मराठी चित्रपटांचे आशय-विषयांचे वैविध्य हा ‘यूएसपी’ आहेच. मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धूम मचवल्यानंतर अधिकाधिक अमराठी लोक निर्माता म्हणून मराठी सिनेमाकडे वळले. त्याचबरोबर अक्षय कुमार-अश्विनी यार्दी, रोहित शेट्टी, अजय देवगण, रितेश देशमुख अशा हिंदीतील कलावंतांनीही मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यात पुढाकार घेतला. आता परदेशांत स्थायिक असलेल्या मराठी लोकांनी आपल्या मातृभाषेत सिनेमा बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

यापूर्वी श्रीहरी साठे या परदेशात चित्रपट शिक्षण घेतलेल्या आणि परदेशात चित्रपट बनवून यशस्वी झाल्यानंतर अलीकडेच ‘एक हजाराची नोट’ या वैदर्भीय भाषेतील चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. विशेष म्हणजे हा २०१४ मधील लक्षणीय मराठी चित्रपट तर ठरलाच त्याचबरोबर राष्ट्रीय पारितोषिकावरही या चित्रपटाने आपली मोहोर उमटवली होती.
ईस्टवेस्ट फिल्म्स या आपल्या संस्थेतर्फे नितीन अडसूळ व सचिन अडसूळ या भावंडांनी त्यांचे मित्र रूपेश महाजन आणि अमेरिकन मित्र डेरेल कॉक्स आणि क्लार्क मॅकमिलियन यांना घेऊन अस्सल मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘परतू’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट सध्या निर्मितोत्तर प्रक्रियेत आहे. हा सिनेमा खऱ्या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय मराठी सिनेमा’ हे बिरुद मिरविणारा आहे.
चित्रपटाचे कथानक आपल्या मातीतले, कलावंत आपल्या मातीतले, परंतु चित्रपटाची निर्मितिमूल्ये, नियोजन व्यवस्था आणि निर्मिती करण्यामागचा विशाल दृष्टिकोन मात्र आंतरराष्ट्रीय अशा भूमिकेतून ईस्टवेस्ट फिल्म्सने ‘परतू’ हा मराठी सिनेमा बनविला आहे.
आपली ही भूमिका विशद करताना निर्माते-दिग्दर्शक आणि या चित्रपटाचे कथालेखक नितीन अडसूळ म्हणाले की, अमेरिका असो की भारत किंवा अन्य कुठला देश असो, सर्वत्र मानवी भावभावना, आपले कुटुंब, आपली माणसं यांच्याविषयीची ओढ सारखीच असते. त्यामुळेच या सिनेमाची कथा सारांशरूपाने आमच्या चारही मित्रांना सांगितली तेव्हा सर्वानाच यावर सिनेमा होऊ शकतो, असा सार्वत्रिक होकार मिळाला आणि मग पुढे जायचे ठरविले.
‘परतू’ या चित्रपटाची थोडक्यात कथा अशी आहे की, एक राजस्थानी मुलगा अगदी लहान असताना ग्रामीण भागातील गरीब मराठी शेतकरी कुटुंबाला सापडतो. राजस्थानी बोलीशिवाय त्याला कोणतीही भाषा येत नसते. तरीही मराठी शेतकरी कुटुंब त्याला वाढविते आणि स्वत:च्या राजस्थानमध्ये असलेल्या मूळ गावाविषयी या मुलाला फक्त तीनच शब्द ठाऊक असतात; पण या तीन शब्दांवरून मराठी शेतकरी या राजस्थानी मुलाला त्याचे घर मिळवून देतो किंवा शोधून देतो. मात्र यासाठी बराच कालावधी लागतो. चित्रपटाचे शीर्षक हेच मध्यवर्ती भूमिकेतील नायकाचे नाव असून नायकाची ही भूमिका सौरभ गोखले या कलावंताने साकारली आहे.
‘राधा ही बावरी’, ‘दोन घडीचा डाव’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केल्यानंतर सौरभ गोखले प्रथमच ‘परतू’ या मराठी सिनेमात काम करतोय.
चित्रपटाची ही कथा सत्य घटना आहे. वडिलांकडून एकदा ऐकली होती. म्हणून याच कथेवर सिनेमा करण्याचे निश्चित झाल्यानंतर आणखी तपशीलवार माहिती मिळवून संबंधित कुटुंबातील लोकांच्या मुलाखती घेतल्यानंतर मी, क्लार्क मॅकमिलियन असे आम्ही दोघांनी मिळून पटकथा लिहिली. अमेरिकस्थित असलेलेच आमचे मित्र मयूर देवल यांनी आम्हाला संवादलेखन करून दिले आणि प्रत्यक्ष चित्रीकरणासाठी भारतात परतलो, असे नितीन अडसूळ यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक भूमिकेसाठी आम्ही ऑडिशन्स घेतल्या आणि नंतरच परतू या प्रमुख भूमिकेसाठी सौरभ गोखले, तर त्याच्या मराठी शेतकरी कुटुंबातील आईवडिलांच्या भूमिकेसाठी किशोर कदम आणि स्मिता तांबे यांची निवड केली.
या सिनेमाचे वैशिष्टय़ म्हणजे हॉलीवूडचे संगीत संयोजक ग्रेग सिम्स यांनी ‘परतू’चे पाश्र्वसंगीत केले आहे. निर्मिती करण्याचे ठरविल्यानंतरही फक्त अमेरिकन किंवा परदेशी तंत्रज्ञ-तज्ज्ञ न घेता आपल्याकडील मराठीतील गुणवत्तापूर्ण चमूला घेऊन उत्तम मराठी आणि अमेरिकन अशा मंडळींचा उत्तम चमू असला, तर उत्कृष्ट मराठी सिनेमाची निर्मिती करता येईल, हा विचार नितीन अडसूळ यांनी केला, हेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
छायालेखन संजय खानझोडे यांचे असून राजेश राव यांनी संकलन केले आहे. संगीत शशांक पोवार यांचे आहे. बालकलाकार यश पांडे, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला, रवी भारतीय या कलावंतांच्याही यात भूमिका असून एप्रिलपर्यंत चित्रीकरणोत्तर प्रक्रियेचे काम पूर्ण केले जाणार आहे.
सुनील नांदगावकर

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे