त्या दोघांचं प्रेम तुटतं आणि दोघं दोन दिशांना निघून जातात, पुन्हा एकमेकांचं तोंड बघणंही त्यांना नको असतं ही गोष्ट सगळ्यांच्याच माहितीची. पण आता नव्या पिढीने ब्रेकअपच्या या गोष्टीचा शेवट बदलायला घेतलाय..

‘‘हाय सॉरी.. जरा उशीर झाला अगं..’’ पाठमोऱ्या बसलेल्या तिच्याकडे पाहत त्याने म्हटलं.
तिने हलकेच मागे पाहिले. त्याला पाहून ती हसत म्हणाली ‘‘अरे तू उशिरा नाही मीच लवकर आलेय.. ये ना बस..’’
‘‘हो खरंच की.. आज चक्क तू लवकर आलीस.. म्हणजे आधी वेळेवरही न येणारी तू आज वेळेआधीच आली.. कसं काय घडलं हे..’’
‘‘हो.. आता घडतं असं कधी कधी.. अनपेक्षित.. बरं ते सोड.. कसा आहेस तू?’’
‘‘मी मस्त.. तू कशी आहेस.. काय म्हणतेस.. एवढय़ा दिवसांनी या पामराची आठवण कशी काय आपणास..?’’
‘‘सहज रे.. आपण भेटलोच नव्हतो ना कितीतरी दिवसांत..’’
‘‘महिन्यांत.. कितीतरी महिने भेटलो नाही आहोत आपण..’’ तिच्याकडे रोखून पाहत तो म्हणाला.
‘‘अं.. हो ना.. तेच तर. वेळ कुठेय साहेबांना भेटायला.. बिझी माणसं..’’ त्याची ‘ती’ नजर चुकवायचा एक निष्फळ प्रयत्न केला तिने.
‘‘हं.. तर बोला.. काय चाललंय आयुष्यात आणि इथे याच कॉफीशॉपमध्ये भेटायचं कसं सुचलं तुला..’’
‘‘इथे याच कॉफीशॉपमध्ये तर प्रेमात पडलेलो ना आपण..’’ आता निष्फळ प्रयत्न करण्याची पाळी त्याच्यावर होती. त्याचं अवघडलेपण जाणवलं तिला. तिने मग पटकन सावरून घेतलं. ‘‘काही नाही रे.. ही जागा आवडते मला.. आणि दुपारी तसंही कोणी येत नाही ना.. त्यामुळे शांत निवांत वाटतं छान. त्यादिवशी अचानक तुझी आठवण आली. म्हटलं भेटूया छान गप्पा मारू या. तुला आहे ना वेळ की जायचंय कुठे?’’ तिने एका दमात बोलून टाकलं.
‘‘आहे ना.. वेळच वेळ आहे आणि तुझ्याशी बोलायला तर नेहमीच आवडतं मला. हा म्हणा.. गेले ७-८ महिने आपल्यात हाय बाय पलीकडे काही बोलणं झालेलं नाहीये पण तरीही..’’
‘‘हं.. आपलं ब्रेकअप झाल्यापासून ७-८ महिने झालेसुद्धा ना.. ए तुला असं विचित्र नाही वाटत  आपलं भेटणं आपलं बोलणं?’’
तिच्या या बोलण्यावर तो नेहमीसारखं गूढ हसत म्हणाला, ‘‘खरं सांगू जेव्हा तुझा मेसेज आला ना ‘भेटू या का’ तेव्हा थोडं विचित्र वाटलं.. म्हणजे आपण एकमेकांशी अगदीच ‘टॉकिंग टर्म’वर वगैरे नव्हतो असं नाही, पण खुलेपणाने एकमेकांशी बोलतही नव्हतो. मग विचार केला काय हरकत आहे भेटायला.. आता तुला भेटलो. थोडासा अन्कम्फर्टेबल झालेलो सुरुवातीला, पण आता एकदम रिलॅक्स्ड आहे. आपलं अवघडलेपण हे बरेचदा समोरच्यावरसुद्धा अवलंबून असते. तसं आपल्या बऱ्याच गोष्टी आपण समोरच्यावर अवलंबून ठेवतो म्हणा.. असो. तुला वाटतंय का अन्कम्फर्टेबल किंवा विचित्र..?’’
