेच नाही तर सैन्याची शस्त्रागारे दाखवतो. बिभीषणास पूर्णत: आपलासा करून हनुमान लंकेतून निघून जातो.
बिभीषण फितूर झाला नसता, तर रामायण वेगळ्या प्रकारे लिहावे लागले असते. हनुमंताने एवढेच केले नाही, तर युद्धकाळात सीतेचे मनोबल अचल राहील व तिला संरक्षण मिळेल अशी योजना बिभीषणाच्या कुटुंबीयांकडून केली. प्रत्यक्ष युद्धात राम-लक्ष्मण मूच्र्छित झाले असताना आता आपले काय होणार? लंकाधिपती होण्याचे आपले स्वप्न साकार कसे होणार, या कल्पनेने बिभीषण हताश होतो. तेव्हा म्हातारा जांबुवंत त्याला विचारतो, हनुमान जिवंत आहे ना? यावर बिभीषण संतापून उत्तर देतो. अरे राम -लक्ष्मणाची चौकशी न करता तू हनुमानाची चौकशी करतोस?
म्हातारा जांबुवंत शांतपणे म्हणतो-
‘अस्मिन्जीवत्ती वीरे तु हतमप्यहतं बलम्॥
हनुमत्यूज्झितप्राणे जीवन्तोऽपि मृता वयम्॥’
(वाल्मीकी रामायण युद्धकांड ५४।।२२)
अरे, हनुमंत जिवंत असेल तर राम-लक्ष्मणादी सारे सैन्य मेले तरी जिवंत असल्यासारखे आहे. आणि हनुमंत मेला असेल तर आपण सर्व जिवंत असून मेल्यासारखे आहोत. रावणवधानंतर बिभीषणास हनुमानाने दिलेल्या वचनानुसार रामाने बिभीषणास लंकेच्या सिंहासनावर बसवले. तद्नंतर राम, लक्ष्मण, सीता हनुमानासह अयोध्येस परतले.
हनुमान हा भारतीय महापुरुष आहे. रामायणात हनुमानाचा वाटा आहे तो सर्व योजना सुसूत्रपणे शेवटास नेणारा धुरंधर राजकारणी म्हणून. श्रीकृष्ण नसता तर पांडव नसते, कौटिल्य नसता तर चंद्रगुप्त नसता, तसे हनुमान नसता तर? तर काय झाले असते?
वानराचा मुखवटा व शेपटी उतरवून आता तरी आतल्या हनुमानाला आपण ओळखणार आहोत का?
अरविंद जागीरदार

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री