‘‘बिल्कूल नाही.. तुझ्याबरोबर मला केव्हाच अनकम्फर्टेबल वाटलं नाही आणि आत्ताही वाटत नाहीये. कारण मला माहीतेय की तू आपल्या भेटीचे आपल्या बोलण्याचे उगाच वेगळे आणि चुकीचे अर्थ काढणार नाहीस. त्यामुळे मी एकदम निर्धास्त आहे.’’
तेवढय़ात त्यांची ऑर्डर टेबलवर आली. ‘‘काय गं.. आज तुझी आवडती कॉफी नाही पिणार.. सरबत काय..’’
‘‘अरे किती गरम होतंय आणि मी कॉफी सोडलीये. म्हणजे प्रयत्न तरी सुरू आहेत.’’
‘‘व्वा.. बरंच काही बदललंय म्हणायचं या मधल्या काळात..’’
‘‘हो.. खरंय तुझं, बरंच काही बदललंय.. खूप काही शिकवून गेलाय हा मधला काळ मला..’’ कुठेतरी दुसरीकडेच टक लावून ती बोलत होती.
‘‘काय तू.. एकदम सीरिअस झालीस एका सरबतावरून.. पी पी निवांत पी..’’
‘‘मेघना आणि तुझं कसं सुरू आहे..?’’ अपेक्षित प्रश्न अनपेक्षित वेळेला आल्यामुळे त्याला कळेचना कसं रिअ‍ॅक्ट करायचं ते. ‘‘चांगलं सुरूए.. पण हल्ली आम्हाला दोघांनाही वेळ नसतो. ऑफिसचं बरंच काम असतं आणि मग वीकेन्डला घराबाहेर पडावसंच वाटत नाही त्यामुळे फारसं भेटणंसुद्धा होत नाही दोघांचं.’’
‘‘हं.. या एकमेकांना वेळ न देण्याने कितीतरी गोष्टी बिघडतात ना यार.. पण आपण तरी काय करणार.. आपली लाईफस्टाईलच अशी झालीये की वेळच पुरत नाही कशासाठी.. वेळ काढण्यासाठी हातात वेळ तर हवा. आपलंसुद्धा असंच झालेलं ना.. वेळ कमी.. कमी.. कमी आणि अचानक नातंच शून्य झालं..’’ खिन्नसं काहीसं विचित्र हसत ती म्हणाली.
त्या बोलण्यातला विचित्रपणा आणि तरीही असलेली सुसंगती त्याला जाणवत होती. असंच आहे हिचं. मूळ मुद्द्याला हात घालण्याआधी असंच विचित्र बोलायचं आणि धपकन मुद्दा समोर ठेवायचा. ‘‘कोलमडलेले मी पार..’’ त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिलं अगदी शांत स्थिर नजरेनं. ती मात्र स्थिर नव्हती. तिच्यात भासणारं ते स्थैर्य जाऊन एक अस्थिरता तिच्या नजरेत यायला लागली. ती त्याच्याकडे पाहत नव्हती.. ती खरंतर कुठेच पाहत नव्हती. प्रयत्न मात्र सुरू होता पाहण्याचा.. स्वत:कडेच. तिचं बोलणं थांबवायचा प्रयत्न त्याने केला नाही कारण तिला ते आवडायचं नाही. अजूनही या गोष्टींच भान आपण ठेवतो याचं त्याला स्वत:लाच आश्चर्य वाटलं.
‘‘खरंच सांगतेय.. कोलमडलेले मी. आपलं ब्रेकअप झालं तेव्हा नाही तर त्यानंतर.. आपण किती स्मूथली वेगळे झालो.. मला कळलेलं बरंच आधी आपल्या नात्याचं फ्युचर.. आपल्यातला संवाद हरवत चालला होता. म्हणायला गर्लफ्रेंड होते मी तुझी. तू मेघनामध्ये गुंतत चाललाएस हे कळत होतं मला. आणि त्या दिवशी अचानक भेटून सांगितलसंच मला तुला ती आवडते म्हणून.. नकोशी असलेली गोष्ट कितीही आधीपासून माहीत असली तरी ती घडताना त्रास तेवढाच होतो. पण बळजबरीने नात्यात बांधून ठेवणं हे डोक्यावरच्या टांगत्या तलवारीपेक्षा अधिक भीतिदायक असतं. झालो आपण वेगळे. मला माहीतेय तुला अजून गिल्टी वाटतं त्याचं, पण खरंच नको वाटून घेऊस.. चूक वगैरे तर अजिबातच नाही. हे सगळं ना आपण त्या प्रेमाच्या वायफळ संकल्पना मांडून ठेवल्यात ना म्हणून होतं. प्रेमाचं फालतू उदात्तीकरण करून ठेवलंय आपण. प्रेम ही एक नॉर्मल भावना आहे. रागावणं, रडणं, हसणं यांच्याइतकी साधी गोष्ट आहे. अमर प्रेम वगैरे सारखे तकलादू प्रकार तर अस्तित्वातच नाहीत.’’ त्याला माहीत होतं की तिचे प्रेमाविषयीचे विचार फारसे प्रेमळ नाहीत, पण आज त्या विचारात एक विखार जाणवत होता. प्रेमाचा राग होता, पण त्याहीपेक्षा स्वत:चा राग जास्त होता.
‘‘मला गिल्टी वाटणं साहजिकच होतं अग. आपलं नातं काही सहा महिन्यांचं नव्हतं.. सहा वर्षांचं होतं. सहा र्वष मी ज्या मुलीबरोबर सगळं शेअर केलंय.. आणि सगळं म्हणजे सग्गळं.. माझे विचार, माझी मतं, माझ्या भावना, माझ्या आवडीनिवडी, माझं शरीर, माझा बेड, माझ्या सगळ्या चित्रविचित्र फँटसीज्.. तिच्यापासून मी अचानक दूर दूर होतोय आणि दुसऱ्याच कोणाकडे तरी खेचला जातोय ही गोष्ट मला खूप खात होती. कळेचना मला मी काय करतोय. मी विश्वासघात करत होतो.. तुझा आणि स्वत:चाही. शेवटी ठरवलं काय तो एक निर्णय घ्यायचाच. चांगला वाईट माहीत नाही. परिणाम काय तेही माहीत नाही. पण काहीतरी ठाम निर्णय घ्यायचा आणि तो हा असा घेतला. तो घेतल्यावर तुला मी फसवतोय असं सारखं यायचं मनात. तसंही म्हणा हल्ली मुलं बदनामच आहेत. मुलींना चीट करण्यासाठी..’’ या वाक्याने वातावरण हलकं होईल असं उगाच वाटलं त्याला.
‘‘कारण तुम्ही करता चीट.. तुम्ही मुलं तशीच आहात.’’ ती जवळपास ओरडली. हे असं काही होणं त्याला अजिबातच अपेक्षित नव्हतं. मुठीत खूप घट्ट पकडून चोळामोळा करून ठेवलेली गोष्ट समोरच्याने केवळ गुदगुल्या केल्याने झटकन हातातून सांडून जावी तसं काहीसं झालं तिचं. तिला अचानक आपण कुठे आहोत याची जाणीव झाली. मात्र स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला नाही तिने. ‘‘मला हे सांगायचं नव्हतं तुला किंवा कदाचित सांगायचं होतं.. माहीत नाही. तू आयुष्यातून निघून गेल्यावर खूप वेगळंच वाटायला लागलं. म्हणजे सकाळी तुझ्या मेसेजची वाट पाहायचे पण तो यायचाच नाही किंवा बोअर झालंय म्हणून फोन करायला आता तू माझ्या स्पीड डायलवर नव्हतास. ‘आय नीड ब्रेक’ असं म्हटल्यावर मला मी जिथे म्हणेन तिथे घेऊन जाणारा माझा हक्काचा पार्टनर नव्हता आता. इमोशनली डिसेबल्ड झालेले मी. फिल्मी वाटेल पण खरंय हे. आणि त्याच काळात तो आला माझ्या आयुष्यात.. नुकतीच ओळख झालेली.. मुलगी सिंगल आहे आणि त्यातही नुकतंच ब्रेकअप झालंय म्हटल्यावर चार खांदे कायम तयार असतात तिच्यासाठी. त्यातलाच एक खांदा तो. हळूहळू बोलणं वाढायला लागलं आमचं. तो खूप फ्लर्ट करायचा माझ्याशी. मलापण आवडायचं ते. मग तुझी आठवण येईनाशी झाली. त्याच्यात मी पूर्णपणे गुंतले. त्याचा तो बेफिकीर स्वभाव आवडायचा मला. जे आहे ते सरळ तोंडावर बोलायचं. असंच एकदा तो तोंडावर बोलला ‘आय वाँट टू गेट लेड.. झोपायचंय मला तुझ्याबरोबर..’ दोन महिने झालेले आम्हाला एकमेकांबरोबर. खूप लवकर होतंय हे सगळं असं कोणीतरी आतून ओरडून सांगत होतं, पण धुंदी पसरलेली माझ्या मनात. त्या धुंदीच्या धुक्यात ते कोणीतरी ओरडणारं विरून गेलं. आम्ही खूप जवळ आलो एकमेकांच्या. मी पुरती त्याच्यात अडकलेले..’’ अचानक ती थांबली.
‘‘मग..मग काय झालं?’’ शक्य तितक्या भावनाशून्यतेने पाहायचा प्रयत्न केला त्याने तिच्याकडे. तो सपशेल फसला हे दोघांनाही कळलं.
‘‘मग काय.. एक दिवस त्याचा फोन आला. मला तुझ्यासोबत कोणतंच रिलेशन नकोय. मला कमिटमेंट नकोय कोणतीच. तुला हवं असेल तर आपण फ्रेंड्स राहू, पण आपल्यात पुढे काही होणं शक्य नाही.. रडले मी.. खूप रडले मी. त्याच्यापेक्षा जास्त राग मला स्वत:चा आला. कोणीही यावे टपली मारून जावे तशी अवस्था झालेली माझी. कोलमडलेच मी तेव्हा पूर्णपणे. आरशात बघितलं स्वत:ला.. इतकी घृणा कधीच वाटली नव्हती मला स्वत:ची. कोणीतरी १०-१५ थपडा लाथे बुक्के मारून शुद्धीवर आणल्यासारखं वाटलं मला. काय करून ठेवलं होतं मी हे. आता तो त्याची ही मर्दुमकी मित्रांमध्ये सांगणार की कसं त्या पोरीला पटवलं.. तिच्यासोबत झोपलो आणि कसं तिला वाऱ्यावर सोडलं.. स्वत:ला ‘स्टड’ म्हणवून घेणार आणि मला ‘स्लट’. खूप घाबरले मी. अस्वस्थ झाले. त्यादिवशी ऑफिसमधून सरळ हॉटेलमध्ये गेले.. एक बीअर मागवली.. एकटीच बसून प्यायले. कोण काय बघतंय याची काही फिकीर नव्हती मला. त्यादिवशी स्वत:मध्येच इतकी मश्गूल होते की माझं जग मीच आहे एवढंच मला जाणवत होतं. प्यायल्यावर डोकं हलकं झालं. शांत वाटलं की भासलं माहीत नाही. पण शांत होते, त्यानंतर खूप त्रास झाला या गोष्टीचा. वीकेंडला घरी राहिलं की ंमाझेच विचार मला खायचे मग ऑफिसचं काम घरी आणायला लागले. घरातली नसलेली कामं काढायला लागले. वीकडेजना ऑफिसमध्ये रात्र रात्र बसून राहायचे. हॉरिबल फेज होती ती..’’ तिने सरबताचा एक घुटका घेतला आणि शांतपणे त्याच्याकडे पाहून ती म्हणाली, ‘‘नको रिअ‍ॅक्ट होऊस.. कळतंय मला.. आणि कन्सोल वगैरे तर मुळीच करू नकोस मला..’’
‘‘आता कशी आहेस तू’’ त्याच्या या प्रश्नावर मात्र ती खुलेपणाने हसली.. पहिल्यासारखं. ‘‘आता एकदम मस्त आहे मी. या सगळ्यामुळे एका वेगळ्याच प्रोसेसला सामोरे गेले. स्वत:ची मानसिक क्षमता आजमावून पाहायला मिळाली मला. आणि आता तुझ्याशी हे सगळं शेअर केल्यावर बरं वाटतंय मला. आपल्याला ना एकदा कोणाच्या तरी भावनिक आधाराची सवय झाली की ती सुटणं मुश्कील होतं. मी इमोशनली पूर्णपणे तुटले आहे, याचा फायदा घेऊनच त्याने माझ्याकडून फिजिकल प्लेजर मिळवलं.. अर्थात ते वन साईडेड नव्हतंच मलाही ते हवंच होतं. पण त्याही पेक्षा जास्त मला भडाभडा बोलण्यासाठी कोणीतरी हवं होतं. हल्ली ना आपण मनाने इतके वीक झालो आहोत की दिसायला सुंदर आकर्षक पण असायला मात्र थर्माकॉलचं मन. पण मला त्यानंतर एक प्रश्न राहून राहून पडतो. आपण कमिटमेंटपासून लांब का पळतो.. व्हाय..?’’
‘‘खरंय तुझं. हल्ली आपल्याला प्रेम करण्यापेक्षा सेक्स करण्यासाठी पटकन कोणीतरी मिळून जाते. आणि आपण कमिटमेंटपासून नाही स्वतपासून लांब पळतो. स्वत:च्या इमोशन्सपासून दूर जातो. आपण एखाद्यात गुंतत गेलो की कदाचित ती व्यक्ती आपल्याला फसवून किंवा सोडून निघून जाईल त्यापेक्षा आपणच का सोडू नये तिला.. एखाद्यावर मुरून प्रेम करणं झेपतच नाही ग आपल्याला. कारण आपल्याकडे ऑप्शन्स रेडी असतात; त्यामुळे जरा काही बिनसलं की स्वल्पविराम येण्याच्या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊन मोकळे होतो. नात्यांना वेळच देत नाही. किती गंमत आहे ना.. ज्या गोष्टींची नितांत गरज असते आपल्याला त्यांच्यापासूनच दूर पळतो आपण कायम..’’ न जाणो हे केव्हापासून बोलायचं होतं त्याला. अचानक काहीसं आठवल्यासारखं त्याने तिला विचारलं, ‘‘पण मग तू आता खरंच बाहेर आली आहेस ना त्यातून..?’’
‘‘हो आलेय.. आधी खूप घाबरलेले.. लोकांना जेव्हा कळेल तेव्हा माझ्या कॅरेक्टरवर कितीतरी प्रश्न उठवले जातील याची सतत धास्ती असायची मनात. पण मग नंतर नंतर जाणवलं की हल्ली लोकांच्याच आयुष्यात इतके कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स असतात त्यातून त्यांना उसंत मिळत नाही.. प्रत्येकजण आपापली लढाई लढतोय. माझी लढाई मी कशी लढतेय याच्याशी त्यांना देणघेणं नाहीये. आणि असलं तरी हू केअर्स.. त्यांच्या म्हणण्याने किंवा न म्हणण्याने मी कॅरेक्टरलेस होत नाही. नैतिकतेचे नियम हे स्वत स्वतला घालायचे असतात. ते इतरांना शिकवायला जायचे नसतात. आाणि तसंही हे आपलं वय ना आपल्याला खूप काही शिकवत असतं. आपणच शिकायचं विसरून जातो. एकदा तुम्हाला कुठे थांबायचं कळलं ना की समोरच्यालाही योग्य वेळी अडवता येतं. मी ते शिकलेय आता.’’
‘‘बापरे.. सहा महिन्यांत सहा इयत्तांचे धडे शिकलीस तू तर. पण खरं सांगू तर मला अजूनही तुझी काळजी वाटते. आणि आपल्याला एकमेकांशी काही शेअर करायला मला तरी कोणत्याही नात्याच्या लेबलची गरज वाटत नाही. अगदी मैत्रीच्याही नाही. आपण दोघं एकमेकांना कशाहीवरून जज न करता काहीही बिनदिक्कितपणे सांगू शकतो. आणि..’’ एवढय़ात त्याचा फोन वाजतो.
‘‘काय म्हणाली मेघना..? मला भेटणार म्हणून सांगितलेलंस का..?’’
‘‘हो. अगं.. माहितेय तिला. सहज केलेला फोन तिने. ऐक ना, आपण बाजूच्या त्या बुकस्टोअरमध्ये जाऊया का कित्येक दिवस झाले मी पुस्तकच विकत घेतलं नाहीये..’’
‘‘चल जाऊ.. मी ना सध्या एक मस्त पुस्तक वाचतेय .. थांब सांगते तुला. बिल देऊ आधी.’’ आपापल्या ऑर्डरचे पैसे देऊन ते दोघं निघाले.
अजूनही एकमेकांच्या प्रेमात होते का ते.. गुंतलेले होते का अजूनही.. या प्रश्नांवर काथ्याकूट न करता आयुष्यातल्या अनमोल व्यक्तीचा सहवास ते दोघेही एन्जॉय करत होते. प्रेम होतं का ते.. होतं किंवा नव्हतंही.. काही म्हणा.. हू केअर्स..
प्राची साटम- response.lokprabha@expressindia.com

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष